आसामच्या अतिपूर्वेकडच्या टोकाला बलाढ्य ब्रम्हपुत्रेच्या काठी चार-पाच खेडी आहेत. ही सगळी खेडी वर्षानुवर्षे ब्रम्हपुत्रेच्या अपुऱ्या पडणाऱ्या पात्राने येणाऱ्या पुराच्या तडाख्यात फुटतात, वाहून जातात, अन कागदासारखी दूर वर फेकली जातात. पण शेवटी "कधीच हार नाही मानायची" या आसाम रायफल्सच्या जजब्याप्रमाणे पूर ओसरला कि ही खेडीही परत आपली कंबर कसून स्वतःला याच जीवघेण्या नदीच्या पोटात पुन्हा वसवून घेतात. याच पाचपैकी एक, अवघ्या ९८ घरांचं खेडं म्हणजे कंधुलीमारी. या कंधुलीमारीतल्या एका शेतकरी आईबापाच्या पोटी जन्मलेले पाचवं अन सर्वात लहान अपत्य म्हणजे ही नाव नसलेली "पोरगी". बाप म्हणजे फक्त इनमीन ४५ बिघा भाताची जमीन असलेला शेतकरी. कसंबसं घर चालवू शकणारा. या पोरीला खेळायचं प्रचंड वेड. खेळ कुठला खेळायचा? तर माहित नाही. म्हणजे जो मिळेल तो. बाहेर पोरं क्रिकेट खेळत असली तर ही क्रिकेट खेळणार, फुटबॉल असेल तर फुटबॉल, लगोर तर लगोर. किंवा साधं नुसतं एखाद्या पळणाऱ्या पोराच्या मागे जोरात पळत जाऊन सर्वात आधी त्याला कोण शिवतं? हेही.
एकदा तालुक्याच्या शाळेत खेळाच्या स्पर्धा होत्या, फुटबॉलची मॅच सुरु असताना ही पोरगी तिथल्या एका कोचला जाऊन बऱ्याच वेळा आर्जवे करायला लागली की मला पण हा खेळ खेळू द्याल का? १०-१२ वर्षाचीही नव्हती ती. अन दिसायला तर प्रचंड कुडकुडीत. म्हणजे निव्वळ कुपोषित असल्यासारखी. या मॅच मधली एक टीम तशीही हरायलाच आली होती. तो कोच हसत-हसतच म्हणला , "हे १०-११ रेग्युलर प्रॅक्टिसवाले प्लेअर काय करू शकत नाहीत, तू काय दिवा लावणार?, खेळ, लागलं तर ओरडू नको फक्त!!!!."
आता ही पोरगी खेळात नेमकं आली कधी तर मॅचच्या दुसऱ्या हाल्फमध्ये. अन हिच्याकडं पहिल्यांदाच बॉल आला तर पहिल्या २ ते ३ मिनिटातच बाईनं बॉल या टोकापासून त्या टोकापर्यंत पळवत नेत, अनेकांना चुकवत, पडत , उठत पहिला गोल मारला.
बास!! नंतर तालुक्यात कुठंही फुटबॉलची मॅच असली की वेगवेगळ्या संघाकडून हिला त्यात खेळायची बोलावणी यायची. अगदी तालुक्याच्या ठिकाणाहून सुद्धा.
दरम्यानच्या काळात छोटं-खेडेगाव च असलं तरी याही गावात काड्या करणारी लोकंपण कमी नव्हती. काही लोकांनी गावात देशी दारू विकायला सुरु केली. ते इथवर त्यातल्या त्यात ठीक होतं कि काही मोठं माणसं फक्त याच्या आहारी गेली. पण जेव्हा हिच्या टीम मधली काही खेळणारी पोरं तिकडं ओढली जायला लागली तेव्हा मात्र ही १०-१२ वर्षांची अन अजून जास्त समजही नसलेली पोरगी हातात काठ्या घेऊन, गावातल्या ५-६ बायका अन टीम मधल्या दोन-तीन पोरी अन पोरं घेऊन, या दारूच्या गुत्त्यावर जाऊन पिणाऱ्या , पाजणाऱ्या अन पाहणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या लोकांना सटासट रटके लावायला लगली. त्यांना काही कळायच्या आत ती तो गुत्ताही फोडून आली, का तर फक्त "माझ्या टीम मधली पोरं खेळायचं सोडून इथं बसतायत!!" म्हणून...
