आज तू पुन्हा एकदा स्तब्ध झालीस, अक्षरशः निःशब्द झालीस.. आधी फक्त तुझा आवाज दाबला जायचा पण आज त्या नराधमांनी तुझा आवाज कायमचा बंद केला, तू जीवंत असताना. चहूबाजूंनी तुटून पडलेले नराधम, त्यांचे पापी स्पर्श आणि पाशवी अत्याचार.. वर्षातल्या सगळ्या अमावास्या त्याच वेळी दाटून आल्यात का? असा प्रश्न तुझ्या मनाला पडला असेल, कारण तुला ओरडायचं होतं, रडायचं होतं, प्रतिकार करायचा होता, प्रतिवार करायचा होता पण सारं सारं व्यर्थ होतं, अशक्य होतं.. कारण आज त्यांनी तुझा आवाज दाबला नाही.. कायमचा बंद केला.. जेव्हा तुझी बातमी समोर आली तेव्हा एक स्त्री म्हणून असह्य यातना झाल्या. सुन्न, विषण्ण, स्तब्ध आणि अतिशय खेदाने सांगते मी हतबल सुद्धा होते.
फार पूर्वी आपल्याला एक कानमंत्र मिळाला होता. ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास’ उदास? तुझी अवस्था कळल्यापासून मनस्थिती भकास झालीये. तुझ्या नशीबातले हे भोग तुला इतरांनी भोगून मग संपणार हा कसला न्याय घेऊन जन्म घेतेस तू? मुळात हा न्याय नाही अन्याय आहे याची जाणीव तुलाच होत नाही अगं.. आणि म्हणून काही काळाच्या अंतराने या अशा विकृत घटना सातत्याने घडत रहातात तुझ्यासोबत.
सई, तुला एका गोष्टीची कल्पना आहे? की समज तुझं लग्न झालं असेल आणि तुझ्या नवऱ्याने जर तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्याशी शरिरसंबंध ठेवला तर तो ही एक प्रकारचा बलात्कारचं असतो. लग्न हे समाजमान्य बलात्कार करायचा परवाना नाही हे ना तुला माहिती असतं, ना त्याला आणि म्हणूनच त्यामुळे तुला या सगळ्याची जाणीव होण्याआधी हा अनन्वित छळ तू निमुटपणे सहन करतेस.
सई गेल्या वर्षभरातल्या काही घटना मांडते तुझ्यासमोर उदाहरणादाखल, तुझ्या एका मित्रासोबत तू कुठेतरी फिरायला गेली होतीस, छान निवांत वेळ तुम्ही एकमेकांसोबत घालवत होतात, अशावेळी काही समाजकंटकांचं टोळकं तुझ्याजवळ आलं आणि त्यांनी थेट तुझ्या कॉलरला हात घातला. काय चूक होती तुझी? मित्रासोबत फिरायला गेलीस ही? नाही तुझी चूक ही होती की जेव्हा त्यांनी तुझ्या कॉलरला हात घातला, तेव्हा तू प्रतिकार केला नाहीस हतबल झालीस आणि त्या नराधमांचा हात तुझ्या पँटपर्यंत पोहोचला.
असं म्हणतात की ज्ञानदान हे सगळ्यात पवित्र दान असतं, पण या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत सई, यात रमू नकोस इथे सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत. गेल्या वर्षभरात तुझ्याच शिक्षकांनी तुला अश्लील व्हिडिओ दाखवत तुझ्यासोबत घृणास्पद चाळे केल्याच्या घटनाही आल्यात माझ्या कानावर. ज्या शिक्षकांना तू वंदनीय, पूजनीय वगैरे मानतेस, तोच शिक्षक आपल्याशी अशा पद्धतीने वागतोय हा आघात कसा सहन केलास तू? कदाचित तुला या सोशिकतेची सवय झालीये..
सई.. हिंगणघाटमधली तू, तुझ्या नकाराचा आदर करण्याची ताकद नव्हती त्याच्याकडे, मनाने फार दुबळा होता तो, आणि म्हणूनच तुझ्या एका नकाराने त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि त्याने उभी पेटवली तुला.. त्याच्या डोक्यातल्या राखेने तुझ्या उभ्या आयुष्याची राखरांगोळी केली.
म्हणून सांगते सई सावध हो.. इथे पावलापावलावर सावज हेरत बसलेल्या गिधाडांच्या टोळ्या आहेत. ‘अखंड सावध असावे’ हा मंत्र तुझ्याचसाठी लिहिलाय असं समज आणि त्याचा अंगीकार कर.अगदी मित्रमैत्रिणींशी लपाछपीचा डाव खेळताना सुद्धा सावध रहा, कारण तू लपशील एखाद्या कोपऱ्यात आणि त्याचवेळी तुझ्या बाजूला रहाणारा तुझा लाडका काका तिथेच त्याचा डाव साधण्यासाठी लपलेला असेल.
स्वतःच्या सुरक्षेसाठी ज्या भावाच्या हातावर राखी बांधतेस त्याच्यावर विसंबून रहाताना किंवा जन्मदात्या बापावर विश्वास ठेवताना सातत्याने, पुन्हा पुन्हा सगळ्याची खातरजमा करुन घे कारण काही नराधमांना नातं, त्यातली ओढ, भावनेचा ओलावा आणि त्या नात्याच्या अनुषंगाने येणारी कर्तव्य यांचा फार फार विसर पडलेला असतो. त्यांच्यासाठी महत्त्वाची असते ती फक्त आणि फक्त शरिराची भूक आणि ती भागवण्यासाठी समोर असलेला स्त्री देह.
सई, तुझं वय त्याच्यासाठी फार महत्त्वाचं नाहीये अगं. तुझं शरीर किती विकसित झालंय याचा विचारही नसेल त्याच्या डोक्यात. किंवा एखाद्या क्षणी असं वाटेल आता वय सरलं काय उरलं या देहात. सई तुझं शरीर विकसित झालेलं नसलं तरी त्याच्या शरीराची भूक ही बकासुराच्या भूकेसारखी फोफावत चालली आहे. आणि जरी तुझं वय सरलं तरीसुद्धा त्याची भूक तो सरणावर जाईपर्यंत सरणार नाही हे ध्यानात ठेव कायम. कारण तू स्त्री म्हणून जन्माला आलीस न? मग जन्मापासून मरेपर्यंत हा वासनेचा भोग तुझ्या माथी गोंदवला गेलाय. तो मिरवायचा की मिटवायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे.
आता तू म्हणशील की आपल्या देशात या सगळ्याविरोधात कठोर कायदे आहेत, कायदे कठोर असले तरी त्यातून असंख्य पळवाटा आहेत. ठोस पुराव्याअभावी सुटलेले कित्येक गुन्हेगार आज समाजात उजळ माथ्याने फिरतातस, तू कुठेही दाद मागायला जा, एकतर तुझ्या पदरी निराशा पडेल किंवा मग वर्षानुवर्षांची प्रतीक्षा.
तुला एक खेदजनक गोष्ट सांगू? स्वतःच्या कृत्याचं समर्थन करण्यासाठी ते तुलाच दोषी ठरवतील. तुझे कपडे त्यांच्या भावना चाळवत होते आणि म्हणून मग त्यांच्या हातून हे कृत्य घडलं, आणि त्यानंतर हा विवस्त्र समाज समस्त स्त्री वर्गाला नैतिकतेचे धडे शिकवायला सुरुवात करेल. आणि म्हणूनच एक खूप जवळची मैत्रिण म्हणून तुला एक सल्ला देते की तू काय आणि कसे कपडे घालायचे, हे सांगण्याचा आणि ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे तुझ्या कपड्यांना चिकटलेली धार्मिकतेची, धर्मनिरपेक्षतेची, सभ्यतेची, नीतीमत्तेची आणि लज्जेची झालर तूच उसवून टाक आणि स्त्री देहापलिकडचं तुझं स्त्रीत्त्वाचं तेज दिसू दे या सभ्यतेचा चष्मा लावून फिरणाऱ्या समाजाला.
सई, तुला असं वाटेल की हे सगळं माझ्यासाठी नाहीये, कारण या अशा गोष्टी, असा प्रसंग माझ्यासोबत कधी घडलाच नाहीये. पण तो कधी घडणारचं नाही याची खात्री ना मी देऊ शकत ना तू.. आणि मुली बलात्कार करण्यासाठी दरवेळी स्पर्शाचीच गरज असते असं नाही.. आजवर कैकदा फक्त नजरेने असंख्य वेळी अशा प्रसंगाला तू सामोरी गेली असशील कधी कळत कधी नकळत...
सई, आज त्यांनी तुझ्या एका सईची जीभ छाटली पण म्हणून तू भेदरुन गप्प बसू नकोस. त्या असंख्य सयांचा तुला आवाज बनावं लागेल ज्यांना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलंय. तुझं गप्प बसणं त्यांची ताकद बनत गेलंय युगानुयुगं.. पण आता बास.. खूप झालं..तू ललकार तुझ्यातल्या स्त्री शक्तीला आणि दाखवून दे तुझी ताकद, तुझी क्षमता.
आणि आता एक काम कर, असं म्हणतात की प्रत्येक पुरुषात एक स्त्री दडलेली असते आणि प्रत्येक स्त्री मध्ये एक पुरुष. स्वरक्षणासाठी आता तू तुझ्यातल्या पुरुषाला जागं कर. स्वयंपूर्ण हो, स्वयंसिद्ध हो, सशक्त हो, सबला हो.. कारण द्रौपदी तब भी शरमिंदा थी, आज भी शरमिंदा है और उसका चीर बचाने वाले कृष्ण ना जाने कहाँ खो गए है|
आणि जाता जाता एक प्रेमाचा सल्लाही देते, हे सगळं वाचून पुरुष जातीचा कधी तिरस्कार नको करुस. आपण अगदी सहज म्हणतो की सगळे पुरुष एका माळेचे मणी असतात. पण त्यात सगळेच मणी नसतात काही मोतीही असतात, फक्त त्याची योग्य पारख करणं आता तुला शिकावं लागणार आहे. कारण एक पुरुष स्त्रियांप्रती असलेलं प्रत्येक नातं फार प्रामाणिकपणे जपतानाही पाहिलंय मी.
शेवटी तुझ्या एका जबाबदारीची जाणीव करुन देणार आहे मी. हे सगळं आजूबाजूला घडत असताना तुझ्या गर्भातून जन्माला येणाऱ्या नव्या जीवावर उत्तम संस्कार करायला विसरु नकोस. कारण भविष्यातल्या तुझ्या माझ्यासारख्या असंख्य सईंचं भवितव्य तुझ्याच हातात आहे.. त्यांचा मोकळा श्वास तुझ्यावर निर्भर असणार आहे.