गणेश, विनायक, एकदंत, वक्रतुंड, गजानन आदी नावांनी ओळखला जाणारा गणपती ही देवता केवळ भारतात नव्हेतर ईराण, पाकीस्तान, अफगाणीस्तान पासून ते समस्त भारतीय भारतीय उपखंडासह श्रीलंका, भुतान, कंबोडीया, मलेशिया, इंडोनोशिया, थायलंड आदी देशातही विविध रूपात आणि विविध आख्यायिकांसह लोकप्रिय आहे.

पौराणिक, वैदिक, नाथसंप्रदायी, तांत्रिक पंथासह जैन व बौद्ध धर्मातही तीचा गौरव सर्वदुर आहे. अशी ही देवता मुळात व्रात्यांची विघ्नकारी देवता म्हणून प्रसिद्धीस असली तरी काळाच्या ओघात ती विघ्नहारी विनायक म्हणून तीने जनमानसांत स्थान मिळवले. जनतेच्या मनात ती अधिदेवता बनली आणि अधिनायकही या स्वरूपातही तीची पुजा व आराधना सुरू झाली. तीची लोकप्रियता एवढी की शाक्त आणि शैव या तीच्या पितृसंप्रदयाबरोबर तीच्या उपासनेचा गाणपत्य संप्रदायही स्वतंत्रपणे निर्माण झाला. सर्वसमावेशकता हा गणपतीचा स्थायीभाव आहे, हे त्याच्या सर्वदुर पसरलेल्या भक्तसंप्रदयातून दिसून येतो.

'गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा।
मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा।
नमूं शारदा मुलचत्वारिवाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥'

असे त्याच्या गुणवर्णाचे सर्वसमावेशकत्व संतांनी मांडले आहे, जे आजच्या एकसाची व एककल्ली धार्मिक मान्यतांना ध्वस्त करणारे आहे. म्हणून सर्वगुणांचा समुच्चय असणाऱ्या गणरायाचे स्मरण आजच्या धार्मिक वातावरणात त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करताना अगत्याचे ठरते!

विविध पंथाना, संप्रदयांना, उपासनांना कवेत घेणाऱ्या भारतीयत्वाची प्राचीन संस्कृती गणेश या देवतेने आधिदेवता म्हणून व्यापलेली हे विशेष नव्हे तर स्वाभाविकच आहे. म्हणून तर या गणपतीने अनेकविध धर्मातील तत्वचिंतक व्यक्तींचे अंतरंग व्यापून विविधरंगी भारतीयत्वास सर्वरंगात रंगवून शाश्वत प्रेमरंगात भिजवले! यातून भारतातील मुस्लीम शासकही सुटले नाहीत.

दक्षिण भारतातील विजापूरच्या इब्राहिम अली आदिलशहा दुसरा यास विद्यापती गणेश आणि विद्येची देवता सरस्वतीने एवढे मोहीत केले की, तो स्वत: गणेश आणि सरस्वतीचा पुत्र म्हणवून घेत असे! किताब-ए-नवरस या त्याच्या ग्रंथात अनेक रचना त्याने सरस्वती आणि गणेश या देवतेच्या स्तुतीपर केल्या असल्याची माहीती 'पंचधारा' या आंध्र मराठी साहित्य परीषदेच्या एका अंकात वाचली होती. डॉ. विद्या देवधर या विदुषीने 'किताब-ए-नवरस' या इब्राहिम अदिलशहाच्या पुस्तकाबद्दल जे संशोधन व लेखन केले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे!

गणपतीच्या प्रेमाने भारावणे, ही बाब इब्राहिम आदिलशहा पुरती मर्यादित राहिली नाही. त्याने अनेक मुस्लिम मराठी संककवीही प्रभावित झाले. संशोधक रा. चिं. ढेरे सरांच्या 'मुसलमान मराठी संतकवी' या पुस्तकात याची प्रचिती येते.

गणेशस्तुती व गणपती महात्म्य याचे दाखले शेख महमंद, अंबर हुसेनी, शहा मुंतोजी, अलमखान मानभावी शहा मुनी यांनी त्यांच्या लेखनात दिले असले तरीही, गणपती जन्मकथा यावर शेख सुलतान आणि 'जंगली फकीर' सय्यद हुसेन यांची रचना विलोभनिय आहे!

