माळीणकरांच्या दुखःवर फुंकर घालण्याच्या उद्देशाने शासनानं घरं बांधून दिली. त्यांच्या दुखावर तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु जखम एवढी खोल होती की, तेवढ्याने ती बरी होणे कदापि शक्य नव्हते. यासाठी काही करता येईल का म्हणून धडपड करत होतो. बरेच दिवस ठरवलं होतं. तिथं प्रत्यक्ष भेट देऊ. लोकांशी चर्चा करु. आपल्या परीने होईल तेवढी मदत करु. लगोलग दुसऱ्याच दिवशी ऑफिसला सुट्टी मिळाली.


सकाळी लवकरच शिवाजीनगरहून मंचरसाठी बस पकडली. दीड-दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी मंचर स्टेशनला येऊन थांबली. स्वागताला मैत्रिण प्रीती पवार हजर. बराचवेळ चर्चा केल्यानंतर तिने मंचर जवळील पळसटिका गावाला येण्याचा प्रचंड आग्रह केला. तिच्याकडे आल्यामुळे तिला नाहीही म्हणता येईना. शेवटी बालकाश्रमात दहा मिनिटे थांबून पुढे निघण्याच्या आश्वासनावर आमच्या गाडीने वेग घेतला. अर्ध्या तासात गाडी आश्रमाच्या दारात उभी. इथेही स्वागताला  लहान मुले हजर. प्रीती आणि तिचे मिस्टर तर लगेचच तेथील वातावरणात रमून गेले. परंतु माझं सर्व लक्ष माळीण गावाकडं लागलेलं. त्यामुळे तिच्याकडे जाण्यासाठी तगादा लावला, तेव्हा तिने मला इथे आणण्यामागचे कारण सांगायला सुरुवात केली.

काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगरच्या बालसुधारगृहातून दहा मुलांना या आश्रमात बाल कल्याण समितीने वर्ग केलंय. या मुलांची पार्श्वभूमी अशी की, मुलं अनाथ आहेत. कुणी रेल्वे स्टेशनला तर कुणी कचरा कुंडीजवळ सापडलेलं. कुणाचे लहानपणीच आईवडील सोडून गेलेले. कुणी बालकामगार म्हणून पकडला गेलेला तर कुणी शंभर टक्के अपंग आहे म्हणून सुधारगृहासमोर पालक सोडून गेलेत. यांना ना जात ना धर्म.



धक्कादायक बाब अशी की, कागदोपत्री कसलीही नोंद नसल्यामुळे ही मुलं शासनाच्या विविध सवलतींपासून कोसो दूर. मुलांची आडनावे ए.बी. सागर, एक्स.वाय बली अशी. सगळं काही भयंकर आणि विलक्षण होतं. कानात कोणीतरी शिसं ओतावं आणि कान हळूहळू बधीर होतं जावा, अशी माझी अवस्था झाली होती.

इतक्यात बालकाश्रमाचे चालक विलास पंधारे भेटायला आले. थोडावेळ गप्पा-टप्पा झाल्या आणि त्यांनी थेट मुद्द्याला हात घातला. साहेब राग मानून घेऊ नका. परंतु मला ना पत्रकारांचा प्रचंड राग येतो. समाजात घडणाऱ्या अनेक वाईट घटनांवर पत्रकार प्रकाश टाकतात. लेखणीच्या धारेने भल्या भल्या गुंडाना ताळ्यावर आणता. त्याच्या बातम्या देखील हे मोठेच्या मोठे मथळे लिहून छापून आणता. वाचणाऱ्याला त्यामुळे हुरुप चढ़तो. अन्याय-आत्याचाराविरुद्ध लढण्याचे बळ मिळते. परंतु प्रत्येक्षात गुंड मवाली तर दुसऱ्या दिवसापासूनच आरामात फिरताना दिसतात. एकंदरीतच काय तर सगळचं अलबेल असतं राव तुमचं. कधी मॅनेज होऊन जातात कोणास ठाऊक? त्यामुळे प्रश्न असा आहे की, गरीबानं न्याय मागावं तर कोणाकडं. आशेचा एक किरण म्हणून चौथ्या स्तंभाकडं पाहतं होतो. पण कशाचं काय आणि फटक्यात पाय असली गत झाली आमची.



