काही दिवसांपूर्वी एक लेख एका वेबसाईटवर वाचण्यात आला.. तो वाचल्यावर असं लक्षात आलं की हा अनुभव मलाच नाही तर अनेक गव्हाळ, गेरुवा किंवा सावळ्या रंगाच्या स्त्रियांना नक्की आला असेल. 1996 साल... मला ललित कला केंद्राची पाठ्यवृत्ती मिळाली होती. आणि त्याकरिता दीड वर्ष चेन्नईतल्या ललित कला केंद्रात काम करावं लागणार होतं. म्हणजेच चेन्नईत राहाणं गरजेचं होतं. एका वेगळ्या राज्यात राहून काम करायला मिळणार याचा आनंद होता. आणि आनंदाने मी तिथल्या एका वर्किंग वूमेन्स हॉस्टेलमध्ये राहाण्याची सोय करुन घेतली होती. म्हणजे काम करताना वेळेचे बंधन नको. रात्रीचे 10 वाजले तरी चालेल, असे हे हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये दक्षिण भारतातल्या राज्यातून आलेलेया अनेक स्त्रिया. या दाक्षिणात्य स्त्रियांचं सौंदर्य खूप ठसठशीत आणि मोहक असे आजही आहे. बरं फक्तं दक्षिण भारतातल्याच स्त्रिया नव्हत्या तर सिन्हली म्हणजेच श्रीलंकेतून रोजगारासाठी आलेल्या अनेक मुली इथे राहात होत्या. या हॉस्टेलमध्ये चौथ्या मजल्यावर माझी खोली.. आम्हा चौघींची ती खोली. एका भल्या मोठ्या खोलीत चार लोखंडी पलंग आणि चौघींसाठी चार वेगवेगळी कपाटं.. मी महाराष्ट्राची, दुसरी केरळ, तिसरी तामिळनाडूतल्या तिर्थ क्षेत्रातून म्हणजे मदुराईतून तर चौथी आशा ही सिन्हली.. श्रीलंकेची.. सिन्हली भाषेबरोबर तमिळ भाषेत देखील उत्कृष्ट होती. ही आशा नावाची रुमी किंवा रुममेट तीन-चार महिन्यातून आपल्या घरी म्हणजे श्रीलंकेत जायची.. जायच्या आधी तिची एकच महत्त्वाची खरेदी असायची.. 50 ते 100 ट्यूब्स ‘फेअर अँड लव्हली’ या फेअरनेस क्रिमची.. एक लॉयल ग्राहक.. तिला अनेकदा समाजवलं की अगं याने काही होत नसतं पण मनात लहानपणा पासून रुजवलेला काळ्या रंगा बद्दलचा न्यूनगंड..असो.. हॉस्टेलमधला माझा पहिला दिवस उजाडला.. तो रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण हॉस्टेल गजबजलेलं... जाग आली तीच कलकलाटाने.. आमच्या खोलीत माझ्या रुमींच्या काही मैत्रिणी आल्या होत्या. किलकिल्या डोळ्यांनी मी त्यांच्याकडे पाहिलं. पण त्यांचे चेहरे फार विचित्र दिसत होते.. म्हणून माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहाण्यासाठी मान वळवली तर इतर रुमींचे चेहरे तसेच.. पिवळे.. खाडकन जागी झाले, स्वच्छ डोळे धुतले आणि बाहेर आल्यावर पॅसेजमध्येदेखील तेच दृश्य.. पिवळटलेले चेहरे.. मला समजेना.. बरं फक्त चेहरा पिवळटलेला, तर तसं ही नाही.. पाय-तळपाय, अगदी खांद्यापासून ते नखांपर्यंतचे हात सगळंच पिवळं.. अंग पिवळं तर केस हिरवे.. मी वगळता सगळ्याच तशा जणू काही रविवारची या हॉस्टेलची प्रथा असल्यासारखे. पोटात भूकेचा खड्डा पडल्याने कॅन्टिनला गेले.. तर कॅन्टिनच्या अण्णासहित तिथल्या वाढप्यांसहित सगळ्यांच्या चेहऱ्यावर विचित्र पिवळ्या रंगाची छटा.. शेवटी न राहात विचारलं.. अण्णा.. ये क्या है.. माझं नशिब त्यावेळी अण्णा म्हणावं हे सुचलं नाहीतर आम्हा मुंबईकरांना भैय्या म्हणायची सवय.. माझा हिंदीतला प्रश्न त्याला किती समजला त्यालाच माहिती. ( साल 1996 असल्याने आत्तासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हाची परिस्थिती आणि आताची याच्यात खूप बदल झालेयत.. काही दिवसांपूर्वीच एका सर्व्हेनुसार आज तिथली 60 % तरुण तामिळ जनता हिंदी भाषेत संवाद साधते.) पण मात्र मला माझं उत्तर मिळालं होतं.. अण्णा म्हणाला ‘अम्मा.. white face.. नल्ला फेस.. turmeric –oil, अम्मा’... वीज चमकावी आणि लख्ख प्रकाश पडावा तसा प्रकाश माझ्या डोक्यात पडला.. अरे बापरे कठीण आहे. इतकं गोऱ्या रंगाचं आकर्षण..