'त्यांचं मार्गदर्शन ज्यांना लाभतं, ते काहीतरी विलक्षण करतात.' मी बोलतोय अर्थातच भारताचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित अर्थात चंदू सरांविषयी.
मुंबई आणि मध्य प्रदेश संघांमध्ये यंदाच्या रणजी करंडकाचा अंतिम सामना होतोय. मुंबईचा संघ यंदा भन्नाट फॉर्ममध्ये आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची यंग ब्रिगेड जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. पण दुसरीकडे मध्य प्रदेशनंही शानदार प्रदर्शन करत तब्बल २३ वर्षांनी रणजी करंडकाची फायनल गाठलीय.
मुंबईच्या संघातल्या प्रत्येकाबद्दल मी बरंच बोलू शकतो... लिहू शकतो... कारण संघातल्याल्या जवळपास अर्ध्याअधिक जणांना त्यांच्या स्कूल क्रिकेट आणि एज ग्रुप क्रिकेटपासून खेळताना बघतोय. कर्णधार पृथ्वी शॉ, यशस्वी जैसवाल, अरमान जाफर, सरफराज, सुवेद पारकर, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन या सगळ्यांना मुंबईतल्या मैदानांमध्ये खेळताना, त्यांच्या धावा, त्यांनी काढलेल्या विकेट्स स्कोअरशीटमध्ये लिहिण्याचा आनंद मी अनेकदा लुटलाय. एमसीएचा स्कोअरर म्हणून हे सगळेजण खेळत असलेले अनेक सामने मी पाहिलेत. 'एबीपी माझा'मध्ये काम करताना यातल्या काहींचे इंटरव्ह्यूपण घेतलेयत. त्यामुळे ही सगळी मंडळी माझ्या जवळची आहेत. त्यामुळे मुंबईची टीम जिंकावी असं मलाही मनापासून वाटतंय.
पण आज या फायनलच्या निमित्तानं मला लिहावसं वाटतं ते चंदू सरांविषयी. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांच्या तालमीत तयार झालेले चंद्रकांत पंडित भारतासाठी पाच कसोटी आणि ३६ वन डे ते खेळले. पण एक प्रशिक्षक म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि मुंबईविरुद्धचा हा सामनाही त्यांच्यादृष्टीनं फार महत्वाचा आहे. कारण १९९८-९९ च्या मोसमात जेव्हा मध्य प्रदेशचा संघ रणजी करंडकाच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा चंदू पंडित या संघाचे कर्णधार होते. पण तेव्हा मध्य प्रदेशचं विजेतेपदाचं स्वप्न कर्नाटकनं धुळीस मिळवलं होतं. पण आता चंद्रकांत पंडित प्रशिक्षक म्हणून मध्य प्रदेशला पहिलंवहिलं विजेतेपद मिळवून देण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये हजर असतील.
चंदू पंडितांनी प्रशिक्षक या नात्यानं मुंबईला याआधी रणजी चॅम्पियन बनवलंय. पण त्यानंतर विदर्भानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७-१८ आणि १८-१९ या मोसमात इतिहास घडवला. मुंबईचा अनुभवी वासिम जाफर आणि प्रशिक्षक चंदू पंडित या मोसमात विदर्भाच्या फौजेत सामील झाले. आणि त्यांनी विदर्भाच्या युवा शिलेदारांना हाताशी धरुन सलग दोन वर्ष रणजी करंडक उंचावला. खासकरुन २०१८ साली विदर्भानं रणजी करंडक जिंकला तो क्षण चंद्रकांत पंडितांच्या कारकीर्दीतला सर्वोच्च क्षण ठरावा. कारण रणजीच्या इतिहासात ८४ वर्षानंतर विदर्भाला विजेतेपदाची चव चाखता आली होती. पुढच्या वर्षी पंडित अँड कंपनीननं पुन्हा विदर्भाला विजेता बनवलं.
२०२० साली चंद्रकांत पंडितांनी मध्य प्रदेशचं प्रशिक्षकपद स्वीकारलं. त्या मोसमात रणजी करंडक स्पर्धा कोरोनामुळे रद्द झाली. पण ती वेळ संघबांधणीसाठी उपयोगी ठरली. मध्य प्रदेशचा संघ पाहिला तर त्यात एकही मोठं नाव नाही. त्यामुळे हा संघ फायनलमध्ये पोहोचला कसा असा प्रश्न अनेकांना पडला. पण ज्यांच्या संघाच्या पाठीवर चंदू सरांचा हात, त्यांच्या कामगिरीत अशक्य ते शक्य करण्याचं बळ आपसूकच येतं. मध्य प्रदेश संघाच्या यशाचं हेच रहस्य.
बंगळुुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पंडित गुुरुजींचा संघ मुंबईशी दोन हात करणार आहे. मुंबईच्या प्रशिक्षकपदी आहे अमोल मुजुमदार. त्यामुळे हा सामना कमालीचा रंगणार यात शंकाच नाही. पण या सामन्यात मध्य प्रदेशला चंदू सरांचं मार्गदर्शन ऐतिहासिक जेतेपद मिळवून देणार की खडूस मुंबईकर विक्रमी ४२वं विजेतेपद पटकावणार हे लवकरच कळेल.
Best Of Luck To Both Teams....!!