एक्स्प्लोर

BLOG : जिन्ना आणि लियाकत - रक्तरंजित सत्तालालसेचे पाकिस्तानी व्हर्जन!

BLOG : मुघल सम्राट शहाजहान हा 1658 मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपला सख्खा भाऊ दारा शुकोह याचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास 300 वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. वास्तविक पाहता आपल्या स्पर्धकांना बंदी बनवणे अथवा ठार मारणे ही मुघलकालीन खुनशी परंपराच झाली होती. हीच परंपरा पाकिस्तानात थोड्याफार फरकाने सुरु राहिली. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान पदरात पाडून घेतला, पण 11 सप्टेबर 1948 ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले.... 

मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीत निर्णायक राजकीय भूमिका बजावली होती. नव्या देशाच्या संस्थात्मक उभारणीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्याच्या संस्थापकांची प्रकृती गंभीररीत्या खालावली होती. जिन्ना दीर्घकाळ क्षयरोगाने त्रस्त होते आणि त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचाही त्रास असल्याच्या वैद्यकीय नोंदी आहेत. त्यांचा आजार सार्वजनिकरीत्या मोठ्या प्रमाणावर उघड केला गेला नव्हता. नव्याने जन्मलेल्या देशाचे नेतृत्व करत असताना त्यांचे शरीर मात्र साथ सोडत चालले होते.

11 सप्टेंबर 1948 रोजी जिन्ना यांना क्वेटा परिसरातील जियारत येथून कराचीला आणण्यात आले. त्यांची बहिण, फातिमा जिन्ना यांनी 'माय ब्रदर' या पुस्तकात, ह्या प्रवासाविषयी एक धक्कादायक प्रसंग नोंदवलाय. कराची विमानतळावरून सरकारी निवासस्थानाकडे नेत असताना त्यांची रुग्णवाहिका मध्येच बंद पडली. रुग्णवाहिकेतले  पेट्रोल संपले होते. फातिमा आणि गंभीर आजारी असलेल्या जिन्ना यांना, पर्यायी वाहन येईपर्यंत उन्हात रस्त्याच्या कडेला तीन तास वाट पाहत थांबावे लागले. अखेर दुसरी रुग्णवाहिका आल्यावर त्यांना गव्हर्नर हाऊस ह्या निवासस्थानी आणण्यात आले; मात्र त्याच रात्री त्यांचे निधन झाले. या घटनेने नव्या देशाच्या प्रशासनाच्या तत्परतेविषयी गंभीर प्रश्न निर्माण केले.

जिन्ना यांच्या मृत्यूने पाकिस्तानच्या राजकारणात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण केली. देशाच्या घटनात्मक आणि राजकीय संस्थांना स्थिर होण्यासाठी आवश्यक असलेला काळ मिळण्यापूर्वीच सत्तेचे संतुलन बदलू लागले. याच पार्श्वभूमीवर पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यावर देशाच्या राजकीय स्थैर्याची मोठी जबाबदारी होती. पण जिन्ना यांच्या निधनानंतर अवघ्या तीन वर्षांत त्यांचाही हिंसक मृत्यू झाला.

मुहम्मद अली जिन्ना यांचा मृत्यू नैसर्गिक होता, की त्यामागे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचे काही कटकारस्थान होते, याची चर्चा पाकिस्तानमध्ये आजही होते. या मृत्यूची संशयाची सुई लियाकत अली खान यांच्याकडे निर्देश करत होती. जिन्नांची बहीण फातिमा याबद्दल लिहिते की, 'माझ्या भावाची हत्या लियाकत अली खान यांनीच केली आहे. त्यांना औषधोपचार तर दूर, त्यांना प्राणवायूसुद्धा पुरविला गेला नाही. जिन्नाचे खाजगी डॉक्टर वेळोवेळी सांगत होते की, काही औषधी या विदेशातून मागवाव्या लागतील. पण, लियाकतने त्या मागविल्या नाहीत.'

