कोणत्याही सामान्य तरुणीची काय इच्छा असते. चांगलं शिक्षण, करियर करता यावं, आपल्या आवडत्या मुलाबरोबर लग्न व्हावं. पण ही सगळी स्वप्न, इच्छा एक क्षणात मरतात.


निर्भया. आई वडिलांची लाडकी लेक. हुशार मुलगी. कॉल सेंटरमध्ये काम करायची. हेल्थ केअर क्षेत्रात शिकत होती. घरच्यांची काळजी घ्यायची. दोन भावांची बहीण. खूप स्वप्न होती तिची. एक बलात्कार आणि तिचं आयुष्य थांबलं.


मी लहान असताना कधीतरी आईने अरुणा शानबागबाबत काय झालं हे सांगितलं होतं. ट्रेनमध्ये ,गर्दीत, शेअर टॅक्सीत गैरफायदा हात लावणारे पुरुष अनुभवले.  हे ऐकतावा त्याचा सुरुवातीला त्रास होतो नंतर अश्या गोष्टी मनाला लावून घेत नाही. पत्रकार म्हणून पण आसपास अनेक घटना घडत असतात, बातमी करतो. आणि तिथेच विषय थांबतो. पण एखादी घटना तुमच्या मनावर खूप परिणाम करून जाते,तुम्हांला आतून हादरवून टाकते .अशी घटना म्हणजे दिल्लीतील निर्भया प्रकरण. नुसतं पत्रकार नाही तर मुलगी म्हणून पण आयुष्यात पहिल्यांदा घाबरले.


मुंबईसारख्या सुरक्षित शहरातून दिल्लीत नोकरीसाठी गेले. दिल्लीत तर अनेक विचित्र अनुभव येत होते. पण निर्भया प्रकरणानंतर पहिल्यांदा आयुष्यात भीती वाटली की आपण सुरक्षित नाही.


निर्भया आपल्या मित्राबरोबर साकेतच्या मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेली. Life of Pi बघितला, तिथून घरी जाताना मुनिरका वरून बस पकडली, त्या बसमध्ये तिच्यावर दुष्कृत्य झालं. नराधमांनी शरीराचे लचके तोडले त्या मुलीच्या.


दररोज सगळीकडून माहिती येत होती. त्या लोकांनी बसमध्ये तिच्या मित्राला मारायला सुरुवात केली. ती मध्ये पडली मित्राला वाचवायला, तिने त्यांना खेचलं, मारलं,चावले पण ते नराधम तिच्या मित्राला मारत होते एक जण बलात्कार करत होता. एकामागून एक त्या सहा जणांनी दिल्लीच्या रस्त्यावर धावत्या बस मध्ये बलात्कार केला. हे कमी होत की रॉड सदृश गोष्ट तिच्या योनीत घुसवून तिला इतकं जखमी केलं की तिची आतडी बाहेर आली. आणि अशा परिस्थितीत निर्भया आणि तिच्या मित्राला डिसेंबरच्या थंडीत,फाटलेल्या कपड्यात रस्त्यावर फेकलं.


पोलिसांनी कारवाईत दाखवलेला ढिसाळपणा, कोणाच्या हद्दीत गुन्हा झाला म्हणून झालेला वाद. दिल्लीतील वाहतूक व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था दिल्लीतील जनता रस्त्यावर उतरली.


मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात रोष. पोलीस केंद्र सरकारच्या अंतर्गत येते म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकार वर राग. दररोज बातम्या, आंदोलन. परिस्थिती चिघळत होती. निर्भयाला सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आले पण तिचा जीव वाचला नाही.


केंद्र सरकारने बलात्कार सारख्या प्रकरणात कठोर शिक्षा मिळावी,कायद्यात बदल व्हावा म्हणून न्यायालयीन समिती नेमली. देशातून आलेल्या अनेक सूचनानंतर बलात्कार सारख्या घटनेत फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. अध्यादेश काढला. यूपीए सरकारवर खूप दबाव वाढला. त्यावेळीच्या काँग्रेस नेते आणि मंत्र्यांनी केलेली वक्तव्य तर निषेधार्ह होती. वातावरण खराब होत गेलं. त्यात गुडीया नावाच्या छोट्या चिमुरडीवरही बलात्कार झाला, बलात्कारनंतर त्या छोट्या मुलीच्या योनीत तर मेणबत्तीचे तुकडे कोंबले होते.


