राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चेंबूर (Chembur) येथील युवा मंथन शिबिरात पक्षातील सहकाऱ्यांशी बोलून लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं म्हंटलं. जर भाकरी फिरवली नाही तर भाकरी करपते असं म्हणत त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शरद पवार नेमकं असं का म्हणाले असतील याचाच राष्ट्रवादीतील वरिष्ठ सुत्रांच्या माध्यमातून शोध घेण्याचा केलेला प्रयत्न 


शरद पवार शरण जाणार की नामोहरम करणार?


19 एप्रिलला माध्यमांमध्ये अजित पवार बंडाच्या तयारीत असल्याची बातमी येऊन धडकली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपच्या साथीला नेमकं कोण जाणार याची. महत्त्वाची बाब म्हणजे या कालावधीत अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची कायम चर्चा होते ती मंडळी देखील अजित पवारांना विधानभवनातील कार्यालयात येऊन भेटून गेली. यामध्ये 2019च्या बंडात आघाडीवर असणारे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अण्णा बनसोडे, नितीन पवार, शेखर निकम. अनिल पाटील, धर्मरावबाब आत्राम, संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत माने, राजू नवघरे, दत्तामामा भरणे यांचा समावेश होता. तर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी जाऊन भेट घेणाऱ्यांमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख आणि खासदार सुनील तटकरे यांचा समावेश होता. एकिकडे या भेटीगाठी सुरु असताना अजित पवारांनी माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हंटलं मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत 8 एप्रिलला भेट झाली होती का याबाबत मात्र चुप्पी साधल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकंदरितच आज नाहीतर उद्या अजित पवार भाजपसोबत जाणार असे राजकीय अडाखे बांधले जात आहेत. याबाबत अजित पवारांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की, अजित पवार यांची संपुर्ण पक्षासह भाजपच्या साथीला जाण्याची  इच्छा आहे. याचाच प्रत्यय अजित पवार यांनी 19 एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळतो. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, आमच्या पक्षात सर्व निर्णय सर्वानुमते होतात. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीत राहणार आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी "एबीपी माझा"शी बोलताना ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. जे जातील ते स्वतःच्या जबाबदारीवर जातील. पक्ष मात्र महाविकास आघाडीतच राहिल असं स्पष्ट केलं होतं. चेंबूर येथील सभेत शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते असं म्हणत एकप्रकारे बंडाच्या तयारीत असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाच यानिमित्ताने इशारा दिल्याचं बोललं जात आहे. 


याबाबत राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की, शरद पवार यांनी कधीही शरण न जाता लढाई लढणं पसंद केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी शरद पवार निष्क्रिय झालेत असं भाजपच्यावतीने सातत्याने म्हंटलं जात होतं. दिवसेंदिवस राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत होती. आता लढाई एकांगी झाली असून भाजप एकहाती सत्ता प्रस्थापित करणार अशी चर्चा होती. त्यातच भाजपच्या वतीने शऱद पवारांना आणखी निष्क्रीय करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांमार्फत ईडीची नोटीस पाठवण्यात आली आणि बघता बघता हातून निस्टत चाललेली बाजी शरद पवारांनी पुन्हा हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्यात अवघ्या काही तासांत वातावरण पलटलं. कारण शरद पवार यांनी ईडी चौकशीला न घाबरता ईडी कार्यालयात चौकशीला येत असल्याचा निरोप अधिकाऱ्यांना पाठवला आणि कार्यकर्त्यांसह ईडी कार्यालयाच्या दिशेने जाण्याची तयारी सुरु केली. शरद पवारांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे अचानक पोलीस यंत्रणेवर आणि प्रशासनावर ताण आल्याचं पाहायला मिळालं. स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी येऊन आपण कार्यकर्त्यांना थांबवण्याची विनंती केली तर दुसरीकडे अवघ्या काही तासात कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले. राज्यातील हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता अखेर केंद्रीय यंत्रणांवर नोटीस मागे घेण्याची नामुष्की ओढवली. दुसरं उदाहरण म्हणजे 2019 साली पार पडलेली लोकसभा निवडणुक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं. ज्यादिवशी लोकसभेचा निकाल आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच शरद पवार कोकणात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. पराभवाच्या छायेत गुंतून न पडता दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्याचं काम शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरुन केलं. लगोलग लोकसभा निवडणुकीतील चुका लक्षात घेत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तरुणांना संधी दिली. दरम्यानच्या काळात अचानक राष्ट्रवादीचे तत्कालीन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यात हाताच्या बोटांवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदारांपैकी एक संख्या कमी झाली. दिवसेंदिवस राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांची संख्या पाहता पुन्हा एकदा भाजपचा विधानसभा निवडणुकांसाठी आत्मविश्वास वाढल्याचं चित्र निर्माण झालं. त्यावेळी राष्ट्रवादी विधानसभेला देखील मातीमोल होणार हेच राजकीय आडाखे बांधले जात होते. मात्र विधानसभा निवडणुक आणि लोकसभेची सातारा पोटनिवडणुकीसाठी शऱद पवारांची साताऱ्यात पार पडलेली शेवटची सभा राज्यातील वातावरण एका रात्रीत बदलून गेली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपेक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतर संपूर्ण देशाला केवळ आशक्यप्राय वाटणारा महाविकास आघाडीचा प्रयोग पाहायला मिळाला.   


