पेशवेकाळात मोडीला बहर आलेला होता आणि बरीच अक्षरे कशी लिहिली पाहिजेत यासाठी काही पद्धती ठरल्या होत्या. तसेच पेशवेकाळातील मोडी अक्षरलेखन हे कोरीव, आणि सहज वाचता येईल असे होते.
मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे. ही जवळपास 700-800 वर्षे हस्तलिखित होती. मोडी लिपीचे फाँट एकविसाव्या शतकात उपलब्ध झाले आहेत. पण काही मोडी तज्ञांचे मत होते की, सध्या उपलब्ध असलेल्या फाँटमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये मोडीचे खास वैशिष्ट्ये असलेली ’’र’’ च्या करामतीचे अक्षरे खूप कमी आहेत, त्यात अजून वाढ होण्याची गरज आहे. मोडीला नव्या फाँटची गरज आहे असे कळल्यावर मी कामाला लागलो. मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. (श्री लिपी) पुणे, यांच्या कार्यालयात पोहचलो. भारतातील बहुसंख्य भाषेचे फाँट श्री लिपीने तयार केलेले आहेत, त्यांनीही काही वर्षापूर्वी मोडी लिपीचा फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यामध्ये यश आलं नव्हतं. मी स्वत: हा विचार त्यांच्याकडे घेऊन गेल्यामुळे, श्री. निशिकांत आपटे सरांना आनंद झाला. कारण त्यांनी अर्ध्यावर सोडलेला मोडी लिपीच्या फाँट निर्मितीचे काम परत सुरु होणार होते. श्री लिपी बरोबर सर्व व्यावहारीक बाबींचे बोलणे संपवून आम्ही फाँट निर्मीतीचे काम सुरु केले. श्री लिपीने पहिली मुळाक्षरे एका महिन्यात तयार केलीत. पहिला फाँटचा टाईप तयार झाल्यावर, मी मोडी तज्ञांना दाखविला, प्रत्येक मोडी तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य बदल करुन परत एक टाईप तयार केला. पण परत काही तज्ञांच्याकडून सूचना आल्या की या फाँटमध्ये ‘‘र‘‘च्या करामतीची अजून जास्त अक्षरे असतील तर अजून चांगले होईल, मग पुन्हा ’’र’’च्या करामतीची अक्षरे त्यामध्ये वाढवली. मोडी हस्तलेखनात ’’र’’ ची करामत वापरुन लिहिणे हे सहज शक्य आहे, पण तेच ज्यावेळी फाँटमध्ये वापरासाठी लिहावे लागते. त्यावेळी त्यामागे खूप मोठे इंजिनिअरिंग असते. जर एखाद्या अक्षरामध्ये बदल वा वाढ करायची असेल तर तीन–तीन विभागात काम करावे लागते. एका अक्षरावर तीन विभागात काम करणे अवघड नाही पण तीन विभागातील लोकांशी त्यांना त्याच अक्षरावर गोड बोलून परत कार्य करण्याची, त्यांची मानसिकता करणे, तसेच त्या कामाची व्यवहारीक बाजूही बघणे महत्वाचं कार्य मला करावे लागे. संपूर्ण फाँट तयार झाल्यावर परत सर्व तज्ञांना दाखवून घेतला. तरीही त्यामध्ये खूप चुका राहिल्या होत्या, कारण मोडीलिपीची अक्षरे ही हस्तलिखीत असल्याने बरेच वळणप्रकार अस्तित्वात होते, तसेच वेगवेगळ्या लेखणशैली मोडीलिपीत प्रचलित होत्या. तसेच मोडीचा वापर हा 700-800 वर्षापासून होत असल्याने त्यामध्ये प्रत्येक कालखंडाप्रमाणे अक्षरांच्या लेखन पद्धतीमध्ये बदल झालेला आढळतो. मोडी लिपीचा वापर यादव कालखंडापासून सुरु झाला, पुढे शिवकाळातही मोडीचा वापर