Navjot Singh Sidhu : पंजाबचे भावी मुख्यमंत्री म्हणून नवज्योत सिंह सिद्धू यांनी स्वतःला प्रचारित करण्यास सुरुवात केली होती. पंजाब काँग्रेसमधील काही नेते, आमदार त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनच पाहात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यामुळे संपूर्ण पंजाब काँग्रेस सिद्धूंच्या हातात होती. परंतु आता हे चित्र पूर्णपणे उलटे झाल्याचे दिसत आहे. ज्या अमृतसर पूर्वमधून सिद्धू निवडणुकीच्या मैदानात उतरलेत तिथे त्यांना विजयासाठी प्रचंड झगडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसमधील नेतेही आता त्यांच्याऐवजी चन्नींच्या पाठिशी असल्याचं चित्र दिसू लागलंय.


काही महिन्यातच सिद्धूंवर ही पाळी का आली? तर याचं कारण स्वतः सिद्धूच आहेत. सिद्धू स्वतःच हिट विकेट झालेत. भाजप विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर नाराजी व्यक्त करीत सिद्धूंनी भाजपला सोडून काँग्रेसचा हात हातात घेतला. काँग्रेस नेत्यांनीही सिद्धूच्या बोलघेवडेपणावर विश्वास टाकला आणि पंजाबमधील भावी काँग्रेस नेते म्हणून त्यांच्याकडे पाहाण्यास सुरुवात झाली. खरे तर काँग्रेसमध्ये प्रदेश अध्यक्षपद लगेचच कोणालाही देत नाहीत. अनेक वर्ष पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यालाच प्रदेश अध्यक्ष पद दिले जाते. प्रदेश अध्यक्ष पद म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्रीपदच असते. पण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ दोन वर्षातच सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. अध्यक्षपद मिळताच सिद्धूंनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधात मोहिम सुरु केली आणि कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात यश मिळवले. यामुळे कॅप्टन नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसचा हात सोडून स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. आता भाजपसोबत ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत.


सिद्धूंची वाढती ताकद पाहून अनेक आमदार त्यांच्या बाजूने झाले होते. आता सिद्धूच मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच हायकमांडने चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले आणि सिद्धू पुन्हा एकदा नाराज झाले. चन्नींची गरीबी, चन्नींची जात यावरून ते सतत बोलू लागले. चन्नी आणि सिद्धूंमध्ये एक प्रकारे शीतयुद्धच सुरु झाले. पंजाब निवडणुकीत सिद्धूच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचं बोललं जाऊ लागलं. अखेर अनेक स्तरावरील विचारविमर्शानंतर काँग्रेस हायकमांडनं पुन्हा एकदा चरणजीत सिंह चन्नी यांचंच नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे केलं आणि सिद्धूंना पुन्हा एकदा मोठा झटका बसला.


नाराज सिद्धू यांनी याबाबत काहीही वक्तव्य केलं नसलं तरी त्यांच्या पत्नींने मात्र याविरोधात आवाज उठवण्यास आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. पण सिद्धूंच्या पत्नीच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचं काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आणि सिद्धूंच्या नाराजीकडे लक्ष देत नसल्याचं दाखवून दिले. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सगळ्याची मतं घेऊन लोकशाही पद्धतीने घोषित करण्यात आल्याचे राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते आणि उमेदवारांशी चर्चा करून चन्नी यांचे नाव घोषित केले. तसंच कँपेन कमेटीचे अध्यक्ष सुनील जाखर यांचाही सल्ला घेतला होता असेही शुक्ला यांनी म्हटलेय. याचाच अर्थ काही महिन्यापूर्वी जे आमदार सिद्धूंच्या बाजूने होते तेसुद्धा आता चन्नींच्या बाजूने झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पंजाब काँग्रेसमधील सिद्धू यांचे स्थान डळमळीत झाल्याचं दिसू लागलेय. केवळ काँग्रेसमधील स्थानच नव्हे तर निवडणुकीत विजय मिळवण्यासही त्यांना अडचणी येताना दिसतायत.



सिद्धू बोलघेवडेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मजीठिया यांच्याविरोधातही सिद्धूंनी अनेक वक्तव्ये केली. अमृतसर पूर्व हा मतदारसंघ हिंदू बहुल आहे. येथील हिंदू मतांसाठी सिद्धूंनी आता देव-देव करण्यास सुरुवात केलीय. गेल्या आठ दिवसात त्यांनी दुसऱ्यांदा वैष्णोदेवीची यात्रा केलीय. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची पत्नी नवजोत कौर मतदारसंघात जाऊन प्रचार करू लागल्यात. दुसरीकडे मजीठिया यांना सर्वच पक्षांनी पडद्यामागून पाठिंबा दिलाय. एवढेच नव्हे तर काही काँग्रेस नेत्यांनाही सिद्धूची ब्याद टळली तर बरे होईल असे वाटत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच मजीठिया यांना पाठिंबा वाडू लागलाय आणि सिद्धूंसमोर विजयाची पराकाष्ठा करण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीनंतरच सिद्धूंची काय स्थिती असेल ते समोर येईलच.


पण एकूणच ज्या पद्धतीने नवज्योत सिद्धू पंजाब काँग्रेसमध्ये शिखरावर पोहोचले होते तेथून ते स्वतःच हिटविकेट झाल्याचं चित्र दिसतेय हे नक्की.