'अजात' डॉक्युमेंट्रीचा एक शो मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.


डॉक्युमेंट्री संपल्यानंतर दिग्दर्शक अरविंद जोशी याच्याशी छोटेखानी चर्चा झाली. दत्ता बाळसराफ यांच्या आग्रहाने ही चर्चा पत्रकार सुनील तांबे यांनी घडवून आणली. यात अरविंद म्हणतो, "जातीव्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, मात्र माझ्यापुरती जात संपलीय."

‘अजात’ डॉक्युमेंट्री पाहिल्यावर अरविंदचे हे विधान दोनशे टक्के पटते. कारण संपूर्ण डॉक्युमेंट्रीमध्ये त्याने स्वतःचे मत न दाखवता, 'जे आहे ते असे आहे' या फॉरमॅटमध्ये मांडलंय.

चार्वाकवाद ते परवाची अमित शाहांची कर्नाटकातील राजकीय रणनीती वगैरे किंवा आर्यांचा भारतीय भूगोलावर प्रवेश ते परप्रांतीयांचा मुंबईत लोंढा अशा अनेक विषयांवर आपल्याला किमान एक ओळ तरी माहित असल्याच्या अदृश्य अभिमानाचा माझा घडा ‘अजात’ पाहिल्यावर खडकन फुटला. आपल्या राज्यात, भौगोलिकदृष्ट्या जवळ असणाऱ्या अशा एका भूभागावर होऊन गेलेल्या क्रांतिकारी माणसाबद्दल आपल्याला एक शब्द माहीत नसावा, किंबहुना त्याचे नावही कुठे ऐकिवात नसावे, याची रुखरुख लागून राहते. ‘अजात’ पाहिल्यावर अनेक प्रश्न घेऊन आपण बाहेर पडतो. अरविंद सगळ्यांची उत्तरे देईल अशातला भाग नाही, तर आपण ती शोधायची असतात. मला खूप प्रश्न पडले आहेत. ‘अजात’ने मला अस्वस्थ केले आहे.

अजातची स्टोरी लाईन सांगतो. जेणेकरुन तुम्हाला पुढे माझे अस्वस्थ करणारे प्रश्न कळायला सोपे जाईल.

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या गावात होऊन गेलेल्या गणपती महाराज यांच्या जीवनावर आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांवर आधारित ही डॉक्युमेंट्री आहे. हा काळ आहे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील. 1887 साली या गणपती महाराजांचा जन्म आणि 1944 साली मृत्यू. नावात 'महाराज' आहे म्हणून आताच्या स्थितीला अनुसरुन मत बनवण्याआधी थोडं त्यांच्या कार्यवर दृष्टीक्षेप टाकूया.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तेव्हाही होताच. मात्र चंद्रभागेच्या पात्रात जी समानता होती, ती वारकरी राहत असलेल्या गावा-गावांमध्ये नव्हती. किंबहुना आजही आहे, असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही. त्यामुळे वारी अगदीच निष्फळ ठरत नसली तरी त्याचे अंतिम यश निराशादायीच ठरते. अशातच गणपती महाराजांचे वारीला अनुसरुन कार्य फार मोठे, अगदी डोंगराएवढे वाटते.

गणपती महाराजांनी आपल्या अनुयायांमध्ये प्रबोधन सुरु केले. जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडले. आपल्या अनुयायांना जात सोडायला लावली आणि ‘अजात’ व्हायला सांगितले. कुठल्याही जाती-धर्माचं लेबल नसलेला पांढारा रंग त्यांनी प्रतिक मानला. पांढरे कपडे, पांढरा झेंडा इ. गोष्टी प्रतिके म्हणून वापरली. जवळपास 400 आंतरजातीय लग्न लाऊन दिले. याची सुरुवात स्वतःच्या आंतरजातीय लग्नापासून केली. तसेच, काल्याच्या उत्सवातून समतेचा संदेश देणारी सुरुवात असो. कितीतरी गोष्टी गणपती महाराजांनी काळाच्या पुढे जाणाऱ्या केल्या.

विचार करा, 1915 ते 1935 चा हा काळ आणि या काळात गणपती महाराज लोकांना जात सोडायला सांगतात, आंतरजातीय विवाह लावून देतात. किती धाडसी आणि क्रांतिकारी आहे हे सारे!

आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, हे क्रांतिकारी काम 1915 ते 1935 या काळात घडत होते. तेही महाराष्ट्रात. (आजच्या भौगोलिकदृष्ट्या. कारण तेव्हा आजचा महाराष्ट्र नव्हता.) याच काळात दुसरीकडे देशभर स्वातंत्र्याची चळवळ सुरु होती, त्या चळवळीचे केंद्र महाराष्ट्र होते, याचवेळी देशभर सामाजिक सुधारणेची चळवळ सुरु होती, त्या चळवळीचे केंद्रसुद्धा महाराष्ट्र होते. अशा काळात कुणाही मुख्य प्रवाहातील व्यक्तीचा गणपती महाराजांशी संपर्क आला नाही. फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या संकल्पनेचा पुसटसा संबंध दिसतो. पण तोही तितकाच.

