मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतोय, परंतु हा आकडा इतका झपाट्याने वाढतोय की त्याने प्रशासनासमॊर मोठे आव्हान उभं केलंय. काही दिवसांपासून राज्यात दिवसाला 1 हजारपेक्षा जास्त नवीन रुग्णाचं निदान होत आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबई शहरातील आहे. सध्या मुंबईमध्ये रुग्णांची धावपळ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. घरातील कोणी एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली तर, भले-भले मी म्हणाऱ्यांची भंबेरी उडतानाच चित्र दिसत असून त्या रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्ण रुग्णालयात दाखल करून घेताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर चुकून एखादी व्यक्ती कोविड19 विषाणूंच्या प्रादुर्भावाने ग्रस्त झाली तर होणारी अनाठायी 'धावपळ' तुमच्या पदरी आलीच म्हणून समजून जा, त्यामुळे अशा काळात आजारी पडणं गुन्हा आहे की काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मी, 'कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही' या शीर्षकाखाली, कुणी स्वतःहून कोरोना व्हावा म्हणून प्रयत्न करत नाही, कोरोना होणे म्हणजे काय गुन्हा नव्हे मात्र तो लपवणं हे कुठल्याही गुन्ह्यापेक्षा कमी नाही. या विषयावर विस्तृत लिखाण केले होते. मात्र, त्या एप्रिलच्या पहिल्या दिवसात आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कमालीची तफावत आहे. 1 एप्रिल रोजी राज्यातील एकूण रुग्ण संख्या 335 होती तर 33 नवीन रुग्णाचं निदान झालं होतं आणि 13 जण या आकाराने मृत्यमुखी पडले होते. तर 9 मे रोजी राज्यातील एकूण रुग्ण संख्या 20 हजार 228 आहे तर 1165 नवीन रुग्णाचं निदान झालं असून आतापर्यंत मृतांची संख्या 779 इतकी आहे. अनेक आरोग्य तज्ञांनी या अगोदरच कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्यात वाढू शकते याचं अनुमान व्यक्त केले होते. संपूर्ण भारतात मुंबई शहराची रुग्ण संख्या अधिक असून, या महाभंयकर परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता राज्याची आणि महापालिकेची आरोग्य यंत्रणा काम करत आहे.
अचानकपणे वाढलेल्या रुग्णांची संख्याच एवढी आहे की, त्या सर्व रुग्णांना उपचार देण्याकरिता सर्वच पातळीवर शर्थीचे प्रयत्न करूनही कुठेना-कुठेना काही तरी कमी पडत आहे. काही ठिकाणी मनुष्यबळ, पायाभूत साधनसामुग्री याची कमतरता जाणवत आहे. प्रशासन अनेक पातळीवर विविध समस्यांना तोंड देत उत्तर शोधत असून काही ठिकाणी यश मिळवीत आहे. मात्र, या सर्व प्रकारात नागरिकांचे आरोग्य हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज असून, आरोग्य व्यस्थापनात काही बदल निश्चित करावे लागणार आहे. कारण आजही एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला त्याला कोणत्या रुग्णलयात बेड मिळेल याची खात्रीलायक माहिती देणारी कोणतीही व्यवस्था आज उपलब्ध नाही. आणि खरी अडचण इकडेच सुरुवात होते अनेक वेळा धावपळ केल्यानांतर समस्यांचे निराकरण होत सुद्धा, नाही असं होत नाही, पण ती अनाठायी होणारी धावपळ जर थांबवू शकलो तर नातेवाईकाचा मानसिक ताण हलका करण्यास नक्कीच हातभार लागू शकतो.
याकरिता हेल्प लाईन सुरु केली आहे. मात्र, त्या प्रक्रियेत खूप वेळ जात आहे. अनेक दिवसांपासून विविध स्तरांवरून एक मोबाईल अॅप तयार केलं जावं अशी मागणी होत असून, त्यावर शहरात किंवा राज्यात कोविड-19 बाधित आणि कोविड -19 बाधित नसणाऱ्या रुग्णांना कुठल्या रुग्णालयात जागा मिळेल, अशी माहिती मिळेल. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात हे शक्य असून त्यावर रोज संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला अपडेट मिळू शकतात. आजही एखाद्या अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णास खासगी रुग्णालयात घेऊन गेल्यावर, त्यावर उपचारांपेक्षा तेथील प्रश्नांच्या भडिमारामुळे नातेवाईकांचा जेव मेटा-कुटीला येतो. त्यांचीही अपरिहार्यता असेल पण यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचे आहे. या कोरोनाकाळात रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला रुग्ण दाखल करताना ज्या पद्धतीने 'ट्रीटमेंट' मिळते, ती नक्कीच सुखद नाही, ती सुखद अशी अपेक्षाही नाही. मात्र, नक्कीच ती दुःखदही नसावी.
एक मात्र खरं मानायला पाहिजे की, राज्याची आणि महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणि त्यातील डॉक्टरांसहित सर्व आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहे. जीवाची बाजी लावून ते रुग्णांना उपचार देत आहे. मात्र, काहीवेळा या व्यवस्थेत संबधितांपर्यंत सूचना व्यवस्तिथ पोहचत नसून किंवा योग्य सवांदाअभावी थोडाफार गोंधळ उडत असून या छोट्या चुका दुरुस्त करायला वाव आहे.
कोरोनामय वातावरण आणि कोरोनाबाधित रुग्ण आपणास आता नवीन नाही, टाळेबंदी लागू होऊन 45 पेक्षा जास्त दिवस उलटलेत. आतापर्यंत बरेच रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी गेलेत, हे आपल्या आरोग्य यंत्रणेचं यशच मानावे लागेल. मात्र, सुरुवातीच्या काळात सर्वांनाच कोरोना नवीन होता. त्यावेळी चुका खपून गेल्या जात होत्या. मात्र, आता तसं होण्यास फार कमी वाव आहे. आज नागरिकाला त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यास तो त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता पूर्वीप्रमाणे प्रचलित प्रसारमाध्यमांची वाट न पाहता, सामाजिक माध्यमांवर ती माहिती प्रसारित करतो आणि स्वतःच स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तो करीत असतो. जेव्हा त्याची सहाशक्ती संपते आणि त्याला अन्याय सहन होत नाही तेव्हा तो हे सगळे उपदव्याप करतो. त्याची झलक आपल्या सगळ्याना रोज पाहावयास मिळत आहे.
या सगळ्या प्रक्रियेत कुणी राजकारण करू नये, अशी माफक अपेक्षा असतानाही चुकीच्या प्रकारांना मात्र आळा घालणे ही सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी आहे. रुग्णालयात जाण्यास कुणालाही आनंद होत नाही आज रुग्णालयात जाताना सर्वसामान्य नागरिकांची अवस्था कशी होते, याचा प्रत्येकाच्या वाट्याला येणारा अनुभव हा शब्दात विशद करता येणार नाही. रोगापेक्षा उपाय जालीम ठरू नये, अशी मात्र अवस्था होऊ नये ही प्रामाणिक भावना असून केवळ टीका करून चालणार नाही तर त्या सुधारण्याकरिता आपला छोटासा हातभार पुरेसा ठरू शकतो.
कोरोना हे महाभयंकर संकट याचा मुकाबला संपूर्ण जग करतंय, या रोगाचा प्रसार थांबविण्याकरिता निरनिराळे प्रयोग केले जात आहे. अशा काळात नागरिकांची जबाबदारी फार मोठी आहे. प्रशासन त्यांचं काम करेलच, मात्र या सर्व व्यवस्थेवर आपल्यामुळे कोणता ताण पडणार नाही याची आपण प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः आणि कुटुंबाबातील सदस्यांसह या सगळ्या वातावरणात कसे सुरक्षित राहू याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडून कोरोनाच्या प्रादुर्भावाला निमंत्रण देऊ नये. आपण या काळात न घाबरता सजग राहण्याची गरज आहे. या सर्व संकटातून बाहेर पडायचं असेल तर शासनाने वेळोवेळी दिलेल्याला सूचनांचं पालन करणं आपलंही काम आहे, सगळ्याचं अनुचित प्रकारचं खापर शासनावर फोडून चालणार नाही.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'ऐशीतैशी' कोरोना गंभीरतेची