प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णूर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
शिवमुद्रेचा मराठी अर्थ – ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो,आणि सार्या विश्वात वंदनीय होतो. तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. मराठा इतिहासातील शिवकालीन कालखंड हा स्वराज्यनिर्मितीचा कालखंड असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी केलेल्या सर्व गोष्टी पुढे मराठा साम्राज्य वाढण्यास उपयुक्त ठरल्या आहेत हे दिसून येते. महाराजांनी केलेल्या अनेक कार्यामध्ये राजलिपी मोडीचा विकास महत्वाचा ठरलेला दिसतो. मोडी लिपीच्या उगमापासून आत्ताच्या आधुनिक कालखंडापर्यंत मोडीचे सर्वसाधारणपणे सहा ऐतिहासिक आणि एक अर्वाचिन असे कालखंड आहेत, मोडी लिपीचे आद्य कालखंडातील स्वरुप अजून अंधारात आहे. तो कालखंड मोडी उगमापासून ते १० शतका पर्यंतचा होता. यादव कालखंड हा १० शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंतचा आहे. यादव कालखंडामध्ये मोडी ही राजलिपी होती, राजकारभारातील सर्व लेखन हे मोडीत होत असे. यादव साम्राज्याचे करणाधीप हेमाडपंत यांनी आपल्या लेखनप्रशस्ती या ग्रंथामध्ये मोडी लिखानाचे काही नियम सांगितले आहेत.मित्राणां त्रितया रेषा द्वे भृतस्य रिपोरपी
षड्गुरो: स्वामिन पंच एकैकंपुत्रकन्यो:
मराठी अर्थ – मित्रासाठी तीन रेषा, दोन रेषा सेवक, आणि चार रेषा शत्रु प्रतिस्पर्धीसाठी, सहा रेषा गुरु आणि स्वामीसाठी पाच रेषा,मालकासाठी आणि कन्या पुत्र यांचेसाठी प्रत्येकी एक रेघ काढावी. अशाप्रकारचे नियम मोडी लिखाणासाठी वापरले जात होते. यादवकालखंडापासूनच मोडी हे नाव आढळते. त्या अगोदर आद्य काळात मोडीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते. बाहमानी कालखंड हा 13 व्या शतकापासून सुरु होतो, या काळात परकीयांची सत्ताजरी असली तरी सरदार व इतर अधिकारी वर्गाचे लोक मराठी होते, त्यामुळे मोडीचा वापर राजकारभारासाठी झालेला आढळतो. पण याच दरम्यान मोडी लिपीमध्ये परकीय शब्दांचा शिरकाव झालेला दिसतो. आजही आपल्या मायमराठीतील बरेच शब्द परकीय आहेत आणि आपल्याला ते मराठीच वाटतात. शिवकालीन मोडी लिपीचा कालखंड हा इ.स. १६५६ पासून सुरु झालेला आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज हे कोकण प्रांताचा दौरा करत असताना, जंजीरा येथील सिद्धींच्या सेवेत चिटणीस म्हणून कार्यरत असलेल्या आवजी चित्रे यांच्यावर फितुरीचा संशय घेऊन त्यांना मृत्युदंड द्यावयाचे ठरले, तसेच त्यांच्या पत्नी व मुलगा यांना गुलाम बनविण्याचे आदेश देण्यात आले. ही गोष्ट समजताच आवजी चित्रे यांची पत्नी आपल्या मुलाला घेऊन शिवाजी महाराजांच्याकडे गेली व अभय मागितले. त्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्यात कोणात्याही व्यक्तीला आपल्याकडे कार्यासाठी घेत नसत. एखादे कौशल्य अंगी असलेल्या व्यक्तीलाच ते नियुक्त करत. आवजी चित्रे यांच्या पत्नीने महाराजांना सांगितले की बाळाजीने गणित व लेखन त्याच्या वडीलांकडून शिकले आहे. महाराजांनी बाळाजी आवजी चित्रे यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून त्यांची नियुक्ती चिटणीस पदी केली. त्यावेळीपासून बाळाजी आवजी चित्रे यांच्या हस्ताक्षरामध्ये पत्रे तसेच इतर गोष्टी लिहिण्यास सुरुवात झाली.अजरख्तखाने दामदौलतहु बजानेब हाल व इस्तकबाल
मराठी अर्थ – आज आपल्याला असलेलेली प्रसिद्धी व दौलत दुपटीने वाढो. असे असलेले पत्रांचे मायने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाळात बदलून घेतले, व त्याऐवजी पुढीलप्रमाणे मायने वापरण्यास सुरुवात केली.श्रीसकलगुणालंकरण अखंडीत लक्ष्मी आलंकृत
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री गोसावी
वज्रचुडेमंडीत मातोश्री आईसाहेब यांचे सेवेसी
पुढे राज्याभिषेकानंतरचा पत्रमायाना –स्वस्तीश्री राज्याभिषेक शक क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति याणी आज्ञा केली ऐसीजे
शिवकालीन दस्तऐवजांवरून त्याकाळातील मोडी लिपीची, मराठी भाषेची कल्पना येते, ही अक्षरे गुंतागुंतीची असली तरी बहामनीकालीन मोडीच्या तुलनेत सुवाच्य, आणि वाचनीय होती. शिवकाळात बहुतेक दस्तऐवजांच्या शेवटी पत्र लिहून घेणारा स्वहस्ते काही ओळी लिहित असे, त्यामुळे बहुतेक दस्तऐवजामध्ये पत्राच्या शेवटी एक वेगळे हस्ताक्षर दिसून येते. त्याचप्रमाणे पत्राच्या शेवटी मोर्तब सूद लेखनालंकार यासारखी मुद्रेतील अक्षरे आढळतात. शिवकाळातील न्यायनिवाडे, राजव्यवहाराची पत्रे, आज्ञापत्रे वाचण्यास बहामनीकाळापेक्षा सुलभ आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचे अव्वल ग्रंथ, रामचंद्रपंत आमात्यांचे आज्ञापत्र, शिवकालीन राजनिती, तसेच राजव्यवहार कोष इ. शिवकालीन मोडी लिपीत लिहिलेले आढळतात.