2016 ची गोष्ट. पुण्यात समाजभूषण पुरस्कार सोहळा होता. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट मुख्य पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. बापटांच्या हस्ते शांतीलाल मुथा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बापट हे शांतीलाल मुथा यांचे महाविद्यालयीन जीवनातले जीवलग मित्र. यात बोलताना बापट म्हणाले, “कॉलेजमध्ये समारंभ, विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम यात शांतीलाल आग्रही असायचे. त्यावेळी केवळ अभ्यासाकडे लक्ष दिलं असतं, तर आज पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात ‘चार्टर्ड अकाऊंटंट शांतीलाल मुथा’ अशी पाटी लागली असती. मात्र, त्यांच्या मनात समाजसेवेचं वेड होतं.”  गिरीश बापट यांचं हे शांतीलाल मुथा यांच्याबद्दलच विधान अगदी साधं-सोपं वाटत असलं, तरी शांतीलाल यांच्या जणीवक्षमतेबद्दल अंदाज वर्तवण्यात पुरेसे आहे.

महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजसेवेची ओढ मनात कायम होती. ओढ म्हणण्यापेक्षा ते पिंडच होतं. मात्र, विशिष्ट काळापर्यंत पोटा-पाण्याचंही पाहिलं पाहिजे, हेही आव्हान अपरिहार्यपणे समोर होतं. कारण घरची स्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यांचा जन्मगाथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच इतक्या समृद्ध विचारांच्या या माणसाचं लहानपण, त्यानंतरचा प्रवास, मग तो वैयक्तिक जीवनातला असो वा शैक्षणिक पातळीवर... अफाट इनस्पिरेशनल असाच आहे.



शांतीलाल मुथा यांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या पिढीतला. 15 ऑगस्ट 1954 रोजी त्यांचा जन्म झाला. आज महाराष्ट्र, देश आणि जगातल्याही अनेक कोपऱ्यांमध्ये नाव पोहोचलेल्या या माणसाचं जन्मगाव आहे बीड जिल्ह्यातील एक लहानसं गाव. डोंगरकिन्ही असं या गावाचं नाव. पुढे गावाच्या नावाप्रमाणेच डोंगराएवढं कार्य त्यांनी केलं. मात्र, त्यामागची संवेदनशीलता, जाणीवसंपन्नता आणि प्रेरणा हे कुणा व्यक्तीकडून मिळालेली देण नव्हती, तर ती त्यांच्याच आयुष्यातल्या घटना, पाहिलेले प्रसंग होते.

ज्या वयात मायेची उब मिळावी, त्याच वयात म्हणजे वयाच्या 6 व्या वर्षी आईचं निधन झालं. डोक्यावरलं मायेचं छत्र हरपलं. त्यानंतरही त्यांच्या पायला भिंगरी लागल्यागत शिक्षणासाठी त्यांना कधी या शहरातून त्या शहरात, तर कधी त्या शहरातून या शहरात फिरावं लागलं.



बीडमधील कडा गावच्या जैन बोर्डिंग स्कूलमधून त्यांचं 8 वी ते 11 वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर पुढे बारावीच्या परीक्षेसाठी ते अहमदनगरला गेले आणि पुढे पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी विद्येचं माहेर गाठलं. अर्थात पुणे. इथे त्यांना त्यांच्या आयुष्याची नवी दिशा, विचार आणि सोबतीही मिळाले. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अर्थात बीएमसीसीमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. या शिकण्याच्या साऱ्या प्रवासात त्यांना हाताला पडेल ते काम करावं लागलं. आर्थिक चणचणीतून स्वत:च मार्ग काढला. या सर्व वाटचालीत त्यांना सामाजिक जाण आणि आपण काय देणं लागतो याची जाण मनात घट्ट निर्माण झाली. शांतीलाल यांच्या शिक्षणाचा हा प्रवास त्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षणापुरता मर्यादित राहिला नाही, तर जगण्याचं मोल आणि जबाबदारीचं भानही शिकवणारा ठरला.



महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शांतीलाल यांना पोटा-पाण्याकडे पाहणं अपरिहार्य बनलं. म्हणून त्यांनी 1978 ते 1985 या काळात रिअल इस्टेटमध्ये आपलं नशीब अजमावून पाहिलं. प्रामाणिकपणाने काम आणि कामातली सचोटी यांमुळे यशानंही त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. मात्र, पैसा हा त्यांच्यासाठी कधीच प्राधान्यक्रमात बसला नाही. त्यांचं मन हे गावकुसाबाहेर उन्हा-तान्हातून उघड्या अंगाने वावरणाऱ्या वंचित पोरा-बाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे त्यांच्या मनात कायम घोळत होतं. मग काय व्यवसायातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली आणि वयाच्या 31 व्या वर्षी एका क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. नाव होतं – भारतीय जैन संघटना अर्थात तुम्हा-आम्हाला सर्वार्थाने परिचित असणारी बीजीएस!



भारतीय जैन संघटनेचा वर उल्लेख करताना मी ‘क्रांतिकारी’ शब्द वापरला. तो मला प्रचंड योग्य आणि नेमका शब्द वाटतो. कारण शांतीलाल यांनी या संघटनेच्या माध्यमातून खरंच क्रांतिकारी समस्या, विषय मांडले, मुद्दे पुढे सरकवले आणि काम केले.

समाजाची सेवा करणं, इतकं साधं, सोपं आणि सरळ ध्येय असलेल्या या संघटनेने पुढे विस्मयचिक व्हावं, इतके संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण मुद्दे पुढाकाराने अजेंड्यावर ठेवले. शांतीलाल यांच्या कामाचा झपाटा इतका वेगवान आणि रचनात्मक होता की, बीजीएसने संघटनेच्या सीमा ओलांडून चळवळीचं रुप धारण केलं. मुळातच प्रेमळ, सुस्वभावी आणि माणुसकीचा झरा असलेल्या शांतीलाल यांच्या या कामात माणसं जोडावी लागली नाहीत, तर ती आपसूक जोडली गेली. प्रत्येक जखमेला आपण फुंकर मारावी, या वेडाने हा माणूस झपाटला होता. आणि अजूनही तो झपाटलेपण तसाच आहे. जो 35 ते 40 वर्षांपूर्वी होता.

आपल्याकडे आजही लग्नांमध्ये अफाट खर्च होतो. आता कुठे हळूहळू सामूहिक विवाहांची संकल्पना जोर धरु लागली आहे. मात्र, हेही विशिष्ट समाजांपलिकडे जात नाही. विशेषत: जैन समूहात सामूहिक विवाहांची गोष्ट तर विरळच. मात्र, जैन समाजात वारेमाप पैसा खर्च होणारी लग्न पाहिल्यावर त्यांना दु:ख झालं. सुरुवात स्वत:च्या समाजापासून करण्याचं निश्चय गाठीशी बांधून त्यांनी जैन समाजातल्या 25 जोडप्यांचा देशातला पहिला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करुन त्यांनी समाजकार्याची कृतीशील सुरुवात केली. आजपर्यंत शांतिलालजींनी हजारो जोडप्यांचे संसार सुरु करुन दिले. हेही मोठं क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचललं होतं.

पुढे सामूहिक विवाह सोहळ्यांसोबतच हुंडा, विधवा आणि घटस्फोटित महिलांचे पुनर्विवाह, वंचित समाजातील आणि गरीब-गरजू चिमुकल्यांचे शिक्षण, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत इत्यादी नाना गोष्टींवर, मुद्द्यांवर, विषयांवर, समस्यांवर त्यांनी पुढाकारात घेत काम केलं.

शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तीवेळी मदत, या दोन विषयात तर शांतिलाल यांचं काम हे डोंगराएवढं आहे.

लातूरमधील भूकंप (1993), गुजरातमधील भूकंप (2001), अकोल्यातील पूर (2002), अंदमान निकोबारमधील त्सुनामी (2005), जम्मू-काश्मीरमधील भूकंप (2005), बिहार पूर (2008), महाराष्ट्रातील दुष्काळ (2013 आणि 2016).... या मोजक्या घटना. यातल्या प्रत्येक घटनेत शांतीला यांनी जातीने मदतीचा हात पुढे केला. विशेष म्हणजे कपडालत्ता किंवा चार पैसे हातात टेकवून त्यांनी आपल्या मदतीचा हात आखडता घेतला नाही. त्यांनी तिथे कंस्ट्रक्टिव्ह काम केलं.

1993 च्या राज्याला हादरवणाऱ्या लातूर भूकंपाच्या दरम्यान शांतीलाल यांच्या संस्थेच्या पुढाकाराने सुमारे महिनाभर रोज 10 हजार लोकांना अन्नदान करण्यात आलं. या दरम्यान जमीनदोस्त झालेल्या 368 शाळा त्यांनी पुन्हा बांधून दिल्या. भूकंपग्रस्तांच्या मुला-बाळांचा सांभाळ करण्याची व्यवस्था केली, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ झालेल्या अनेक मुलांना त्यांनी पुण्याला आणून पदवीपर्यंत शिकवलं आणि स्वत:च्या पायावर उभं केलं. विशेष म्हणजे या मुलांचं संसार थाटून देण्यातही त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. एकंदरीत कोणतंही काम त्यांनी अर्ध्यात सोडलं नाही. ते तडीस नेले. पूर्णत्वास नेले.

महाराष्ट्राच्या एका खेडेगावातून आलेल्या शांतीलाल मुथा नावाच्या या अवलिया माणसाने समाजसेवेचं हे काम राज्याच्या सीमा पार करत परराज्यात नेलं. आज महाराष्ट्रासोबतच छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्येही बीजीएसचं काम पसरलेलं आहे.

ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मूल्यवर्धनाचा राज्यस्तरीय प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. शिवाय, वाघोली एज्युकेशनल रिहॅबिलेशन सेंटर हेही शिक्षण क्षेत्रातील त्यांचं महत्त्वपूर्ण काम आहे.

वाघोली एज्युकेशन रिहॅबिलेशन सेंटरच्या माध्यमातून तर शांतीलाल मुथा यांनी पराकोटीचं मौल्यवान काम केलंय. या सेंटरच्या सुरुवातही लातूर भूकंपाच्या घटनेनंतरच सूचली. झालं असं की, लातुरातील 1993 च्या भूकंपावेळी शांतीलाल मुथा आणि बीजीएसचे 800 हून अधिक स्वयंसेवक मदतीसाठी धावून गेले. लातूर भूकंपात 3 लाखाहून अधिक लोकांनी आपलं घरदार गमावलं होतं. याच भूकंपात 1 ते 13 या वयोगटातील सुमारे 500 मुलं अनाथ झाली होती. हे सर्व भयंक चित्र पाहून शांतीलाल यांनी यातील शक्य तितक्या मुलांना पुण्यात आणलं. सुमारे एक हजार मुलांचं नवीन आयुष्य त्यांनी सुरु करुन दिलं. पुढे मग अशा दुर्घटनांमधील मुलांसाटी रिहॅबिलेशन सेंटर उघडण्याचं ठरलं आणि त्यातूनच वाघोली एज्युकेशन रिहॅबिलेशन सेंटरचा जन्म झाला.

10 एकरावर वसलेल्या या सेंटरने आतापर्यंत अनेक अनाथ, निराधारांना आयुष्य मिळवून दिलंय. माणूस म्हणून घडवलंय. 1995 च्या जबलपूर भूकंपातील 50 अनाथ मुलांचं पुनर्वसनही याच सेंटरमध्ये मुथा यांनी केले. मेळघाटातील 400 हून अधिक मुलांनाही इथे आणळे गेले. शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासाठी जे काही आवश्यक आहे, त्या सगळ्याबाबतीत योग्य त्या गोष्टी मुलांसाठी इथे केल्या जातात.

खरंतर शांतीलाल मुथा यांच्या सामाजिक कामांची यादी भलीमोठी आहे. विशेष म्हणजे निस्वार्थ मनाने केलेलं ते काम आहे, म्हणून त्याचं यश तितकंच देदिप्यमान आणि कौतुकास्पद आहे.

देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला, नव्हे शांतीलाल मुथा यांचा स्पर्श होऊन त्या पुरस्कारांचाच गौरव झाला. महाराष्ट्राच्या मातीतल्या या ध्येयवेड्या ‘तरुणाला’ एबीपी माझाचा सलाम!