Nana Patekar Detah Marathi News: 'नटसम्राट' ते 'जननायक'चा प्रवास करणारा आपला माणूस गमावला!

Nana Patekar Detah Marathi News: नाना पाटेकर (Vetarna Actor Nana Patekar) गेल्याची बातमी एव्हाना कर्णोपकर्णी झालीय, सर्वांच्या जिवाला हुरहुर लागलीय कारण तो 'आपला माणूस' होता! योगायोग म्हणजे त्यांच्या एका सिनेमाचे नावही 'आपला माणूस' होते! प्रत्येक माणसाला त्यांच्यात एक सत्व आढळायचे, जे सामान्यातल्या असामान्यत्वाचे असे! नाना आपल्यासारखेच आहेत पण आपल्याला त्यांच्यासारखं होता येत नाहीये कारण, काहीतरी एक खास त्यांच्यात आहे जे आपल्यात नाही तरीही हा माणूस आपल्यासारखाच आहे, असे सर्वांना वाटायचे! एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला येणारं हे आपलेपण आताच्या काळात दुर्मीळ झालेय. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये लोक स्वतःला शोधत असत, ती माणसं आपल्या अवतीभवतीच आहेत आणि ती आपल्यासारखीच हाडामासाची आहेत तरीही अलौकिक आहेत, असं त्या पात्रांबद्दल वाटायचं! नाना केवळ सिनेअभिनेता नव्हते तर रंगभूमीवरचे कसदार नट होते, लेखक, कवी, वक्ते होते आणि समाजाची राजकारणाची नाळ जाणणारे, जाणते असे आपले माणूस होते! नात्यांची ही शिदोरी भल्या भल्यांना भेटत नाही, नानांना अगदी सहजपणे भेटली होती. त्यांना याची जाणीव होती मात्र त्याचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. त्यांना निरोप तरी कसा द्यावा!
नाना पाटेकर गेल्याची बातमी काही केल्या खरी वाटतच नव्हती. त्यांचं, हे असं तडकाफडकी जाणं काही केल्या रुचलं नाही. काही माणसं जातात आणि आपण त्यांच्या जाण्याची नोंद करतो; त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात काहीतरी गमावल्यासारखं वाटतं. नाना पाटेकर हे अशापैकी एक होते. वास्तवात, ते आपल्या घरचे कुणी नव्हते, नात्यातले नव्हते, रोज भेटणारेही नव्हते; पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या पात्रांनी आपल्या आयुष्यात इतक्या वेळा परकाया प्रवेश केला की, त्यांच्या अनुपस्थितीचे वर्णन ‘एका महान अभिनेत्याची रुखरुख लावणारी एक्झिट' अशा रुक्ष शब्दांत करता येणार नाही. 'त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झालीय' हे वाक्य तर अगदी पुस्तकी होईल, खरेतर त्यांच्या जाण्याने आपल्या सामूहिक स्मृतीतला एक आवाज कायमचा लोप पावलाय हे अधिक उचित होय!
वयाच्या पंचाहत्तरीत नाना गेले. गोव्यातील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी बराच प्रयत्न केला मात्र नियतीला ते मंजूर नसावे. मृत्यूला ते इतक्या शांतपणे सामोरे गेले की, त्यांच्या पात्रांच्या अगणित हाका लोकांच्या कानी पडताहेत. त्यांनी साकारलेल्या नायकांनी पडद्यावर कायम आक्रोश केलाय, एल्गार केलाय, आपल्या अनोख्या शैलीत संताप व्यक्त केलाय! परिस्थितीशी चार हात करताना त्यांची पात्रे अस्मानाला भिडतात, झुंजतात! धगधगत्या लाव्ह्याची बोली बोलणाऱ्या विद्रोही पात्रांना साकारणारा हा माणूस विलक्षण शांततेने आणि कुणालाही न कळवता एकाएकी गेला. काही दिवसांपूर्वीच एका सार्वजनिक कार्यक्रमात, "उद्याचा भरवसा नसतो", या अर्थाचं साधं वाक्य त्यांनी सहज उच्चारलं होतं. तेव्हा तो नानांचा नेहमीसारखा निरिच्छ, थेट बोलण्याचा ढंग वाटला असेल; आज मागे वळून पाहताना त्या वाक्याला नकळत वेगळीच छटा लाभलीय. आयुष्यातली शेवटची वाक्यं वेगळ्या अर्थाने अखेरची असतात, ती उच्चारताना हे कुणालाच कधीच माहीत नसतं.
