ढासळलोय... खिळाखिळा झालोय... काळजी वाटते मी संपून जाईन. मुख्यमंत्री साहेब... थोडा वेळ मिळाला की, माझ्याकडे पण लक्ष द्या! तसे तुम्ही संवेदनशील आहात, माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. सध्या तुम्ही शिवस्मारकाच्या गडबडीत होतात. म्हणून म्हटलं त्यातून थोडा वेळा मिळाला की, मग तुम्हाला पत्र लिहू... पत्र मिळताच तुम्ही तितक्याच संवेदनशील मनानं माझ्याकडे लक्ष द्याल असं वाटतं. राजांच्या स्मारकासाठीचा आटापिटा मी पाहायला साहेब... इथं तर माझ्या अंगाखांद्यावर आमचा 'जाणता राजा' वावरलाय...

नाही... माझी काही तक्रार नाही साहेब... माझी माती तुमचे कार्यकर्ते इथून घेऊन गेले बरं का, अगदी वाजत-गाजत... शिवस्मारकासाठी... पण ढासळलेल्या बुरुजाकडे कुणाचं लक्ष काही गेलं नाही. बुरुज... माची... दरवाजे सारं काही खिळखळं झालंय... नाहीतरी आज ना उद्या त्याची मातीच होणार म्हणा... पण तुमचा आदेश महत्वाचा साहेब... ढोल ताशांच्या गजरात कलशात माती भरली... त्याच गजरात मीही खूश झालो. म्हटलं चला उद्या राहू न राहू कुणी पाहलंय... किमान यानिमित्तानं मुंबई तरी पाहू... जीवाची मुंबई होईल... स्मारकाच्या चरणी राहीन... याचा आनंद काय थोडाथोडका आहे का...



साहेब... मोठ्या साहेब्यांनी कलश हाती घेतला तेव्हा काय आनंद झाला सांगू... जेवढा तुम्हाला मुख्यमंत्रीच्या शपथेसाठीचा फोन आला होता त्यावेळी झाला असेल ना तेवढाच... वाटलं मोठ्या साहेबांचं आता आपल्याकडे लक्ष जाणार, आपला उद्धार होणार... पण मोठे साहेब दिल्लीत बसतात. तिथून माझ्यावर लक्ष जाणं तसं अवघडच आहे म्हणा, पण तुमच्या मित्रानं (म्हणजे आम्ही अजून तरी त्यांना तुमचे मित्रच म्हणतो... बरं का) मोठ्या साहेबांना आमच्यासाठी गळ घातली. दिल्लीतून आमच्यावर लक्ष ठेवणं कठीण... तरी कारभार आमच्या हाती द्यावा! साहेब... काय सांगू तुम्हाला... ऐकून असं भारी  वाटलं ना, म्हटलं आता मोठे साहेब ऐकणारच...



साहेब... महाराजांचं स्मारक करताय तुम्ही, आनंद मनात मावत नाही माझा... आमच्या राजानं सत्ता गाजवली, जमिनीवर अन् समुद्रावरही... त्याच समुद्रात तुम्ही राजांचं स्मारक बांधताय, आमची माती त्याच स्मारकाच्या चरणी असेल. आमची म्हटलं... बरेच आहोत ना आम्ही... खचलेलो, मोडकळीस आललो...

साहेब... खरं सांगू आज राहवलं नाही म्हणून हा पत्रप्रपंच... जेव्हा एक-एक दगड खचतो ना, तेव्हा मनाला पिळ पडतो... आमच्या राजानं जिवापाड आम्हाला जपलं, खचलेलो, दुंभगलेलो त्यांना आवडायाचं नाही, डोंगरावरचे मुकूट होतो ना आम्ही... ‘ज्याचा गड, त्याची जमीन’ आणि ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र,’ राजे नेहमी म्हणायचे... म्हणून आम्हाला फार जपायचे.



सिंधुदुर्गानंतर... थेट भर समुद्रात महाराजाचं स्मारक... कुणाला आनंद होणार नाही, मलाही झालाय. फक्त भविष्यात माझ्यासारखी त्याची अवस्था होऊ नये इतकंच... साहेब... आता खरंच खचलोय!

तुमचाच

एक ढासळलेला किल्ला...

संबंधित ब्लॉग:

टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार... जयंत यादव?

विराट कोहली… टीम इंडियाची 2000ची नोट!

कमालही कर दी पांडेजी!