गणपतीच्या जन्माबाबत अनेक कथा अनेक पुराणात आणि लोकश्रुतीत प्रचलित आहेत. मध्यंतरी एका मंत्र्याने गणपती म्हणजे 'प्लॅस्टिक सर्जरी' असे संशोधन मांडले होते. ते सर्वाथा चुकीचे होते! परंतु सर्वांच्या अंतरी वास करणाऱ्या गणपतीचे स्वरूप अंतरी असणाऱ्या भावनेच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न अनेक साधू संतांनी आणि धार्मिक तत्वचितकांनी केला आहे. जो वैज्ञानिक कसोटीवर योग्य असो वा नसो पण त्यात निखळ प्रेमभावना असल्यामुळे तो अधिक प्रामाणिक वाटतो. अप्रमाणिकपणा हा मुळातच अधार्मिक आहे!

गणपती जन्मकथेतील रचनेनुसार, 'सिंधुपुरचा सिंधुरापूर या दैत्याने भगवान शंकरास प्रसन्न करून घेतले आणि 'मृत्यूभयचिंता देहासी नसावी' असा वर मागितला. ते वरदान देवाधिदेव महादेव यांनी त्यास दिले खरे, पण त्यास त्याच्या अंताची माहीतीही दिली.

वर दिला तुज।बोले शंभूराज।
परी ऐक गुज। अंतरीचे ।।
पार्वती उदरी। जन्मेल गणपती।
मरण त्याचे हाती। तुज आहे ।।

आपल्या मृत्यूचे हे रहस्य समजताच सिंधुरासुर चिंताक्रांत होऊन तो सदैव पार्वतीकडे लक्ष ठेवतो. एकदिवस त्यास समजते की पार्वती गर्भवती आहे. हे समजताच तो दैत्य शक्तीचा वापर करून गर्भातच गणपतीचा शिरच्छेद करतो. पुढे पार्वती प्रसूत होते तेव्हा तिला समजते की आपल्याला झालेले मुल शिरोविहीन आहे. ती विलाप करू लागते, याच वेळी, महादेव गजासुरला मारून त्याचे शीर कौतुकाने घरी घेवून येतात आणि ते शीर पार्वतीला जन्मलेल्या शिरोविहीन बालकास जोडतात. त्यामुळे हे बालक “गजानन” बनते. गजानन मोठा झाल्यावर सिंधुरासुरावर स्वारी करून त्याचा संहार करतो. मृत्यू समोर दिसताच सिंधुरासुर गजाननास विनंती करतो की,

सिंदुराची उटी । लावावी सर्वांगी ।
निरंतर भोगी । सिंदुरसी ।।
अवश्य म्हणोनी। दैत्य वधियेला ।
जयवंत झाला । गणराज । ।
वाजता दुंदुभी । डोलती निशाणे ।
भेटताती जन । सुखरूप ।।
शंभू पर्वतीशी ।आनंद दाटला ।
ब्रह्मानंद जाला । तीही लोकी ।।

गणपती जन्माची कथा लिहिली आहे, गोपाळनाथ या अठराव्या शतकातील संत महात्म्याच्या एका मुस्लिम शिष्योत्तम संत शेख सुलतान याने!

संत शेख सुलतान यांचे मुळ गाव कराड जवळचे कारवे हे गाव! शेख सुलतान मुळचे शाहीर होते, ज्यांना पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराजांनी आश्रय दिला होता! अशी वदंता आहे की, एकदा एका मठात गोपाळनाथ या नाथयोग्याचे किर्तन चालू होते. ते ऐकून शेख सुलतान यांनी त्यास हजेरी लावली. संत गोपाळनाथ यांनी शेख सुलतान यांना काही गायला सांगताच त्यांनी 'गण' म्हणून दाखविला. मात्र, त्या गणाचा अर्थ त्यास सांगता आला नाही. अखेर त्यांचा अहंकार गळून पडला आणि त्याने शाहिरीचा त्याग करून गोपाळनाथांचे शिष्यत्व पत्करून ते नाथ संप्रदायी झाले, असे म्हटले जाते!

