गेल्या 22 मार्चपासून भारतीय नागरिक आणि कोरोना असं सूत्र समोर आलं. देशात याच दिवशी पहिल्यांदाच जनता कर्फ्यु नावाच्या संकल्पनेतून ‘लॉकडाऊनचा’ प्रयोग झाला, आणि भारतीयांनीही तो अगदी शंभर टक्के यशस्वी करुन दाखवला. मात्र या ऐतिहासिक दिनाच्या समारोपाला पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांची अनेकांनी ऐशीतैशी करीत ढोल-नगार्‍यांसह चक्क मिरवणुका काढून कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन दिवसभर पाळलेल्या सामाजिक अंतर नियमांवर पाणी फेरले आणि कोविडचे देशात नेमके काय होणार आहे हे देखील दाखवून दिले. या घटनेला आज चार महिने लोटले आहेत. या दरम्यान देशाने मोठ्ठा लॉकडाऊन ते दुसरा अनलॉक असा प्रवासही पूर्ण केला. मात्र ज्या कारणांसाठी देश ठप्प झाला ते कारण मात्र कायम राहीले आणि आज देशातील व राज्यातील आकडे पाहिले तर कोरोना संकट कमी नव्हे खूप मोठे झाले.

भारतात कोरोनाचा प्रवेश झाला. जगभरातील कोविड संक्रमितांचे आकडे पाहिल्याने जनतेच्या मनात भीतीही निर्माण झाली, त्यामागे या विषाणूंबाबतच्या माहितीचे अज्ञान हे सर्वात प्रमुख कारण होते. अशा प्रसंगात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला आणि लॉकडाऊनला सुरवात झाली. सुरुवातीच्या काळात परदेश वारी केलेल्या लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं. ती परिस्थिती हाताळत असताना अचानक धार्मिक स्थळात झालेल्या मरकजमुळे देश हादरला. मात्र यानिमित्ताने मरकज काय असते याची सुद्धा माहिती देशवासियांना पहिल्यांदाच झाली. यानंतर मात्र देशभर कोरोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. सुरुवातीच्या काळात एकाच समाजाचे रुग्ण सापडत गेल्यानं धार्मिक दुही निर्माण करणार्‍या मंडळींना आयती संधी मिळाल्याचे दिसून आलं. आणि त्यानंतर सुरु झाला खेळ कोरोना आकड्यांचा. एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे कोरोना रुग्ण सापडण्याची मालिका सुरु होती. आणि यानंतर खर्‍या अर्थाने प्रशासन सज्ज होऊ लागले. नवनवीन नियम आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम एकीकडे सुरु होतं तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसून आल्या.

कोरोना आणि नियमावली

सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्ण आढळला कि, त्याच्यावर उपचार करायचे आणि त्याच वेळी त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण करायचे व तपासणी करायची हा खेळ सुरु झाला. 14 दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णाची पुन्हा तपासणी करायची आणि निगेटिव्ह आला असेल तर घरी 14 दिवस विलगीकरण करायचे असे कडक नियम होते. सुरुवातीच्या काळात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी असल्यानं नियमांची अमंलबजावणी करताना प्रशासन कुठेही कमी पडत नव्हतं.

लॉकडाऊन ते अनलॉक प्रवास आणि नियम

दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ असलेला लॉकडाऊन आता नागरिकांसाठी अडचणींचा ठरत होता. तर, देश व राज्यासाठी सुद्धा आर्थिक दृष्ट्या गंभीर परिस्थिती निर्माण करत होत. रुग्ण संख्या जास्त वाढणार नाही आणि कोरोना आटोक्यात येईल असं वाटल्यानं हळूहळू अनलॉकचा उदय झाला आणि व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकारनं सुरु केला. परराज्यात अडकलेले मजूर गावाकडे जाऊ लागले व परराज्यातील नागरिक गावची वाट धरू लागले. सुरुवातीच्या काळात मोठ्या शहरांमध्ये आढळत असणार्‍या रुग्णांमुळे खेडी सुरक्षित आहेत असंच वाटू लागल्यानं शहरातील नागरिकांनी खरंतर खेड्यांची वाट धरली आणि त्यातूनच महानगरांमध्ये फिरणारा हा विषाणू ग्रामीण भागात पोहोचला. देशात आढळणार्‍या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणं आढळंत नसल्यानं कोरोनाचा शहर ते खेडी हा प्रवास अजून सुकर झाला असं म्हंटल तर ते वावगं ठरणार नाही.

वाढती कोरोना संख्या आणि नियमांत झालेले बदल

जसे दिवस जात होते तसे नियमही बदलत होते. हळूहळू व्यवसायांना दिल्या जाणार्‍या परवानग्या वेळेनुसार आणि आर्थिक दृष्टीतून महत्वाच्याच. मात्र हे सगळं सुरु असताना सरकारने नागरिकांना केलेल्या आवाहनाचा नागरिकांना विसर पडल्याचे अनेकदा दिसून आलं. सुरक्षित अंतर, मास्क या गोष्टींकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आणि त्याचे रुपांतर आज राज्यातील रुग्णसंख्येत दिसून येतंय. हळूहळू कोरोना रुग्ण वाढत जाऊ लागले व याचा परिणाम आरोग्य यंत्रणेसह सर्वच ठिकाणी दिसू लागला. कोरोना रुग्ण वाढत असताना अनेकदा बेड मिळत नसल्याच्या तक्रारी काही भागात पुढे येऊ लागल्या व याच नंतर सुरुवात होऊ लागली नियमावलीत बदल करण्याची. सुरुवातीच्या काळात 14 दिवस रुग्णालय व 14 दिवस घरी असे नियम होते, आता मात्र केवळ सात दिवस रुग्णालयात व सात दिवस घरात अशा नियमाची अंमलबजावणी सुरु आहे.

