>> हेरंब कुलकर्णी

1. महाराष्ट्रातील अनेक वर्षे गाजत असलेल्या पुस्तकाविषयी किंचितशी माहिती नसलेला लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात आहे हे यातून दिसले... एकूणच साहित्यिक वैचारिक विश्व यापासून अनेक राजकारणी किती कोसो मैल दूर आहे. याचा अंदाज या निमित्ताने आला. जागतिक पुस्तक दिनाच्या रात्री या शिव्या दिल्या यातून राजकारण आणि पुस्तके हे अंतरही लक्षात आले.

Continues below advertisement

2. गोविंद पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्रातील सामाजिक वर्तुळ आणि सामान्य माणसे व्यथित असताना त्यांच्याविषयी अत्यंत असंवेदनशील अनुदार उद्गार त्यांनी काढले. यावरून सामाजिक कार्यकर्त्यांविषयी किती अनादाराची आणि असंवेदनशील भावना अनेक राजकारण्यांच्या मनात असते हेही बघता आले... 

3. मीडिया राजकारणी आणि सामाजिक संस्था पूर्वी अशा विषयावर जितक्या आक्रमक व्हायच्या त्या आता का दिसत नाही हा प्रश्न पडतो..? अजित पवार यांनी धरणात लघुशंका करण्याच्या विधानावर पूर्ण राजकीय वर्तुळ हलले होते... दादांच्या राजकारणाला त्या एका वाक्याने मोठा सेटबॅक बसला. बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे, वसंत बापट यांच्याविषयी काढलेल्या अपमानकारक उद्गाराने तेव्हाचे युती सरकार बॅकफूटवर गेले होते... साहित्य संमेलनात गोंधळ झाला.. आज संजय गायकवाड आई वरून बायकोवरून ज्या शिव्या देतात त्या ऐकवत नाहीत... स्त्रियांविषयी किती हीन भावना मनात आहे. जीभ कापण्याची भाषा ते करतात... तरीही विरोधी पक्ष आक्रमक होत नाही... रस्त्यावर येत नाही.सत्ताधारी पक्षातील विचारी लोकही चुकीला चुकीचे म्हणत नाहीत... व महाराष्ट्र ढवळून निघत नाही. त्यामुळे हा फरक जास्त अस्वस्थ करणारा आहे. जणू हे आपण स्वीकारले आहे अशी मानसिकता सर्वांची झाली आहे...

Continues below advertisement

4. पूर्वी राजकारणात असलेल्या सर्वपक्षीय महिला अशा विषयांवर पक्षभेद विसरून आक्रमक भूमिका घेत होत्या... आता सत्ताधारी पक्षातील महिला गप्प आहेत, या शिव्या ऐकल्यानंतर त्यांना काहीच वाटले नसेल का...? महिला अभिनेत्री, कलावंत लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या हा राजकीय विषय म्हणून सोडून देतात...

5. संजय गायकवाड यांनी दिलेल्या शिव्या ऐकल्यावर  सार्वजनिक जीवनात काय स्तराची माणसे आली आहेत, हे बघून धक्का बसतो. सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे पाठ फिरवल्यानंतर आणि राजकारण आणि सामाजिक चळवळी यांचे नाते कमी होत गेल्यानंतर काय प्रकारची माणसे आपले नेतृत्व करत आहेत, हा दीर्घ चिंतनाचा विषय यानिमित्ताने पुन्हा पुढे आला आहे.