नाना चांगला कलाकार होता. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो भला माणूस होता. मात्र पूर्णपणे निर्दोष, निर्व्याज, देवदूतासारखा माणूस नव्हता! आणि म्हणूनच तो आपल्याला अधिक जवळचा वाटायचा. त्याच्या स्वभावात ताठरपणा होता, चिडचिड होती, मतांबद्दल आग्रहीपणा होता, कधी कधी विक्षिप्तपणाची किनारही होती. पण त्याचा विक्षिप्तपणा चहाटळ नव्हता; लुचाड नव्हता; बेमुर्वत नव्हता. तो कुणाच्या आयुष्याचा नाश करून स्वतःची मजा घेणारा विक्षिप्त नव्हता. उलट मनाचा एखादा कोपरा फार हळवा असलेला हा माणूस होता. त्या हळव्या कोपऱ्याची त्याने फारशी जाहिरात केली नाही; पण तो कोपरा त्याच्या भूमिकांमध्ये, शेतकऱ्यांसाठीच्या कामात, सैनिकांविषयीच्या आदरात आणि एखाद्या अनोळखी माणसाच्या दुःखासमोर अचानक बदललेल्या त्याच्या चेहऱ्यात दिसत राहिला.
कदाचित म्हणूनच नानांचा अभिनय इतका जिवंत वाटत असे. अभिनय करताना ओढून ताणून भावनांचे प्रदर्शन त्यांनी केले नाही; ते भावनांना काळजात रुजवत आणि मग त्या भूमिकेत शिरत. पडद्यावर क्रोधाचा भाव दाखवताना ते खरोखरच चिडलेले वाटत. त्याचबरोबर त्यांचं हसणं असो की रडणं असो, त्याची एक स्वतंत्र शैली होती. पडद्यावर ते 'खामोश' असले तरीही त्यांचे पात्र आक्रन्दन करून भावना पोहोचवे हे विशेष होते. अतिशय खर्जातला आवाज ते आक्रोश करणारा गगनभेदी आवाज असे विरुद्ध टोकांचे टोन्स त्यांच्या आवाजात आढळतात. संवादफेक हे त्यांच्या अभिनयाचे स्वतंत्र अंग होते! ते फक्त संवाद उच्चारत नसत तर त्या संवादफेकीच्या जोरावर सीनवर कब्जा करत!काही अक्षरांवर ते अनपेक्षित जोर देऊन बोलत, अचानक पॉझेस घेत, आणि मध्येच एका श्वासासाठीही न थांबता एका दमात भला मोठा संवाद आवाजाच्या वेगवेगळ्या पट्टीत म्हणत! हे सगळं मिळून नानांच्या अभिनयाची स्वतःची एक भाषा तयार झाली होती, लोक त्याला प्रेमाने 'नाना स्टाईल' म्हणत!
