जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मात्र यानिमित्ताने तिच्या दुर्दैवाचे भांडवल करून राजकारणाचा, धार्मिक विद्वेषाचा व्यवसाय मात्र जोरात चालला.
महत्वाचा मुद्दा असा की, आजपर्यंत पीडितेचे नाव माध्यमात येत नव्हते. मात्र अत्याचार पीडित या देशातील अल्पसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व करते आणि आरोपी हा बहुसंख्य समाजातील असल्याने एका धर्माच्या माध्यमातून आरोपीच्या धर्माला शिव्या द्यायची दुर्मिळ संधी ढोंगी सेक्युलरवाद्यांनी अजिबात दवडली नाही. म्हणजे पीडितेसाठी असणारे दु:ख यापेक्षा हिंदूना झोडपायची भावना अधिक प्रभावी दिसत आहे. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे भांडवल करून हिंदू धर्माविरोधात वातावरण तापवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार सर्रास होताना दिसत आहे.
खरे पाहता ज्या नराधमाने अत्याचार केलेत त्याचे कुठलाही हिंदू कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही आणि जर असे कोणी करत असेल तर तो हिंदूच काय माणूस म्हणूनही दावा करू शकत नाही. आरोपी एवढेच तेही दोषी आहेत.
जर एका आरोपीच्या आडून त्याच्या धर्मावर बोट ठेवले जात असेल तर याच न्यायाने जगभरात दहशतवादी कृत्ये करणाऱ्या अतिरेक्यांच्या आडून त्यांच्या धर्मावर टीका केली तर त्यांना दोषी कसे मानले जाऊ शकते? त्या वेळेस तर दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो अशा प्रकारचे वाक्य प्रसारमाध्यमात मुसळधार पावसासारखे आदळत असते. जर दहशतवादाला धर्म नसतो तर मग बलात्कार करणाऱ्याला असतो का?
परंतु आपल्या देशात मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याची वृत्ती जागोजागी आढळते. त्यांना कठुआ अत्याचार पीडितेच्या माध्यमातून देशातील 79 % हिंदूंना, त्यांच्या संस्कारांना झोडपायची संधी मिळाली. हिंदूंना झोडपण्यासाठी ते कुठलीही संधी सोडत नसतात. स्थळ, काळ, वेळ, घटना अशा कोणत्याही मर्यादेच्या बाहेर जाऊन त्यांना हिंदूना झोडपण्याची संधी साधायची असते. तर आणि तरच त्यांचा निधर्मीवाद सिद्ध होतो. असो. अन्यथा पीडितेचे नाव आणि फोटो माध्यमात आलाच नसता.
अनेकांनी हिंदू असल्याची लाज वाटत असल्याची गरळ ओकली. त्यांना विचारावेसे वाटते की यापूर्वी एखादेवेळेस तरी हिंदू असल्याचा अभिमान आपणास वाटला का? देशात अनेक ठिकाणी हिंदू धर्माला फॉलो करत अनाथाश्रम, विद्यालये चालवले जातात त्याबद्दल कधी अभिमान व्यक्त का नाही करावासा वाटला? किंवा वाटला असेलच तर तो आपण जाहीरपणे व्यक्त केलात का? आणि बलात्कार करताना तो वासनांध होता का हिंदू होता? किंवा हिंदूंच्या कोणत्या ग्रंथात असे नीच कृत्य करा म्हणून सांगितले आहे? यातून एकच बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कठुआ पीडितेचे नाव आणि फोटो जाहीर करण्यामागे हिंदूंना झोडपण्याचा एक नियोजित अजेंडा कार्यरत आहे.
हिंदू अस्मिता, आदर्श यांना सतत झोडपण्यामागे महत्वाचे कारण आहे ते तेजोभंग करण्याचे. हिंदू असण्याची लाज वाटावी यासाठीच हा सगळा अट्टाहास चालू आहे. प्रथमतः हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करून बदनामीची सुरुवात करण्यात आली. यापैकी एकाही प्रकरणात न्यायालयात आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. परिणामी हिंदू दहशतवाद थोपवण्याचे कारस्थान संपुष्टात आले. त्यानंतर काही ढोंगी बाबाबुवांच्या निमित्ताने पुन्हा एकदा यथेच्छ बदनामी केली गेली. आणि आता कठुआ बलात्कार पीडितेच्या निमित्ताने हेच सत्र चालू आहे.
वरील विवेचन वाचून कदाचित आपणास असेही वाटेल की हा आरोपीच्या समर्थनार्थ केलेला खटाटोप आहे. त्यांनी लक्षात घ्यावे यासंबंधी सुरुवातीसच स्पष्ट केले आहे की, आरोपीला फाशीच व्हायला हवी. प्रश्न आरोपीचे पाठराखण करण्याचा नाहीच तर प्रश्न आहे त्यावरून हिंदू धर्माला झोडपण्याचा. जणू काही हिंदू धर्मापासून मार्गदर्शन घेत त्याने हे कृत्य केले. आता तर केवळ हिंदू धर्माच्या बदनामीपुरते मर्यादित राहिले नाही तर याहीपुढे जाऊन एका व्यक्तीने एक संदेश असलेला टी-शर्ट परिधान केला आहे व त्यात असे लिहिले आहे की, भारतात मुली पाठवू नका. त्या व्यक्तीचे फोटो समाजमाध्यमावर फिरत आहेत. राज्यातील पुरोगामी नेत्यांचे फेसबुक व्हिडीओ संदेश स्पोंसर केले जात आहेत. यातील मेसेज बीटवीन द लाईन काय आहे तर, हिंदू धर्म हा वाईट आहे व ते फॉलो करणारे सरसकट धर्मांध, अंधश्रद्धाळू, बलात्कारी आहेत. या प्रकरणातील सर्वात आक्षेपार्ह बाब ही आहे. अर्थात प्रत्येकाला राजकीय,सामाजिक लाभ दिसू लागल्याने अनेकजण याला बळी पडत आहेत. स्वतः:चे पुरोगामित्व सिद्ध करण्यास ही सुवर्णसंधी आहे तर अनेकांचा निधर्मीवाद याने सिद्ध होत आहे.
एकूणच हिंदू धर्म, देश यावर सातत्याने आघात करून तेजोभंग करण्याचा अजेंडा जोरात सुरु आहे. त्याला राजकीय पार्श्वभूमी तर आहेच शिवाय सामाजिक स्तरावर हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचेही मनसुबे लपुन राहत नाहीत. यामुळे अशा प्रकारच्या दुष्प्रचाराला बळी न पडण्याची मोठी परीक्षा हिंदू धर्मियांना द्यावी लागत आहे. अशा परीक्षांची सवय असल्याने हिंदू समाज ही परीक्षाही उत्तीर्ण होईल यात शंका नाही.
प्रसाद एस जोशी
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Apr 2018 03:42 PM (IST)
आपल्या देशात मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याची वृत्ती जागोजागी आढळते. त्यांना कठुआ अत्याचार पीडितेच्या माध्यमातून देशातील 79 % हिंदूंना, त्यांच्या संस्कारांना झोडपायची संधी मिळाली. हिंदूंना झोडपण्यासाठी ते कुठलीही संधी सोडत नसतात. स्थळ, काळ, वेळ, घटना अशा कोणत्याही मर्यादेच्या बाहेर जाऊन त्यांना हिंदूना झोडपण्याची संधी साधायची असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -