काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सुजय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि सुजय अहमदनगरच्या तिकिटासाठी भाजप प्रवेश करतो. भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे पाटलांवर टीका करताना आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे की दस्तुरखुद्द राधाकृष्ण विखे पाटील 1995 साली शिवसेनेतून मंत्री झाले होते. सत्तेसाठी त्यांनी तेंव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता आता पोरगा भाजपमध्ये जातोय, याचे नवल नाही. इकडे सुप्रियाताई म्हणतात आमच्या पोरांनी राजकारणात येऊ नये. पवार साहेब म्हणतात सगळे उमेदवार घरातले दिल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं, असं म्हणतात तोवर 'कार्यकर्त्यांचा आग्रह आहे' असं म्हणत पार्थ पवारांचं मावळचं तिकीट फायनल होतं. नारायण राणे भाजपच्या तिकिटावर खासदार होतात, त्यांचे पुत्र काँग्रेसचे आमदार असतात, सरकारच्या विरोधात बोलत राहतात. कोल्हापुरात महाडिक साहेब स्वतः कॉंग्रेसमधून विधानपरिषद सदस्य होते. मुलगा भाजप आमदार, पुतण्या राष्ट्रवादीतून खासदार.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार होते, मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार होतो, रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार होतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री/खासदार होतात.
पवार साहेबांच्या मुलाखती काय? भेटीगाठी काय? कार्यकर्त्यांकडून कौतुकाचे सोहळेच होऊ लागलेत. बाकी भाजपमधील इनकमिंग आणि सहयोगी पार्टी शिवसेनेशी असलेली अनोखी 'प्रेमकहाणी' सर्वांना परिचित आहेच. त्याबद्दल तर लिहायचीही इच्छा नाहीये इतकं पांचट झालंय, ते ही सर्वश्रुत आहेच.
पोरांनी राजकीय लोकांची काम करावी पण केवळ खाण्यापिण्यासाठी नको. काहीतरी उद्देश ठेवून काम करावी, त्यांचा 'आशीर्वाद' घेऊन सक्रिय राजकारणात जावं. सरळ आपल्या स्वार्थासाठी काम करावं. उद्योग धंदा करून पैसे कमवावा. ते आपला वापर करतात आपण त्यांचा वापर करावा. नेत्यांची मुलं परदेशात शिकतात. त्यांना भविष्याची कसली चिंता नसते. ज्यावेळी येतात त्यावेळी बरोबर ऍडजस्ट केली जातात. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही. देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं, मग पक्षासाठी, देशासाठी वेळ द्यावा, असा सल्ला अलीकडेच खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र कार्यकर्ते मात्र सगळं सोडून आपल्या नेत्यांसाठी आणि पक्षासाठी दिवसरात्र 'ट्रोलिंग' करत राहतात.
मोठ्या नेत्यांनी कार्यकर्त्याला मोठं केल्याची काही उदाहरणं आहेत. मात्र ती 'काही'च आहेत. दुसरीकडे राजकारणात फरफट झालेल्यांची मात्र अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियात व्हायरल झालेली एक छोटीशी गोष्ट जी ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे सरांनी शेअर केली होती. ही गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटतेय. ती गोष्ट अशी... मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात? उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड हत्ती, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट, उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर आणि महामहीम बादशहा एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला! बरं, इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शुत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार. तसा रिवाजच आहे! थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही. सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्यांचाच होणार. कारण, तसाच रिवाज असतो! ही गोष्ट प्रत्येक 'निष्ठावान' कार्यकर्त्यांनी आपापल्या डोक्यात फिट्ट करणे गरजेचे आहे. कारण आधी तुमची निष्ठा ही तुमच्या परिवाराशीच असली पाहिजे, कारण तुमच्या नेत्यांची निष्ठा केवळ 'खुर्ची'शी असते. हा इतिहास होता, वर्तमान आहे आणि भविष्यही. सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी आधी घर सांभाळलं पाहिजे. यात माझे काही मित्रही आहेत. आपल्या 'छत्र्या' होऊ देऊ नका दोस्ताहो. ते तुमचा वापर करतात, तुम्ही त्यांचा वापर करा. एकंदरीत पोटापाण्याचं बघा. #निलेश्राव