1951 सालच्या जानेवारीत रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिऱ्यात जन्मलेल्या नानांच्या घरची परिस्थिती सुखाची नव्हती. वडिलांच्या व्यवसायाला धक्का बसल्यानंतर आर्थिक अडचणी इतक्या वाढल्या की, लहान वयातच नानांना काम करावं लागलं. मुंबईत चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचं काम त्यांनी केलं असं सांगितलं जातं. काम केल्यानंतर मिळणारे तुटपुंजे पैसे, त्यातून येणारं दिवसातलं एक वेळचं जेवण आणि हाताला लागलेले रंग, हे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याचे वास्तव होते. रोज बरीच मोठी पायपीट करून ते कामावर जात. आज आपण ज्याच्या आवाजावर फिदा आहोत, त्यांनी कधीकाळी दुसऱ्यांच्या चित्रपटांचं पोस्टर रंगवलं होतं, हा योगायोग नसून त्यांच्या आयुष्याची जडणघडण समजून घेण्याची महत्वाची पायरी आहे. पडद्याच्या झगमगाटाच्या आधी, त्यांनी जणू स्वप्नांमध्ये रंग भरले होते, भुकेची टोचणी सोसली होती आणि अपमानाची चवही अनुभवली होती. दिवस पालटले तरी जुने दिवस ते विसरले नव्हते, म्हणूनच ते कधी मातले नव्हते! त्यांच्या राहणीमानातून हे नेहमी जाणवायचे.
रंगभूमीने त्यांच्यातल्या नटाला पैलू पाडले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. विजया मेहता यांच्या हाताखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. रंगमंचाने नानांना एक गोष्ट शिकवली, 'अभिनय म्हणजे मोठ्याने बोलणं नव्हे; अभिनय म्हणजे माणसाच्या आत चाललेला संघर्ष प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं.' रंगभूमीची ही शिकवण आयुष्यभर त्यांच्या रंध्रात भिनली. परिणामी पुढे जाऊन ‘गमन’पासून सुरू झालेल्या चित्रपटप्रवासात नाना कधीच फक्त ‘भूमिका करणारा अभिनेता’ राहिला नाही. तो व्यक्तिरेखा जगू लागला. त्यांच्या अभिनयाचे महत्वाचे अंग असलेला आवाज, त्यांच्या 'खामोशी' सिनेमात मूक केला होता तरीही त्यातले नाना कायम स्मरणात राहतात! हे त्याचेच द्योतक आहे.
‘परिंदा’मधला अण्णा आठवला की, आजही एक थरकाप अंगावरून जातो. त्या भूमिकेत नाना केवळ खलनायक नव्हता. हिंसेच्या कराल साम्राज्यात बेदरकारपणे उभा राहिलेला, संशयी, क्रूर, भावनिकदृष्ट्या विदीर्ण झालेला माणूस होता. त्याच्या डोळ्यांतून हिंसा दिसायची; पण त्या हिंसेत स्वतःचा नाशही दिसायचा. ‘अंगार’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, 'तिरंगा', ‘अब तक छप्पन’, ‘राजनीती’ प्रत्येक ठिकाणी नाना वेगळा दिसत गेला. आणि त्याच वेळी ‘वेलकम’मधला उदय शेट्टी आला आणि आपल्याला हेही कळलं की हा माणूस आपल्याला घाबरवू शकतो, तितक्याच ताकदीने हसवूही शकतो. नानांनी कधी स्वतःच्या गंभीर प्रतिमेचं ओझं वाहिलं नाही. त्यांनी स्वतःला एका चौकटीत अडकू दिलं नाही. इतकं सारं असूनही लोक वेडे होतात ते त्यांच्या 'बारीश'वाल्या अविष्कारासाठी, 'थोडासा रुमानी हो जाये' मधील ती अफलातून बारिश कोण विसरेल!
‘क्रांतिवीर’मधला प्रताप हा नानांच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा टप्पा असला तरी वास्तवात तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पडद्यावर साकारलेला स्फोट होता. व्यवस्था, धर्मांधता, राजकीय ढोंग, हिंसा, सामाजिक अन्याय, सगळ्यावर संतापणारा तो माणूस आजही स्मरणात राहतो. ‘प्रहार’मधला मेजर चौहान नाना केवळ साकारत नव्हता; त्याने त्या भूमिकेसाठी लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि शिस्त, देहबोली, हालचाली यांना आपल्या अभिनयाचा भाग बनवलं. पुढे टेरिटोरियल आर्मीशी त्याचं नातं जडलं. कारगिलच्या काळात सैनिकांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची त्याची ओढ ही अभिनयाच्या पलीकडची होती. याच्यातून नानांच्या मनात सैनिकांविषयीचा अस्सल आदर दिसतो.
