माझी पुण्यातली दैनंदिन उपासना म्हणजे, पहाटे ए टू झेड पेपर वाचायचे आणि आज पुण्यात अमुक कार्यक्रम, तमुक कार्यक्रम वगैरे वगैरेनं दिवसाची सुरुवात व्हायची.
एस. एम. जोशी, भरत नाट्य, ज्योत्स्ना भोळे किंवा अगदी सुदर्शन, टिळक स्मारक, बालगंधर्व, फर्ग्युसनपासून सगळ्या महाविद्यालयात होणारे प्रवेश विनामूल्य असलेले कार्यक्रम पाहण्याचा माझा जसा 'कार्यक्रम' मात्र दररोजचा ठरलेला असायचा.
तसं आई म्हणायची पुण्यातल्या ज्येष्ठ क्लबचा सदस्य हो. कारण बऱ्यापैकी हा सगळा प्रेक्षकवर्ग रिटायर्ड मंडळीचा आणि कधी कधी कार्यक्रमांचे पासेस मिळवायला वृत्तपत्रांच्या ऑफिसमध्ये लागलेल्या या वयोवृद्धांच्या रांगेत मी छाती काढून उभं असायचो. याचं कारण पोरगा किती सज्जन आहे असं रांगेतली मंडळी विचार करत असतील आणि कौतुक करतील असं मला वाटायचं. पण वास्तविक तसं नव्हतं. तो भाग सोडा, कित्येकवेळा शेवटी मी हातात आलेले पास सगळ्यांना वाटून टाकायचो, पुण्यातली व्याख्यानं, गझल-कवितांचे कार्यक्रम, नाटकं सोबत उगाचच नको नको त्या कार्यक्रमांचं कॅलेंडर जणू पाठच झालं होतं.
ब्लॉगची सुरुवात असं करायचं कारण काय असेल? हे आपल्याला शेवटी कळेलच.
मुद्दा असाय की प्रत्येकाची एक शैली असते अन् तीच त्याची किंवा तिची ओळख बनते, तुमचे मुक्त छंद गूढ असतात हीच तुमची ओळख बनतात.
'वसंतोत्सव' पाहणं म्हणजे कंटाळवाणं काम आहे असं वाटायचं. पण धाडस करून कधीतरी पाहायला हवंच ना. एवढी बैठक पुणेकरांची असते तर नक्कीच गेलं पाहिजे, एकदा तरी पाहायला हवं म्हणून गेलोच. मग संगीत मानापमान, कट्यार..., संशयकल्लोळ उत्सवात प्रथमच पाहिलं आणि जाणवलं की हे भन्नाट आणि भारीच आहे. गझलमंचच्या मैफिलीमध्ये भावनांचा ओघ वाहताना जसा पाहायचो. त्याहून वेगळंच तितक्याच ताकदीने उत्सवातलं सादरीकरण इथली ऊर्जा पण खूपच मनाला भावली आणि मग काय. पंडीत वसंतराव देशपांडे यांना त्यानंतर वाचायला घेतलं. त्यानंतर राहुल दादाचा फॅनच झालो. हा सगळा पूर्वार्ध मला सांगावा लागला.. याचं कारण एबीपी माझाच्या सहकाऱ्यांसाठी स्पेशल सिनेमाच्या स्क्रिनिंगचं आयोजन केलेलं होतं.
मी वसंतराव... या सिनेमामधील 22 गाणी, सकाळी उठू... राम राम (अंगाई गीत), वसंतरावांचं भावविश्व उलगडणारं ले चली तक़दीर.., कैवल्यगाण
या सगळ्याच्या मध्ये गुंफलेलं पंडित वसंतराव देशपांडे यांचं वादळी आयुष्य आहे...
पंडित पाहता आले, एक एक सूर हा एक एक दैवत असल्यासाखाच कानी पडत होता, कला की कलाकाराच्या आयुष्याचा आरसा असतो आणि याच आरश्यात डोकवता आलं, सिनेमाबद्दल आणि पंडितांबद्दल लिहायला मी फार लहान समजतो स्वतःला... पण आवडलेलं मात्र नक्की लिहतोय.
चित्रपटात मनात घर केलं म्हणजे आईनं, अर्थात अभिनेत्री अनिता दाते यांनी बाळाला पोटावर बांधून घर सोडनं ते कट्यारच्या प्रयोगाला खुर्चीवर बसणं तो इथवरचा आईचा प्रवास आणि मामाच्या भूमिकेतला अलोक, मग भेटलेले सारंग गुरुजी... मास्टर अमेय, मग बायको कौमुदी सोबत संसाराची गाडी सोबत आणि भाई म्हणजेच पुष्कराज, सोबची 'संहिता' सुद्धा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी त्यांच्या एवढीच गोड यानिमित्ताने सादर केलीय असं मी म्हणेल, कलाकाराच्या आयुष्य असं असतं प्रत्येक गोष्ट मांडताना कानावर पडणारा सूर संगीत तर होतंच शिवाय डोळ्याच्या कडांवर येणाऱ्या पाण्याला भाईंचे विनोद हसवून सोडत होते... छोटं छोटच पण, अनिता दाते यांचा कुंकू लावतानाचा सीन, मास्टर सोबतची तालीम, डबिंग वगेरे... नागपूर ते पुणे मग लाहोर.
सैन्य दलातील नोकरी सोडून सुरू झालेला गायकीचा संघर्ष, किंवा वैभव जोशी यांची शब्दरचना असलेलं 'ललना...' बैठकीची लावणी 'पुनव रातीचा' , अपेक्षित नसलेलं तीनशे रुपयांचं पाकीट, स्वतःच्या कलेवरचा ठाम विश्वास हीच कलाकाराची पुंजी असते, आणि गवसलेला सुरांच्या समाजमान्यतेचा संघर्ष 'पंडित' वसंतराव देशपांडे इथवची देशपांडे घराण्याची गोष्ट जेव्हा वसंतोत्सवात जेव्हा संगीत संशयकल्लोळ केलेलं ते पाहिलेलं ऐकलेलं त्याच वेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि गायक, सिनेमाचं संगीत दिग्दर्शन आणि आता अभिनेता म्हणून राहुल देशपांडे यांची असणारी जोडी सुरांची मैफिल घेऊन येतात की काय अशी चुणूक लागली होतीच,राहुल यांना अलीकडे युट्युब चॅनेलवर खूप ऐकलं, त्यांच्या लेकी सोबत.आता कोरोनानंतर पुन्हा पासेस तिकिटांसाठी करावा लागणार आटापिटा मंत्रमुग्ध करणाऱ्या मैफिली आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितलेल्या पंडित वसंतरावांच्या आठवणी आणि स्पेशल स्क्रिनिंग तेही राहुल देशपांडे आणि निपुण धर्माधिकारी यांच्यासोबत पाहताना मन शेवंतीचं फुल मात्र झालं...
सिनेमा संपताच सगळी सहकारी मंडळी निशब्द झालेली... एकदम शांत खरंच दाटून कंठ आले होते... मला 'सिनेमा, चित्रपट' हा उल्लेख करायचाच नाहीये कारण, गायक राहुल देशपांडेंचं आजोबा-नातवाचं एवढं प्रेम, हा पंडित वसंतरावांचा आयुष्यपट आणि आजवरची केलेली वसंतोत्सवाची पारायणं...
सिनेमाची गोष्ट यांची सांगड याचसाठी की, मामा, सुका मेवा, जिलेबी, मस्त झालेले लाडू,गच्चीवरच्या मैफिली आणि Casual Leave सोबत 'मी वसंतराव' ही कट्यार मात्र काळजात घुसलीय...