युरोपातले देश निर्वासितांमुळं त्रस्त झालेत. यात अफ्रिकन लोकांची संख्या जास्त आहे. 2022 मध्ये 34000 पेक्षा जास्त अफ्रिकन निर्वासित इटलीच्या समुद्र किनारी दाखल झाले होते. यावर्षी जुलै (2023) महिन्यात ही संख्या 83,400 वर पोचली होती. दीड वर्षांपूर्वी इटलीतल्या सार्वजनिक निवडणुकीत निर्वासितांचे लोढे हा मोठा मुद्दा होता. त्यावर जोर देऊनच उजव्या विचारांच्या जॉर्जा मेलोनी सत्तेत आल्या. आता हे निर्वासितच त्यांची खरी डोकेदुखी बनलीय. 

Continues below advertisement

इटलीत समुद्रीमार्गे येणारे हे लोंढें रोखण्यासाठी अफ्रिकन देशांनी प्रयत्न करावेत, असा आग्रह जॉर्जा मेलोनी यांचा आग्रह आहे.  यासाठी युरोपियन युनियन आणि आयएमएफची मदत घेण्यात येतेय. सर्व युरोपात हीच परिस्थिती आहे. या लोकांना त्यांच्या देशातच सुरक्षित वातावरण आणि रोजगार मिळण्यासाठी काय करता येईल, यासाठी एक बैठक सप्टेंबर (2023) महिन्यात पार पडली. यात निर्वासित, मानव तस्करी, माफिया आणि त्या संबंधित अफ्रिकन देशांमध्ये आर्थिक विकासाचे कोणते कार्यक्रम घेता येतील यावर चर्चा झाली. बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही. परिस्थिती बिकट बनत चाललेय. 

इटलीचा दिग्दर्शक मटेव गरोनी यानं हाच विषय घेऊन सिनेमा बनवलाय. मी कॅप्टन (2023) (Me Captain 2023). सेनेगन या छोट्या पश्चिम अफ्रिकन देशातल्या सिदोस आणि मोसा या दोन मित्रांची गोष्ट. दोघेही 15-16 वर्षांचे.  त्यांना युरोपत जायचंय. त्यासाठी त्यांनी पैसे जमा करायला सुरूवात ही केलीय. घरच्यांना यातलं हे काहीच माहीत नाही. एक दिवस  ठरल्याप्रमाणे ते दोघे युरोपात जायला निघतात. पुढचा सिनेमा हा या दोघांच्या इटलीपर्यंत पोचण्यावर आहे. व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला मानवी हक्कांसंदर्भात दिला जाणारा युनेस्को पुरस्कार मिळाला. शिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता आणि प्रोडक्शन डिझाइन आदि पुरस्कारही पटकावले. 

Continues below advertisement

ग्रीस मालता आणि स्पेन आदी देशांपेक्षा इटलीत येणाऱ्या निर्वासितांची संख्या जास्त आहे. भूमध्य समुद्रातून छोट्या बोटी, ट्रॉलर इटलीच्या किनाऱ्यांवर धडकत असतात. त्यात हजारो अफ्रिकन निर्वासित कोंबून भरलेले असतात. लहान मुलं, म्हातारी माणसं, गरोदर बायकाही त्यात असतात. अन्न पाण्याशिवाय, कित्येक रात्री जागून ते या ठिकाणी पोचलेले असतात. आधी मानवतेच्या भावनेतून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. पण नंतर अफ्रिका आणि युरोपात निर्वासीत माफियाच तयार झाला. तो अफ्रिकेतल्या लोकांना युरोपात आणतो. हजारो-लाखो लोक दरवर्षी युरोपाच्या किनाऱ्यावर धकतात. 

इटलीतल्या अफ्रिकन निर्वासितांच्या छावणीत दिग्दर्शक मटेव गरोनी गेला होता. त्यांचे हाल त्याने पाहिले. ते इटलीपर्यंत कसे पोचत असतील या उत्सुकतेतून मी कॅप्टन (2023) सिनेमाची निर्मिती झालीय. सेनेगनच्या छोट्या शहरातून सिदोस आणि मोसाची गोष्ट सुरु होते. त्याचं जगणं खडतर आहे. हातातोंडाची मारामारी आहे. सेनेगलची लोकसंख्या 80 लाखांवर आहे. रोजगार नाही. त्यामुळं मग सिदोस आणि मोसासारखी मुलं युरोपची स्वप्न पाहतात. घराबाहेर पडल्यानंतर समजतं की आपण निर्वासित माफियांच्या तावडीत सापडलोय. हा माफिया अनेकदा या अशा तरुण मुलांना विकतो. त्यांचे हाल हाल करतो. सेनेगन ते लिबिया व्हाया सहार वाळवंट असा हा प्रवास. सर्व काही बेभरवश्याचं. जगलो-वाचलो तरच युरोपात पोचू अशी परिस्थिती. यातून महिलांचे लैंगिक शोषण आणि पुरुषांचे शारीरिक हाल असं सर्व सहन केल्यानंतर एखादा इथं पोचला तर तो नशिबवान. पण युरोपात आल्यावर खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. 

इटलीत बेकायदेशीरपणे येणाऱ्या या लोकांना अटक करण्यात येते. तिथल्या कायद्यानुसार या गुन्ह्याला 20 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. बरं यांचं डिपोर्टेशन करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे कागदपत्रं नसतात. नक्की कोण कुठल्या देशातून आलाय हे ते सांगत नाहीत. जीवावर बेतलेला प्रवास केल्यानंतर त्यांना परत जायचं नसतं. अनेकांकडे खोटे युरोपियन पासपोर्ट असतात. इटलीतली सर्व तुरुंग अशा निर्वासितांनी भरलेली आहेत. युरोपियन देशांची आर्थिक परिस्थिती पाहता हा खर्च त्यांना परवडणारा नाही. यामुळंच तुर्की, लिबिया, अलगेरीया, युएई सारख्या देशांनी युरोपीयन युनियन, आणि आयएमएफ सारख्या संस्थांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केलीय. अफ्रिकन देशांमध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यावर त्यांचा भर आहे. तिथं इंडस्ट्रीज सुरू करण्याच्या अनेक योजना आहेत. यानंतर ही स्थलांतर थांबेल का याबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जा मेलोनी यांना शंका आहे. तोडगा न काढल्यास आपला देश डबघाईला येईल अशी भिती आहे.

मी कॅप्टन (2023) या सिनेमात सिदोस आणि मोसाचा जो प्रवास दाखवलाय. त्याची ही पार्श्वभूमी आहे. सेनेगनमधल्या कळकट वस्त्या, सहारचं वाळवंट, लिबियातला मानव तस्कर, भूमध्य समुद्रातली चाचेगिरी हे सर्व  मटेव गरोनी सिनेमात दाखवलंय. या प्रवासात 15-16 वर्षांच्या या मुलांमधलं माणूसपण कसं टिकून राहतं हे प्रभावीपणे दाखवलेलं आहे. युरोपात खास करुन इटली, फ्रान्समध्ये तिथं आलेल्या निर्वासितांचे काय हाल होतात यावर अनेक सिनेमे बनलेत. हा सिनेमा अफ्रिकेतून सुरु होऊन इटलीतल्या सिसीली समुद्र किनारी येऊन पोचेतो. या दरम्यान जे काही घडतं ते क्षणोक्षणाला उत्कंठा वाढवणारं आहे.