कोरोना नियमावली व स्वयंशिस्त

आज राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत रोजचं मोठी वाढ होतेय. अनेकदा खेड्यांमध्ये हा कोरोना आपले हातपाय पसरताना दिसून येतोयं. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावर आलीय. सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम फक्त प्रशासनाचं आहे अशी भूमिका बहुतेक नागरिकांनी घेतल्यानं कदाचित आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेयं अशीच स्थिती निर्माण झाली. गेल्या काही महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेय तर निगेटिव्ह असेलेल्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मात्र हा खेळ सुरु असताना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या प्रवासात नागरिक मात्र स्वयंशिस्त विसरले आहेत.

संस्थात्मक विलगीकरण ते गृह विलगीकरण

सुरुवातीला संस्थात्मक विलगीकरण या गोष्टीला प्रशासनाने जास्त प्राधान्य दिले. मात्र नंतरच्या काळात वाढती रुग्णसंख्या पाहता हे प्रशासनाला शक्य राहीले नाही आणि सुरु झाले गृह विलगीकरण. दररोज रुग्णसंख्येची वाढ पाहून प्रशासन सज्ज झाले आणि चाचण्यांचा वेग वाढवण्यावर भर दिला गेला. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींचा स्त्राव घेतल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्याची नवीन पद्धत सुरु झाली. आणि येथूनच सुरु झाला कोरोना विषाणूंची साखळी वाढण्याचा धक्कादायक प्रकार. ज्या व्यक्तीचा स्त्राव घेतला गेला, त्याला सूचना देऊनही तो घरी थांबणं गरजेचं असताना बाहेर फिरू लागला आणि कोरोनाचा धोका जास्त वाढू लागला. गेल्या महिनाभरात वाढलेली रुग्णसंख्या आता काळजी वाढवणारी ठरत आहे. अशा स्थितीत नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्त्राव तपासणी व विलगीकरण

रोज वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता चाचण्या करण्याचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. स्त्राव घेतल्यानंतर आता संशयित रुग्णांना घरी न सोडता संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. ज्या संशयित रुग्णांचे स्त्राव घेतले जातात त्यांचे अहवाल यायला 24 ते 48 तासांचा अवधी लागत असल्यानं सर्वच जणांना एकाच छताखाली ठेवलं जातं. येथूनच पुढे काळजी घेण्याची खरी गरज आहे. समजा 50 संशियतांचे स्त्राव घेण्यात आले, त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह येतात असे गृहीत धरले तर, उर्वरित 45 जणांचा पुढचा प्रवास अधिक काळजीचा ठरतो. निगेटीव्ह आलेल्यांना गृह विलगीकरणात ठेवले जाते. मात्र अशाच व्यक्ती नियमांना धाब्यावर बसवून घराबाहेर फिरतात. अहवाल निगेटीव्ह आला असला तरीही अहवाल प्राप्त होईस्तोवर त्यांचा संपर्क पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांशी असतो याकडे अशी मंडळी साफ दुर्लक्ष करते आणि येथूनच कोरोनाची साखळी चोहोदिशांना दौडू लागते. गृह विलगीकरणात पाठवतांना प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या सूचनांकडे अशी मंडळी दुर्लक्ष करते आणि त्यातूनच त्याचे कुटुंब, आसपासची आणि संपर्कातील मंडळी धोक्याच्या पातळीवर पोहोचते.

हाय रिस्क कॉन्टॅक्ट

गेल्या काही दिवसात याबाबतीत प्रशासन सुद्धा संथ झालं असून कोरोना रुग्ण सापडल्यावर त्याचा पूर्वइतिहास मिळविण्यात दोन ते दिवस जात आहेत. अनेक प्रसंगात तर रुग्णाचा संपर्कच शोधण्याकडेच दुर्लक्ष झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. ‘हायरिस्क’ कोरोना प्रसारातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कंटेनमेंट केलेल्या भागातून नागरिक राजरोसपणे बाहेर फिरतांना दिसतात याकडे सुद्धा फारसे कोणी गांभीर्याने पहायला तयार नाही. या प्रमुख गोष्टींकडेच दुर्लक्ष झाल्यास तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडणं केवळ अशक्य बनून जाईल. तालुक्यातील काही रुग्णांनी परस्पर पुण्या, मुंबईत जावून तपासण्या केल्या आणि अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिकडेच उपचारही घेतले, मात्र याबाबतची माहितीच स्थानिक यंत्रणेला नसल्याने त्याच्या संपर्कातील हायरिस्क मंडळीने त्याचा रहिवास असलेला भाग बाधित केल्याचेही काही दाखले आहेत. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणार्‍या अशा कोणत्याही व्यक्तीवर मात्र अद्यापपर्यंत कायद्याचा बडगा उगारला गेला नाही.

अनलॉक ते लॉकडाऊन परतीच्या प्रवासाकडे

सगळ्या मुद्यांचा व आपलं कोणतंही रूप न बदलणार्‍या कोरोनाचा विचार केला गेला तर नियम बदलले मात्र कोरोना नाही हे विसरुन चालणार नाही. अर्थात वाढते रुग्णांचे आकडे पाहून घाबरण्याची गरज नाही. मात्र स्वयंशिस्त लागणंं गरजेचं आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने सुद्धा आता नियमाची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुसत्या आर्थिक दंडाचा आकडा वाढवून व वाहनांवर कारवाई करून कोरोना रोखला जाईल असा विचार करण्यापेक्षा विलगीकरण व प्रतिबंधित क्षेत्रासाठी निश्चित असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासारखे आहे.