Continues below advertisement

पुण्यात माझ्या काही मैत्रिणी आहेत. नुकत्याच तिशी पार केलेल्या. अजूनही सिंगल. अलिकडेच आम्ही डेटींग, वन नाईट स्टँड आणि विवाहबाह्य संबंधांवर खुप मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या अजुनही सिंगल कश्या? हा माझा प्रश्न होता. एकीनं डेटींग एप ट्राय केलंय. दुसरी ट्रेडिशनल पध्दतीनं ट्राय करतेय. पण दोघींना हवा तसा जोडीदार सापडला नाही. हे फक्त मुलींच्या बाबतीत नव्हे तर तिशी-पत्तीशी पार केलेले माझे काही मित्र अजूनही सिंगल आहेत. त्यांना ही हवी तशी किंवा प्रेमात पडण्याजोगी मुलगी सापडली नाही. इथं मला दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे मधला राज म्हणजेच शाहरुख खानचा डायलॉग आठवला. ‘अफेअर्स तो बहोत हुए है, लेकीन प्यार नही हुआ’. आपण सर्व प्यार, प्रेम, लव, मोहब्बत म्हणजे नक्की काय शोधतोय? आणि ते मिळणार कधी? म्हणूनच मग सेलीन साँगच्या मटेरियलिस्टीक (२०२५) सिनेमातला डायलॉग विचार करायला लावतो. यातली मॅचमेकर नायिका लुसी (डकोता जॅक्सन) म्हणते ‘ मी नेहमी जगात पहिल्यांदा लग्न केलेल्या स्त्री-पुरुषाचा विचार करते. हे दोघे शिकार करताना, एकत्र फिरताना प्रेमात पडले असतील. ते असं काय असेल ज्याने त्यांना ‘मेड फॉर इच अदर’ अर्थात ‘परफेक्ट कपल’ बनवलं असेल. समान आर्थिक स्थिती? समान राजकीय मतं? एकमेकांना सुसंगत असणं? समान भवताल, वातावरण? किंवा मग यापेक्षावरआणखी काही तरी वेगळं? नक्की काय? 

हे काही तरी वेगळं हवंय याचा शोध कधी थांबेल? आज त्याचं उत्तर आपल्यापैकी कुणाकडेच नाही. पास्ट लाईव्ह (२०२३) मध्ये सेलीन साँगनं बालपणी हरवलेलं  व्यक्त-अव्यक्त प्रेम करणाऱ्या दोघांची गोष्टी सांगितली होती. आता ती मटेरियालिस्ट्स (२०२५) सिनेमात यू यॉर्क शहरात मॅचमेकींग कंपनीत काम करणाऱ्या लुसी (डकोता जॅक्सन), तिचा जुना बॉयफ्रेंड  जॉन (क्रिस इवान्स) आणि नवा आताचा बॉयफ्रेंड हॅरी (पेद्रो पास्कल) या तिघांची गोष्ट घेऊन आलेय. त्याचं नाव ही तेव्हढं समर्पक आहे. मटेरियलिस्ट (२०२५).  उपभोक्तावादी, सर्व काही पडताळून पाहून भोगणारे. ही महानगरी मानसिकता आहे  आपल्या मॅचमेकींग बिझनेसची तिची व्याख्या भारी आहे. ती म्हणते आम्ही बॉडी विकतो, उंच, गोरा, हँडसम, मग त्याची पत पाहतो, म्हणजे किती कमवतो, मग त्याचे सोशल स्टेटस, तो तोडीचा आहे की नाही ते पाहतो. मग पुढे त्याचं कुटुंब, समाज असं बरंच काही येतं. शवागार किंवा इन्शोरेन्स कंपनीमध्ये काम केल्यासारखं वाटतं. मॅचमेकींग किंवा डेटींग हे असंच असतं. 

Continues below advertisement

लुसी स्वतःलाही मटेरियलिस्ट मानते. ती एक्टींग करायला न्यू यॉर्क शहरात आली होती, एक्टर बॉयफ्रेंड नेहमी पैशाची गणितं लावत बसायचा, म्हणून त्याला सोडलं. आता तिलाही पैसेवाला, सिक्स फ़ीट, हँडसम हंक हवाय. एका सक्सेसफुल मॅचमेंकींगच्यावेळी तिला हॅरी सापडतो. तो तिला हवा तसा आहे. म्हणजे पहिल्यांदा ते वन नाईट स्टँडसाठी त्याच्या घरी जातात तेव्हा लुसी त्याच्या पॉश घराच्या प्रेमात जास्त पडते. लव्ह मेकींग सुरु असताना तिला घरातल्या महागड्या वस्तू आकर्षित करत असतात. अशा या मटेरियलिस्ट लुसीचा जुना बॉयफ्रेंड ही त्या लग्नात भेटतो. मग आता लुसी कुणाची निवड करेल याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. आजच्या शहरातली घडणारी-बिघडणारी नाती मटेरियलिस्ट (२०२५) सिनेमात आहेत. मला जे आवडलं ते म्हणजे एकूण डेटींग उद्योगाची कार्यपध्दती. 

शहरात राहणाऱ्या लोकांना तिशीनंतर आपण सेटल व्हावं असं वाटायला लागतं. तोवर त्यांनी एखाद दोन अफेअर्स केलेले असतात. व्हाईब मॅच झाले तरी जे आयुष्यभर टिकेल याचा शोध सुरुच राहतो, शेवटी ४० येते आणि तरीही ते एकटेच असतात. योग्य जोडीदाराच्या शोधात. डेटींग आणि वन नाईट सँड पलिकडे प्रत्येकाला एका सिक्युरिटी आणि कमीटमेंट हवी असते. ही कमीटमेंट सध्या खुप महागडी गोष्ट झालेय. वाढत्या वयानुसार काही मानसिक आजार ही सुरु होतात. एकटंपण वाढत जातं. शहरातलं गर्दीतलं एकटपण टाळण्यासाठी मग पार्टी, पबमध्ये जाणं होतं. तरीही हे एकटंपण आणि पार्टनरचा शोध वन नाईट स्टँडच्या पुढे जात  नाही. असे सांगणारे अनेकजण आसपास भेटतात. म्हणजे आपल्याला आयुष्यभर टिकेल असं प्रेम हवंय म्हणजे नक्की काय हेच अनेकांना माहित नसतं. वाढत्या शहरातली नाती बिघडलेली आहेत. याचे हे प्रतिक आहेत. समाजाचा विचार करुन लग्न केलं तर त्यातूनही अनेकदा निराशाच मिळते. मग विवाहेतर संबंधांकडे जाताना दिसतात. शोध काय संपत नाही. आता नाती ही विकत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यातही उपभोक्तावाद आलाय. लुसी तिचा निर्णय नक्की कसा घेईल याची उत्सुकता सिनेमात सतत कायम राहते.   

नात्यातला उपभोक्तावाद ही काय नवी कल्पना नाही. बासु भट्टाचार्य यांच्या गृहप्रवेश (१९७९) आणि आस्था (१९९७) सिनेमात तो आधीच येऊन गेलाय. आस्था सिनेमात तर बाजारवाद आणि त्याचे वैयक्तिक खासकरुन पती-पत्नी संबंधावर होणारे परिणाम याचं चित्रण आहे. शोधाची ही प्रक्रिया तेव्हापासून सुरु होती आणि ती तशीच पुढे राहिल हे सत्य नाकारता येणार नाही. म्हणूनच मटेरियलिस्टीक्स हा आजच्यासाठी महत्त्वाचा सिनेमा ठरतो.