केळेवाडीच्या दिशेने एक इनोव्हा गाडी संथ गतीने जात आहे. उन्हाळा असल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडं पानगळ झाल्यामुळे उघडी बंब दिसतायत. वड, पिंपळ या झाडांच्या पारंब्याची तर जमिनीकडे स्वतःला खेचण्यासाठी झाडाबरोबरच रस्सीखेच सुरुय... त्यातच पांढरा, केसरी, सोनचाफा ऐन उन्हाळ्यात फुललेला दिसतोय. इकडं इनोव्हा गाडीत चालकाच्या शेजारच्या सीटवर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता राहुल जोशी बाहेरचं निसर्गाचं बदलेलं रुप पाहून खुश झाला आहे. पाठीमागच्या सीटवर कीर्ती देशपांडे सायंकाळी पुण्यात नाटकाच्या शोसाठी वेळेत कसं पोहचायंच या टेन्शनमध्ये आहे. तीच्या शेजारी बसलेली अल्फीया खान ही नवोदित अभिनेत्री रात्रभर शुटिंग करुन दमल्याने झोपी गेलीय. ड्राइव्हर मात्र आपल्याच सुरात कमी जास्त स्पीड करत गाडी चालवतोय. मधून मधून राहुल जोशी सांगत असलेल्या निसर्गाच्या वर्णनाने तो एकदम भारावून गेलाय. अशातच कीर्तीची काळजीमुळे होणारी चिडचिड राहुलच्या लक्षात येते.
तो नजरेने तिलाच काय झालं म्हणून खुणावतो. यावर कीर्ती बोलायला सुरुवात करते. हल्ली चित्रपटदृष्टीत कलाकारांचं कोणी ऐकतंच नाही. निर्माते बोलतील तसं त्यांच्या तालावर नाचायला लागतं. वैताग येतो अक्षरशा निर्मात्यांच्या नियमांची आणि अटींची पुर्तता करता करता. आता हेच बघ ना! मुंबईत इतक्या छान छान पद्धतीने वेब सीरीज शुट होत असताना आपल्याला मात्र इकडं मुंबई पासून लांब डोंगरावर सिनेमाच्या प्रमोशनल शुटसाठी पाठवलंय.
कोणाबरोबर काय शुट करायचं आहे याची देखील माहिती नाही. राहुल जोशी मात्र ' हम्म हम्म' करत याविषयावर बोलणं टाळतो आणि दाराची काच खाली घेत समोरुन येणाऱ्या शाळकरी मुलांना ' केळेवाडी' चा रस्ता विचारतो. मुलं गोऱ्या पाहुण्याला बघुन एकदम लाजून जातात. आणि डोंगराच्या घाटमाथ्याकडं हात करत केळेवाडीचा रस्ता दाखवतात. गाडी घाटमाथा चढून चिंचोळ्या वळणाने कच्च्या रस्त्याला लागते. उन्हाळा असल्यामुळे रस्त्यावरच्या लालमातीचा धुराळा गाडी पुढे जाईल तसा मागे उभा राहतो. रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पवनचक्क्या लांबच लांब दिसणारं उन्हानं पिवळधम्मक झालेलं गवत. असा सारा नजराणा या मुंबईच्या पाहुण्यांच स्वागत करत असतो.
इकडं केळेवाडी गावाच्या सुरुवातीला साधा पँट शर्ट घातलेला दिग्दर्शक नितीन पवार दगडावर उभं राहून अँड्राँईड मोबाईलवर रेंज शोधण्यात व्यस्त आहे. नेमकं त्याच्याच पाठीमागच्या बाजूला खड्ड्यात कौलारु दहा पंधरा घरांचं गाव दिसत आहे. तर समोरच्या दिशेला उंचच उंच पवनचक्क्या दिसत आहेत. इतक्यात लांबूनच वर उडणारा लाल धुराळा दिसतो आणि मुंबईची टिम गावाकडं येत असल्याचा अंदाज नितीनला येतो. दुसरीकडं गावात संत्या, सुरखी कॅमेरा ट्राईपॉडवर(कॅमेऱ्याचं स्टँण्ड) लावण्यात व्यस्त आहेत तर अव्या साऊंडसाठी कळकाच्या काठीला माईक सुतळीन बांधण्यात गुंग. तसेच बापू, माधुरी एकमेकांचे संवाद वाचण्यात दंग. सगळं वातावरण एकदम कसं शुटिंगमय होऊन गेलंय. गाववाल्यांनी देखील मुंबईच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल-ताशे लेझीमचं पथक सज्ज करुन ठेवलंय.
