Marathwada Liberation Day: देश स्वतंत्र झाल्यानंतर खूप उशिरा मराठवाड्याला निजामशाहीच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाले. या काळात मराठवाड्यातील जनतेने अन्याय, दडपशाही आणि विषमता भोगली. स्वातंत्र्यानंतरही प्रश्न संपले नाहीत. उलट जीवनावश्यक गरजांसाठी आणि प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याचे पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबई या शहरांकडे स्थलांतर झाले.

Continues below advertisement

स्थलांतराची दोन प्रमुख कारणे होती.शिक्षण आणि रोजगार. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज लक्षणीय प्रमाणात मराठवाड्याचे लोक वास्तव्यास आहेत. अभिमानास्पद बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे.हेवा वाटावी अशी बाब आहे.

विशेषतः शिक्षणात 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी मराठवाड्यातूनच पुण्यात येतात. “शिक्षणाशिवाय प्रगती नाही” हे त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे ते मोठ्या हिंमतीने, कौटुंबिक व नैसर्गिक अडचणी झेलत पुढे सरसावत आहेत.अनेकजण महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असून, मराठवाड्याचे वैभव उजळवत आहेत. पण दुसरीकडे चिंता वाढवणारी बाजूही तितकीच गंभीर आहे. समाजातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून ती चिंताजनक बनली आहे.आरक्षणांचे प्रश्न ऐरणीवर आहे.अजूनही शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी मराठवाड्यातून स्थलांतर का करावे लागते..! काही जिल्ह्यांची नावे जरी काढली तरी साशंकतेने लोक पाहतात, ही वस्तुस्थिती सद्याची वेदनादायी आहे.

Continues below advertisement

खरं तर मराठवाड्याचे लोक कधीही संकुचित व प्रांतिक भूमिका घेत नाहीत, हे त्यांचे वेगळेपण जपलेले आहे. पण वास्तवाचा विचार केला तर इतर प्रादेशिक भागांच्या तुलनेत मराठवाड्याचे प्रश्न अधिक दाहक व तीव्र भासतात. यामागे अनेक कंगोरे आहेत.राजकीय उदासीनता, प्रशासकीय दुर्लक्ष, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधींचा अभाव. आजही मराठवाड्यात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कॅम्पस अपुरे आहेत. रोजगाराच्या संधी नाहीत. आरोग्यासाठी मोठ्या शहरांचा रस्ता धरावा लागतो. तरुणाईसमोर “कार्यकर्ता” ही एकमेव ओळख उरली आहे. कारण कार्यकर्त्यासाठी येथे सुपीक जमीन आहे. मात्र पुढे काय? कार्यकर्त्याच्या पलीकडे भविष्य कुठे आहे?

जर हीच स्थिती कायम राहिली, तर पुढील दहा वर्षांत 70 टक्के मराठवाडा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होईल, ही भाकितवाणी अतिशयोक्ती वाटली. तरी पूर्णतः अशक्य नाही. मराठवाडा रिकामा होत चाललेला असेल, तर तिथे आणि येथेही राहणाऱ्यांच्या भविष्याचे काय? प्रश्न गंभीर आहेत, उत्तरं मात्र शोधली जात नाहीत. “सध्या तरी जे चाललंय ते बरंय” या मानसिकतेत आपण सुख मानतोय की “कधीतरी काहीतरी बदलेल” या अपेक्षेवर जगतोय? हा विचारच अधिक अस्वस्थ करणारा आहे. म्हणूनच मराठवाड्याची चिंता आणि चिंतन ही केवळ चर्चा न राहता ती कृतीत उतरली पाहिजे. अन्यथा स्थलांतरित मराठवाड्याची वेदना आणि रिकामं होत चाललेली गावे ही आपल्या समोर गंभीर वास्तव म्हणून उभी राहतील.

- अँड. कुलदीप आंबेकरसंस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स