चंद्रकांतदादा पाटील.. राज्याच्या राजकीय पटलावरील मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व.. कोल्हापुरातून मुंबईत गेलेल्या एका गिरणी कामगाराच्या मुलाने कोणतेही राजकीय बाळकडू किंवा कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही राज्याच्या राजकारणात मारलेली मजल निश्चितच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक रोडमॅप ठरावा, अशीच आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या चंद्रकांत पाटील यांचे आज ज्यांच्या हातात भाजप पूर्णत: सामावला आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे अनेक दशकांचे संबंध आहेत. अमित शाह यांची सासूरवाडी कोल्हापूर असल्याने आणि चंद्रकांत पाटील सुद्धा मूळचे कोल्हापूरचे असल्याने दोघांमधील स्नेहाचे संबंधही सर्वश्रुत आहेत.

  
भाजपची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे तसेच आयुष्यातील उमेदीच्या काळापासून ते आज पक्षाला सोन्याचे दिवस आणून देणाऱ्यांमध्ये राज्यातील हाताच्या बोटावरील मोजक्या नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश होतो, तेच चंद्रकांत पाटील आयुष्याच्या साठीमध्ये उत्तुंग राजकीय यशाने कारकीर्द गाजवण्याऐवजी सलग वादग्रस्त वक्तव्ये करुन स्वत:चे कारण नसताना हसे करुन घेत आहेत का? अशी शंका येऊ लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी 1980 च्या दशकात अभाविपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी प्रचारक म्हणूनही काम केले. ते 13 वर्ष संघाचे प्रचारक होते. त्यांना संघाकडून पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्येही ते सक्रिय होते. 2005 मध्ये त्यांना मातृशाखेतील कामाचे बक्षीस मिळून भाजपत संधी मिळाली. त्यांनी दोनवेळा पुणे पदवीधरमधून नेतृत्व केले. त्यानंतर त्यांना 2014 मध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर 2019 मध्येही त्यांना संधी मिळाली होती. त्यांनी एकवेळा मुख्यमंत्रिपदाची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. मात्र, याच वक्तव्यामुळे भाजपमध्ये त्यांना विरोधक निर्माण झाले का? अशीही चर्चा आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही त्यांना शिवसेनेकडील खाते देण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडून तातडीने काढून घेण्यात आले. यावरुन भाजपमध्येही त्यांच्याविरोधात अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करत असल्याचे दिसून येते.


वादग्रस्त विधान आणि वाद समीकरण थांबेना 


गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या दीड वर्षांपासून चंद्रकांतदादांचे वादग्रस्त वक्तव्य आणि वाद समीकरण होत गेले आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करुन भाजपने विरोधकांना नेस्तनाबूत करुन टाकले, तोच सोशल मीडिया चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही उलटला आहे. कोणताही सारासार विचार न करता, त्याचे पडसाद काय उमटतील? याचा विचार न करता त्यांच्या तोंडातून राज्याची अस्मिता असणारे महापुरुष सुटले नाहीत. आता त्यांनी बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता असे म्हणत बाळासाहेब ठाकरेंनाच लक्ष्य केल्याने अत्यंत स्नेहाचे संबंध असलेल्या थेट अमित शाह यांचीही नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी सुद्धा त्यांच्यापासून अंतर राखले. 


चंद्रकांत पाटलांकडून वादाची माळ  


चंद्रकांतदादा यांच्याकडून सातत्याने अत्यंत वादग्रस्त वक्तव्ये झाली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवरील वक्तव्याने चंद्रकांत पाटील अडचणीत आले. फक्त अडचणीत न येता त्यांच्या तोंडावर पुण्यात शाईफेकही झाली. शाईफेक झाल्यानंतर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या पत्रकारालाच लक्ष्य केल्याने चंद्रकांत पाटील आणखी अडचणीत आले. त्यानंतर पोलिसांचे निलंबन आणि पत्रकारावरील कारवाई मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. शेवटी त्यांना माफी मागून वादावर पडदा टाकावा लागला.  


महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये करून चंद्रकांत पाटील यांनी कोणताही धडा न घेता त्यांनी सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवरही कधी एकेरी, तर कधी वादग्रस्त वक्तव्ये करत त्यांनी स्वत:ला आणखी अडचणीत आणून ठेवले आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊत, नाना पटोले, रविंद्र धंगेकर यांच्यावरील टीकेने त्यांना बॅकफूटवर जावं लागलं आहे.  


शिवाजी महाराजांनी हिंदूची व्होटबँक तयार केली  


चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला, असे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष असताना वाद ओढवून घेतला. वादग्रस्त व्यक्तव्याचे समर्थन करताना मी शिवरायांबद्दल बोललो त्यामध्ये चुकीचे नाही. त्यांनी व्होटबँक तयार केली म्हणजे ईव्हीएम मशीन घेऊन केली असा होत नाही, तर त्यांनी हिंदू जनमत संघटित केले. मावळ्यांना देश, देव आणि धर्मासाठी जगायला शिकवले. हिंदूंना संरक्षण दिले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे, असे चंद्रकांत पाटील बोलून गेले. मात्र, शिवरायांनी अठरापगड जातींच्या धर्माच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, याचाच त्यांना विसर पडला.  


कोणताही देव आणि महापुरुष बॅचलर नव्हते  


महापुरुषांवर केलेल्या टीकेनंतर लक्ष्य होऊनही चंद्रकांत पाटील यांनी देवतांवर वादग्रस्त वक्तव्य केले. कोणताही देव आणि महापुरुष बॅचलर नव्हते, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वाद ओढवून घेतला. मात्र, त्यांच्या सुदैवाने वाद वाढला नाही.  


शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली  


चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शाळा सुरु करण्यासाठी सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असे थेट वक्तव्य करुन कारण नसताना वाद ओढवून घेतला. प्रचंड वाद झाल्याने माझ्या भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार असल्याचे सांगितले.  


हू इज धंगेकर? ते महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील


राजकारणात टीका होतच असते. मात्र, ती करत असताना कोणाची उपमर्द होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातून येत असतानाही कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना कमी लेखण्याची चूक केली. एका सभेत त्यांनी कोण धंगेकर? who is dhangekar अशी थेट इंग्रजीतून विचारणा केली. यानंतर धंगेकर यांनी पोटनिवडणूक जिंकल्यानंतर this is dhangekar म्हणून उत्तर देण्यात आले. याच प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, असे वक्तव्य केले होते.  


नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि चर्चा कर


भीक वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका झाली. मात्र, नाना पटोलेंच्या टीकेला उत्तर देताना पुन्हा चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती. नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि चर्चा कर असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा थेट एकेरी उल्लेख केला.  


सुप्रिया सुळे तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा


चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून खासदार सुप्रिया सुळेही सुटल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना, तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे म्हणाले. यावरुनही चंद्रकांतदादा बॅकफूटवर गेले.  


तर राजकारण सोडून हिमालयात जाईन  


मी कोणतीच निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही लढण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असेही वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना दिले होते. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांना त्याच वक्तव्यावरुन ट्रोल व्हावे लागले. विरोधकांकडून आजही त्यांना त्याच वक्तव्याचा संदर्भ देऊन डिवचले जाते.  


चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांचा नेहमीच कलगीतुरा  


खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये युती तुटल्यापासून नेहमीच कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संज्या म्हणत संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतरही दोघांकडून सातत्याने एकमेकांचा उद्धार केला जातो. बाळासाहेबांवरील होणाऱ्या टीकेवरुन त्यांनी संजय राऊत यांनाही लक्ष्य केले. तत्पूर्वी, त्यांनी बाळासाहेब जिवंत असते, तर राऊतांच्या थोबाडीत मारली असती असे वक्तव्य केले होते.