महाराष्ट्राची राजधानी मुंबई...मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही. त्यासाठी गुजरातसोबत मोठा लढा द्यावा लागला. पंडित नेहरुंचं केंद्र सरकार, मोरारजी देसाईंच्या मुंबई स्टेट सरकारसोबत सुद्धा मराठी माणसाला लढावं लागलंय. 106 मराठी माणसांनी हौतात्म्य दिलंय, हजारोंचं रक्त सांडलंय, अभूतपूर्व लढ्यानंतर 1960 साली मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवलाय. हे सांगायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाची अजुनही होत असलेली उपेक्षा.


या मायानगरीत देशभरातील लाखो लोक दररोज आपली स्वप्न घेऊन दाखल होतात. त्यातही उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण जास्त. अगदी मणिपूर आसाम बंगालपासून कश्मीर ते केरळ जो आला त्याला या शहराने आणि मराठी माणसाने आपलं मानलं. छोट्या मोठ्या आगळीकीकडे दुर्लक्ष करत सामावून घेतलं. पण हळुहळु या महानगराची स्कायलाईन बदलू लागली, चेहरामोहरा बदलू लागला. परप्रांतीय टक्का वाढत गेला मराठी टक्का कमी होत गेला. 
महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 1960 साली मुंबईत 40-45 लाखांपैकी20-22 लाख म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त मराठी टक्का होता, तो आता एक सव्वा कोटींच्या लोकसंख्येत 35 ते 40 लाख म्हणजे  30-35 टक्क्यांवर आल्याचं जाणकार सांगतात. 


मुंबईत जवळपास 1 कोटी मतदार आहेत. मुंबई शहरात 25 लाख तर उपनगरात 75 लाख. ठाण्यात साधारण 85 लाख मतदार आहेत. यात सिंगल लार्जेस्ट मराठी मतदार आहे. मुंबईतील 35-45 लाख मराठी मतांना तोड म्हणून गुजराती भाषिक आणि जैन समाजाचे मिळून असलेल्या साधारण 40 लाख मतदारांकडे पाहिलं जातंय. पश्चिम उपनगरातही उत्तरप्रदेश आणि बिहार मतांवर अनेक वार्डातील निकाल अवलंबून आहे. जवळपास 26 टक्के उत्तर भारतीय आणि 13 टक्के मुस्लिम मतं महत्वाची ठरु लागली. मराठी मतांना काऊंटर करण्यासाठी मुस्लिम आणि इतर अमराठी मतांची मोळी बांधली जाऊ लागली.  या सगळ्या मांडणीने मुंबईची राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुंबईत जिंकायचं असेल तर मराठी मतांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाल्याचं राजकारण्यांच्याही लक्षात आलं आणि इथेच अमराठी मतांसाठी लांगुलचालन सुरु झालं. हे करण्यात कोणताही पक्ष मागे नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना उत्तरायण भरवायला लागली, आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीसाठी केम छो वरळीचे पोस्टर लागू लागले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुंबईच्या काही भागात थेट हिंदीत भाषण करु लागले. अगदी राज ठाकरे सुद्धा उत्तर भारतीयांच्या स्टेजवर दिसू लागले. 


2014 साली राज्यात आणि केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर मुंबईतील भाषिक समीकरणं वेगाने बदलली असं जाणकार मानतात. उत्तर प्रदेशात गेली दोन टर्म भाजपला निर्विवाद मतं मिळाली, गुजरात तर भाजपची प्रयोगशाळाच. त्यामुळे भाजपचा हा पारंपरिक उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार असलेल्या मुंबईत जास्त सक्रिय झाला. 2019 साली लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं एकत्र लढवली. त्यावेळी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी, गुजराती मतदार मतदानासाठी बाहेर पडला. मुंबईतील मतदानाने आपला जुना विक्रम मोडला. त्याचं फळ भाजपसेनेला मिळालं. मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा भाजप सेना युतीने अगदी आरामात जिंकल्या. त्या आधी मुंबई महापालिकेत वेगवेगळं लढताना शिवसेनेने 84 जागा जिंकल्या पण भाजपने मराठी, उत्तर भारतीय, गुजराती मतांची मोट बांधत रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 82 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या विधानसभेनंतर चित्र बदललं आहे.  मविआचा प्रयोग झाला आहे. कोणी कल्पनाही केली नव्हती अशा पद्धतीने मुंबईतील मुस्लिम मतदाराला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंमध्ये आश्वासक चेहरा दिसत आहे. त्यामुळे 2024 साली मुंबई लोकसभेत काय होईल किंवा जेव्हा केव्हा होतील तेव्हा बीएमसीच्या निवडणुकीत काय होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे.
  
मुंबई आणि मराठी माणसाचं हृदय विशाल आहे. त्याचा स्वभाव मूळात अतिशय शांत आहे सौम्य आहे समाधानी आहे. त्यामुळे तो मुंबईबाहेर फेकला गेला तरी शांत समाधानी असतो. त्यामुळे मारु घाटकोपरचे पोस्टर लावले, घरं नाकारली तरी शांत समाधानी असतो. मतांच्या राजकारणात आपलेच नेते आपलेच पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करतायत हे बघूनही तो शांत असतो समाधानी असतो. आपल्या आजुबाजुला जे बदल होतायत त्याचा आपल्यावर, आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर काही परिणाम होतोय याची जाणीवही मुंबईकर मराठी माणसाला नाहीय. ही जाणीव होऊ नये अशी इको सिस्टिम काम करतेय हे सुद्धा त्याच्या गावी नसतं. यदाकदाचित जाणीव झालीच तरी तोवर बराच उशीर झालेला असेल.


अशी परिस्थिती असतानाही मुंबईला आई मानणारे... मराठीला, महाराष्ट्राला मावशी मानणारे अनेक परप्रांतीय, उत्तर भारतीय,गुजराती गुण्यागोविंदाने मुंबईत राहात आहेत. शेजारच्या गुजराती परिवाराला जीव लावणारा, आपल्या भावापेक्षा मोटा भाईला, शेजारच्या भैय्याला मानणारा मराठी माणूस सुद्धा इथे आहे. वेळप्रसंगी जात पात धर्म पंथ भाषा भेद हे काहीही न मानता एकमेकांच्या हाकेला धावणारा मुंबईकर इथे आहे. जेव्हा निवडणुका जवळ येतात, राजकारणी मतांचं गणित मांडू लागतात तेव्हाच या सगळ्या अस्मितांना टोक येतं. मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केला जातो. मुंबईत मराठीचा पहिला अधिकार अमान्य करण्यापर्यंत किंवा चॅलेंज करण्यापर्यंत मजल जाते. मतांची आकडेवारी बघून कोणत्या अस्मितांना जास्त फुंकर घालायची हे राजकीय पक्ष ठरवतात. त्या नादात मुंबईच्या मूळ संस्कृतीवर, मुंबईकराच्या मूळ परोपकारी वृत्तीवर अन्याय होतोय याचं भान राखणं गरजेचं आहे. निवडणुका येतील जातील राजकारणी येतील जातील पण ही मुंबई-आपली मुंबई-आहे याचं भान प्रत्येक मुंबईकराने राखायलाच हवं.