सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात जितकी खिल्ली राहुल गांधींची उडवली गेलीय, तितकी देशात कदाचित दुसऱ्या कुठल्याच राजकारण्याची उडवली गेली नसेल. 2004 ला राहुल गांधी हे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, त्यानंतर गेली 13 वर्षे ते सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. एक सीरियस लीडर म्हणून त्यांना प्रस्थापितच होऊ द्यायचं नाही, अशी भाजपची रणनीती होती.


पप्पू इमेजमध्येच त्यांना अडकवून ठेवण्यासाठी भाजपने मोहीम हाती घेतली. पण अखेर या इमेजमधून राहुल गांधी हे बाहेर पडत आहेत. बाहेर पडत आहेत याचा अर्थ ते आधी खरंच पप्पू होते का? असतील तर मग आता अशी काय जडीबुटी त्यांना मिळाली की ते एकदम बाह्या सरसावून मोदींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले? तर हा बदल राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वात कमी आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातला जास्त आहे. मोदींच्या करिष्म्याला उतरती कळा लागल्याने त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे थोडेसे प्रभावी वाटू लागलेत. केवळ काही स्मार्ट ट्वीटस, भाषणातले पंच यातून इमेज मेकओव्हर पूर्ण होत नाही. अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यावर संघटनेत प्राण फुंकण्यासाठी या पक्षाची जी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, ती राहुल गांधी किती सफाईने, किती कणखरपणे करतात यावर बरंच काही अवलंबून असेल.

गुजरातमधे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाची चर्चा जोरात आहे. पण या प्रतिसादात भाजपच्या 22 वर्षाच्या इनकम्बन्सीचा, जीएसटी-नोटबंदीवरच्या गोंधळाचा, हार्दिकच्या पटेल आंदोलनाचा बराच हातभार आहे. नेता म्हणून राहुल गांधी कसे अपयशी आहेत, ते कसे रिलक्टंट पॉलिटिशिअन आहेत. त्यांनी कसं परदेशात हॉलिडेला जाणं थांबवलं पाहिजे यावरून आपल्याकडे बरंच विश्लेषण, बरीच चिरफाड झालेली आहे. पण या सगळ्या काळात पक्ष म्हणून काँग्रेस किती रसातळाला गेलाय, 100 वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या पक्षाचं जमिनीवरचं संघटन कसं मजबूत होणार, या सगळ्या प्रश्नांना मात्र दुर्लक्षिलं गेलं.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांइतकीच काँग्रेसच्या या घसरलेल्या आलेखाचीही समीक्षा व्हायला पाहिजे. या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्या तरी त्या तितक्याच स्वतंत्रही आहेत हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे नव्या पिढीत स्वीकारार्हता मिळवायची असेल तर काँग्रेसला पक्ष म्हणून काही गोष्टी सोडाव्या लागतील. लांगुलचालनाचं राजकारण हे नव्या पिढीच्या डोक्यात जाणारं आहे, प्रादेशिक अस्मितांना दिवसेंदिवस नव्याने धुमारे फुटत असताना काँग्रेसमध्ये मात्र अशा प्रादेशिक नेत्यांची उंची कमी करण्याची कटकारस्थानं दिल्लीत बसून सुरु असतात, धर्मनिरपेक्षता महत्वाचीच आहे, पण नको त्या ठिकाणी तिचा मुखवटा पांघरुन प्रश्न भिजत ठेवण्याचा ढोंगीपणा आता जनतेपासून लपून राहत नाही. आमचा जन्म सत्ता करण्यासाठीच झालाय असा माज दाखवणारा आविर्भाव अनेक काँग्रेस नेत्यांमधे असतो. पण तो जमाना गेला, मोदींशी लढायचं असेल तर किमान कष्ट करण्याच्या बाबतीत तरी त्यांच्याशी स्पर्धा करावीच लागेल. सत्तेत असलेला पक्षही नियमाने तीन महिन्यांनी कार्यकारिणी घेऊन संघटनेला, कार्यकर्त्यांना सतत पळतं ठेवतो. इथे तीन वर्षांत 12 पेक्षा जास्त राज्यं गमावूनही काँग्रेस पक्षाची कुंभकर्णी डाराडूर काही कमी व्हायला तयार नाहीय. काँग्रेसला या प्रश्नांच्या उत्तरापासून आता पळता येणार नाही, कारण सगळे दोर कापले गेले आहेत. आता नाही जागे झाले तर कधी होणार?  वर उल्लेखलेल्या गोष्टींपैकी अनेक काँग्रेसने स्वत:च स्वतामध्ये मुरवून घेतल्यात.

फाळणीच्या पार्श्वभूमीवर सत्ता सांभाळणाऱ्या नेहरुंनी मुस्लिमांकडे सहिष्णुतेने पाहणं समजू शकतं. पण त्यानंतरही कित्येक वर्षे काँग्रेसने आपलं सॉफ्ट हिंदुत्व जपलेलं होतं. विशेषत: इंदिरा गांधींच्या काळापर्यंत. बीबीसीच्या मुलाखतीत इंदिरा गांधींना प्रश्न विचारला गेला होता. गेल्या 2000 वर्षातली अशी कुठली व्यक्ती आहे ज्याचा तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. त्यावर इंदिरा गांधींचं उत्तर होतं आदि शंकराचार्य. मुस्लिमांच्या हिताचा विचार करताना हिंदू जीवनशैलीपासून दूर पळण्याची गरज अजिबात नसते. मुळात हिंदू हा शब्दच मुळात अधिक व्यापक अर्थाने स्वीकारला तर त्यात हे असं परधर्मीयांकडे सहिष्णुतेने बघणं हे आपसूक येतंच. पण मतांच्या राजकारणात काँग्रेस इतकी वाहवत गेली की सार्वजनिक आयुष्यात हिंदू असल्याचं सांगणं म्हणजे जणू पाप आहे अशी परिस्थिती करुन ठेवली. बहुसंख्यांच्या हितातच अल्पसंख्यांकांचंही हित दडलेलं असतं हा एक विसरलेला राज्यशास्त्रीय विचार बहुधा आता काँग्रेसला पुन्हा आठवत असावा. त्यामुळेच गुजरातमध्ये राहुल गांधींच्या मंदिरदर्शनाचे कार्यक्रम आखले गेले. सॉफ्ट हिंदुत्वापासून दूर गेल्याने आपण काय गमावून बसलो याचीही जाणीव आता काँग्रेसला होत असावी.

राहुल गांधी यांच्यावर भाजपने केलेल्या अतोनात टीकेचा फायदा असा आहे, की राहुल गांधींची कामगिरी त्यामुळे शून्यापासून मोजली जाणार आहे. राजकारण हे काही राहुल गांधींना आयुष्यात जमणारच नाही अशी प्रतिमा करुन ठेवलीय. त्यामुळे आता जे काही यश मिळेल ते त्यांच्या नावावर जमा होणार आहे. संघटना एकदम रसातळाला गेलेली असतानाच तिची सूत्रं हाती येणं हे त्यामुळे एकप्रकारे राहुल गांधींच्या पथ्थ्यावरच पडणारं आहे. फक्त संघटनेची बांधणी करताना ते आपल्या आजीचा आदर्श बाळगणार की वडिलांचा हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण इंदिरा आणि राजीव या दोघांच्याही कार्यशैलीत बराच गुणात्मक फरक होता. 1977 च्या आणीबाणीनंतर जेव्हा काँग्रेसने सत्ता गमावली,त्यानंतर इंदिरा गांधींनी पुन्हा संघटना बांधणीचं आव्हान स्वीकारलं. या काळात जे काँग्रेससोबत टिकून राहिले, त्या जुन्या निष्ठावंतांवर त्यांनी विश्वास ठेवला. याउलट राजीव गांधींकडे 1984 नंतर जेव्हा काँगेसची सूत्रं आली, तेव्हा त्यांनी अनेक जुन्या निष्ठावंतांची सद्दी मोडीत काढत आपल्या वर्तुळातली माणसं संघटनेत पेरली. अगदी कमी वयाच्या तरुणांनाही संधी दिली. अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह हे त्यातलेच प्रॅाडक्ट. राहुल गांधी हे व्यक्तिमत्वानं अधिक लोकशाहीवादी आहेत असं काँग्रेसचे नेते सांगत असतात. त्यामुळे काँग्रेसमधलं हे जुन्या-नव्याचं गणित त्यांना व्यवस्थित हाताळावं लागणार आहे. राहुल गांधींकडे अध्यक्षपद आल्यानंतर त्यापाठोपाठ काँग्रेस वर्किंग कमिटीतला फेरबदल अपेक्षित आहे. नवी टीम राहुल गांधी कशी निवडतायत याची उत्सुकता आहे.

राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर सोनिया गांधींचा पक्षातला रोल काय असणार हाही प्रश्न आहे. प्रकृती ठीक नसल्याने त्या तशाही सार्वजनिक जीवनात फारशा वावरत नाहीत. 2019 ची लोकसभा निवडणूक त्या रायबरेलीमधून लढवतील की नाही याबद्दलही शंका आहे. अशा परिस्थितीत रायबरेलीमधून प्रियंका गांधींची एन्ट्री होणार का, याचीही कुजबूज सुरु झालीय. अर्थात या सगळ्याला फार अवकाश आहे. त्याआधी राहुल गांधी संघटनेतला बदल कसा करणार याला जास्त महत्व आहे. राजकारणात प्रवेश करताना सोनियांचा लोकांशी जास्त कनेक्ट नव्हता. त्यामुळे आपल्या विश्वासू सल्लागारांच्या वर्तुळावरच त्यांचे निर्णय अवलंबून असायचे. जास्तीत जास्त सहमतीने निर्णय घ्यायचे, कडक कारवाईची जिथं गरज असेल तिथं फार घाई करायची नाही, सहकारी पक्षांशी मिळतं-जुळतं घेत त्यांनी काँग्रेस पक्षाची मदार 19 वर्षे सांभाळली. सोनियांच्या तुलनेत राहुल हे पक्षसंघटनेत तसे अधिक मिसळलेले आहेत. त्यामुळे आता त्यांचे अहमद पटेल कोण असणार? किंवा त्यांना अशा राजकीय सचिवाची गरज असेल का याबद्दल चर्चा झडू लागल्यात.

राहुल गांधींचं नेतृत्व आणि काँग्रेसची संघटनात्मक ताकद या दोन्हींची स्वतंत्र समीक्षा का आवश्यक आहे? एबीपी न्यूजच्या शिखर संमेलन या कार्यक्रमात गुजरातमधले पूर्वाश्रमीचे काँग्रेस शंकरसिंह वाघेला यांना ऐकायला हवं होतं. वाघेला काँग्रेसबद्दल बोलताना एकदम तुटून पडत होते. पण राहुल गांधींबद्दल मात्र ते एकच वाक्य सारखं ऐकवायचे. I will not speak any wrong about him. He is thorough gentleman.  पक्ष सोडून गेल्यावर एखादा राजकारणी आपल्या नेतृत्वाबद्दल अशी हळवी भावना मनात ठेवणं जरा कठीणच. पराभव होतोय म्हणून अपयशाचा धनी फक्त नेताच करुन टाकायचा नसतो. विजय झाल्यावर उथळ नेत्यांनाही वलय मिळतं. पराभवात भल्याभल्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागतं. शिवाय भारतीय राजकारणात तसंही मतदानाची परंपरा ही नकारात्मक आहे. एखादा माणूस नकोसा झालाय म्हणून लोक मतदान करतात आणि त्यात दुसरा निवडून येतो. त्यामुळे राहुल गांधींच्या क्षमतेविषयीचा भ्रमही असाच कदाचित दूर होईल.

बाकी राहुल गांधी यांच्यासाठी म्हणाल तर त्यांनी काय करावं यापेक्षा काय करु नये याची लिस्ट जास्त आहे. आणि या न करण्याच्या गोष्टींवर त्यांनी मेहनत घेतली तर त्यात जास्त हित आहे. पार्ट टाईम राजकारणी ही त्यांची प्रतिमा आता चालणार नाही. देशात काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु आहे आणि त्याच दरम्यान यांचं उड्डाण मात्र परदेशात हाँलिडेसाठी हे थांबायला हवं. काँग्रेस पक्षाची मदार आता पुढची बरीच वर्षे किमान राहुल गांधी यांच्यावरच असणार आहे हे स्पष्ट आहे. ही जबाबदारी ओळखून त्यांच्या अशा सरप्राईज परदेशवाऱ्यांना पूर्णविराम मिळायला हवा. मोदींवर टीका करताना राहुल गांधींचा एक स्मार्ट अवतार प्रोजेक्ट केला जातोय. काल महागाईवरच्या ट्वीटमध्ये आकडे चुकल्यानंतर त्यांनी दिलखुलासपणे मान्य केलं. आपण काही नरेंद्रभाईंसारखे नाही असं सांगत भाजपला चिमटेही काढले. भारतीय राजकारणातले मिस्टर कूल अशी त्यांची प्रतिमा होत असेल तर ती तरुणाईला अधिक भावू शकते. नेता म्हणजे कुठला परग्रहावरचा माणूस आहे, त्यात असामान्य शक्ती असल्याचा आव आणत त्याच्याभोवती एक वलय निर्माण करण्यापेक्षा, सामान्य माणूस आणि नेत्यामधली ही दरी तुटलेली अधिक चांगलं. उद्या याच मिस्टर कूल अवतारात त्यांनी आपल्या तथाकथित गर्लफ्रेंडबद्लच्या चर्चांनाही पूर्णविराम देण्याचं धाडस दाखवावं. जे काय असेल ते लोक स्वीकारतीलच. तसंही स्त्री असो की पुरुष एकांड्या शिलेदारांची संख्या भारतीय राजकारणात इतकी वाढलीय की असा कुटुंबवत्सल राजकारणी लोकांना जास्त भावेल. विदेशात ओबामांसह अशी अनेक उदाहरणं आहेतच की. त्यामुळे काँग्रेसने खरंच यावर विचार करायला हवा. बदलत्या काँग्रेसची चुणूक दाखवायला यापेक्षा जास्त चांगली संधी काय असू शकते?