तीनेक वर्षापूर्वी सदाभाऊ मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यात अजून एक तसबीर होती. चळवळीतून राजकारणाच्या प्रवाहात आलेल्या तीन मित्रांची ही तसबीर. राजू शेट्टी, महादेव जानकर आणि सदाभाऊ यांची हात गळ्यात टाकून अतिशय सुरेख हसतानाचा हा फोटो पाहून ही दोस्ती किती जबरी होती याचा प्रत्यय पाहणाऱ्यांना यावा. त्या फोटोवर लक्ष्मीकांत, अशोक सराफ, महेश कोठारे या तीन हिरोच्या गाजलेल्या धडाकेबाज चित्रपटातील 'ही दोस्ती तुटायची नाय' असं देखील लिहिलेलं. शेतकरी-कष्टकरी वर्गाचे हे आशेचे किरण. सदाभाऊ आणि राजू शेट्टी म्हणजे कधीकाळचे जिगरी दोस्त. स्वाभिमानीच्या या दोन शिलेदारांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर रान उठवलं. व्हाया शेतकरी आंदोलन लोकांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ विधीमंडळ तर राजू शेट्टी संसदेच्या सभागृहात पोहोचले.


भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये सदाभाऊ मंत्री झाले. मात्र त्याच काळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन पेटले असताना राजू शेट्टी सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवीत असताना सदाभाऊंनी मात्र मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळून घेत सत्तेत राहण्याचा सेफ झोन मजबूत केला. मग नंतर शेट्टी-खोत वाद शिगेला पोहोचला. सोशल मीडियात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील लेटर वॉर होऊ लागली. दोघेही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींवर उतरल्याचे चित्र दिसून आले. अगदी सदाभाऊ यांच्या वडिलांच्या आजारपणाचा खर्च केल्याचे स्क्रिनशॉट शेट्टी यांच्या नावाने फेसबुक, व्हॉट्सअॅप वरून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर सदाभाऊ यांच्या नावाने ती रक्कम वापस केल्याच्या पोस्ट व बँकेचे ट्रांजेक्शन डिटेल्स सोशल मीडियात व्हायरल झाले. दोघांची सोडचिठ्ठी झाली. राजकारण म्हणजे 'सत्ता' चळवळ किंवा मैत्रीवर कशा पद्धतीने वरचढ होते याचे हे उदाहरण लक्षात राहण्याजोगे ठरले. अर्थात संघटनेच्या लेव्हलवर बघायचं झालं तर सदाभाऊंचे देखील संघटनेसाठी केलेलं योगदान विसरण्याजोगे नाहीच. मात्र त्यावेळी मोक्याच्या क्षणी सत्तेच्या सोयीची भूमिका शेट्टी आणि कार्यकर्त्यांना दुखावणारी ठरली.

यानंतर अनेकदा शेट्टी आणि खोत यांच्यातील कुरबुरी समोर आल्या. एकमेकांविरोधात बोलले. काल मात्र ही विरोधाची लेव्हल पार वरच्या टप्प्यात गेलेली दिसली. खोतांनी राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या भंपक माणसाला शेतकऱ्यांनी देवाला सोडलेल्या वळू सारखी अवस्था झाल्याची टीका केली. 'राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहित आहे, मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही' अशा शब्दात खोत यांनी आपल्या कधीकाळच्या जिगरी मित्रावर टिकास्त्र सोडलं.

यावर राजू शेट्टींही म्हणाले, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन फसलं. त्यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत. आंदोलन केंद्र सरकार विरोधात आहे की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी यांच्या विरोधात आहे ते आधी ठरवा. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिस्थासारख बोलले असावेत. माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या. ती विकून कडकनाथमधील लोकांचे पैसे परत करतो, असं म्हणत पलटवार केला.

