माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्या खोऱ्यातील शिळा


या शब्दांत कवी कुसुमाग्रज मराठीचं वर्णन करतात... कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिवस' म्हणून साजरा करतो.


कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातला. 27 फेब्रुवारी 1912. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचं नाव विष्णु वामन शिरवाडकर असं बदललं. मराठीतले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार. त्यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपन नावाने काव्यलेखन केलं.


कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. एकुलती बहीण सर्वांची लाडकी असल्यामुळे कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' या टोपन नावाने त्यांनी लिखान केले. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे 'कुसुमाग्रज' हे दुसरे साहित्यिक. 1987 साली कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. जागतिक मराठी अकादमीने कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले.


पूर्वी एक बातमी करताना प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा प्रसंग सांगितलेला, 'जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली तेव्हा मराठी भाषा दिवस वेगळा साजरा व्हावा, अशी मागणी तेव्हाचे अध्यक्ष माधव गडकरी यांनी शासनाकडे केली. कारण तोपर्यंत 1 मे हा 'कामगर दिवस', 'मराठी भाषा दिवस' आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्याने 'महाराष्ट्र दिन' म्हणूनही साजरा व्हायचा. पण तेव्हा शासनाकडून काही परवानगी मिळाली नाही.


मग 1996 मध्ये माधव गडकरींनी मुंबईमधून वेगवेगळे साहित्यिक शाळा, कॉलेजांमध्ये पाठवायला सुरवात केली. त्यांना सांगितलं, तुम्ही विद्यार्थ्यांशी बोला, साहित्यासंदर्भात बोला, कवितेवर बोला आणि त्यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवस निवडलेला. अशा पद्धतीने जागतिक मराठी अकादमीने कुसुमाग्रज हयात असतानाच 27 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ लागलं.' मराठी साहित्य, संस्कृतीमध्ये कुसुमाग्रजांचं खूप मोठं योगदान आहे. कुसुमाग्रज हे साहित्य क्षेत्रातलं एक लखलखतं नाव आहे. त्यांचं नाव एका तार्‍यालाही दिलं गेलंय.


'कुसुमाग्रज तारा'... त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी दिन यांना पुन्हा एकदा नवी झळाळी मिळाली.


माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात,
संतांच्या शब्दात… इतिहासाच्या पानात


आपली मराठी खोलवर रुजलेली आहे. भारतातल्या 22 मुख्य भाषांमधली मराठी ही एक भाषा. आपण बोलतो, लिहितो त्याहूनही वेगवेगळ्या रुपातही मराठी आढळते. भागागणिक मराठीचा हेल बदलतो. मग पश्चिम महाराष्ट्रात वेगळी, विदर्भ/मराठवाड्यात वेगळी, मुंबईत बऱ्यापैकी शुद्ध आणि पुणे... तिथे काय उणे. म्हणी, वाक्यप्रचार तर एकावर एक वरचढ. कोणाचं कौतुक करण्यापासून टोमणे मारण्यापर्यंत. एकेक परिस्थिती एका वाक्यात स्पष्ट करता येते. वर्णन करता येतं. काना, मात्रा, अनुस्वार, वेलांटी सौंदर्याने नटलेली आहे आपली मराठी.


पण नावापुरता राजभाषेचा दर्जा मिरवणारी मराठी मंत्रालयाच्या दारात राजमुकुट घालून परंतु अंगावर लक्तरे लेