कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या महत्वपूर्ण औषधाची टंचाईची, बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची जागा काही दिवसांपासून या आजाराच्या उपचारात योगदान ठरणाऱ्या प्राणवायूने घेतली आहे. कुठल्याही वैद्यकीय तज्ञाने स्वप्नातही विचार केला नसेल कि राज्यात रुग्णाच्या उपचारात वापरात येणाऱ्या प्राणवायूची टंचाई भासून त्यावर संपूर्ण राज्यात यावरून ओरड होऊ शकते. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांपासून ते अन्न औषध प्रशासन मंत्री सध्या या प्राणवायूचा पुरवठा सर्व रुग्णालयातील राज्यात व्यवस्थित व्हावा म्हणून युद्धपातळीवर काम करीत आहे.


कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने 'प्राणवायूचा' वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि त्यातूनच सुरु झाल्या त्या प्राणवायू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी, गेल्या काही दिवसाचा जर अन्न औषध प्रशासन विभागाचा कोरोनाच्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन प्राणवायूचा अहवाल पाहिला तर सर्वात जास्त पुणे विभागात प्राणवायूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्या खालोखाल नाशिकात प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. दीड महिन्यापूर्वी कोरोनाचा 'हॉटस्पॉट' असणाऱ्या मुंबई विभागाला ऑक्सिजन वापराच्या बाबतीत मात्र पुणे आणि नाशिक विभागाने मागे टाकले आहे. या दोन विभागाचा प्राणवायूचा वापर संपूर्ण राज्यात एकूण वापरण्यात येणाऱ्या प्राणवायू वापरच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे.


राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. या रुग्णांवर व्यवस्थित उपचार व्हावेत, कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य व्यवस्था त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तरीही काही बाबतीत त्यांनी निर्माण केलेल्या सुखसोयी अपुऱ्या पडत असून अधिक वाढविण्यासाठी त्यांची धावपळ सुरूच आहे. या सर्व निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये 'प्राणवायू' या विषयाने गेल्या काही दिवसापासून विशेष महत्त्व प्राप्त करून घेतले आहे. राज्यातील विविध भागात प्राणवायूचे वितरण आणि त्याचा वापर व्यस्थित व्हावा कोणत्याही प्रकारचा अपव्यय किंवा गळती होऊ नये याकरिता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यातील जिल्ह्यांची सात विभागात विभागणी केली आहे त्यामध्ये, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या विभागाचा समावेश आहे.


अन्न आणि औषध प्रशासन विभाग दररोज कोरोना रुग्णालयात प्राणवायूचा राज्यात होणार वापर आणि सध्याचा साठा यावर दैनंदिन अहवाल सादर करत असतो, त्याच्याच रविवारी दिलेल्या अहवालानुसार एका दिवसात संपूर्ण राज्यात 771.347 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरीता करण्यात आला आहे आणि 796.729 मेट्रिक टन प्राणवायू पुरविण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात अधिक वापर हा पुणे विभागात करण्यात आला असून तो 347.3 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात इतका वापर का होतोय त्याची कारणे फार सोपी आहेत. पुणे विभागात मुख्यत्वे करून पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या मोठ्या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. या पूर्ण विभागात 436 कोरोनाचा उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये असून राज्यात सर्वात जास्त रुग्णालय असणार हा विभाग आहे. या विभागातील एकट्या पुणे जिल्ह्याला 213.530 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर एका दिवसात केला गेला आहे आणि 217 मेट्रिक टन इतका प्राणवायू पुणे जिल्ह्याला पुरविण्यात आला आहे.


त्याखालोखाल नाशिक विभागात प्राणवायूचा वापर करण्यात आला असून तो 92.060 मेट्रिक टन इतका आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 274 कोरोनाचे उपचार देणारे रुग्णालय असून सर्वात जास्त प्रव्ययच वापर नाशिक जिल्ह्यात झाला असून तो 34.200 मेट्रिक टन इतका आहे. त्यानंतर मुंबई विभागात 86.204 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर करण्यात आला असून मुंबई विभागात फक्त मुंबई जिल्ह्याचा समावेश असून या विभागात कोरोनावर उपचार करणारी 61 रुग्णालये आहेत.


तर राज्यात सर्वात कमी प्राणवायूचा वापर अमरावती विभागात होत असून तो 24.507 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश असून येथील 31 रुग्णालयात कोरोनाचे उपचार देण्यात येत आहे. या विभागात सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यात 10.320 मेट्रिक टन इतका प्राणवायूचा वापर येथे करण्यात आला आहे. त्यानंतर औरंगाबाद विभागात 69.420 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर करण्यात आला असून या विभागात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात एकूण 96 रुग्णालयात कोरोनाचे उपचार दिले जातात. या विभागात सर्वात अधिक प्राणवायूचा वापर औरंगाबाद जिल्ह्याचा असून तो 23.800 मेट्रिक टन इतका आहे. तसेच ठाणे विभागात 71.856 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर केला गेला असून या विभागात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. या मध्ये सर्वात जास्त प्राणवायू ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना लागला असून तो 60.33 मेट्रिक टन इतका आहे. तर नागपूर विभागात 80 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर केला गेला असून या विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या विभागात 71 रुग्णालये कोरोनाचा उपचार करीत आहे. या विभागात सर्वात जास्त प्राणवायूच वापर नागपूर जिल्ह्याने केला असून तो 60 मेट्रिक टन इतका आहे.


या सध्याच्या विभागाने दिलेल्या आकड्यानुसार आजच्या घडीला प्राणवायूचा पुरवठा राज्यात सध्या तरी व्यवस्थित दिसत आहे. तसेच या अहवालातील आकड्यानुसार 547.956 मेट्रिक टन इतका प्राणवायूचा साठा या राज्यातील एकूण 1096 या कोरोनाचे उपचार देणाऱ्या रुग्णलयात सध्याच्या घडीला उपलब्ध आहे.


एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते डॉक्टर ठरवतात. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजारात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात प्राणवायूची गरज भासत आहे.


कोरोनाबाधित काही प्रमाणातच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.

काही दिवसांपासून अनेक रुग्णांलयांच्या अचानकपणे प्राणवायू कमी पडत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ते म्हणजे, साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50% या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. हे केल्यानंतर लक्षात आले प्राणवायची ज्या वाहनाने वाहतूक करतात त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो, परिणामी प्राणवायू वेळेवर रुग्णालयांना पोहचत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनातर्फे रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या वाहनाची वाहतूक कोंडीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही म्हणून या वाहनांवर सायरन आणि रुग्णवाहिकेला वापरत येणारी बत्ती लावण्यास अनुमतीही दिली आहे.

येत्या काळात जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर प्राणवायूचा वापरही वाढू शकतो. अशा काळात सध्या रुग्णांची संख्या म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्याशिवाय प्राणवायूचे उत्पादन वाढविण्याकरिता उत्पादकांना सूचना देणे सोबतच नवीन प्राणवायू निर्मितीचा प्लांट टाकता येईल का? यासंदर्भात चाचपणी युद्धपातळीवर करावी लागणार आहे.