आणि मग ‘नटसम्राट’ आला. गणपत बेलवलकरच्या रूपाने नाना जणू स्वतःच्या आयुष्याशीच संवाद साधत उभा राहिला. रंगभूमीवर टाळ्या मिळवणारा, आयुष्यभर दुसऱ्यांचे चेहरे जगणारा एक वृद्ध माणूस शेवटी स्वतःच्या घरातच अनोळखी ठरतो, ही शोकांतिका नानांनी इतक्या आतून जगली की पडद्यावरचा अभिनेता आणि व्यक्तिरेखा यांच्यातील भिंतच कोसळली. त्या भूमिकेत नाना आपल्याला अभिनय शिकवत नव्हता; तो कलाकाराच्या जीवनातील वृद्धत्वाची भीती, नात्यातला दुरावा, कलाकाराच्या अस्मितेचा अंतिम अपमान आणि आठवणींचं ओझं आपल्यासमोर ठेवत होता. ‘नटसम्राट’ पाहताना कित्येकांना स्वतःच्या घरातील वृद्ध माणसं आठवली, हे त्या अभिनयाचं खरं यश.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर त्यांनी तीन वेळा आपलं नाव कोरलं. त्यांनी फिल्मफेअरचे पुरस्कारही पटकावले. सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना पुरस्कारांची विशेष हाव नव्हती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा निरिच्छपणा होता. ते स्वतःच्या स्टारडमच्या मोहापासून बऱ्यापैकी दूर राहिले. कदाचित आयुष्याच्या सुरुवातीला ज्याच्याकडे काहीच नव्हतं, त्याच्यासाठी नंतर पैसा आला तेव्हा त्या पैशाला फारसं अप्रूप उरलं नाही. अनेकांना आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी मिळत नाहीत; आणि त्या नंतर अकस्मात मिळाल्या, तरी त्यांचं आश्चर्य वाटत नाही. लहानपणी ज्याने सिनेमांची पोस्टर्स रंगवली, त्याच्याकडे पुढे अफाट पैसा आला; पण पैसा हा त्याच्या आयुष्याचा देव बनला नाही. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्याच्यात मातीशी, गावाशी, साधेपणाशी एक राकट नातं टिकून राहिलं. तो कुठल्याही अर्थाने ‘शहरातला स्टार’ होऊन गेला नाही. त्याच्या आत एक ‘घाटी’ माणूस जिवंत राहिला, राठ, थोडा हट्टी, आपला, मातीचा.
त्यांच्या सामाजिक कार्याचा विचार केला तर, नानांचं मोठेपण आणखी ठळकपणे समोर येतं. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ उभं केलं. दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या, त्यांच्या विधवा, मुलांचं भविष्य, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, या सगळ्यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष हात घातला. अनेक शेतकरी कुटुंबांना मदत मिळाली; विधवांसाठी रोजगाराच्या साधनांची उभारणी झाली; गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी कामं झाली; कालवे, नाले, जलसंधारण यावर काम झालं. ‘नाम’ने केवळ चेक वाटणाऱ्या संस्थेची चौकट ओलांडून ग्रामीण स्वावलंबनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. या कामाचा आवाका आणि सातत्य पाहता, सामाजिक कार्याच्या बाबतीत नानांनी जे साध्य केलं ते मोठं आहे. काही अर्थाने ते आमिर खानच्या सामाजिक कामाशी तुलना करण्याजोगं आहे; किंबहुना ग्रामीण महाराष्ट्राच्या विशिष्ट संदर्भात कांकणभर सरसही वाटू शकतं, कारण नानांचं काम भावनिक भाषणांपेक्षा थेट मातीशी जोडलेलं होतं.
