No Other Choice Movie Review: एखाद्या कंपनीत 20-25 वर्षे काम केल्यानंतर नोकरीवरुन काढण्यात आलं तर तुम्ही काय कराल? 25 वर्ष हा मोठा कालावधी असतो. आपण नोकरीत मिळणाऱ्या पगारावर कुटुंब चालवत असतो. अचानक ऐन चाळीशीत बेरोजगार झाला तर एखादा माणूस काय करेल? पहिला आपला खर्च कमी करेल, गरजा कमी करेल, असलेल्या पैशात आता घर चालवायचंय, त्यासाठी कुटुंबाची तयारी करेल, शिकणारी दोन मुलं, दोन कुत्रे, मोठं घर आणि त्यातलं फर्निचर प्रत्येक गोष्टीचा नव्यानं विचार सुरू होईल. ज्या गोष्टी आवश्यक नाहीत, त्या विकून पैसे कसे येतील? हे पाहिलं जाईल. नव्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू होतील, आता त्या नोकरीच्या आड कोण येत असल्यास त्याचा काटा काढायला ही तो मागे पुढे पाहणार नाही. कारण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. हे सर्व असंच नो अदर चॉइस (2025) या दक्षिण कोरियन सिनेमात घडतं.
कथानकाची मांडणी विनोदी आहे. पण त्यातून घडणारं नाट्य, चाळीशीतल्या बेरोजगारीकडे पाहण्याचा विडंबनात्मक दृष्टीकोन सिनेमात आहे. डार्क ह्युमरच्या जोरावर दिग्दर्शक पाक चान वुक सिनेमाभर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याची आपल्या हिरोची धडपड विनोदी अंगानं दाखवण्यात आलीय. नोकरी मिळवण्यासाठी तो जो मार्ग निवडतो तो भयंकर आहे. सिनेमाची मांडणी विनोदी असल्याने गंभीर विषयाला जास्त मनोरंजक बनवते.
डार्क कॉमेडी हा दक्षिण कोरियाचा दिग्दर्शक पाक चान वुकचा आवडता जॉन्रा आहे. ओल्ड बॉय (2003) आणि डिसीजन टू लीग (2022) या दोन्ही सिनेमातल्या डार्क ह्युमरनं जगाला वेड लावलं. आता त्याचा हा नो अंदर चॉइस (2025) आलाय. ओल्ड बॉय सिनेमाने पाक चान वुकला जागतिक पातळीवर पोचवलं. जगभरात गाजलेला तो पहिला दक्षिण कोरियन सिनेमा ठरला होता. या सिनेमापासून के-ड्रामाचा वेगळा अवतार जगाला समजला. कॅन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ओल्ड बॉय’ला ग्रँड पिक्स ज्युरी पुरस्कार मिळाला होता. यंदा नो अदर चॉइस (2025) सिनोमाला टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिपल्स चॉईस अवार्ड मिळाला. तो यंदाचा सर्वात गाजलेला दक्षिण कोरियन सिनेमा आहे.
तसं पाहिलं तर नो अंदर चॉइस (2005) हा ओल्ड बॉय (2003) चं एक्सटेन्शन मानता येईल. ओल्ड बॉयमध्ये ओडासू या पात्राला 15 वर्ष तुरुंगात डांबून ठेवलंय. का? त्याचं कारण त्याला माहित नाही. बाहेर आल्यावर हे सर्व कुणी केलं हे माहित करुन घेण्यासाठी त्याच्याकडे फक्त 5 दिवस आहेत. मग त्याचा रेस अगेस्ट टाइम टाईप खेळ सुरु होतो आणि सिनेमातल्या पुढच्या गोष्टी घडू लागतात. इथं ही सिनेमाचा हिरो, फॅमिलीमन, ओडासूकडे जे काही घडतंय त्याला सामोरं जाण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. ओल्ड बॉयचा नायक सुटाच्या विचित्र चक्रात अडकला आहे. नो अदर चॉइस (2003) सिनेमातही तेच आहे. युमान्सू हे मुख्य पात्रं ही असंच बेरोजगारीच्या फेऱ्यात अडकलंय. आता त्यातून बाहेर पडायला धडपड सुरु आहे. खर्चाचा हात आखडता झालाय. बायकोनं नोकरी करायला सुरुवात केलेय. घर विकायला काढलंय, घरातले कुत्रे विकून टाकलेत. त्याच्यासमोर आता कुठलाच पर्याय नाही. बेरोजगारी घालवायची असेल तर नोकरी लागेल, मग पण त्यासाठी सोबत स्पर्धेत असलेल्या इतर लोकांना संपवावं लागेल. तसं झालं तरंच त्याला नोकरी मिळेल आणि त्याचं कुटुंब गरिबीतून बाहेर पडेल, आता त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही.
ओल्ड बॉय सुड कथा आहे. बदल्याची नैतिक कोंडी आहे तर नो अंदर चॉइसमध्ये आपल्या हिरोला बेरोजगारीतून बाहेर पडायचंय, पण सर्व मार्ग बंद आहेत. ओल्ड बॉयमध्ये व्हिलनच्या हातात घटनाक्रमाचं नियंत्रण आहें, नो अंदर चॉइस मध्ये आपल्या हिरोला वाटतं आपण मुक्त आहोत, प्रयत्न करतोय, पण तसं नाहीय. एकूण काय तर परिस्थिती आणि कथानक वेगवेगळे असले तरी दोघांची अवस्था तिच आहे.
नो अंदर चॉइसमध्ये माणसाची जागा आता मशिननं घेतलेय आणि त्यामुळं माणूस बेरोजगाच्या गर्तेत ढकलला गेलाय यावर भाष्य आहे. तंत्रज्ञान आलं, प्रोडक्शन वाढलं, ऑटेमेशनच्या नावाखाली यंत्रं जोरजोरात धडधडू लागली, जास्त प्रोडक्टिव्ह झाली. त्यांनी माणसाला रिप्लेस केलं. यातून जगभरात वाढलेली बेरोजगारी हा नो अदर चॉईसच्या सिनेमाचा गाभा आहे. आज एआयमुळं हजारो नोकऱ्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हाडामांसाच्या माणसाला जे काम करायला काही तास लागतात ते काम एआय काही मिनिटांत किंवा सेकंदात करतं. मग प्रोडक्शन किंवा उत्पादन प्रक्रियेत माणूस का ठेवावा? असा धंदेवाईक विचार मालक करतात. नो ह्युमन इंटरवेन्शन म्हणजे माणूस विरहित प्रणाली माणसानेच विकसित केलीय तिच आता त्याचा घात करतेय.