खूप झाला, पेशवेकाळात मोडीला बहर आला. एखादे अक्षर एका कालखंडात जसे लिहिले जाते. त्यामध्ये पुढील कालखंडात थोडा वा जास्त बदल झालेला आढळतो. असे बदल काही अक्षराबाबतीत कमी जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतात. मग नेमका कोणत्या कालखंडातील अक्षरांचा फाँट तयार करायचा हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. पेशवेकाळात मोडीला बहर आलेला होता आणि बरीच अक्षरे कशी लिहिली पाहिजेत यासाठी काही पद्धती ठरल्या होत्या. तसेच पेशवेकाळातील मोडी अक्षरलेखन हे कोरीव, आणि सहज वाचता येईल असे होते. मग असे ठरले की पेशवे काळात वापरात असलेल्या लेखन पद्धतीचा आणि अक्षरांचा वापर करुन फाँट तयार करावा. मग परत सगळा तयार झालेला फाँट बदलून घेतला. त्यात ’’र’’ ची करामत वापरुन तयार केलेली अक्षरे वाढवली. मोडी लिपीचा SHREE_MODI_2100 हा फाँट वापरण्यासाठी सुयोग्य आणि त्यातील अचूक बदल करण्यासाठी श्री.राजेश खिलारी (जागतीक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई) यांनी पुण्याला प्रत्यक्ष श्री लिपी कार्यालयाला भेट देऊन मार्गदर्शन केलं होतं. हा फाँट पूर्ण होण्यास जवळपास सहा–सात महिन्याचा कालावधी लागला, या दरम्यान मी कोल्हापूर–पुणे–कोल्हापूर असे कमीत कमी 20 ते 25 वेळा ये–जा केली. सदरचे कार्य करताना अनेक अनुभव आले, प्रत्येकांच्या सूचना समजून घेणे, त्याप्रमाणे फाँटमध्ये बदल करुन घेणे, त्यासाठी लागणारी व्यवहारीक बाजूची काळजी घेणे, यासाठी सगळे कौशल्य पणाला लागले होते. मोडीमध्ये एकाच अक्षरांचे विविध लेखनप्रकार असतात, सगळेच सगळ्यांनाच माहित असतील असे नसते, तशा स्वरुपाच्या दस्तऐवजांचे वाचन जर त्या अभ्यासकाकडून झाले असेल तरच ते अक्षर त्यांना माहित असते, पण एखाद्या अभ्यासकाच्या वाचनात जर ते अक्षर आले नसेल तर ते आस्तित्वातच नव्हते असे नसते. अशा बाबी माझ्यापेक्षा अनुभवी अभ्यासकांनी नजरेस आणून दिल्यावर त्यांना सदरचे संदर्भ द्यावे लागत असत. तसेच मी मोडीचा अभ्यासक आहे म्हणजे मलाही सगळ्याच बाबी माहित आहेत असे नाही, म्हणूनच मी महाराष्ट्रातील मोडी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मोडी लिपी–शिका सरावातून‘ या पुस्तकात मी लिहिलेल्या वर्णमालेतील अर्धस्वरांची चूक मला जवळपास सगळ्यांनीच दाखविली, मला माझ्या चुका दाखविल्याबद्दल मला किचिंतही राग नाही, उलट एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला आपली चूक दाखवते वा सूचना सांगत असते त्यावेळी आपल्या कार्यातच सुधारणा होणार असते. पण मराठी वर्णमालेतील अर्ध स्वराबाबत बोलायचे झाले तर चूक कोणाची हेच नेमकं समजत नाही. महाराष्ट्रात नव्याने प्रकाशित झालेल्या ९८% मराठी वर्णमालेत अर्धस्वर चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. मूळ स्वरातूनच त्यांचे अर्धस्वर उत्पन झाले, त्यांचा क्रमही मूळ स्वराप्रमाणेच असतो हे व्याकरण सांगते. जुन्या संदर्भ पुस्तकात ही गोष्ट पाहण्यास मिळते. मूळ स्वर इ–ई, उ–ऊ, ॠ, लृ यांचे अर्धस्वर म्हणून य, व, र, ल वापरतात. पण अलिकडे महाराष्ट्रात प्रकाशित झालेल्या बहुतांश पुस्तकात अर्धस्वर हे य, र, ल, व असे चुकीचे लिहिलेले असतात. असे का असते, वा कोणत्या वर्षी व कोणत्या पुस्तकापासून ही पद्धत सुरु झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. पण बहुधा पाठांतर करताना सोपे म्हणून य, र, ल, व असा चुकीचा क्रम झाला असावा असे वाटते, पण लिहिताना वा छापताना तरी योग्य क्रम पाहिजे होता, पण असे झालेले आढळत नाही. पुस्तकात सरावासाठी अक्षर गिरवण्याची दिशा दाखवावी अशी सूचना आली, जी मलाही योग्य वाटली व सदरचा बदल तसेच अशाच योग्य सूचनांप्रमाणे दूसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल. हस्तलेखनाला कोणत्याही मर्यादा नसतात, ते आपण कसेही लिहू शकतो, पण फाँटला मर्यादा पडतात, कारण एका अक्षराच्या बदलामुळे संपूर्ण फाँटमध्ये पुढील बरेच बदल होत असतात. त्यामुळे आजही काही अभ्यासकांना असे वाटत असेल की एखाद्या अक्षराचा आकार वा उकार असा नसून तसा पाहिजे होता पण काही तांत्रिक बाबीमुळे मोडी फाँटला काही मर्यादा पडतात. तरीही जास्तीतजास्त तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच सदरचा अचूक फाँट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजुनही यामध्ये सुधारणेला वाव आहे, फाँटच्या दुसरी आवृत्तीमध्ये हे बदल केले जातील, पण हे लगेचच शक्य करण्यास व्यावहारीक बाब महत्वाची ठरते. त्यात कालबाह्य झालेल्या या मोडी लिपीमधून केलेली गुंतवणूक कधी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून यात जास्त लोक गुंतवणुकीसाठी तयार होत नाहीत. मी हे धाडस केले पण माझ्या एकाही जवळच्या मित्रांनी मला या गोष्टीला मानसिक पाठिंबा दिला नाही. उलट ते मला सांगत होते की असे काही करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवू नको. पण मी मला जे योग्य वाटले व जसे ठरविले तसेच मी केले. मी केलेल्या कामाचे पूर्ण समाधान मला आहे. 'राजर्षीशाहूछत्रपतीमहाराज' हे पुस्तक प्रथम ई–पुस्तक प्रकाशित करावे असे वाटले होते. याचे कारण आज प्रत्येकजण मोबाईल व इंटरनेटशी जोडलेला आहे, परत पुस्तक स्वरुपात जर एखादे पुस्तक वितरीत करायचे असलेस त्यास खूप मोठी वितरण व्यवस्था पाहिजे. काही वितरण व्यवस्था महाराष्ट्रात आहेत. पण त्या संस्था मोडी पुस्तकाला किती स्थान देतील हे सांगता येण्यासारखे नव्हते. कारण माझ्या पहिल्या ’’मोडी लिपी–शिका सरावातून‘‘ या पुस्तकातून मला याचा अनुभव आलेला होता. वितरणाअभावी पुस्तक जास्तीत लोकांपर्यत पोहचत नाही, म्हणून मी ई–पुस्तकाचा मार्ग निवडला. कोणालाही सदरचे ई–पुस्तक आपल्या मोबाईलवर कधीही, कोठेही मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. या पुस्तकाचे लिप्यंतर करताना जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला. देववनागरी ते मोडी लिपी असे लिप्यंतर करताना मोडीच्या वेगवेगळ्या शैलीप्रमाणे टंकीत करावे लागे. टंकन झाल्यावर परत ’र’ च्या करामतीसाठी व मोडी अक्षरांच्या टंकनातील चुका दुरुस्त करणे अशाप्रकारची सर्व कार्य करावे लागे. अजूनही काही तांत्रिक गोष्टीमुळे झालेल्या चुका ई–पुस्तकामध्ये आहेत. पण ई–पुस्तकाचा एक फायदा असाही आहे की पुस्तकात सुधारलेल्या गोष्टी, वाचकांनी त्यांचे ॲप अपडेट केल्यावर अगोदर डाऊनलोड केलेल्या पुस्तकातही सुधारणा होते. त्यात मोडीलिपीचे ई–पुस्तक तयार करत असताना सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो मोडीच्या फाँटला कोणतेही ई–पुस्तक संकेतस्थळ सपोर्ट करत नव्हते, सुरुवातीला अमॅझान किंडलवर सदरचे ई–पुस्तक प्रकाशीत केले पण फाँटला सपोर्ट मिळाला नाही, तो सपोर्ट अमॅझान किंडल या संकेतस्थळाने अजूनही दिलेला नाही. अमॅझान किंडलवर मराठी-देवनागरी फाँट उपलब्ध आहेत, याला सपोर्ट मिळतो पण मोडीसाठी एक वर्ष पाठपुरावा करुन पण अजुनही यश मिळाले नाही. पण श्री लिपीने गुगलसाठी बरेच फाँट तयार करुन दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या सहकार्याने मला मोडी लिपीतील जगातील पहिले ई–पुस्तक गुगलच्या प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात यश आले. गुगल या संकेतस्थळच्या नियमावलीप्रमाणे ई–पब फाईल श्री लिपी यांनी तयार करुन दिली. गुगलने त्यांच्या संकेतस्थळावर नव्या प्रकाशकांची नोंदणी बंद केलेली आहे, मग परत गुगल संकेतस्थळावरील प्रकाशक शोधण्याची सुरुवात केली, खुप शोधाशोध करुन ब्रोनॅटो.कॉम या संकेतस्थळाची माहिती मिळाली, त्यांच्याशी संपर्क झाला. सदरच्या ई–पुस्तकाला प्रकाशक म्हणून ब्रोनॅटो.कॉमचे संचालक श्री. शैलेश खडतरे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. आज मितीला ’राजर्षीशाहूछत्रपतीमहाराज’ या ई–पुस्तकाच्या तीन हजार प्रती, भारताबरोबर, अमेरिका, इंडोनिशिया, मलेशिया, रशीया, टर्की, इटली, हाँगकाँग, इ. देशात डाऊनलोड झालेली आहेत. मी तयार करुन घेतलेला मोडी लिपी फाँट SHREE_MODI_2100 सर्वांसाठी उपलब्ध आहे, हा फाँट युनिकोड आहे. सदरचा फाँट मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. पुणे यांच्या कार्यालयातून प्रत्येकाला परवान्यासहीत विकत घेता येणे शक्य आहे. अजून वेगवेगळ्या विषयावरील मोडी लिपी पुस्तकांचे कार्य सुरु आहे. ’स्वामीविवेकानंदांचीबोधवचने’ (मोडीलिपी) हे पुस्तक मागील महिन्यात मुंबई येथे प्रकाशित झालेले आहे. आता सदरच्या पुस्तकाचे ई–पुस्तकाचे काम सुरु आहे, सदरचे ई–पुस्तकही वाचकांना लवकरच मोफत उपलब्ध होईल. याचबरोबर ’सावित्रीबाईफुले’ यांच्या जीवन चरीत्रा वरील मोडी पुस्तकाचे कार्य सुरु आहे. असाच मोडीच्या प्रचाराचा सुरु केलेला प्रवास अखंडपणे चालू ठेवण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.