हे सगळं ऐकल्यानंतर कधीकाळी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी, सत्तेविरोधात यल्गार पुकारणारी, प्रसंगी लाठ्याकाठ्या खाणारी चळवळीतली शेट्टी-खोत यांच्यासारखी अनेक मंडळी आठवली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर काकांना (अमर हबीब) या विषयावर बोलण्यासाठी फोन केला. काकांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून जवळून पाहतोय. शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात त्यांनी उभारलेली लढाई फार मोठी आहे. या शेतकरी नेत्यांच्या वादावर बोलताना अमर काका म्हणाले, 'शेतकरी आंदोलनाची नदी वाहून गेलीय. आता फक्त गाळ शिल्लक राहिला आहे. त्या गाळात नुसते किडे आहेत, ते असे वळवळ करतात. आंदोलनाचा प्रवाह संपला असल्याचं अमर काका सांगतात. सध्याच्या शेतकरी आंदोलनाची विशेषतः राजकीय पक्षांच्या आश्रयाने झालेल्या आंदोलनांची अवस्था पाहिली की काकांचं हे मत तंतोतंत खरं असल्याचं सिद्ध होतंय.

अमर काका म्हणतात, या नेत्यांना शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्याच माहिती नाहीत किंवा माहिती असल्या तरी त्या समोर आणायच्या नाहीत. त्यांना फक्त नॉन इशूला इशू बनवून आपली पोळी शेकून घ्यायचीय. हा थिल्लरपणा आहे. राजकीय पक्षांच्या दावणीला जाऊन बसायचं. एखादं मोठं आंदोलन झालं की असे प्रकार घडतातच. या लोकांचा आवाज त्यांच्या 'मालकांसाठी' आहे शेतकऱ्यांसाठी नाही, असं अमर काका म्हणाले. शेट्टी-खोत वाद पाहिला की हे किती तंतोतंत खरं आहे हे स्पष्ट होतंय. शेतकरीच या लोकांना केंद्रबिंदू आहे का? असा सवालही आता पडणं बंद झालंय, कारण पिच्चर क्लियर आहे. सत्तेसाठी एकमेकांना ढुसण्या देण्याचं काम केलं जातंय.

शेतकरी नेते आणि ज्यांनी अभूतपूर्व असा शेतकरी संप यशस्वी करून दाखवला असे डॉ अजित नवले यांचं नाव शेतकरी चळवळीत आज प्रामुख्यानं घेतलं जातंय. सध्याच्या या हेवेदाव्याच्या राजकारणावर डॉ नवले म्हणतात, आज शेती आणि शेतकरी संकटात आहे. सर्वच शेतकरी नेत्यांनी व्यक्तिगत कुरघोड्या, मानापमान, अजेंडे बाजूला ठेवत शेतकरी बापाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. दुर्दैवाने अनेक प्रतिष्ठित नेते व्यक्तिगत हेवेदावे आणि राजकीय स्वार्थात अडकून पडले आहेत, हे फार दुर्दैवी आहे, असं डॉ. अजित नवले सांगतात.

या सगळ्या गोष्टींची नोंद शेतकऱ्यांची पोरं ठेवत आहेत. या नेत्यांना पोरांनी बाजूला सारलंय. महाराष्ट्रातला शेतकरी संप हे त्याचं उदाहरण आहे. सर्व नेत्यांना एका स्टेजवर यायला ह्याच पोरांनी भाग पाडले. शेतकरी नेत्यांच्या संकुचित धोरणाला पोरांनी बाजूला सारलंय. स्वतःच्या ताकतीवर ही पोरं नक्की शेतकऱ्यांची चळवळ उभी करतील, असा विश्वास डॉ. नवलेंना आहे. डॉक्टर सांगतात, दुधाच्या दरवाढीच्या आंदोलनाचं असंच झालं. पोरं फिरली, दूध संकलन केंद्रांवर गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न मांडले. मग ही बाकीची लोकं उभी राहिली. शेतकऱ्यांच्या पोरांचा हा नवा पॅटर्न उभा राहतोय, असं डॉ. नवले सांगत आहेत.

