आजपासून बरोबर दोन वर्ष आधी वर्षापूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टने मला भरभरून प्रेम दिलंय. आयुष्यभर लक्षात राहील असे अनुभव या पोस्टने दिलेत. विशेषता नवी उमेद, कुबेर समूह, मनस्पंदन सारख्या काही सामाजिक, शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या काही समूह आणि पेजेसवरून या पोस्टला मिळालेले हजारो शेयर्स, लाखो प्रतिक्रिया ह्या सुखदायक होत्या. या विषयावर बोलण्यासाठी अनोळख्या महिलांचे, मुलींचे आलेले हजारो फोन हे माझ्यासाठी बक्षीसच. अजूनही ही पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. काही ठिकाणी नावाने तर काही ठिकाणी निनावी फिरतेय. पण मासिक पाळीसारख्या विषयावर किमान एकाही पुरुषात फरक पडणार असेल तर ही गोष्ट नावी-निनावी कशीही आली तरी बेहतरच. ती पोस्ट म्हणजे फार अभ्यासून वगैरे लिहिलेली नव्हतीच. मी आणि माझ्या भवती घडत असलेली एक खरी गोष्ट.


पोस्ट अशी होती-


पिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, चुलत्या आणि घरातल्या, गल्लीतल्या बायका लांब बसायच्या. आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की, 'अय तिकडं लांब खेळा, शिवू नका' अशा सुचनावजा धमक्या मिळायच्या. चुकून कधी शिवलचं तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषाकडून मार बसायचा. मग आईला विचारायचो ' आय, का गं, शिवायचं नाही' तर आई कावळ्याने शिवलंय, देवाने सांगितलंय अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची. एखाद्यावेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायची. लहान लेकराला माफ असतंय म्हणून कुशीत घेऊन झोपायची. तिला 4 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं. भांडी घासणे, कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायची. म्हणजे त्या चार दिवसात तिच्याकडे हे अधिकच काम वाढायच. तिची या चार दिवसातली कपडे वेगळी असायची, जी तिला पाचव्या दिवशी धुवून टाकावी लागायची. आई, घरात कुणी नसताना पाय चेपून दे म्हणायची तर आम्ही खेळायला पळून जायचो. मात्र या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो 'चार दिवसाचं' महत्व आणि त्रास समजावून सांगेल.  बरंच मोठं होईपर्यंत ही चार दिवसाची भानगड कळाली नाही. मग कॉलेजवयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्यावर प्रेयसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजलं. शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेंव्हा 'पिरेड' समजू लागला. मात्र त्यांच्या बोलल्याने त्याची तीव्रता कळाली नाही. प्रेमात पडल्यावर म्हणजे बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर ह्या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला. तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची, तेव्हा दूर असल्याने मी काहीच करू शकत नसायचो, त्यावेळी पुरुष असण्याची लाज वाटायची. आज, मात्र ह्या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो. मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी नॅपकिन आणून देतो. खरतर चार दिवस हे नावाला असतात. मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस, पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यांनंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो. या चार दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळीकीची आणि प्रेमाची गरज असते. प्रेमाने बोलणारे, मायेचे शब्द हवे असतात. यावेळी हातपायाचा गळाटा झाल्याने हातपाय चेपून देण्याची गरज असते. आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो. अभिमानाने सांगत नाही मात्र, मी या चार दिवसात घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो. हा काळ फार नाजूक असतो. या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात यामुळे चिडचिड, राग, रडणे या गोष्टी अचानक होतात. यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्वाचे असते. तिच्यासाठी कॅडबरी, आईस्क्रीम अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणतो. तिला चहा करून देतो. अंग चेपून देतो. दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी, ऑम्लेट, अंडामॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो. अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार मामुली आहे. कसय या गोष्टींनी विशेष काही फरक नाही पडत. मात्र त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात ह्या बायका. फार हळव्या असतात हो बायका. आपल्या अनेक चुकांना ह्या प्रेमामुळे कुणी पदरात नाही घेतलं तर त्या नक्की घेतात. नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकार गोष्टीशिवाय आपल्याकडं विशेष आहे तरी काय? त्यामुळे हे संपवू, नाही संपलं तर कमी तरी करूच.


 


आज जागतिक मासिक पाळी दिवस असतो. दोन वर्षांपूर्वी जळगावमध्ये असताना सलूनमध्ये कटिंग करायला गेल्यावर नंबर यायचा असल्याने 10-15 मिनिटात लिहिलेली ही पोस्ट. ही पोस्ट लिहिण्याआधी मला जागतिक मासिक पाळी दिवस वगैरे काहीच माहिती नव्हतं. मात्र ह्या पोस्टनंतर आणि यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि फोननंतर मला एका वेगळ्या प्रकारे पुरुषत्वाची अनुभूती आलीय हे नक्की. मी यामुळे अजून जास्त संवेदनशील झालोय. खरतर मासिक पाळी हा विषय फार चर्चा करावा असा फक्त आपण राहतो त्या समाजातच आहे. बाहेर याला एवढ महत्व दिले जात नसावे एव्हाना दिले जातही नाही. माझ्या सभोवताली अजूनही ही समस्या गंभीर आहे. अनेक भगिनींना आजही सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीये. जुने कपडेच आजही त्यांचा सहारा आहे. काही ठिकाणी तर अक्षरशा राख लावली जातेय हे अतिशय दुर्दैवी आहे. अजूनही मासिक पाळीचा विटाळ मानला जातोयच. यासाठी सरंजामी पुरुषी मानसिकतेसह महिलांमधील पुरुषी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ज्या गोष्टीमुळे आपला जन्म होतो ती गोष्ट विटाळ करावी अशी कशी असू शकते एवढ त्या लोकांच्या बुद्धीत घुसणे गरजेचे आहे. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनबाबत जनजागृती आणि प्रत्यक्ष काम करणारी अनेक लोकं आज दिसताहेत. यात विशेष करून सचिन आशा सुभाष या माझ्या मित्राचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्याने चालवलेली समाजबंध ही चळवळ फार वेगाने फोफावत आहे. अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना खरंतर मोठ्या प्रमाणात सहकार्य होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात सरकारी स्तरावरून हे सहकार्य जास्त अपेक्षित आहे. हळूहळू लोकं मासिक पाळीवर बोलती होत आहेत. स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये आपणही आपली 'मानसिक पाळी' समजून पुढं येणं गरजेचं आहे.