माझे शिवराय देव नव्हते आणि नाहीत. देव तर म्हणे ३३ करोडच्या वर आहेत. छत्रपती ह्या गर्दीत नव्हते, नाहीत आणि नको...
========================
क्लासिक 350 च्या बुलेटवर 3 मीटर च्या स्टीलच्या पाईपला 4 मीटरचा भलामोठ्ठा भगवा झेंडा लहरत घेऊन 50-60 च्या स्पीडने जाताना 'जय भवानी-जय शिवाजी' अस जीवाच्या आकांताने ओरडणारे दोघेच जन पाहून थोर वाटत... =========================
त्यांच्यापेक्षा आपला झेंडा मोठा पाहिजे, त्यांच्यापेक्षा आपली मूर्ती मोठी पाहीजे, आपली जयंती मोठी पाहिजे, अस व्हडाचढीवर सांगण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा आपला विचार आणि आचार मोठा असला पाहिजे असं ठरवूया.
==================
वातावरण भगवं-भगवं झालंय. त्या भगव्यातून शिवरायांच्या समानतेच्या विचारांची झालर अवघ्या विश्वावर मोठ्या प्रमाणावर पसरणे आवश्यक आहे.
=========================
आज एके 47 आणि तंत्रज्ञानाच्या युगात देखील तलवारीचे बळ दाखवले जात आहे जे आजच्या घडीला चुकीचे आहे. आज जर शिवराय असते आणि युद्धजन्य स्थिती असती तर त्यांनी निश्चितपणे बंदुका, बॉम्ब आणि नवीन तंत्रज्ञानाचा फायदा आणि आधार घेतला असता. न त्यांनी तलवार वापरली असती न आपल्या मावळ्यांना वापरू दिली असती. तलवार हे शौर्याचे प्रतिक वगेरे पर्यंत ठीक आहे पण उगाच दहशत वगेरे साठी चुकीचे आहे कारण जमाना ऐके 47, अणुबॉम्ब का है.
=====================
'शिवराय' हा विचार जेवढा आपल्याला समजलाय तेवढाच दुसऱ्यांना सांगावा. अतिशयोक्ती सांगू नका. कारण हा विचार जसा आहे तसा सगळ्यांना पुरून उरेल एवढा महान आहे.
=====================
राज्यात दुष्काळ वगेरे सारख्या स्थितीत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज प्रचंड चिंतीत असायचे. या परिस्थितीत आधी रयतेची चिंता कशी मिटली जाईल यावर उपाययोजन ते करायचे. शेतकरी, कष्टकर्यांचे दुख्ख ते आवर्जून जाणून घ्यायचे. म्हणून ते प्रजाहितदक्ष ठरले... आजही स्मरणात आहेत आणि अजून हजारो वर्षांपर्यंत स्मरणात राहतील. गरिबातला गरीब देखील त्यांची जयंती आज साजरी करतोय आणि करत राहील. नाहीतर आजचे हे भुक्कड लोकप्रतिनिधी जे शेतकऱ्यांच्या मरणाला फॅशन म्हणतात, नुसते दौऱ्यावर दौरे हाणतात. आचरण व्यवस्थित असेल तर ठीक नाहीतर लाज बाळगा आणि डिजिटलवरचे फोटो काढून टाका राजांसोबतचे...
=====================
लहानपणी आम्हाला शिवराय सांगताना अफजल खान, शाहिस्तेखान रंगवत असतांना 'मुस्लीम' खूप वाईट असतात अशी छबी रंगवली जायची. अर्थात जे सांगणारे होते त्यांच्याजवळच चुकीचा इतिहास पोचलेला होता. एखाद्या शूर मुस्लीम मावळ्याची स्टोरी सांगितल्यावर आपला जवळचा 'मुस्लीम' मित्र 'शूर' आहे बाकीचे सगळे अफजल, शाहिस्तेखान आहेत असा बालमनाचा समज व्हायचा. पण शिवराय मुस्लीमद्वेष्टे नव्हते हे सर्वांनाच परिचित आहेच. जवळपास सर्वच इतिहासकारांनी तसं लिहिलंय सुद्धा काही अपवाद असतीलही... सर्वांना समान वागणूक देणारा महान बहुजन राजा म्हणजे शिवराय...
=====================
शिवराय मनामनात, शिवराय घराघरात असं म्हणतो आपण. असं मनात असलेल्या शिवरायांचे मावळे (कुठल्या स्पेसिफिक जातीचे नव्हे) आजूबाजूला होत असलेल्या महिला छेडछाड आणि बलात्काराच्या घटनांकडे कसं पाहतात. अशा घटना घडल्यानंतर आधी पीडित किंवा आरोपीची जात शोधणारे कावळे आज जास्त झालेत. अशा घटनांत आरोपीचा तर कडेलोट शिवरायांनी केलाच असता, मात्र जात पाहून आक्रोश करणाऱ्यांचा देखील कडेलोट राजांनी केला असता.
======================
राजं तुमचे आचार, विचार, व्यक्तित्व, कृतित्व अंगी रुजवण्याचा आजन्म प्रयत्न राहील. सर्वव्यापी छत्रपति शिवाजी महाराज हे नाव आमच सर्वस्व आहे. जाती पातीच्या बंधनातून मुक्त होण्याची सुबुद्धि आणि तुमच्या विचारांच्या पथावर चालण्याची प्रेरणा सर्वांना मिळो... =====================
ना धर्मभेद ना जातपात. हीच तुमची शिकवण.
=====================
मानवता म्हणजे शिवराय सर्वधर्मसमभाव म्हणजे शिवराय वंचितांचा महामेरू शिवराय दीन दुबळ्यांचा कैवारी शिवराय कष्टकऱ्यांच्या तारणहार शिवराय शेतकऱ्यांचा आधार शिवराय आमचा आदर्श शिवराय... शिवराय, तुम्ही आमचा स्वाभिमान आहात. सर्वहारा लोकांचा अभिमान आहात. तुम्ही ना कुठल्या जातीपुरते मर्यादित आहात ना धर्मापुरते ना प्रांतापुरते. तुमच्या विचारांवर अन आचारांवर चालण्याचा प्रयत्न सुरुय अन आजन्म राहिल. तुम्ही जे विचार सोडून गेलात त्यावर आजही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, भविष्यातही राहतील. तुमच्या विचारांना, स्मृतीला मानाचा मुजरा. बहुजनांच्या राजाला मनाचा अन मानाचा मुजरा...