हिचं हे खेळणं चालुच होतं. गावातल्या शाळेतल्या खेळाच्या शिक्षकाला मात्र कळून चुकलं की ही पोरगी एवढी खेळाचं येड असलेली अन इथं संघ अन त्यात खेळणारी पोरं असली, कधी पाचच पोरं खेळायला तर कधी दोनच. शेवटी याच शिक्षकाने सुचवलं की, तू अशा “टीम” मध्ये खेळाव्या लागणाऱ्या खेळापेक्षा , म्हणजे सांघिक खेळापेक्षा तुला ज्यात दुसऱ्या खेळाडूची गरजच लागणार नाही असा कुठलाही खेळ खेळावास. म्हणून प्रचंड चांगला फुटबॉल खेळणारी ही पोरगी शेवटी नाईलाजाने धावण्याच्या शर्यतींकडे वळली. का तर तिथं हिला कोणी सोबत खेळायला असण्याची किंवा संघाची गरज पडणार नव्हती.
शेवटी चांगलं प्रशिक्षण मिळावं म्हणून हिच्या लोकल कोच ‘मालकरा’ नी तिला गुवाहाटीला न्यायची परवानगी मागितली.
तिला परवानगी देताना तिच्या आईवडिलांनी फक्त एकच प्रश्न विचारला होता..
तो वाचून आताही अंगावर काटा येतो, अन ते गरीब अन गलितगात्र आई वडील चेहऱ्यासमोर सपशेल उभे राहतात!...
तो प्रश्न होता...
"तिला कमीत कमी २ वेळेला तरी जेवायला द्याल का?"
(कारण घरी हे आई वडील तिला --- एवढंही पुरवू शकत नव्हते.)
13 वर्षाची असताना मग तिला जिल्हा लेव्हलला पात्र होण्यासाठीच्या स्पर्धत सहभागी व्हायची संधी मिळाली. खूप प्रचंड प्रॅक्टिस केलेली तिने. दिवसरात्र आपल्या भाताच्या शेतातून चिखलातून पळत राहायची. संपूर्ण तयारी झाली. स्पर्धा तोंडावर आलेली. पण काहीच दिवस आधी घराला लागलेल्या आगीत तिचं बर्थ सर्टिफिकेट अन इतर सगळी कागदपत्रं जळाली अन या कागदपत्रांच्या अभावी तिला स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. ते वय अतिशय छोट्या-छोट्या नकारत्मक गोष्ट्टींनीही तुटून जायचं असतं., अन हि तर मोठी गोष्ट होती. पण ब्रम्हपुत्रेच्या पुराविरुद्ध जन्मल्यापासून लढा दिलेली , अन त्यालाही न हरलेली हि पोरगी , दुसऱ्या कशाने हरणार होती? हा नकार तिने संधी म्हणून घेतला. या स्पर्धेच्या सरावासाठी तिला आयुष्यात पहिल्यांदा पळायच्या स्पर्धेसाठी आवश्यक असलेले खिळ्यांचे बूट्स मिळाले होते. ते बूट घेऊन ती गावाकडं परत आली. बूट मिळाले पण हे घालून शेतातून कसं पळणार? म्हणून हिचं रोडवर पळणं सुरु झालं. सराव सुरु केला. पण सकाळी ६-७ वाजता ही पळायला सुरु करायची तेव्हा गावातल्या लोकांनी अगोदरच आपली जनावरं चरायला सोडलेली असायची. ही सगळी जनावरं रस्त्याने अवास्तव चालत जायची. संपलं!! हिला नीट पळताच यायचं नाही. थोडं पळलं की जनावरं मध्येच येणार.. वरचेवर याची खूपच अडचण व्हायला लागली.