इतक्यात नितीन पवारांसोबत' इनोव्हा' गाडी गावात प्रवेश करते. नितीन पवार गाडीतून खाली उतरताच. एक मुलगा जोरात शिट्टी वाजवतो आणि लेझीम आणि ढोलताशे एकसुरात वाजायला सुरुवात होते. डिंच्याक डिच्याक डिंच्याक डिच्याक. अर्धवट झोपेतून जागी झालेल्या अल्फिया खानच्या चेहऱ्यावर या आगळ्या- वेगळ्या स्वागताने आनंदाची आणि आश्चर्याची लकेर उमटते. राहुल तर कधीचा मुलांसोबत लेझीम खेळण्यात दंग झालेला असतो. तर दुसरीकडे कीर्ती मात्र आणि हे काय नवीनच. शुटिंग करायला आलोय की लेझीम खेळायला या भावनेने गाववाल्यांकडे पाहत राहते. नितीन पवार आणि त्यांचे सहकारी अव्या, संत्या, सुरखी, माधुरी, बापू सर्वांच स्वागत करतात. पाहुण्यांचा स्वागत- सत्कार होता करता बाकी मंडळी शुटिंगच्या तयारीला लागलेली असते. नितीन पवारांचा सहाय्यक दिग्दर्शक नितीन वडेवाले लागलीच शुटिंगची स्क्रीप्ट कीर्ती आणि अल्फियाच्या हातात ठेवतो. कीर्ती लगोलग तीला दहाच्या आत पुण्यात पोहचायचं आहे आणि त्यामुळे शुटिंग कसल्याही परिस्थितीत तीन पर्यंत आटोपण्याची तंबी नितेशला देते.
भोळाभाबडा नितीन वडेवाले चटकन जाऊन दिग्दर्शकांच्या कानात पटकन शूटिंग उरकण्याबाबतची माहिती देतो. इकडे नितीन पवार मात्र चालता-बोलता शूटचे सीन उडवण्यास सुरुवात करतात. काहीवेळात शूटिंग पटापट पूर्ण केलं जातं. सहाय्यक दिग्दर्शक नितीन वडेवाले मात्र वेळावेळी काही बाकी तर राहिलं नाही ना याची खातरजमा करत राहतो. सुर्की माधुरी आप- आपलं शूट उरकून आलेल्या पाहुण्यांच्या जेवण्याच्या सोयीसाठी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या असतात. इकडं शूटवर अव्याच्या वाढीव डायलॉगचा कोणताही त्रागा न करता राहुल मात्र मोठ्या उत्साहाने शूट पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. अल्फिया आणि कीर्तीला तर केव्हा शूट करून आपण फ्री झालो हे देखील लक्षात येतं नाही.
दिग्दर्शकांनी शूटिंग पूर्ण झाल्याचं जाहीर करताच इतका वेळ ' बूम माईक' घेऊन ताटकळत असणारे बापू सुटकेचा निश्वास सोडतात. कॅमेरामन उमेश आपल्या साथीदारांसह शूटिंगच सर्व साहित्य ठेवण्यात व्यस्त होतो. इकडे सरपंचांच्या घरात शूटिंगसाठी आलेली सर्व मंडळी जेवायला बसतात. नेहमी सारखंच आमटी भात भाकरीचा बेत पाहुण्यांसाठी केलेला असतो. पाहूणे जेवायला बसतात. ताटात मिरचीचा ठेचा, कांदा, आमटी आणि गरमागरम भाकरी वाढलेली असते.
मुंबईत पिझ्झा बर्गर खाऊन वैतागलेली ही मंडळी ताटातली दीड दोन भाकरी कधी संपवते हे त्यांना देखील लक्षात येतं नाही. भरगच्च पोटभरल्यानंतर हळू- हळू बाजूला सरकत मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होतात. सकाळपासून या पोरांचा कामाबाबतचा राबता आणि आदर पाहून मुंबईची मंडळी बेहद खूश होऊन गेलीय. कीर्तीचा तर जायच्यावेळी तिथून पाय निघत नसतो. पण पुन्हा संध्याकाळच्या नाटकाची वेळ लक्षात घेता जड अंतःकरणाने ती सर्वांचा निरोप घेते. हळू हळू गाडी नजरेच्या टप्प्याआड होऊ लागते. सुर्य देखील मावळतीला जायला लागला आहे. आकाशात पक्षांची घराकडे जाण्यासाठी गडबड सुरू आहे. समोर दिसणाऱ्या आभाळा एवढ्या पवनचक्क्यांचं मंद वाऱ्यावर संथ गतीने फिरणे सुरू आहे.
मंडळी, हे आपल्याला वाचताना जरी एकदम भन्नाट वाटतं असलं तरी गावाकडच्या गोष्टी या वेब सीरिजच्या टीमला हे नवखं राहिलेलं नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल वर्षभरात मराठीमधले जे काही चांगल्या बॅनरचे सिनेमे येऊन गेले. ते सर्व या वेब सीरिजच्या सेटवर स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येऊन गेलेत. म्हणजे खरं सांगू का जसं प्रत्येक निर्मात्याला आपल्या सिनेमाचं प्रमोशन ' चला हवा येऊ द्या' मध्ये व्हावं असं वाटतं त्यातच आता गावाकडच्या गोष्टींची देखील भर पडलीये.