प्रिन्स शुभमन गिलने शतकी खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. त्यानंतर सोशल मीडियावर RCB आणि विराट कोहलीच्या चाहत्यांनी हद्द ओलांडली.. शुभमन गिलच्या बहिणीला शिव्या दिल्या गेल्या. इन्स्टाग्रामवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शुभमन गिललाही ट्रोल करण्यात आले. आपल्याच खेळाडूबद्दल बोलण्याची ही मानसिकता कशी तयार झाली. क्रिकेटचे चाहते अशा पद्धतीचे कृत्य करुच शकत नाहीत.. मुळात हे क्रिकेटचे चाहते आहेत का ? असाच प्रश्न पडतो. क्रिकेटला जंटलमनचा गेम म्हटले जाते. खेळाडूप्रमाणे चाहतेही खिलाडूवृत्ती दाखवतात.पण गेल्या काही दिवसांपासून नेमकं चाललेय काय?


शुभमन गिल याने त्याचे काम चोख बजावले. त्याने गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातच्या तुलनेत आरसीबीची कामगिरी कमकुवत राहिली.. ते सामन्याच्या निकालावरुन स्पष्ट दिसत होते. इतकी साधी अन् सोपी गोष्ट असताना गिल याला अन् त्याच्या कुटुंबियांना धमक्या, शिव्या देण्याची काय गरज आहे. हे नक्कीच क्रिकेटचे चाहते नाहीत. शुभमन गिल याच्या शतकानंतर विराट कोहलीने स्वत: त्याची गळाभेट अभिनंदन केले. विराट कोहलीने गिलचे अभिनंदन करण्याची पहिली वेळ नाही. याआधीही विराट कोहलीने गिल याचे कौतुक केले होते. शुभमन गिल आपल्या देशाचे भवितव्य आहे...असे विराट कोहली म्हणाला होता.


आपल्या देशासाठी खेळणाऱ्या गिलला करताना चाहत्यांना थोडीतरी लाज वाटली का ? मुळात मुद्दा गिल याचा नाहीच. शुभमन गिल , विराट कोहली, धोनी, रोहित, राहुल, शमी, सिराज यांच्यासह अनेक खेळाडूंना केवळ ट्रोलच नव्हे तर कुणाला धर्मावरुन, कुणाला कुटुंबावरुन तर कुणाला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.  ही मानसिकता कधी बदलणार. खेळावरुन बोलणं एकवेळ मान्य आहे. पण खेळाडूंच्या कुटुंबियांना यात खेचणं कितपत योग्य आहे. ही मानसिकता क्रिकेटप्रेमींची असूच शकत नाही. शुभमन गिल आणि त्याच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचे विराट कोहलीला पटले नसेल.. विराट कोहली स्वत: इतरांसाठी पुढे येतो.. त्याला तसा अनुभव आलाय. मग विराट कोहलीच्या चाहत्यांचे हे कृत्य अतिशय लाजीरवाणे आहे. खरेच हे विराटचे चाहते आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होते. 


विराट कोहलीच्या खेळाला पाहून शुभमन गिल क्रिकेटमध्ये आलाय. आपल्या आवडत्या खेळाडूसमोर गिल याने शतकी खेळी केली.. विराट कोहलीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पण विराटच्या चाहत्यांना हे पटले नाही. विराट कोहलीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांना सुनावायला हवे होते.. पण अद्याप विराट कोहलीकडून अशी कोणताही पोस्ट आलेली नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. 


मुळात क्रिकेटला जंटलनमचा गेम म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून यातील सभ्यता हरवत चालली आहे. विराट कोहली, नवीन उल हक, गौतम गंभीर यांच्यासह काही खेळाडूंनी याला कुस्तीचा आखाडा केलाय. मैदानात स्लेजिंग केले.. स्लेजिंगची मर्यादा ओलांडल्यात. आपल्या आवडत्या खेळाडूंचे कृत्य चाहते मैदानाबाहेर फॉलो करतात. युवा खेळाडू यांच्याकडून काय शिकणार. त्यातच आयपीएलमध्ये देशातील तरुण विभागला गेला.. चेन्नई, मुंबई, गुजरात, आरसीबी... माझाच संघ चांगला. हाच खेळाडू चांगला.. तो खराब. पण ते सर्व खेळाडू देशासाठी जिवाचं रान करतात, हे चाहते विरसले काय? पुढच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सची फायनल आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल. एकत्र खेळतील अन् देशासाठी चषक आणतील. चाहत्यांना ही साधी गोष्ट समजत नाही, हे खेदजनक आहे. 