भाकरी कुणाची फिरवणार?


सध्या राष्ट्रवादीत बंड होण्याची शक्यता लक्षात घेत शरद पवारांनी आपल्या पक्षातील बंड करु पाहणाऱ्या नेत्यांना भाकरी फिरवण्याचा तर इशारा दिला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेमागे महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला त्यावेळी त्यांच्यासोबत न जाता शरद पवारांचे विश्वासू म्हणून जे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत राहिले होते त्याच नेत्यांनी आता अजित पवारांना साथ दिल्याचं समोर आलं आहे. परंतु शरद पवार यांनी जे जातील ते त्यांच्या जबाबदारीवर जातील. पक्ष मात्र महाविकास आघाडीत राहिल म्हणत भाकरी फिरवण्याचा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या पक्षातील आमदार ज्याप्रकारे वागले तोच प्रकार उद्या राष्ट्रवादीत पाहायला मिळाला तर राष्ट्रवादीला सहानुभूतीची लाट मिळण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. शिवाय उद्वव ठाकरे यांनी वांद्रे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत केलेले सुतोवाच देखील सुप्रीय सुळेंच्या निमित्ताने सत्यात उतरण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत बोलताना शरद पवारांचे निकटवर्तीय सांगतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला निवडणुक लढवली त्यावेळी उमेदवार मिळत नसल्यामुळे भाजीवाल्यापासून पानटपरी वाल्यापर्यंत विधानसभेची तिकिटं दिली आणि त्यांना निवडून देखील आणलं. सध्याच्या परिस्थितीत पक्ष फुटला तरी पक्ष पुन्हा नव्याने उभा करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद केवळ शरद पवार यांच्याकडेच आहे. मात्र दुसरी बाजू ही देखील आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून सुरुवातीला दिसणारे चेहरे मागील 30 वर्षापासून अद्याप ही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. किंबहुना शरद पवारांची हेच आर्थिकदृष्ट्या सक्षम चेहरे ताकद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या जरी ही मंडळी बंडाच्या तयारीत असली तरी शरद पवार त्यांना नेमके कसं रोखणार की भाकरी फिरवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.


सत्ता हे सर्वस्व नाही, संघटना सर्वस्व आहे : सुप्रिया सुळे


एकिकडे राष्ट्रवादी पक्ष फुटणार अशी जोरदार चर्चा असताना शरद पवार यांचं चेंबूरच्या सभेत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य आणि दुसरीकडे त्याच सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ता हे सर्वस्व नाही ते केवळ टूल आहे. संघटना सर्वस्व आहे. संघटनेतून पुढे लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी सत्ता हे टूल असल्याचं म्हंटलं. शिवाय सत्ता आहे म्हणून पक्ष आहे असं नाही. म्हणत बंड करु पाहणाऱ्यांना जोरदार टोला लगावल्याची चर्चा आहे. त्यामुळे युवा शक्तीला सोबत घेऊन राष्ट्रवादी सोशल इंजिनिअरिंग तर करु पाहत नाही ना ही देखील सध्या जोरात चर्चा सुरु आहे 


पक्ष सत्तेत असताना कायम महत्त्वाची पदे भूषवलेले नेते


1) अजित पवार- (सलग सहा वेळा आमदार) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, मृदासंधारण, कृषी आणि ऊर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, ग्रामविकास मंत्री 


2) जयंत पाटील- (सलग सात वेळा आमदार) ग्रामविकास मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, जलसंधारण मंत्री


3) छगन भुजबळ- (राष्ट्रवादीकडून 5 वेळा आमदार) उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री


4) दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादीकडून 5 वेळा आमदार) वैद्यकीय शिक्षणमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ऊर्जामंत्री, गृहमंत्री


5) सुनील तटकरे- ( अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, अर्थ व नियोजन मंत्री


6) हसन मुश्रीफ- ( राष्ट्रवादीकडून सलग 5 वेळा आमदार)  जलसंपदा मंत्री, विधी व न्याय. पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार आणि ग्रामविकास मंत्री


7) रामराजे नाईक-निंबाळकर- सभापती, अध्यक्ष कृष्णाखोरे विकास महामंडळ


8) राजेश टोपे- (राष्ट्रवादीकडून सलग 5 वेळा आमदार) आरोग्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री


9) जितेंद्र आव्हाड- (विधानसभेची तिसरी टर्म), गृहनिर्माण मंत्री


10) नवाब मलिक- ( विधानसभा पाच टर्म आमदार) कामगार मंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, गृहनिर्माण मंत्री, विशेष सहाय्यता मंत्री


11) अनिल देशमुख- ( पाच वेळा आमदार) गृहमंत्री, अन्न व नागरि पुरवठा मंत्री


सुचना नेमकी कुणाला? 