मग पर्याय काय?
रोज सकाळी ४ ला उठून, जनावरं रस्त्यावर यायच्या आत ही पळून प्रॅक्टिस करून माघारी आलेली असायची. अन रात्री पुन्हा तेच. जनावरं चरून फिरून माघारी आली की ही रात्रीतच पळायला जायची. रस्ताच आता हिचा टीम मधला सदस्य झाला होता. अन तोच कायम सोबत राहणार होता.
एवढ्या ताकदीनं मन लावून १३ वर्षाच्या ह्या पोरीची प्रॅक्टिस हिला काय देऊन गेली... तर- २०१४ साली जिल्हास्तरीय स्पर्धेत हार... त्यानंतरच्या इतर ३ वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही संपूर्ण हार. हार अन फक्त हारच हिच्या वाट्याला यायला लागल्या......
कोवळ्या वयातली ही पोरगी नुसती नदीचा बांध फुटून सगळं पाणी इकडं तिकडं व्हावं तसं हृद्य आतून फुटून गेली होती. कष्टाला न मिळालेल्या यशानं ती नाराज होती, यातून उठणं अवघड होतं... तरीही कशीबशी हिम्मत बांधत होती. पण पुढची २-३ वर्षही ती अशीच देशातल्या नाव नसलेल्या हजारो लाखो खेळाडूंसारखी "नेम-लेस" आणि "फेस-लेस" होती.
२०१७ साली गुवाहाटी येथे "खेलो इंडिया" दरम्यान “ट्रायल कॅम्प”- मध्ये देशभरातून हजारो ऍथलेट्स आलेले. या ना त्या कारणाने सगळ्या खेळाडूंना कोच सरांकडे सारखं बोलावलं जायचं. ‘निपुण दास’ला यातली एक पोरगी खूपच वेगळी वाटली. लक्षात राहून हिच्याशी नंतर बोलता यावं म्हणून त्यांनी तिचं नाव आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेलं. "ट्रायल कॅम्प" म्हणून.
मध्ये बराच काळ लोटला , २०१६ उजाडलं होतं. १६ वर्षांच्या हिची ‘स्पर्धा’ हरत असली तरी ‘हिम्मत’ मात्र हरायची अजून इच्छा नव्हती. तिची सुविधांअभावी रडत-पडत कसंतरी प्रॅक्टिस चालूच होती. स्पर्धा येतच होत्या. हळू-हळू तिला गोष्टी समजत होत्या. "स्प्रिंट रनिंग" म्हणजे ठराविक अंतर कमीत कमी वेळात पूर्ण करणं. ह्युमन सायकोलॉजी अशी सांगते की, कोणत्याही व्यक्तीचा धावण्याचा टॉप स्पीड हा ३० ते ३५ सेकंदाच्या वरती कंटिन्यू राहू शकत नाही. ती स्वतः हे अनुभवत होती. यातच तिच्या आयुष्यातली पहिली राज्यस्तरीय आणि मोठी स्पर्धा आली. "स्पाईक्सच्या बुटांची नीटशी ओळख नाही, रेस ट्रॅक वर धावायची काडीची प्रॅक्टिस नाही, वडलाच्या भाताच्या शेतात अन रोडवर धावायची प्रॅक्टिस केलेली ही वीतभर पोरगी, सगळं वातावरण नवीन, अनुभव काहीच नाही, याचा परिणाम तिच्या धावण्यावर झाला, पण तरीही हे सगळे बॅरिअर्स तोडूनही तिने आयुष्यातल्या पहिल्या मोठ्या रेसमध्ये “ब्रॉंझ” जिंकलं."