मात्र आजपर्यंत असे पॅटर्न उभे राहिले नाहीत का? राहिले तर ते पॅटर्न उभे करणारी मंडळी राजकीय दावणीला बांधली गेलीत का? असे सवालही आहेतच. इतिहास सांगतो, शेतकऱ्यांची संघटना बांधण्यासाठी जोशी यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. सदानंद मोरे यांनी आपल्या एका लेखात सांगितलंय, शेतकरी हा मनुष्य हा दिवसा गावात सापडणं अवघडच. जोशी रात्री-अपरात्री त्यांच्या प्रसिद्ध बुलेटवर बसून गावात धडकायचे. गावातल्या भल्या लोकांना पंचायतीच्या किंवा सोसायटीच्या इमारतीत, चावडीवर किंवा देवळात बोलवायचे आणि त्यांच्यासमोर आपले विचार मांडायचे. रत्नाकर पवार सांगतात, लाखोंच्या संख्येने शेतकरी संघटनेसाठी अनुयायी व कार्यकर्ते उभे करण्यात जोशी यांना भक्कम यश आले हे कोणीही मान्य करेल. मात्र संघटनेला राजकारणाच्या जवळ आणून लोकतंत्रात्मक सत्ताकारणाचा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लाभ मिळावा, या हेतूने शरद जोशी यांनी राजकारणात प्रवेश केला. सवंग राजकारणात शिरताना शेतकरी संघटना ही एक चळवळ म्हणून राहील, स्वयंसेवी संस्था राहील, आंदोलन राहील की राजकीय पक्ष म्हणून लोकतंत्रात्मक राज्य संस्थेमध्ये कार्यरत राहील या बद्दलची शरद जोशी यांची द्विधा मन:स्थिती असणे हे शेतकरी संघटनेला उतरती कळा लागण्याला कारणीभूत ठरलं होतं.

आजही अशीच स्थिती आहे. शेतकरी आंदोलनातील हे दोन महत्वाचे शिलेदार नॉन इशूला इशू बनवून आपली पोळी शेकून घेताहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. 'शेतकऱ्यांसाठी' ही बिरुदावली घेऊन मिरवणारे आणि संघटना मोठे करणारे हे नेते आपापल्या राजकीय सोयीसाठी सोयीस्कर भूमिका घेताना दिसताहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी राजा संकटात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कोरोनामुळे तर शेती, शेतकरी उध्वस्त झालाय. त्यात बोगस बियाणे, खतांची कमतरता यामुळं खरीफ उध्वस्त झालंय. अशा स्थितीत हे शेतकरी चळवळीतील शिलेदार व्यक्तिगत हेवेदावे आणि राजकीय स्वार्थात अडकून पडले आहेत, हे फार दुर्दैवी आहे. यामुळं चळवळीचं नुकसान तर झालंच आहे, मात्र आता शेतकऱ्यांनी आता विश्वास कुणावर ठेवायचा? हा सवाल आहे.

सत्ता आणि सरकारं बदलली. शेतकऱ्यांचे सवाल आणि समस्या मात्र त्याच आहेत. उरल्या नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या चळवळी, असं एक शेतकरीपुत्र म्हणून मला आज वाटतंय. सत्तेच्या दावणीला चळवळी बांधल्या जाऊ नयेत, या चळवळी सत्तेच्या दावणीला बांधून बटिक होऊ नये एवढीच अपेक्षा या नेत्यांकडून आपण करु शकतोच.

निलेश झालटे यांचे अन्य ब्लॉग

#पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी

BLOG | मराठी : भाषा जगण्याची गोष्ट, अभिमानाची नाही!

महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरचा गोतावळा, घराणेशाहीचा रुबाब कायम

पुरुषांची 'मानसिक पाळी'...!

'निष्ठावान' कार्यकर्त्याहो पोटापाण्याचं बघा