पक्षप्रमुख शरद पवार यांनी एकिकडे ज्येष्ठ नेत्यांना भाकरी फिरवण्याचा इशारा दिला अशी चर्चा असताना दुसरीकडे आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी ताकदीने उतरण्याची सूचना मुंबई प्रदेशला दिल्याची देखील माध्यमांमध्ये चर्चा आहे. कारण राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार 1992 साली मुंबई महानगर पालिकेत घडलेल्या अनपेक्षित घटनेची पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही. 1992 साली मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे 112 नगरसेवक निवडून आले होते. तर तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे 12 नगरसेवक निवडून आले होते. संख्याबळानुसार काँग्रेसला महापौरपद मिळणार अशी दाट शक्यता असताना देखील शरद पवार यांनी निर्णय घेतला आणि अवघे 12 नगरसेवक निवडून आलेल्या आरपीआयला महापौर पद देऊ केलं. आता सध्याची परिस्थिती पाहता तत्कालीन आरपीआयकडून महापौर झालेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्याच चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातून मुंबई प्रदेशसाठी भाकरी फिरवण्याचा इशारा देताना मुंबई महानगरपालिकेत आपण ठाकरे गटाच्या साथीने महापौरपद नाही परंतु उपमहापौर पद नक्कीच मिळवू शकतो याची सूचना शरद पवारांनी केल्याची चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी आठवले गटाच्यावतीने आरपीआयचा मुंबईतील सोमय्या मैदान येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जर भाजप महापालिकेत सत्तेवर आला तर उपमहापौर हे निश्चितच आरपीआयचा असेल. त्यामुळे असाच प्रयोग जर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पक्षाची मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी युती झाली तर उपमहापौरपदाची लॉटरी राष्ट्रवादीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


मुंबई प्रदेशची सध्या स्थिती काय आहे?


राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाटी. 2003 साली पायउतार झाल्यानंतर मुंबई अध्यक्षपदाची धुरा मुंबईतील प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांना देण्यात आली होती. सचिन अहिर यांनी देखील आपल्या कामाची छाप पाडत तत्काळ मुंबई प्रदेशच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यानंतर आज अखेर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकाच पार पडलेल्या नाहीत. साल 2003 मध्ये सचिन अहिर यांनी पदभार स्विकारला त्यानंतर नरेंद्र वर्मा, संजय दिना पाटील आणि पुन्हा 2015 साली सचिन अहिर अध्यक्ष झाले परंतु नव्याने नेमणुका पार पडू शकल्या नाहीत. आता मागील 4 वर्षांपासून नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष आहेत मात्र सध्या ते जेलमध्ये असल्याने आता देखील कोणतीच हालचाल पाहायला मिळत नाही.


राष्ट्रवादीच्या घटनेत 3 वर्षांनंतर पद बदलण्याचा नियम


जिल्हाध्यक्ष



  1. अजित रावराणे- उत्तर पश्चिम - 9 वर्ष

  2. इंद्रपाल सिंग- उत्तर- 9 वर्ष

  3. रमेश परब- दक्षिण मध्य - 5 वर्ष

  4. अर्षद अमीर- उत्तर मध्य- 4 वर्ष

  5. धनंजय पिसाळ- उत्तर पूर्व- 3 वर्ष


मुंबई युवक कार्यकारणी



  1. निलेश भोसले- युवक अध्यक्ष- 6 वर्ष

  2. अदिती नलावडे- युवती अध्यक्ष- 8 वर्ष

  3. सुरेखा पेडणेकर- महिला अध्यक्ष- 8 वर्ष

  4. सुनील शिंदे- सामाजिक न्याय- 5 वर्ष

  5. मनिष दुबे- हिंदी विभाग- 5 वर्ष

  6. दीपक पवार- सेवादल- 5 वर्ष

  7. दीपक पारडीवाला- सोशल मीडिया- 5 वर्ष

  8. सोहेल सुबेदार- अल्पसंख्यांक- 6 वर्ष

  9. नितीन देशमुख- कार्याध्यक्ष- 5 वर्ष


एकंदरितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाल्याचं पक्ष स्थापना झालेले वर्ष 1999 पासून पाहायला मिळत आहे. याचा परिणाम ज्या ठिकाणी सातत्याने एकाच कुटुंबात संधी दिली जाते तिथं संबंधित कुटुंबाव्यतिरिक्त दुसरी फळी निर्माण झालीच नसल्याचं पाहायला मिळत आहे.याचाच फटका विधानसभा निवडणुकांवेळी पक्षाला बसल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांपैकी गणेश नाईक, राणा जगजितसिंह, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, मधुकर पिचड, बबनराव पाचपुते भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाची नवी फळी आद्याप त्याठिकाणी कमकुवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.