Selvi Movie Review: सेल्वी - कटलेला पतंग आणि फिश पाँड

Selvi Movie Review: तामीळ भाषेत लग्न न झालेल्या तरुणीला आदरानं सेल्वी संबोधलं जातं. शैलेश रत्थकुमारच्या सेल्वी (2026) सिनेमातल्या मुख्य पात्राची अवस्था ही अशीच आहे. सेल्वी (अंजली पाटील) छोट्या गावातून शहरात आलेली घरातली मोठी मुलगी आहे. इथं ही सर्वांची 'अक्का' आहे. ती आरोग्य सेवक आहे. आरोग्य सेवक म्हणजे, नर्स नव्हे तर होमवर्कर. सेल्वीला सिंगापूरला जाऊन नर्स बनायचंय. त्यासाठी ती अभ्सास ही करतेय. तिची सहकारी आणि रुम पार्टनर मैत्रिण कविता, प्रेमभंगातून आत्महत्येचा प्रयत्न करते. मग सेल्वीचं दिवसच बदलतात. 12 तासांची शिफ्ट आता 24 तासांची होते आणि मग तास वाढतच जातात. पाच-पाच दिवस डोळ्याला झोप नाही अशी व्यावसायिक समस्या असते. हे कमी की काय तिच्या खासगी आयुष्यातला गुंता वाढत जातो. यातून आता स्वयंसिध्दा सेल्वी बाहेर कशी पडणार याची गोष्ट शैलेश रत्थकपमारची फिल्म दाखवते. दक्षिण कोरियातल्या प्रतिष्ठित बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (2026) इथं सेल्वीचा वर्ल्ड प्रिमियर पार पडतोय. सेल्वी व्हिजन एशिया या विभागात स्पर्धेत उतरलेय.
अंजली पाटील या सिनेमाची मुख्य ही आहे आणि प्रोड्युसर ही. तिच्या अनाहत या प्रोडक्शन हाऊसची ही पहिली फिचर फिल्म निर्मिती आहे. सेल्वीची भूमिका अंजलीची सर्वोत्तम म्हणता येईल. सेल्वी घरातली कमावती पोरगी आहे. छोटी बहिण अजूनही शाळेत शिकतेय आणि वडील डायलेसीसवर आहेत. घराची आर्थिक बाजू सेल्वीच्या खांद्यावर आहे. त्यासाठीच तिनं गाव सोडलं आणि शहरात एका एजन्सीच्या मदतीनं आरोग्य सेविका बनली. शहरात याला होम केअर असं गोंडस नाव दिलं गेलंय. हे काम महत्त्वाचं आहे. नर्स किंवा डॉक्टर नसताना रुग्णांची जबाबदारी या होमवर्करवर असते. पण भवतालच्या दृष्टीने त्यांचं काम अतिशय नगण्य. त्याचं अस्तित्वच नाकारणारी स्थिती असते असं असताना न थकता काम करणं, रुग्णांना सकारात्मक ठेवणं. त्याची शारीरीक आणि मानसिक काळजी घेण्याचं काम हे होमवर्कर करत असतात. त्याच बरोबर ते सेल्वी प्रमाणेच कुणाची घरची कमावती मुलगी, आई आणि बहिण असते. या परिस्थितीत स्वतःसाठी वेळ मिळणं खुप कठीण असतं. जो वेळ मिळतो तो स्वतःला सावरण्यात आणि या चक्रातून बाहेर पडण्यासाठी करायच्या प्रयत्नात खर्ची होतो.
शैलेथच्या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी. श्रीधरनं सेल्वीच्या मनाची गुंतागुंत आपल्या फ्रेमिंगमधून दाखवलंय. कॅमेरा सतत सेल्वीला फॉलो करतो. तिची जी अस्वस्थता आहे ती कॅमेऱ्यातून स्पष्ट दिसते. सिनेमाची सुरुवात सेल्वी आणि कविता दोघी पतंग उडवतायत या सीननं होते. कविताचा पतंग कापला जातो सेल्वीचा हवेत मस्त फिरत राहतो. दोघांनाही उंच भरारी घ्यायचीय. कविताची स्वप्न तिच्याप्रमाणेच बोलकी आहेत. ती बडबडी आहे. सेल्वी तशी नाही. ती बुजरी आहे. अनेक अपेक्षांचं ओझं तिच्या खाद्यावर आहे. स्वतःसाठी तिनं पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची तिची तयारी आहे. पण अनेकदा आपण ज्या गोष्टी प्लान करतो तश्या घडतीलच असं नाही. सेल्वीच्या बाबतीतही असंच होतं. तिच्या भविष्याचा पंतग असाच कापला जातो, ती भरकट जाते. परिस्थितीच्या गुंतागुतीतून साचलं पण येतं. हे दाखवण्यासाठी शैलेशनं फिश पाँडचा मिथकासारखा केलेला वापर एकदम बेस्ट आहे. समुद्रात मुक्त फिरणारा मासा फिश पाँडच्या भांड्यात वळून वळून पुन्हा त्याच जागी येत राहतो. सेल्वीची अवस्थाही अशीच झालेली असते. हे इतक्या चांगल्याप्रकारे दाखवण्याचं सर्व श्रेय दिग्दर्शक डिओपीच्या जोडीचं.
अंजलीनं साकारलेली सेल्वी प्रचंड गुंतागुंतीची आहे. या गुंत्यातून की आता कशी बाहेर पडणार याचा विचार प्रेक्षक क्षणाक्षणाला करत असतात. सेल्वीप्रमाणे त्यांचं मनही असंच धावत असतं. हीच सेल्वी सिनेमा पाहण्याची खरी गंमत आहे.
ट्रेंडिंग न्यूज






