ही माझी पहिली प्रतिक्रिया.. तेव्हा लक्षात आले की आज ही पिवळाई पसरली होती, ती आपापलं सौंदर्य खुलवण्यासाठी. हा अनुभव सकाळचा, तर रात्रीची तऱ्हाच वेगळी.. सगळ्यांच्या कपाटातून ‘फेअर अँण्ड लव्हली' ही क्रिम निघते काय आणि चेहऱ्यावर मुरावली काय जाते.. सगळच अजीब होतं.. बरं हा रोज रात्रीचा क्रम.. मात्र दीड वर्षात मला एकाही हॉस्टेलच्या मुलीचा रंग उजळलेला दिसला नाही. अनेकदा माझ्या रुमींना, तिथल्या नव्याने झालेल्या मैत्रिणींना समजावण्याचा प्रयत्न केला.. पण त्यांच्या मते माझा गव्हाळ रंग देखील गोरा असल्याचा दावा त्या करत असत. खरंतर या चारचौघींना सांगून असा काय बदल घडणार होता.. मुळात आपल्या समाजातच गोरी त्वचा असणं म्हणजे सुंदर असणं हा विचार इतका खोलवर रुजलाय की तो पुसून काढायला अजून किती दशकं जातील सांगू शकत नाही. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात गोऱ्या रंगाला महत्वं दिलं गेलंय.. लहानपणापासूनच हे मनावर बिंबवलं जातं.. अगदी जन्माला आल्यापासून मालीशवाली बाई हळद आणि बेसनाचा लेप चोळत असताना बाळाशी बोलत असते.. बघ आता कशी महिन्याभरात तुला गोरी करते की नाही.. शाळेत गेल्यावर गोऱ्या मुलींना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात राणीचा, परीचा प्रवेश दिला जातो.. आणि काळ्या मुला-मुलींना एकतर घेतच नाही आणि घेतलंच तर कोरसमध्ये किंवा फक्त झाडू मारण्याकरीता. म्हणजे कामवाली बाई किंवा गडी माणसाचे प्रवेश.. तोही छोटासा. पुढे मुलं वयात आली की गव्हाळ वर्ण असलेल्या मुला-मुलींना तशाच पद्धतीचे स्थळ आत्या, मावशी, मामी सुचवू लागतात.. आजही एखादी सौंदर्य क्रिम बाजारात आली की, जाहिरातीमध्ये इतर गुणधर्म सांगण्याऐवजी एकच गुण जोर देऊन सांगितला जातो.. त्वचा गोरी करण्याचा.. आता तर पुरुषांसाठी देखील या फेअरनेस क्रिमवाल्यांनी अधिक प्रभावी क्रिम बाजारात आणली आहे.. हे इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे तो वाचलेला लेख. त्या लेखात एका फोटोचा आणि चित्राचा उल्लेख आहे. फोटो अतिशय सुंदर आणि एक वेगळा संदेश देणारा आहे. हा फोटो काढला आहे तो पाकिस्तानच्या पण कॅनडास्थित एका स्त्री कलाकाराने.. झैनब अनवर . आणि याच फोटोग्राफवरुन प्रेरित होऊन बांगलादेशातल्या एका स्त्री कलाकाराने रेखाटलेलं चित्र देखिल तितकच प्रभावी आहे. वासेकर नहार असं या चित्रकाराचे नाव. या दोन्ही कलाकृतीत एका गव्हाळ रंगाच्या आणि रेखीव नाक –डोळे असलेल्या स्त्रीच्या डोक्यावरुन पदर दाखवण्यात आलाय.. ज्यातून देशाच्या संस्कृतीशी नातं जोडलेलं दिसतं.. पण तिथेच या रुजलेल्या गोरेपणाच्या प्रथेवर आपली नाराजी ती हातात डार्क अँण्ड लव्हली अशी अक्षरं असलेली क्रिम घेऊन दर्शवते. या चित्राकडे पहिल्यावर आपण सगळेच खाडकन फेअर अँण्ड लव्हली च्या स्वप्नातून जागं होतो आणि विचार करु लागतो, येस ‘डार्क हेच ब्युटिफुल’..