शेख सुलतान याची गायकी, गोपाळनाथ या गुरूची कृपा या आधारावर हे नाथसंप्रदायी शेख सुलतान सुप्रसिद्ध किर्तनकार बनले आणि त्यांनी किर्तना बरोबरच पाच कथात्मक लेखन केले! त्यात हे 'गणपतीजन्माख्यान' मोठे विलक्षण असे आहे!

गणपतिजन्माच्या या कथेप्रमाणेच नाथसंप्रदायातील संत गोपाळनाथ या सिद्धपुरुषाच्या संत शेख सुलतान या मुस्लीम नाथसंप्रदायी शिष्याप्रमाणेच 'जंगली फकीर' या नावाने प्रसिद्ध असणा-या संत सय्यद हुसेन या मुस्लीम संतानेही गणपतीजन्मावर असेच एक दीर्घ आख्यान लिहिले आहे ! मात्र गणपती जन्माची कथा जी संत शेख सुलतान यांनी किर्तनात मांडली आहे, त्या पेक्षा थोडी वेगळी कथा संत सय्यद हुसेन मांडतात !

संत सय्यद हुसेन यांनी त्यांच्या गणपती जन्म आख्यानात लिहिले आहे की, गजासुर उन्मत्त झाल्यावर भगवान शंकराने त्यास मारण्यासाठी प्रथम विरभद्र यास पाठवले. मात्र विरभद्र त्यास मारू शकला नाही. तो केवळ त्याचा एक दात तोडू शकला! हे पाहताच भगवान शंकरांनी स्वतः जावून त्रिशुळाने त्याचे मस्तक उडवले आणि हेच शीर त्रिशुळास खोवून ते घरी परतले. तोच दारात गणेशाने त्यांना अडवले आणि त्याचा राग येवून भगवान शंकरांनी त्याचे शीर उडवले! पार्वतीस हे समजताच ती शोक करू लागली आणि माझ्या मुलास नाहक मारले म्हणून विलाप करू लागली!

गजासुराचें शिर करी घेतला ।
येतू असे त्रिपुरारी वाहिला ।
तव तो महाद्वारी पावला ।
तव तो नरू देखिला बैसला ।।

तेणे आडकाठी घातली त्रिपुरारी ।
संभूशी येऊं ना दे भीतरी ।

संत सय्यद हुसेन यांच्या या कथानकात सिंधुरासुर अथवा शेंदूर याचा उल्लेख नाही . पण तरीही शेवटी संत सय्यद गणेशाचे वर्णन करताना म्हणतात.

कविजनांचे माहेर ।
दिधले आभरण सेंदूर ।
महेश्वरी ।।

हा गणेश, विद्यादेवता आहे खरं पण तो कविजनांच्या चिंतनाचे माहेर घर आहे. कवि वसंत बापटांनी म्हटलंय,

त्रैलोक्य व्यापुनीही
कोठे न राहणारा,
माझा गणेश नाही
मखरात मावणारा ।

नक्षत्रमंडलाची
माथ्यावरी झळाळी,
आरक्त सूर्य भाळी
सिंदूर लावणारा ।

मूर्ती अमूर्त याची
रेखाल काय चित्री,
विज्ञानरूप सूत्री
भूगोल ओवणारा ।

स्वार्थी लबाड लोभी
रोगी अपत्यकामी,
येता पवित्र धामी
हाकून लावणारा ।

भक्तांस नाकळे हा
पोथीतुनी पळे हा,
संशोधकां मिळे हा
सत्यास पावणारा ।

आहे प्रकाशरूपे
विश्वात कोंदलेला,
रेणूत कोंडलेला
बुद्धीस भावणारा ।

केवळ मखरात मावणारा हा गणेश आजीबातच नाही !तो 'वसुधैंव कुंटूंबकम' या विशाल व उन्नत अशा 'गंगा जमनी तहजीब'चा प्रणेता आहे! गणेशाच सर्वव्यापित्व, सर्वसमावेशकत्व समजून घेणे आजच्या नव भारताची सर्वौच्च गरज आहे!