पार्थ पवार.... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, तर अजित पवार यांचे पुत्र. मावळ लोकसभेच्या निवडणूक प्रचारातील ही एकमेव अशी त्यांची भक्कम आणि जमेची बाजू. पण हीच जमेची बाजू पार्थ यांना पेलेल का? कारण आजोबा आणि वडिलांच्या कार्यपद्धतीची अपेक्षा साहजिकच त्यांच्याकडून केली जात आहे. आता 'साहेब' आणि 'दादां'ना हे साम्राज्य निर्माण करायला बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या, तेव्हा इतक्यात पार्थ यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं राहील यात शंका नाही. पण आजोबा आणि वडील हे का करु शकले, यामागे सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे, ते तरी पार्थ यांनी आताच अंगी आणायला हवं, ज्यासाठी अधिकचे काही कष्ट घ्यायची पार्थ यांना गरजही नाही. हे तत्त्व म्हणजे 'वेळ'. घड्याळाने तंतोतंत 'वेळ' दाखवली की घड्याळ 'जिवंत' असल्याची साक्ष देतं. म्हणूनच दैनंदिन जीवनात शरद पवार आणि अजित पवार नेहमीच वेळेला महत्त्व देतात. मग एखाद्या कार्यक्रमाला पोहचायचं असो, की राजकारणात भूकंप करायचं असो त्यांनी आतापर्यंत योग्य 'वेळ' साधली. आता वेळेचं हे तत्त्व पार्थना पाळणं काहीच कठीण नाही. पण पवार कुटुंबाच्या या सर्वात महत्वाच्या तत्वाला पार्थ सध्या हरताळ फासत आहेत.



पार्थ पवार... राजकारणात अवतरलेली पवार कुटुंबातील तिसरी पिढी. नाही-होय म्हणता-म्हणता अखेर मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पार्थची निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री झाली. देशाच्या राजकारणातील मास्टर माईंड शरद पवार यांनी नातवासाठी माढ्यातून माघार घेतली. ही माघार पार्थवर अपेक्षांचं ओझं घालणारी नक्कीच आहे. पण हे ओझं पार्थना इतक्यात तर पेलणार नाहीच. ते प्रचाराचा नारळ फुटला त्याच दिवशीच्या पहिल्याच भाषणातून स्पष्ट झालं. अशी चर्चा खासकरुन सोशल मीडियावर चघळली जात आहे. आता भाषण आलं नाही म्हणून पार्थ कामं करु शकत नाहीत, हा निकषही चुकीचा.

आता चर्चा इथवर येऊन ठेपली असताना थोडं या सभेच्या सुरुवातीकडे जाऊयात. पाच वाजता ही सभा सुरु होणार होती. सहा वाजले तरी पार्थ मंचावर पोहचले नव्हते. तितक्यात वेळेचं गांभीर्य राखणारे पार्थचे वडील अजित पवार अन् त्या पाठोपाठ शेकाप नेते रायगडहून पोहचलेही. साहजिकच पाटील यांची पहिली नजर त्यांचे उमेदवार पार्थना शोधण्यात गुंतली, पण वडील अजित दादांनी ती वेळ मारुन नेली. आता पवारसाहेब येण्याची वेळ झाली अन् तितक्यात पार्थ मंचावर अवतरले. आता कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडायचा असेल तर त्या मंचावर सर्वात आधी उमेदवाराने हजर रहावे, असा अलिखित ठराव आहे. पण तरुण, नवखे आणि उच्चशिक्षित उमेदवार पार्थना 'वेळेचं' गांभीर्य नसल्याचं पहिल्यांदा दिसून आलं. पण आजोबा आणि वडिलांनी भाषणात सांभाळून घ्या, त्याच्याकडून या संधीचं सोनं करुन घेतलं जाईल, अशी भावनिक साद घातली. आता साहेब आणि दादांवर प्रेम करणारे चाहते थोडीच त्यांचा शब्द पडून देणार आहेत. काका-पुतण्याने आजवर दिलं त्याची परतफेड करण्याची हीच 'वेळ' असल्याचं ते जाहीर सांगूही लागलेत.

साहेब आणि दादांच्या भाषणाने पार्थ उशिरा आल्याचा सर्वांना विसर पडला. पण वडगाव मावळ तालुक्यातील प्रचाराच्या शुभारंभ सभेत तेच घडलं. सकाळी दहा वाजता सुरु होणारी सभा बारा वाजता सुरु झाली. आपले लाडके उमेदवार पार्थ यांची कार्यकर्ते सभागृहात वाट पाहत होते. आधीच उशीर झाला होता, त्यात पार्थ वडगाव मावळ येथील कार्यकर्त्याच्या घरी नाश्ता करायला गेले. पवार कुटुंबाच्या प्रेमापोटी कार्यकर्ते थांबले. साहेब आणि दादा कार्यकर्त्यांना कधीच ताटकळत ठेवत नाहीत पण पार्थ नाष्टा करत बसले. 20 मार्चनंतर 21 तारखेलाही याची पुनरावृत्ती झाली. पिंपरी चिंचवडमध्ये होळी आणि पार्थचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चार वाजताची सर्वांना वेळ देण्यात आली अन पार्थ पोहचले सहा वाजता.

सोशल मीडियावर घराणेशाही आणि पहिल्या भाषणाने चर्चेत असणाऱ्या पार्थ यांची आता कार्यकर्त्यांमध्येच 'वेळ' न पाळणारे पवार अशी ओळख होत चालली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पहिल्याच आठवड्यात पार्थनी पवार कुटुंबाच्या 'वेळ' पाळण्याच्या मुख्य तत्वाला हरताळ फासला. त्यामुळेच पार्थ पवारांचं आत्ताच 'असं' मग खासदार झालेच तर 'कसं' असा प्रश्न विचारला जात आहे. मी कमी बोलतो अन् जास्त काम करतो... असं पार्थ आता सर्वत्र बोलून वेळ मारुन नेत आहेत. पण हे काम दाखवण्यासाठी दैनंदिन जीवनात वेळ साधणं सर्वात महत्त्वाचं. आता तर आजोबांनी सल्ला देणार नसल्याचं जाहीर केलंय. ठेच लागली की पार्थ शहाणा होईल असं सूचक टिपणी पवारांनी केली. तेव्हा पार्थनी आजोबा आणि वडिलांप्रमाणे निदान 'वेळ' पाळली तरच ते अपेक्षांचं ओझं पेलू शकतील.