मगापासून सरांच्या तोंडाचा पट्टा जोर जोरात सुरू होता. ते सगळं ऐकून मला मात्र प्रचंड राग आला होता. किती वायफळ बोलतो हा माणूस. मुख्य शहरापासून पन्नास कोस लांब राहून कसल्या फालतू गप्पा मारतो हा. हे म्हणजे लग्नाला जाऊ नको म्हंटलं तर कुठल्या गाडीत बसू अशी गत झाली. कुणी विचारलंय पत्रकार काय करतात ते?? प्रितीला तर रडू की काय करू हेच कळेना. एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागलं तिला. स्वतःची माप काढून घेण्यासाठी आलो होतो का इतक्या लांब मी?? रागाचा अवंढा  गिळत त्यांच्या अशा बोलण्यामागे नक्की काय कारणं असावीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नक्की असं काय झालंय म्हणून त्यांना प्रश्न केला? तेव्हा सरांनी सांगायला सुरुवात केली. सर खोटं नाही बोलणार तुमच्याशी. गेले कित्येक दिवस बालकाश्रमातील मुलांच्या विविध प्रश्नांना घेऊन प्रशासनाशी लढतोय. परंतु कोणीही दखल घ्यायला तयार नाही. याविरोधात एक दोन दैनिकांनी दखल घेतली. वाटलं आता नक्की फरक पडणार पण काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर बऱ्याचवेळा असा प्रकार माझ्या बाबतीत घडला. मला तर वाटतंय पत्रकार आणि अधिकारी यांची काही तरी मिलीभगत नक्की असणार. यामुळंच छापून आलेल्या बातम्या आणि त्यानंतर वाहिन्यातून घडलेल्या चर्चा कधी हवेत विरुन जातात कळतंच नाही. यावर मी त्यांना नक्की असा कोणता प्रश्न आहे ज्याला उचलून धरण्यास सर्वत्र नकार मिळत आहे असं विचारलं. त्यावर सरांनी सांगायला सुरुवात केली.

शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात ऑक्टोबर 2015 मध्ये लहान मुलांवर (वय वर्षे 8 ते 12) तिथेच राहणाऱ्या मुलांनी (वय वर्षे 13 ते 17) लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले. या प्रकाराला घाबरुन पीडित मुलांनी रातोरात सुधारगृहातून पळ काढला. पहाटेच्या वेळी ही मुले स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांची अस्थेने चौकशी केली असता संबंधीत घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मदतीने शेवटी शिवाजीनगरच्या पोलीस स्थानकात आठ मुलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. मुलांनी दिलेली माहिती अशी की, वयाने मोठी असणारी मुले रात्री अश्लील चित्रफिती ई-लर्निंगच्या पडद्यावर पाहतात आणि सेम तसले घाणेरडे प्रकार आमच्यासोबत करतात.