क्रिकेटला दाद देणारे चाहते  कधी क्रिकेटपटूंना अन् त्यांच्या कुटुंबियाना शिवीगाळ करु लागले, हे समजलेच नाही. एखाद्या क्रिकेटरच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. त्याच्या शॉट्सवर बोला. पण एखाद्या खेळाडूच्या आई, बहिण अथवा पत्नीला ट्रोल करणे कितपत योग्य आहे. तेही आपल्याच देशातील. शुभमन गिल या युवा खेळाडूला जीवे मारण्याची धमकी दिली.. त्याच्या बहिणीलाबद्दल सोशल मीडियावर आपत्तीजनक टिप्पणी केली. ही मानसिकता नेमकी आली कुठून... हे लोक आहेत कोण.. याला जबाबदार कोण? यांना क्रिकेट चाहते म्हणायचे का ? सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर टीव्ही बंद करणारे. चाहते आपला संघ हरल्यानंर खेळाडूंच्या कुटुंबियांना शिव्या, धमक्या देत आहेत. यावर विश्वास बसत नाही. बरं ही पहिलीच वेळ नाही. याआधी विराट कोहलीच्या पत्नीला आणि मुलीला धमकी दिली होती. धोनीच्या मुलीलाही धमकी देण्यात आली. हे लोक येतात कुठून. कोण आहेत. असा प्रश्न येतोच. क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखले जाते... पण याला हळू हळू तिलंजली दिल्याचे दिसतेय. जिंकण्यासाठी खेळाडू कोणत्याही स्तराला जात असल्याचे दिसत आहेत.  टी20 आले अन् क्रिकेट सामन्यामधील स्पर्धात्मकता आणखी वाढली. खेळाडू आक्रमक झाले, त्यामुळे मैदानावरील नाट्यही वाढले. खेळाडू अधिक आक्रमक झाले... मैदानावर त्यांच्यातील आक्रमकता दिसून येऊ लागले. हीच आक्रमकता, सूडबुद्धी मैदानाबाहेर चाहत्यांमध्ये दिसते. संघ हरल्याच्या भावनेतून चाहते असले घाणेरडे कृत्य करत असतात. याला तोडगा काय तर... सोशल मीडियावर अशा कमेंट्स दिसल्या तर रिपोर्ट करा. फॉरवर्ड करु नका.. जेणेकरुन आशी खाती बंद होतील. लोकांची मानसिकता बदलणार नाही. पण याला खेळाडूही तितकेच जबाबदार आहेत. अशा मानसिकतेला क्रिकेटचे चाहते म्हणता येणार नाही.हे सनकी आहेत.


सचिन, द्रविड, युवराज यासारख्या दिग्गजांची फलंदाजी पाहिली. सचिन बाद झाल्यानंतर टीव्ही बंद केली जायची. पण सध्याचे हे चाहते आलेत कुठून. आपला संघ हरल्यानंतर अथवा खेळाडू फ्लॉप गेल्यानंतर दुसऱ्या संघातील खेळाडूला आणि त्याच्या कुटुंबियांना शिव्या देतात. तो खेळाडू मरावा, अशी प्रार्थना करतात.. यांना क्रिकेटचे चाहते म्हणता येणार नाही. क्रिकेट अथवा इतर क्रीडा पाहणारे सर्वांचा सन्मान करता. जिंदादिल असतात.. इमोशनल होतात. पण खलनायक, डाकूप्रमाणे वागत नाहीत. हे शिव्या देणारे, चाहते नाहीत सनकी आहेत. यांच्याकडे स्वत:चे मत नसते. अशा सनकींना वेळीच आवर घालायला हवा. त्यासाठी सर्वांनीच पावले उचलायला हवी. खेळाडूंनीही वारंवार सोशल मीडियावर अशा कृत्यांबद्दल व्यक्त व्हायला हवे.