प्रवास आता सुरु झाला होता. २०१६ च्या उत्तरार्धात ती १०० मीटर "ज्यूनियर नॅशनल्सच्या" फायनलपर्यंत पोचली. तिथून पुढं भारताच्या सीमा तोडत ती बँकॉकला झालेल्या एशियन यूथ चॅम्पियनशिपच्या २०० मी इव्हेंटमध्ये ७ वी आली. पण अजूनही पोडियम फिनिश नव्हताच. सगळीकडं हारच सुरु होती. पण डोळ्यात एक अश्रू कमी यायला मात्र एक कारण मिळालं होतं. हि २०० मी रेस पूर्ण करण्याचा तिचा टाइम होता २४.५२ सेकंद ज्याने तिला वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप नैरोबी मध्ये पात्र करून दिलं.
पण तो उरलेला एक अश्रू ही तिला इथं पुरा करावाच लागला कारण ती ही रेसही हरली. पुढच्याच वर्षी म्हणजे मे २०१७ ला दिल्लीला झालेल्या १०० मी स्पर्धेत ती पाचवी आली. थोडक्यात हरलीच. मात्र तिने करिअर संपवू नये म्हणून की काय सप्टेंबर २०१७ चेन्नई इंडियन ओपन २०० मी इव्हेंट मध्ये मात्र तिनं गोल्ड मिळवलं. तिचा जिंकणं टू हारनं हा रेशो अल्मोस्ट १ टू ९९ होता. गोल्ड कोस्ट कॉमनवेलथ गेम्स 2018 एप्रिल मध्ये ती, ४०० मी रेस मध्ये ५१.३२ सेकंद घेत सहावी तर ४ बाय ४०० मी रेस मध्ये ती सातवी आली. एखाद्याने किती हरावं त्यालाही मर्यादा असतात. एका मर्यादेनंतर प्रत्येक हार तुमच्या आयुष्यातला एक एक श्वास, अंगातला एक एक अवयव, एक एक इच्छा, एक एक स्वप्न मारून टाकायला लागते.
अशातच, ६ मार्च २०१८, मंगळवारी रात्री हिने आसामच्या कंधुलीमारी गावात राहणाऱ्या आपल्या आईला कॉल केला.
कारण त्याच दिवशी पटीयाला मध्ये झालेल्या फेडरेशन कप मध्ये हिने ५१.९७ सेकंदात ४०० मीटर रेस पूर्ण केली होती. ती स्पर्धा जिंकली का हरली माहित नाही पण ही वेळ अत्यंत महत्वाची होती कारण तिने अजून काही नॅनो सेकंद घेत ५२ सेकंदाला टच केलं असतं तर ती पुढे होऊ घातलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पात्र होऊ शकली नसती. अन तिची कॉमनवेल्थला पात्र व्हायची ही पहिलीच वेळ होती. ती अतिशय आनंदात होती. पण बराच वेळ झाला आईचा फोन लागत नव्हता. (कारण १०० घरांचं हे गाव इतकं लहान अन रिमोट होतं कि इथं फोनची रेंज पोचवायला ना फोन कंपन्यांना ना देशाला इंटरेस्ट अन वेळ होता.) किती तरी वेळ रेंज म्हणून येत नव्हती. इथंही हार. पण शेवटी कसाबसा फोन लागला.
हिचं वेड्यासारखं सगळं बोलून झाल्यावर आई फक्त एवढंच म्हटली की, "कॉमनवेल्थ गेम्स? ते काय असतं?"
विश्वास बसणार नाही पण हे सत्य होतं. याइतकं दुःख काय असावं की आपल्या आयुष्यात घडलेली सर्वात यशस्वी अन महत्वाची घटनाच आपल्या घरच्यांना आपण कितीही उलगडून समजावून सांगितलं तरी समजूच नये. एवढं मोठं अचिव्ह करणं म्हणजे सुद्धा पाप वाटावं अशी बाब होती ती.
तरीही तिनं समजवायचा बराच प्रयत्न केला पण आईने शेवटी समजून घ्यायचा नाद सोडून दिला. शेवटी तिने आईला एवढंच सांगितलं की "आई मी ही शर्यत पळताना टीव्ही वर दिसणार आहे!."
तेव्हा तिच्या आईला कळलं की आपल्या पोरीच्या आयुष्यात किती मोठी घटना घडली होती. पोरीला आईच्या अडाणीपणावर हसायची काडीचीही इच्छा नव्हती कारण फक्त १८ महिन्याखाली तिला स्वत:ला ही कॉमनवेल्थ गेम्स काय असतात हे माहित नव्हतं.
फिनलंड टेम्परे २०१८ - १२ जुलै. जागतिक अंडर २० चॅम्पियनशिप. पोरीच्या आयुष्यातली एक महत्वाची धाव आणि स्पर्धा. पण इकडं गावात मात्र हात-पाय थंड पडलेले बापाचे. पोरगी जागतिक स्पर्धा धावत असताना बापाच्या खेडेगावात मात्र नेहमीसारखी लाईट नसलेली. टीव्ही बंद. त्याच्या जीवाची घालमेल. त्याला राहावलं नाही. त्यानं शहराकडं जाऊन तिथून जनरेटर आणला. कदाचित भारतातलं हे ९०-९८ घराचं गाव सोडलं तर देशातल्या उरलेल्या ७ लाख गावात, ४००० शहरात, ४६ छोट्या आणि ८ मोठ्या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये कोणीच ही स्पर्धा पहिली नसेल.
घरात लाईट आणि टीव्हीवर ही स्पर्धा लाइव्ह असतानाही. पण या बापाची घालमेल आता जनरेटरमुळे आलेल्या लाईटसोबत थोडी कमी झालेली. अशा स्पर्धेसाठी जगातल्या कित्येक देशात वयाच्या अगदी ५ वर्षांपासून त्या खेळाडूची तयार करून घेतली जाते, जबरदस्त कोचेस दिले जातात, सगळ्या सुविधा पुरवल्या जातात, जगातच काय - भारतात सुद्धा असे लाखो खेळाडू असतात. पण यात सिलेक्ट झाली होती, गेल्या वर्षीपर्यंत पायात साधे खिळ्यांचे बूट नसलेली, ना धावायला ट्रॅक असलेली , ना कोणी कोच असलेली ही खेड्यातली एक किडकिडीत पोरगी. तीही अशी की ४०० मीटर स्पर्धा ही तिची "बेस्ट तयारी असलेली" स्पर्धा नव्हती. तिचं स्पेशलायझेशन होतं १०० मीटर अन २०० मीटर. काहीच महिन्याखाली तिने ४०० मीटरची तयारी केलेली.
एका बाजूला वर्ल्ड क्लास अन वर्षानुवर्षे तयारी करणारे खेळाडू तर दुसऱ्या बाजूला काहीच महिन्यापूर्वी ४०० मीटर स्पर्धेची तयारी केलेली ही पोरगी. ४०० मीटर स्पर्धा ही जगातली सर्वात अवघड धावण्याची स्पर्धा मानली जाते कारण यात फक्त धावून चालत नाही तर, हातखंडे वापरावे लागतात, स्पीड तर ठेवावाच लागतो, कधी फास्ट अन कधी स्लो धावायचं हे ठरवावं लागतं, एक सेकंद इकडं-तिकडं, अन मागचा खेळाडू तुम्हाला पार करून पुढे. तेही फक्त असाइन झालेल्या ४ फूट जागा असलेल्या दोन लाइन्समध्ये धावायचं, लाईन्स पलीकडे पाय पडला की विषय संपला. स्पर्धेतून बाद व्ह्यायची भीती. त्यातून ३५० मीटर धावल्यांनंतर हातापायाच्या अन शरीराच्या मसल्स मध्ये 'लॅक्टिक ऍसिड' जमा व्हायला लागतं , पाय तर आखडून प्रचंड दुखायला लागतात. नसा निव्वळ कडक झालेल्या असतात. फुटायला आतुर झालेल्या!
स्टार्ट गनचा धाडकन आवाज आला अन बाण सुटाव्या तशा या जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ सिलेक्टेड स्पर्धक पोरी बाण दोरीतून सुटल्यासारख्या तमाम धावायला लागल्या. त्यात ही पोरगी प्रचंड मागे पडलेली. पण ती हिची चपळता होती. पहिले ३५० मीटर ती एव्हरेज धावणार अन सगळे स्पर्धक जेव्हा शेवटच्या ५० मीटर मध्ये थकलेले असतात तेव्हा ही स्वतःचा जीव फाडून टाकत, पायातल्या नसा लॅक्टिक ऍसिडने फुटल्या तरी अन हृदयाचा स्फोट झाला तरी ही प्रचंड स्पीड घेत धावणार अशी.
चार नंबर लेनमध्ये, आठ खेळाडूंपैकी ही पुढून पाचव्या नंबरला म्हणजे जवळ-जवळ शेवटी होती. ३४.८ व्या सेकंदाला तिने ४ थ्या नंबरच्या तर ३५.६ व्या सेकंदाला तिसऱ्या नंबरच्या प्लेअरला मागे टाकलं. ४०.५ व्या सेकंदाला दुसऱ्या नंबरच्या रोमानियाच्या अँड्रिया मिक्लोसला, ४४.०२ व्या सेकंदाला पहिल्या नंबरच्या अमेरिकेच्या टेलर मॅनसनला मागे टाकलं, अन ५१.४७ सेकंदाला आजवरची सर्वात जबरदस्त धाव घेत ती हि जगाची अनभिषिक्त सम्राज्ञी बनली होती.
ही घटना केवढी मोठी होती याचा अंदाज यावरून लागू शकतो की भारताच्या ७१ वर्षाच्या आयुष्यातील ही पहिली महिला होती जिने आंतरराष्ट्रीय /ग्लोबल ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. शर्यतीच्या जवळजवळ ८० टक्के भागात ही प्रचंड मागे असताना पुढच्या फक्त २० टक्के भागात जगातल्या ४ बेस्ट महिला धावपटूना सपशेल मागे टाकत ही "पहिली" आली होती. चिखलात धावलेली हिमा दास शेवटी जिंकली होती.
तिला एकदा विचारण्यात आलं होतं की, "धावताना तुझ्या शेजारी जगभरातल्या शेकडो स्पर्धा जिंकलेल्या अन प्रचंड नाव कमावलेल्या , जबरदस्त प्रॅक्टिस केलेल्या स्पर्धक धावत असतात, तुला त्याची अन त्यांच्यासमोर हरण्याची भीती वाटत नाही का.?
खूप वैध प्रश्न होता तो. पण यावर तिचं उत्तरही तितकंच अनपेक्षित अन साजेसं होतं, ती म्हटली "मी खूप अज्ञानी आहे. अलंकारिकदृष्ट्या नाही तर अक्षरक्ष: अज्ञानी आहे. मला स्पर्धेला जाते तेव्हा हे माहितच नसतं की माझ्या शेजारच्या लेनमध्ये जी स्पर्धक धावतेय तिचं नाव काय, ती कुठल्या देशाची आहे, तिनं किती स्पर्धा जिंकल्यात अन काय रेकॉर्डस् केलेत. मला जगातल्या कोणीही नॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स माहीत नाहीत किंवा त्यांचे फोटोही मी पाहिलेले नाहीत. त्यामुळं शेजारी कोण धावतंय हेच माहीत नसेल तर मला प्रेशर कशाचं घ्यायचं हेही कळत नाही, त्यामुळं मी फक्त माझ्या स्ट्रॅटेजीस अन माझं धावणं यावर लक्ष केंद्रित करते.."
