एक होता अलान.
एकदा तो बोटीतून सफरीवर निघाला.
कशासाठी? माहित नव्हतं त्याला.
समजण्याचं वयही नव्हतं.
गेला बिचारा.


किनाऱ्यावर वाहात आलेलं मरण पाहून
जग हळहळलं. रडलं. चिडलं.
विसरून गेलं.


मग भेटला ओमरान.
राख आणि रक्तानं माखलेला भकास चेहरा.
त्याचा एकच उघडलेला डोळा
कॅमेऱ्याच्या लेन्सपलीकडे, कुठेतरी
शून्यात पाहात होता.

तेव्हाही जग हादरलं. हळहळलं.
रडलं, चिडलं. विसरून गेलं.



एक आहे बाना.
निरागस हसू, बोलके डोळे.
ट्विटरवरून ती मांडते
अलेप्पोची कहाणी.
कधी तिच्या नजरेतून,
कधी तिच्या आईच्या शब्दांतून.
जग वाचत राहतं

जग गहिवरतं. हळहळतं. रडतं. चिडतं.
विसरून जातं.

बाना आहे की नाही?
याची चर्चा सुरू असते.
पण ती आहे. असावी.
अजूनतरी जीवंत असावी.

जगूच दे तिला
आणि हेही कळू दे-
पाच चौरस किलोमीटरमध्ये
अडकलेल्या एक लाख लोकांवर
बॉम्बचा वर्षाव झाला
तरी फरक पडत नाही जगाला.

जग फक्त हळहळतं. रडतं. चिडतं.
विसरून जातं.

- जान्हवी मुळे