पण याच ठिकाणी नानांविषयी एक अस्वस्थ करणारी गोष्टही सांगावीशी वाटते. शेतकऱ्यांविषयी त्याला कमालीची तळमळ होती, हे नाकारता येत नाही. पण शेतकऱ्यांच्या समस्येचं अंतिम उत्तर फक्त मदत, चेक, विहीर, कालवा किंवा रोजगारनिर्मितीत नाही. शेतकरी का आत्महत्या करतो, शेती तोट्यात का जाते, पिकाला हमीभाव का मिळत नाही, बाजारपेठेची रचना शेतकऱ्याला का पिळते, कर्जव्यवस्था कुठे अपयशी ठरते, विमा, सिंचन, जमीनधोरण, पीकपद्धती, आयात-निर्यात आणि सरकारी निर्णय यांचा शेतकऱ्याच्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो, हे प्रश्न अधिक खोल आहेत. ‘नाम’ने जखमेवर फुंकर घातली; काही ठिकाणी जखमेला मलम लावलं; अनेक जीवांना उभं केलं. पण रोगाचा उगम बदलला नाही. अर्थात त्याने तसा दावाही कधी केला नव्हता की, ह्या समस्येचे समूळ निराकरण तो करेल. मात्र त्याने त्या दृष्टीने एक प्रयत्न नक्की केला होता, हे अधिक खरे.
नानांविषयीची अनेकांची एक कायमची खंत आहे, ती सुद्धा आज सांगितली पाहिजे. ते अशा स्तरावर जाऊन पोहोचले होते की, सरकारला प्रश्न विचारण्याची त्यांची पात्रता होती. भल्या भल्या राजकारण्यांना सभेत कान धरून सुनावण्याचा वकुब त्यांच्या आवाजात होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक स्पष्ट राजकीय भूमिका ते घेऊ शकले असते. चुकीचं सरकारी धोरण असेल, तर धोरण बदललं पाहिजे, असं सरकारला सांगण्याची नैतिक ताकद नानाकडे होती. तो शेतकऱ्यांचा लाडका कलाकार होता, सामान्य माणसाच्या दुःखाचा साक्षीदार होता, लाखो लोकांपर्यंत पोहोचणारा आवाज होता. मग जिथे आवाजाची खरोखर गरज होती, तिथे तो पुरेसा मोठा का झाला नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात उरतोच. अर्थातच ही देखील एक अतिरेकी अपेक्षा ठरू शकते, कारण लोकांना नेहमीच मागे थांबायचे असते आणि आपल्यासाठी छातीचा कोट करून लढणारा माणूस समोर हवा असतो!
सर्व प्रकारच्या व्यवस्थांना जाब विचारून अस्वस्थ करण्याची क्षमता त्यांच्यात होती, हे कुणीही मान्य करेल. त्यांच्यात तितकी ताकद होती. सामाजिक कार्य करणारा जननायक, एक लोकप्रिय कलाकार आणि सत्ता यांच्यातला संघर्ष त्यांनी अधिक खुलेपणाने स्वीकाला असता तर आज अनेकांची राजकीय सामाजिक कारकीर्द धोक्यात आली असती. ज्याच्यात समाजाला हलवण्याची ताकद आहे, त्याने महत्त्वाच्या प्रसंगी एक ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असते. आयुष्य आपल्याला एखाद्या निर्णायक क्षणी दोलायमान स्थितीत उभं करतं, तेव्हा योग्य भूमिका घेण्याचं धैर्य हवं असतं., जे नानांच्या ठायी होतं. अनेकदा वाटायचे ह्यावर नाना नक्कीच आसूड ओढतील, कान पकडतील मात्र कधीकधी ते मौन राहिले. कदाचित आगामी काळात या अनुषंगाने त्यांच्या मनात काही वेगळेच नियोजन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी वाट चोखाळणं, स्वतःला सिद्ध करून दाखवणं, सत्ता-गटांपासून काही प्रमाणात दूर राहणं, मनाला पटेल ते थेट बोलणं, स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपणं, यातही धैर्य लागतं. पण सामाजिक आणि राजकीय सत्याच्या निर्णायक क्षणी आवाज उचलणं हे वेगळ्या प्रकारचं धैर्य आहे. नानांकडे आवाज होता; त्या आवाजाला इतिहासाचा मोठा मुद्दा बनवण्याची क्षमता होती. त्याने अनेकदा तो आवाज वापरला; पण काही प्रसंगी तो जितका धारदार असायला हवा होता, तितका झाला नाही ही खंत अनेकांना वाटते. मात्र हे देखील अपेक्षांचे एक ओझेच आहे! आपल्या सर्वांच्या अपेक्षा कधीही संपणार नाहीत, हे सांगताना नानांच्या स्पष्टवक्तेपणाचे आणि परखड बोलण्याचे कौतुक केलेच पाहिजे, जमेल तेव्हा त्यांनी हे काम केले आहे, तेही कुठली भीडभाड न बाळगता! त्यांच्या सामाजिक कामाचा गौरव करायला कुणीही कचरणार नाही अशी कामगिरी त्यांनी केलीय.
राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक स्तरांवर सक्रिय राहूनही या माणसाच्या मनातली हळुवार जागा नाकारता येत नाही. ‘नाम’च्या कामात तो स्वतःला झोकून देत होता, हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं गेलं असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. ग्रामीण भागात फिरताना, शेतकऱ्यांच्या घरात जाताना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या डोळ्यात पाहताना त्याला त्या माणसांचं दुःख लागून राहत होतं. त्याच्या चेहऱ्यावरची हळहाळ कृत्रिम नव्हती. तो शेतकरी समस्येचा अंतिम अर्थशास्त्रज्ञ नव्हता; पण त्याला शेतकऱ्याचं दुःख झोपवत नव्हतं. या दोन गोष्टी वेगळ्या ठेवून पाहाव्या लागतात. त्यांच्या ठायी करुणा होती; त्या करुणेला धोरणाची भाषा लाभली असती तर त्यांच्या धडपडीचे अधिक सार्थक झाले असते.
नानाच्या खासगी आयुष्यातही थोडी रुक्ष थोडी हळवी गुंफण होती. त्याच्या वैवाहिक आयुष्यात तणावाचे काही क्षण आले. आईच्या मृत्यूने त्याला हादरवलं. पहिला मुलगा बालवयात असताना गेला, तेव्हा नाना हबकून गेला हे देखील खरेय! आयुष्यातील दुःखांची मोठी जाहिरात त्याने केली नाही. पण त्यांचं सावट त्याच्या कलाकृतींमध्ये राहिलं. म्हणून त्याचा वृद्ध बाप इतका खरा वाटायचा, हरवलेला सैनिक इतका खरा वाटायचा, आणि खलनायकाच्या डोळ्यातही अचानक दया दिसायची. तो फक्त व्यक्तिरेखा साकारत नव्हता; तो आपल्या आत साठलेलं जग त्या व्यक्तिरेखांना देत होता.
नानांच्या विक्षिप्तपणाकडेही प्रेमानेच पाहावं लागतं. लाडक्या व्यक्तीचा थोडा विचित्रपणा लोक आनंदाने खपवून घेतात. कारण त्या विचित्रपणात विकृती नसते, लबाडी नसते, स्वार्थी चावटपणा नसतो. नाना थोडा हट्टी होता, अचानक काहीतरी बोलून टाकायचा, स्वतःच्या पद्धतीने जगायचा, प्रसिद्धीला लाथ मारून गावाकडे वळायचा. हे सारे गुण आजच्या गुळगुळीत, मॅनेज्ड सेलिब्रिटी संस्कृतीत दुर्मिळ वाटतात. स्वतःच्या प्रतिमेवर सतत रंगरंगोटी करणाऱ्या काळात नाना स्वतःवर फारशी पॉलिश लावत नसे. कधी विस्कटलेला, कधी चिडका, कधी तडकाफडकी, कधी हळवा वाटायचा, तो ‘पब्लिक रिलेशन’च्या आरशात बसणारा माणूस नव्हता. तमाम मराठी माणसाला तो आपलासा वाटायचा कारण, मराठी माणसात असणारे सगळे सद्गुण दुर्गुण त्याच्याही अंगी होते आणि जोडीला होतं एक रांगडेपण! एक मराठमोळा बाणा!
म्हणूनच त्याच्या जाण्याचं दुःख श्रद्धांजलीच्या चौकटबंद पद्धतीच्या शब्दावलीत तर कधीच सामावणार नाही. त्यासाठीची शब्दांची निवड आणि मांडणीही त्यांच्यासारखीच एकमेवाद्वितीय असावी लागेल! मखमली शब्दांच्या जोडीने थोडे रुक्ष शब्दही हवेत, त्याचं कौतुक करताना जरा आवाज चढलाच पाहिजे; त्याची उणीव सांगताना जरा कंठ दाटलाच पाहिजे. कारण नाना स्वतःसुद्धा ‘एकरेषीय’ देवमाणूस म्हणून स्मरणात राहणार नाही. तो खराखुरा माणूस म्हणून राहणार आहे, ज्यात चांगुलपणा होता, दोष होते, राग होता, अहंकार होता, दया होती, हट्ट होता, वेदना होती आणि काही अपुऱ्या राहिलेल्या शक्यताही होत्या.
आज त्याच्या मृत्यूबद्दल लिहिताना ‘महान अभिनेता’ एवढंच म्हणणं अपुरं वाटतं. कारण त्याचं खरं मोठेपण त्याने केलेल्या भूमिकांपेक्षा अधिक मोठं, आणि त्याच्या सामाजिक कामापेक्षा अधिक गुंतागुंतीचं होतं. तो एक असा माणूस होता, ज्याने स्वतः आयुष्याच्या चिखलातून उभं राहून, पिचलेल्या लोकांना प्रकाशवाटा दाखवल्या! तो प्रकाश कधी स्वतःवर पडू दिला, तर कधी शेतकऱ्यांच्या घराकडे बांधाकडे वळवला आणि कधी तो कुठल्याही दिशेने न नेता स्वतःच्याच अस्वस्थतेत जळता ठेवला!
नानाला 'देवत्वा'च्या पोलादी भिंतीत कुणी चिणू नये, कारण मोठ्या माणसांना देव बनवलं की त्यांच्यातून शिकण्यासारखं काही उरत नाही. नाना देव नव्हता. तो एक मनस्वी माणूस होता आणि म्हणूनच मोठा होता. त्याने जगताना जितकी धग दिली, तितकीच उबही दिली. जितका राग दिला, तितकीच करुणाही दिली. जितक्या भूमिका केल्या, तितक्याच शक्यता अपुऱ्या ठेवल्या. मराठी चित्रपटक्षेत्रातल्या माणसाने अन्यभाषिक राज्यात नानाइतकी लोकप्रियता अपवादाने कमावली असेल. नानांची जागा कुणी घेऊ शकणार नाही, कारण अभिनेता म्हणून आणखी एखादा नाना पाटेकर काही दशकात शतकात उदयास येईल मात्र त्यांच्यासारखे माणूसपण तो कोठून आणणार! हीच तर खासियत होती नानांची, आपल्या माणसाची! हा 'आपला माणूस' आज आपल्यातून निघून गेलाय! शतकांत एखादाच असतो असा, तुमचा माझा, यांचा त्यांचा, आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस! तुम्ही जिथेही असाल तिथे नटसम्राटाच्या नव्या नांदीची सुरुवात झाली असेल! सर्वसामान्यांची आयुष्ये कलात्मक सामाजिक अंगांनी समृद्ध केल्याबद्दल समाज तुमच्या ऋणात राहील! अलविदा नाना!
ट्रेंडिंग न्यूज