लियाकत अलींनी यावर स्पष्टीकरण देत देत कसातरी बचाव केला. पण लियाकत यांचीही एका इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. लियाकत खान यांची हत्या करणारा खरा सूत्रधार कोण होता, त्याचे नाव इतक्या वर्षांनंतरही पाकिस्तानच्या संसदेच्या पटलावर कधीही आले नाही. 16 ऑक्टोबर 1951 रोजी रावळपिंडी येथील कंपनी बागेत, एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी लियाकत अली खान उभे असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सईद अकबर नावाच्या अफगाण नागरिकाने त्यांच्यावर गोळीबार केला.

पोलिसांनी घटनास्थळीच सईद अकबरला ठार मारले. त्यामुळे या हत्येमागील व्यापक कट, सूत्रधार किंवा संभाव्य सहकाऱ्यांची चौकशी करण्याची संधी मोठ्या प्रमाणात कमी झाली. घटनेनंतर लियाकत अली खान यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला. त्याने साक्षीदारांची चौकशी केली; मात्र आयोगाच्या अहवालातील अनेक नावे, परिच्छेद आणि तपशील सुरक्षेच्या कारणास्तव वगळण्यात आले. परिणामी, अहवालातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी काही शंका अधिक दृढ झाल्या.

लियाकत अली खान यांच्या हत्येमागे नेमके काय कारण होते, याबद्दल वेगवेगळे तर्क पुढे आले. त्यांची अंतर्गत धोरणे, काश्मीरविषयक भूमिका, अफगाणिस्तानाशी संबंध आणि पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रांमधील स्पर्धा यांचा संभाव्य संदर्भ चर्चेत राहिला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही नंतरच्या काळात आरोप झाले. त्यांच्या हत्येच्या कटाचे आणि त्यातील संभाव्य सहकाऱ्यांचे सत्य कधीच समोर आले नाही.

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मारले गेले, तरी त्यानंतर देशाच्या राजकारणात स्थैर्य आले नाही. नागरी नेतृत्व आणि प्रशासकीय-लष्करी सत्ताकेंद्रांमधील संघर्ष तीव्र होत गेला. हुसेन शहीद सुहरावर्दी यांचे उदाहरण या संदर्भात घेतले जाते. 1956 ते 1957 ह्या एका वर्षाच्या काळात ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अयुब खान यांच्या लष्करी राजवटी विरोधात त्यांची भूमिका होती आणि त्यांना काही काळ राजकीय निर्बंधांना सामोरे जावे लागले. 5 डिसेंबर 1963 रोजी बेरूत येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला गेला. राजकीय संशयाच्या वातावरणातच त्यांचा मृत्यू झाला, हे वास्तव आहे! 

यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात लष्करी सत्तेचा प्रश्न अधिक निर्णायक बनला. झुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक आणि 1970 च्या दशकातील सर्वांत प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होते. 1971 च्या युद्धानंतर देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पाकिस्तानच्या नव्या संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. 1973 चे संविधान आजही पाकिस्तानच्या संसदीय व्यवस्थेचा आधार आहे. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द सत्तासंघर्षापासून मुक्त नव्हती. विरोधकांशी संघर्ष, राजकीय विरोधकांवर कारवाईचे आरोप आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेबद्दलचा वाद वाढत असताना 5 जुलै 1977 रोजी जनरल झिया-उल-हक यांनी लष्करी उठाव केला आणि भुत्तो यांचे सरकार उलथवून टाकले.

भुत्तो यांच्यावर राजकीय प्रतिस्पर्धी नवाब मोहम्मद अहमद खान कसुरी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. खटला चालला आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 4 एप्रिल 1979 रोजी रावळपिंडी तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. हा खटला पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेविषयी दीर्घकाळ वादात राहिला. तब्बल साडेचार दशकांनी मार्च 2024 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या संदर्भावरील मत देताना, भुत्तो यांच्या खटल्याची आणि अपील प्रक्रियेची छाननी केली. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्या कार्यवाहीत निष्पक्ष सुनावणी आणि योग्य न्यायप्रक्रियेच्या घटनात्मक निकषांचे पालन झाले नव्हते. तथापि, अंतिम निकाल म्हणून अंमल केला गेलेला जुना निकाल रद्द करण्याची तरतूद कायद्यात नसल्याने न्यायालयाने तो औपचारिकरीत्या उलटवला नाही.

भुत्तो यांना सत्तेवरून हटवणारे जनरल झिया-उल-हकही अखेर एका गूढ घटनेत मरण पावले. 17 ऑगस्ट 1988  रोजी बहावलपूरजवळून उड्डाण केल्यानंतर त्यांचे सी- 130, हे विमान कोसळले. या अपघातात झिया यांच्यासह अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड राफेल, लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर प्रवासी मरण पावले. विमानातील तांत्रिक बिघाड, पायलटची चूक आणि हवामान यांसारख्या शक्यतांचा तपास करण्यात आला. पाकिस्तानी तपास पथकाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अपघात घातपातामुळे झाला असण्याची शक्यता मांडली; अमेरिकेच्या न्याय विभागाने 1991 मध्ये तपासाचा निष्कर्ष निश्चित करता येत नाही हे सांगतानाच, अपघात आणि घातपात या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत याकडे लक्ष वेधले. 

झिया यांच्या विमानात आंब्यांच्या पेटीत स्फोटके ठेवण्यात आली होती, हा वादग्रस्त मुद्दा लोकानी उचलून धरला.  विमानात आंब्यांच्या पेट्या असल्याची नोंद आणि काही नमुन्यांमध्ये स्फोटकांशी संबंधित रसायनांचे अंश आढळल्याच्या वृत्तांमुळे या चर्चेला बळ मिळाले. झिया यांच्या मृत्यूमुळे पाकिस्तानच्या लष्करी राजवटीचा एक अध्याय संपला; पण त्या राजवटीने निर्माण केलेल्या राजकीय संघर्षांचे निराकरण झाले नाही. पाकिस्तानच्या  राजकारणातील सत्तासंघर्ष पुढील दशकांतही कायम राहिला.

पाकिस्तानच्या इतिहासात राजकीय नेतृत्वावर झालेला सर्वांत मोठा आघात म्हणजे बेनझीर भुत्तो यांची हत्या. झुल्फिकार अली भुत्तो यांची कन्या असलेल्या बेनझीर, ह्या मुस्लिमबहुल देशातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. राजकीय संघर्ष, तुरुंगवास आणि निर्वासनातून परत आल्यानंतर त्या निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्या. 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडी येथील लियाकत बाग येथे सभेनंतर बाहेर पडताना त्यांच्यावर गोळीबार आणि आत्मघाती स्फोटाचा हल्ला झाला. त्यांचा मृत्यू झाला; या हल्ल्यात आणखी अनेक लोक मारले गेले. या घटनेने पाकिस्तानच्या राजकारणाला पुन्हा एकदा हिंसक वळण दिले.

बेनझीर भुत्तो यांच्या हत्येची चौकशी करताना संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाने 2010 मध्ये अत्यंत गंभीर निष्कर्ष नोंदवले. पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी त्यांना पुरेसे संरक्षण देण्यात हयगय केली आणि हत्येनंतर घटनास्थळ हाताळण्यात व तपासात गंभीर त्रुटी राहिल्या; ह्या उणिवा हेतुतः ठेवण्यात आल्या असाव्यात असेही अहवालात नमूद करण्यात आले. मात्र हत्येचा अंतिम सूत्रधार निश्चित करण्याचे काम ह्यावेळी देखील पार पडले नाही. बहुतांश लोकांच्या मते हे काम लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या सांगण्यावरूनच केले गेले. 

2017 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने, ह्या प्रकरणातील पाच संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आणि माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना फरार घोषित केले. घटनास्थळावरील हाताळणी आणि तपासातील निष्काळजीपणासाठी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे बेनझीर यांच्या हत्येच्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली; पण हत्येमागील कारस्थान आणि  सूत्रधार यांचे वास्तव समोर आलेच नाही. मुशर्रफ यांचा मृत्यू 2023 मध्ये दुबईत झाला. त्यांच्या मृत्यूची नेमकी चिकित्सा होऊ शकली नाही, अखेरच्या काळात त्यांची शारीरिक स्थिती संशयास्पद रित्या ढासळत गेली होती हे विशेष आहे.

पाकिस्तानी सत्तालालसेच्या साठमारीच्या दीर्घ इतिहासाच्या वर्तमान टप्प्यावर इम्रान खान यांचे नाव येते. एके काळचे गाजलेले क्रिकेटपटू इम्रान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यांच्या राजकारणाचा प्रवास पाकिस्तानच्या पारंपरिक सत्ताकेंद्रांशी संघर्षातून गेला. एप्रिल 2022 मध्ये संसदेतील अविश्वास ठरावानंतर त्यांचे सरकार सत्तेतून गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करून सरकारविरोधी आंदोलन सुरू केले. 3 नोव्हेंबर 2022 रोजी वझीराबाद येथे त्यांच्या पक्षाच्या मोर्चावर गोळीबार झाला. इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली; त्यांच्या पक्षातील एक कार्यकर्ता मारला गेला आणि अनेक जण जखमी झाले. पक्षाने या हल्ल्याला स्पष्टपणे इम्रान यांच्या हत्येचा प्रयत्न म्हटलेलं.

हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी तत्कालीन पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर हल्ल्यात सहभागी असल्याचे आरोप केले. संबंधित व्यक्तींनी हे आरोप नाकारले. हल्ल्याच्या प्रकरणात प्रत्यक्ष गोळीबार करणारा मुहम्मद नदीम पकडला गेला. एप्रिल 2025 मध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला या हल्ल्यातील हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ह्या हल्ल्यामागचे सुपीक डोके कुणाचे होते हे कधीही समजू शकले नाही.

इम्रान खान यांच्या कहाणीचा आणखी एक भाग म्हणजे त्यांची अटक आणि तुरुंगवास. ५ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना अटक करण्यात आली; त्यानंतर भ्रष्टाचारासह विविध प्रकरणांत त्यांच्याविरुद्ध खटले भरले गेले. त्यात कथित दोषसिद्धी झाली. इम्रान खान यांनी आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने हे खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. तुरुंगात असताना उजव्या डोळ्याची दृष्टी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे सांगितले गेले. दिवसागणिक त्यांचे आरोग्य ढासळत आहे, असे त्यांच्या बहिणी सातत्याने सांगत आहेत. 

यंदाच्या ऑक्टोबरमध्येच, त्यांच्या पक्षाच्या प्रभावाखालील खैबर पख्तूनख्वा प्रांतात, पाकिस्तानच्या केंद्रातील सद्यकालीन सरकारने आणीबाणी लागू करून प्रांतीय सरकारचे अधिकार स्थगित केलेत. सरकारने त्यामागे वाढती दहशतवादी हिंसा आणि सुरक्षा व्यवस्थेतील अपयश कारणीभूत असल्याचे सांगितले; इम्रान यांच्या पक्षाने आकांडतांडव करुनही फायदा झाला नाही. इम्रान यांची तुरुंगात हत्या केली जाऊ शकते अथवा त्यांचा मृत्यू व्हावा ह्यासाठी व्यवस्था काम करत आहे असे त्यांचे कुटुंबिय सांगतात!

आजवरच्या ह्या रक्तरंजित सत्ता इतिहासाचे सत्य कधी बाहेर येईल हे कुणीच सांगू शकत नाही. औरंगजेबाचा  सत्तेसाठी गळे घोटण्याचा वारसा पाकिस्तानी राजकारण्यांनी यशस्वी रित्या चालवला अन लियाकत अली खान हे या वर्तुळाचे शीर्षबिंदू ठरले. आगामी कालखंडात सत्तातूर मृत्यूचे वर्तुळ कधी आणि कसे पूर्ण होत जाईल हे कुणीच सांगू शकत नाही!

आज लियाकत अलींच्या खूनाला 75 वर्षे पूर्ण होतायत. रक्तरंजित सत्तालालसेचे पाकिस्तानी व्हर्जन अद्यापही कार्यरत आहे!  

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget