RCB vs PBKS IPL Final 2025: तो अठरा वर्ष एकाच फ्रॅंचाईजी मधून खेळतोय.....तो अठरा वर्ष त्या फ्रॅंचाईजीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतोय.... तो अठरा वर्ष त्या फ्रॅंचाईजीला ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही म्हणून लोकांची टीका सहन करतोय....तो अठरा वर्ष त्या फ्रॅंचाईजीची ओळख बनून पराभवात सुद्धा त्या फ्रेंचाईजीला ब्रँड बनवतोय.... तो अठरा वर्ष म्हणजेच दीड तप फक्त वाट पाहतोय...काल ती प्रतीक्षा एकदाची संपली...काल त्याने ज्या खेळावर जिवापाड प्रेम केले त्या खेळातील एक प्रतिष्ठित ट्रॉफी त्याच्या फ्रेंचाईजीने त्याच्यासाठीच जिंकली...आणि खऱ्या अर्थाने आयपीएलच्या शिखरावर आधुनिक क्रिकेट मधील महानायक आणि आयपीएल ट्रॉफी यांचा प्रीती संगम झाला...हा खऱ्या अर्थाने प्रीती संगम होता...या खेळावर ,या फ्रेंचाईजीवर...त्याने आणि त्याच्या चाहत्यांनी केलेली प्रीती ...काल महानायकाच्या डोळ्यातील अश्रू वाटे बाहेर आली...त्याला आणि त्याच्या संघाला प्रोत्साहित करायला मिस्टर थ्री सिक्सटी ए बी डी सीमारेषेवर उभा होता....तो ज्या क्रमांकाची जर्सी परिधान करतो तेवढीच वर्ष त्याला या ट्रॉफी ला आलिंगन द्यायला लागली.
काल नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यर याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले... फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टीवर आपण धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करू असे कदाचित त्याला वाटले ही असावे....विराट आणि सॉल्ट यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली..पण जेमिन्सन याला त्याच्याच डोक्यावरून फेकून देण्याच्या प्रयत्नात त्याचा एक अप्रतिम झेल श्रेयस ने घेतला..नंतर आलेले मयांक..रजत यांनी छोट्या पण आक्रमक खेळ्या केल्या . ..विराट कोहली याने या प्रत्येकसोबत महत्त्वाची भागीदारी केली...विराट जरी षटकार मारत नसला तरी या महत्त्वाच्या सामन्यात त्याने कोणताही धोका न पत्करता ४३ धावांची खेळी केली...विराट बाद झाल्यावर जितेश आणि लिविंगस्टोन यांनी १२ चेंडूत ३६ धावांची भागीदारी केली.....जितेश आणि लिविंग स्टोन यांनी मिळून ४ षटकार मारून बंगळूर संघ २०० पार होईल असे संकेत दिले होते...पण जेमिन्सन आणि आर्षदीप यांनी प्रत्येकी ३ बळी घेऊन बंगळूर संघाला १९० वर रोखले.
१९० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघ सहज विजय मिळवून या ट्रॉफी वर आपला दावा सांगेल असे वाटले होते...पण डीप स्क्वेअर सीमारेषेवर सॉल्ट याने प्रियांश याचा अप्रतिम झेल घेऊन पंजाब संघाला पहिला धक्का दिला...नंतर आलेल्या इंग्लिश याने डीप मिड विकेट परिसरात आखूड टप्प्याच्या चेंडूवर ४ षटकार वसूल केले...तेव्हा हा सामना एकत्रफी होतो की काय असे वाटू लागले....पण नंतर चलाख कुणाल याने आपल्याकडील सर्व अनुभव पणास लावून...२०/२० क्रिकेट मधील एक ऐतिहासिक स्पेल टाकला....कुणाल पांड्या आज त्याच्या आयुष्यातील चौथ्या ट्रॉफीसाठी खेळत होता..तीन ट्रॉफी त्याने मुंबईमधून जिंकल्या आहेत...हा त्याचा चौथा अंतिम सामना..पण त्याच्याकडे फार मोठा टर्न नसताना केवळ अचूकता...आणि बुद्धिमत्ता आणि क्लिअर थॉट प्रोसेस...याच्यावर त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला...त्याने इंग्लिश आणि प्रभ सिमरन यांना बाद करून केवळ १७ धावा दिल्या...त्याच्या तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेट वर इंग्लिश याने षटकार खेचला...तरी सुद्धा त्याच षटकात त्याने केवळ ७ धावा दिल्या..यावरून त्याची अचूकता लक्षात येते.
प्रभ सिमरन बाद झाल्यावर श्रेयस याने केवळ एक धाव घेण्यासाठी शेफर्ड यांच्या उजव्या यष्टी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आपली बॅट घातली...ती बॅट नव्हती...श्रेयस याने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती....इंग्लिश बाद झाल्यावर नेहल याने १८ चेंडूत १५ धावांची खेळी केली पण ती पंजाब पेक्षा बंगळूर संघाच्या फायद्यासाठी होती....कारण तोपर्यंत आवश्यक धावगती १५ जवळ पोहचली होती...आणि हेझल वूड आणि भुवि यांची चार षटके शिल्लक असताना ती कठीण होती...पंजाब संघाकडून शशांक याने किल्ला लढविला पण त्याला साथ मिळाली नाही. ..आणि बंगळूर संघाने १८ वर्षानंतर ट्रॉफी वर आपले नाव कोरले...पंजाब संघाची कोर टीम ही भारतीय खेळाडूपासून बनली होती...त्यात प्रभ सिमरन, प्रियांश ,नेहल आणि शशांक हे अन कॅप खेळाडू होते...आणि तरीसुद्धा हा संघ अंतिम फेरीत पोहोचला हीच मोठी कामगिरी होती....पण आज जर त्यांच्या ओनर प्रीती झिंटा यांच्यासाठी हा संघ जर जिंकू शकला असता...तर प्रीती झिंटा त्यांच्या सोज्वळ चेहऱ्यावरील...गालावरील खळी सोबत म्हणाल्या असत्या "ध्वज विजयाचा उंच धरा रे"...पण आज या ओळी बंगळूर संघ त्यांच्या महानायकासाठी बोलत असेल.