सूत्रांची माहिती अशी की, यातील फिर्यादी मुलावर सतत हा प्रकार केल्यामुळे तो वारंवार आजारी असतो. त्यावेळी असणाऱ्या तपास अधिकाऱ्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे संपूर्ण प्रकार सुधारगृहाकडून दडपण्यात आला. एवढं कॉन्फिडंटलीत बोलतोय कारण त्यावेळी सुधारगृहातील अधिकाऱ्यांना हे सगळे प्रकार माहीत होते. परंतु नोकरी ठिकवण्याच्या नादात त्यांनी आणि त्यांच्या वरिष्ठांनी मिळून तिथल्याच अधिकाऱ्यांची कमिटी नेमली आणि थातुर-मातुर  अहवाल सादर केला. यात मुलं खोट बोलत असल्याचं नमूद केलं होतं. इतकंच नाही तर मुलांचा वैद्यकीय अहवाल देखील दडपण्यात आला. तपासी महिला पोलीस अधिकारी मुजावर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुढे  कोणतीच कारवाई घडली नाही. या प्रकरणानंतर देखील पीड़ित मुले व अत्याचारी (विधीसंघर्षशित )एकत्रच राहत होती (शिवाजी नगर बालसुधारगृहात) या नंतर या मुलांबरोबरच इतर अनेक मुलांवर त्याच मुलांनी बलात्कार केले. मे 2017 मध्ये त्या मुलांवर तब्बल 3 गुन्हे (पोस्को अंतर्गत) नोंद करण्यात आले आहेत. तरी देखील संबंधीत गुन्हेगारांवर योग्य कारवाई झालेली नाही. या प्रकरणा बाबत वाच्यता करणारी तक्रार "महिला बालकल्याण अधिकारी" यांच्या कपाटात तब्बल सहा महिने पडून होती. तरी देखील त्यांनी वाचण्याची तसदी देखील घेतली नाही.

याच प्रकरणातील आणखी एक भयंकर बाब अशी की राज्यात ई-लर्निंगच्या अंतर्गत डिजिटल उपकरणे सर्व शाळांना देण्यात आली होती. शिवाजीनगरच्या सुधारगृहात देखील ते देण्यात आले होते. याच पडद्यावर येथील मुले रात्रभर ब्ल्यू फिल्म बघत असत. यावेळी लहान मुलांना जबरदस्तीने त्या फिल्म मोठी मुले बघायला लावत असत. त्यांनी न पाहिल्यास त्यांना पाठीमागून लाथा घातल्या जात. यानंतर लहान मुलांवर मोठी मुले अनैसर्गिक कृत्य करत असत. या प्रकरणातील मुख्य आरोपी तब्बल दोन महीने फरार होता. तरी देखील पोलीस त्याला पकडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले होते.



याच सोबत आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे दोन अपंग मुलांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यातील एका मूलाला नैसर्गिक विधीसाठी चार-चार दिवस न नेल्यामुळे त्याच्य़ा छातीत पाणी झाले. सध्या त्याची दोन्ही फुफ्फुसं निकामी आहेत. त्याचाच छोटा भाऊ व्यवस्थित होता. तो टॉयलेटमध्ये पडला. त्याला दोन दिवस दवाखान्यात न नेल्यामुळे सध्या तो शंभर टक्के अपंग झाला आहे. अशी आणखी दोन उदाहरणे आहेत. फुप्फुसे निकामी झालेला मुलगा खूप कमी जगेल अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. वरील प्रकरणात दोन मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. यातील एक बारामती येथील बालकाश्रमात तर दुसरा भिगवण येतील बालकाश्रमात आहे. याबाबत महिला व बाल कल्याण पुणे  विभागचे आयुक्त लहुराज माळी यांना देखील याची पूर्ण माहिती आहे तरी देखील अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांनी याबाबत आलेला अहवाल रद्द केला असून त्यावर आणखी एक कमिटी नेमली आहे. त्यांना याबाबतचा अहवाल दोन महिन्यानंतर देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

बोला साहेब आता... हे सगळं असं आहे. आता तुम्ही म्हणाल मला कशाला या कामाची उपरती आलीय. असला कसला मुलांप्रती कळवळा आहे तर ते ही सांगतो. आज वयाची चाळीशी पार करत आलो. मुलं नसल्याची खंत काय असते ते माझी मला माहीत. बायको तर दिवसेंदिवस खंगत चालली होती विचार करून करून.  शेवटी बालकाश्रम स्थापन केला. स्वतः नोकरीला राजीनामा दिला. आता पूर्ण वेळ आश्रमासाठी दिला आहे. पत्नी शिक्षिका आहे जवळच्या गावात. तिच्या पगारातून चालू आहे आश्रम. जेव्हा ही मुलं इथं आली तेव्हा संबंधित प्रकार उघडकीस आला. आता असल्या प्रवृत्तींना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. कोणी सोबत आले- नाही आले तरी मी लढत राहणार आहे.