आज 2018 मध्येही जे शक्य नाही, किंवा शक्य असले तरी अत्यंत कठीण आहे, असे कार्य त्या काळात गणपती महाराज करु पाहत होते, किंबहुना, प्रत्यक्षात करत होते. त्याची किती दखल आपल्या इतिहासाने घेतली, किंवा इतिहासातील थोर व्यक्तींनी घेतली? तर घेतलेली दिसत नाही. प्रश्न असा पडतो, असे का झाले असावे? एवढी मोठी सामाजिक क्रांती महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागात घडत असताना कुणाला मागमूस लागू नये?

आंबेडकरांपासून ते अगदी प्रबोधनकरांपर्यंत कित्येक समाजसुधारक याच काळात होते. ते केवळ होते असे नव्हे, तर अत्यंत प्रभावीपणे आपापले काम करत होते. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा हा वाद सुद्धा याच काळातला होता. अशा काळात गणपती महाराजांचे कार्य या कुणाच्याच नजरेत आले नसावे? (कमाल आणि कुतूहल, अशा दोन्ही भावना या ठिकाणी माझ्या मनात आहेत.)

बरं, गणपती महाराजांचा शेवट सुद्धा भारतातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांसारखाच काहीसा झाला. 1935 नंतर त्यांना तत्कालीन भटशही, सनातनी प्रवृत्ती आणि कर्मठ ब्राम्हणांकडून त्रास देण्यात येऊ लागला. मग ते अज्ञातवासात गेले. 1940 नंतर तर ते कुठे होते, काय करत होते, काहीच नोंद नाही. थेट 1944 साली मृत्यू अशी नोंद सापडते. त्यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा अनेक अंदाज, कथा वगैरे आहे. कुणी म्हणते, बिब्बे खाल्ल्याने, कुणी हार्टअटॅकने, तर कुणी म्हणते समाधी घेतली.

आपल्या अनुयायांना जात सोडायला लावणाऱ्या आणि आंतरजातीय लग्नाची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या या महान माणसाला आपण किती लक्षात ठेवले? हा प्रश्न आहेच. पण त्या अजात समूहाची होणारी हेळसांड तरी कुठे आपण डोकावून पाहिली?

ज्यांनी जात सोडून ‘अजात’ होण्याचा निर्णय घेतला होता, त्यांची तिसरी पिढी आज आहे. आणि ते आता पुन्हा आपल्या वाडवडिल्यांच्या जाती शोधून पुन्हा जातीत येऊ पाहत आहेत. याला कारण आहे इथली व्यवस्था. कारण कागदोपत्री जातीचा उल्लेख नसेल, तर शासनाच्या सोईसुविधा मिळणार नाहीत, असे नियम सांगून अजात समूहाला हुसकावून लावले जाते. म्हणजे काय तर, शेवटी गणपती महाराजांच्या क्रांतिकारी कार्याची दखल घेणे तर सोडूनच द्या, इथल्या शासनाने तर त्यांच्या कार्याचा पराभव करण्याचेच जणूकाही ठरवले आहे.

डॉ. सदानंद मोरे, प्रवीण चव्हाण, अजात समूहातील दुसरी-तिसरी पिढी, विचारवंत, पत्रकार अशा व्यक्तींशी संवाद साधून, प्रत्यक्ष अजात वारीचे चित्रण करुन, दोन तासांची ही डॉक्युमेंट्री अरविंद जोशी आणि त्याच्या टीमने साकारली आहे. अरविंद सांगतो की, एकूण 110 ते 120 तासांचे फुटेज होते, त्यातील दोन तास एडीट केले आहेत. म्हणजे, किती कष्ट घ्यावे लागले असेल हे लक्षात येते. सोबत या डॉक्युमेंट्रीसाठी जो रिसर्च केला गेला आहे, त्याला तोड नाही. केवळ अफलातून!

आपण एवढे सुद्धा न करता, वर एक ना अनेक प्रश्न विचारतो आहोत, याचे शल्य मनात असले, तरी प्रेक्षक म्हणून आणि सामाजिक-राजकीय घटनांचा विद्यार्थी म्हणून हे प्रश्न ‘अजात’ पाहिल्यावर माझ्या मनात प्रकर्षाने उभे राहिले, तेच वर मांडले आहेत.

बाकी डॉक्युमेंट्री परिपूर्ण आहे, असे म्हणणार नाही. रिसर्चला अजून वाव असेलही. आणखी रिसर्च झाल्यास गणपती महाराजांचे समकालीन मुख्य प्रवाहातील आणखी काही धागेदोरे सापडतील सुद्धा. पण अरविंद जोशी आणि त्याच्या टीमने कॅनव्हासवर उपलब्ध रंगातून जे ‘अजात’ नावाचे चित्र रेखाटले आहे, ते आपल्या ठिकाणी सर्वोत्तम आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

'अजात'चा ट्रेलर :