२०१८ मध्ये मात्र तिच्या कष्टाला फळ यायला सुरुवात झाली.
जुलै २०१८ मध्ये ४०० मी मध्ये गोल्ड मेडल , मग २०१८ आशियाई गेम्स ४ बाय ४०० मध्ये परत गोल्ड, मग जकार्ता गेम्स मध्ये ४*४०० मध्ये पुन्हा गोल्ड.
नुकतंच १९ मे २०१९ ला ती १२ वीची परीक्षा देऊन पास होऊन आलेली. तोंडावर जगातल्या अनेक स्पर्धा अन् तयारी बाकी असतानाही...
बघता बघता मग २०१९ चा जुलै महिना आला अन् हा महिना भारताच्या ऍथलिट विश्वात धमाका करणारा होता. कारण ह्या चिखलात पळणाऱ्या पोरीने जगभरात मेडल्स जिंकले होते - १८ दिवसात ५
१) २ जुलै: २०० मीटर रेस, पोलंडमध्ये गोल्ड मेडल; वेळ २३.६५सेकंद.
२) ७ जुलै; २०० मीटर रेस, पोलंडमध्ये गोल्ड मेडल; वेळ २३.९७ सेकंद.
३) १३ जुलै; २०० मीटर रेस, चेक रिपब्लिकमध्ये गोल्ड मेडल; वेळ २३.४३सेकंद.
४) १७ जुलै २०० मीटर रेस, चेक रिपब्लिकमध्ये गोल्ड मेडल; वेळ २३.२५सेकंद.
५) २० जुलै, २०० मीटर रेस, चेक रिपब्लिकमध्ये गोल्ड मेडल; वेळ ५२.०९ सेकंद.
अन सहावं मेडल ,
परवा म्हणजे १८ ऑगस्टला , ३०० मीटर रेस, चेक रिपब्लिक येथे पुन्हा गोल्ड मेडल;
सध्या हिच्या नावावरचे रेकॉर्डस् आहेत,
१०० मीटर – फक्त ११ .७४ सेकंद
२०० मीटर – फक्त २३ .१० सेकंद
४०० मीटर – फक्त ५० .७९ सेकंद
२५ सप्टेंबर २०१८ ला मग तिला राष्ट्रपती भवनात संपूर्ण देशासमोर "अर्जुन अवॉर्ड" देण्यात आला. दोनच महिन्यात युनिसेफ ची पहिली युथ अँबॅसिडर म्हणून तिला नियुक्त करण्यात आलं.
जिच्या पायात पळायला साधे बूट्स नव्हते तिलाच आपल्या कर्तृत्वामुळे आदिदास सारख्या जगद्विख्यात कंपनीने भारतातला आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमलं. अन स्वतःलाच याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं...
तिच्या या जबरदस्त कामगिरीने तिला आता संपूर्ण देश "धिंग एक्सप्रेस" म्हणून ओळखायला लागला होता...
सुरुवातीला, जेव्हा हिची ट्रायल रन निपुण दासने पहिली तेव्हा ते म्हटले होते...
“एवढा प्रचंड "रॉ-स्पीड" असलेली व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो...”
अन ते हिने अक्षरक्ष खरं करून दाखवलं...
हिमा दास!!!
तू भारताचंच नाही , तर विपरीत परिस्थितीतही कसं झगडून जिंकायचं असतं... हे दाखवलेल्या तू नं , माणूस म्हणून जगाचंही नाव रोशन केलंस...
ब्रम्हपुत्रेतलं लव्हाळं… हिमा दास...
सचिन अतकरे
Updated at:
21 Aug 2019 08:42 PM (IST)
जिच्या पायात पळायला साधे बूट्स नव्हते तिलाच आपल्या कर्तृत्वामुळे आदिदास सारख्या जगद्विख्यात कंपनीने भारतातला आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमलं. अन स्वतःलाच याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -