यवतमाळच्या वाघिणीची प्रत्येक बातमी लिहिताना अस्वस्थ वाटायचं! वाघिणीचा पाठलाग करणारी यंत्रणा, शार्पशूटर, पॅरामोटर यांना ती कधीच सापडू नये असं वाटायचं.... पण जेव्हा या वाघिणीच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची कहाणी ऐकायचो... तेव्हा पुन्हा मन भरकटायचं! वाघिणीच्या हल्ल्यानं उद्ध्वस्त झालेल्या घरातला आक्रोशही पिळवटून टाकायचा!

अशा विचित्र अवस्थेत असतानाच पहाटे 3 वाजता सरिताने बातमी दिली... नरभक्षक वाघीण ठार....
ज्या गावात पहिला बळी गेला... तिथे जल्लोष सुरु झाला होता... वाघिणीच्या खात्म्याबद्दल लोक पेढे वाटत होते... ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती...

पण कुठे तरी काही तरी चुकतंय असंच वाटत होतं...

नव्वदच्या दशकात वाघांची घटती संख्या चिंतेचा विषय होती... वाघांची बेसुमार शिकार सुरु होती... वाघांची आश्रयस्थाने असलेल्या जंगलातून वाघ गायब होऊ लागले... परिणामी वाघांच्या घरात म्हणजे जंगलात माणसं वाढू लागली..

हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वाघ उरल्याने सरकारने वाघ वाचवा मोहिमेला सुरुवात केली... शिकारीवर निर्बंध आणले... शिकाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली... कोअर झोन आणि बफर झोन तयार केले... कोअर म्हणजे दाट जंगल.. आणि बफर म्हणजे जंगलाच्या सीमेवरची संरक्षित जागा....

त्याचा परिणाम दिसू लागला... वाघांची संख्या वाढू लागली...
कोअर जंगल वाघांना पुरेना.. पण बफर झोनमध्ये लोकांचे
अतिक्रमण सुरु झाले... आणि त्यातूनच सुरु झाला वाघ आणि माणसातला अस्तित्त्वाचा संघर्ष...

भूक भागवण्यासाठी वाघ लोकांच्या जनावरांवर हल्ले करु लागले... प्रसंगी माणसाचे मुडदे पडू लागले... आणि सहजप्रवृत्तीने वागणारे वाघ बदनाम झाले!

यवतमाळमधल्या वाघिणीचंही तेच झालं... आपल्या पिलांची भूक भागवण्यासाठी ती बफर झोनमध्ये आली... तिने जनावरांची शिकार सुरु केली... पण तिचा सामना माणसांशी झाला... तेव्हा ती माणसांवरही हल्ले करु लागली... पण पोट भरण्यासाठी नव्हे.. तर आपल्या पिलांच्या सुरक्षेसाठी...

अर्थात आपल्या दारात वाघ यावा असं कुणालाही वाटणार नाही... जीवाच्या आकांताने होणारी माणसांची तगमगही योग्यच आहे... कायम भीतीच्या सावटाखाली राहणे सोपे नाही... पण त्याआधी कोण कुणाच्या घरात घुसलय... याचा विचार नको का व्हायला?

आता प्रश्न असा... की वाघिणीला ठार मारण्याची खरंच गरज होती का? तिचं सुरक्षितरित्या स्थलांतर होऊ शकलं नसतं का?

खरं तर वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठीचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे... याआधी शहरात घुसलेल्या बिबट्यांना बाहेर काढण्यासाठी त्या तंत्राचा वापरही केला आहे.. पण मग त्याचा वापर यवतमाळमध्ये का झाला नाही?

वाघिणीच्या पाठीवर बेशुद्धीचं इंजेक्शन मारलेलं स्पष्ट दिसतंय... मग ती बेशुद्ध का झाली नाही?

वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा  वाघिणीला बेशुद्ध करण्याचा अंदाज का चुकला?

प्रगत देशांमध्ये एखाद्या जंगली श्वापदाला स्थलांतरित करायचे असेल, तर किती काळजी घेतात... आपल्याकडे मात्र सगळाच आनंद... यवतमाळच्या जंगलातला 50 दिवसांचा घटनाक्रम बघितला... तर हसावं की रडावं... हेही कळणार नाही!

1) आधी वाघांना काबूत आणण्यासाठी हत्तींना पाचारण केलं... उपाशी ठेवल्याने हत्ती बिथरले... आणि उधळले... त्यात एका महिलेचा जीव गेला...

2) मग इटालियन कुत्र्यांची जोडी आणली... तेही वास काढून काढून थकले... आणि परत गेले

3) हवेत उडणारे आणि वाघिणीचा शोध घेणारे पॅरामोटर खड्ड्यात गेले

4) मग पायी गस्त घालणारे वन कर्मचारीही थकले...

5) वाघिणीला आकर्षित करण्यासाठी केल्विन क्लेन परफ्यूमचा शिडकावाही केला...

य सगळ्या प्रयत्नांनाही वाघीण पुरुन उरली... बफर झोनमध्ये वनखात्याचा धुमाकूळ सुरु असताना वाघीण मात्र आपल्या पिलांसह सुरक्षित होती...

पण आजचा दिवस तिच्यासाठी काळ बनून आला... शार्पशूटर असगरने तिला गोळ्या घातल्या.. आणि एका क्षणात... त्या वाघिणीची दोन पिल्लं पोरकी झाली.... तीही आता जगतील की नाही, याची शंकाच आहे...

निसर्गाचा नियम पाळणाऱ्या वाघिणीला आपण मृत्यूदंड देतो... आणि पाशवी बलात्कार करु हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाला सोडून देतो...

पिलांना वाचवणारी गुन्हेगार ठरते.. आणि तिच्याच घरात घुसलेले लोक निष्पाप ठरतात...

त्याचं काय आहे... वाघिणीला मतदानाचा अधिकार नाहीये ना!

वाघ खरंच महत्त्वाचे असतील तर जंगलांना कायमस्वरुपी कुंपण का घातले जात नाही?
माणसे जंगलात आणि वाघ जंगलाबाहेर येणार नाहीत, याची काळजी का घेतली जात नाही?

वाघिणीला बेशुद्ध करुन स्थलांतरीत करण्याची यंत्रणाही नसेल, तर वाघ वाचवा मोहिमेच्या बाता मारु नयेत!
त्यांच्याच घरात शिरुन त्यांचीच हत्या करण्याचं घोर पाप तुम्ही केलं आहे...
पिलांची आईशी ताटातूट केली आहे!
शाब्बास सुधीर मुनगंटीवार....
आता त्याच वाघात भुसा भरुन जपून ठेवा, आपल्या पापाचे पुरावे