एका मागून एक घटना घडत असताना राग येत होता, रडू यायचं ,घुसमट व्हायची.हा कसला समाज, हे काय सुरुय. माणूस म्हणून पण कोणी मुलींना वागवू नये? अस वागताना मनात एक क्षण पण आपल्या घरातील आईचा, बहिणीचा विचार मनाला शिवत नसेल? मुलींनी जगू नये का? तुमच्या पायात एक पोकळी आहे आणि ती पोकळी तुमचा जीव देखील घेऊ शकते? ही भावना इतकी भीतीदायक होती..कुणावर विश्वास ठेवायचा..


त्यावेळी ही बातमी करताना निर्भया आणि तिचा मित्र साकेत मॉल ,मुनिरका बसस्थानक,ज्या झाडीत त्यांना टाकलं ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी रात्री फिरून walk through करत होते.. तेव्हा इतकं घाण वाटलं..ज्या मॉल मध्ये ते गेले त्या मॉलमध्ये आम्ही पण जायचो,आवडत restaurant होत म्हणून. त्या मॉलला नंतर जावंसं पण वाटलं नाही. मुनिरका बस स्टॅण्डवर तर अनेकांनी निर्भयाला श्रद्धांजली वाहिली होती. अनेक मेसेज लिहून ठेवले होते.


जी मुलगी कॉल सेंटर मध्ये काम करून आपलं शिक्षण करते, हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देताना पण 'जगायचं आहे' अस सांगायचं प्रयत्न करायची. ती मुलगी काहीही चूक नसताना मारली गेली. या घटनेनंतर लोकांच्या विचारांची घाण दिसली. एखादा वाईट प्रसंग झाला की ती मुलगी इतक्या रात्री काय करत होती,मित्रा बरोबर का होती, कपडे काय घातले होते इथपासून होणाऱ्या आंदोलनाबाबत थट्टा उडवली गेली. मेणबत्ती घेऊन फिरणारी लोक अशी खिल्ली उडवली. म्हणजे इथे एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि प्रत्येकजण आपल्यापरीने आपला अजेंडा राबवत होतं.


या प्रकरणातील एक आरोपीने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक अल्पवयीन आरोपी होता. या संपूर्ण प्रकरणात निर्भयाच्या आईने हिंमत दाखवली. आईच ती.. सगळ्या hearing ला यायची. शेवटपर्यंत कोर्टात लढली. माझ्या मुलीला न्याय हवा म्हणून लढली ती आई.


निर्भयाचे आई वडील एक वर्षाने मीडियाशी बोलायला लागले. त्यांची  मुलाखत घ्यायला द्वारकाला त्यांच्या घरी गेले. एका मागून एक मीडिया चॅनेल, त्यांचा सेटअप, पाऊण पाऊण तास मुलाखती. मी आपलं पंधरा मिनिटं वेळ घेऊन एक कॅमेरावर मुलाखत केली. अतिशय साधे प्रश्न निर्भया, तिची स्वप्न, तिच्या इच्छा कोर्टातील सुनावणी, त्या कुटुंबाचा संघर्ष. त्यांच्या घरात एक खोलीत तिचा फोटो होता. तिच्या आईवडिलांची मुलाखत घेण्यासाठी त्या घरात खूप वेळ थांबले तरी निर्भया कशी दिसते म्हणजे तिचा फोटो बघायची हिंमत झाली नाही.


निर्भयाच्या नराधमांना आज फाशी झाली.आज ती जिथे असेल तिथे थोडी तरी शांत झाले. न्याय प्रत्येकाला हवा आहे पण अवेळी आपल्या इच्छा आकांक्षा मरून जाणं, जगण्याची संधी नाकारणं, दुसऱ्याच्या चुकांची आपल्याला शिक्षा मिळणं याहून वाईट काही नाही.


निर्भयाची कोणतीही बातमी आजही बघितली की माझ्यातली मुलगी घाबरते! मुंबईत एकटी चित्रपट पाहायला जाणारी मी, फिरणारी मी दिल्लीत मात्र हे बंद केलं. बाहेर गेले तर ग्रुपमध्ये. एकट्याने कुठे जावंसं वाटलं तर सुट्टीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बाहेर जायचे. दिल्ली ही मुलींना सुरक्षित नाही हा धसका तेव्हापासून घेतला. निर्भयाही दिल्लीतील दुखरी आठवण म्हणून मनात कायमची कोरली गेली.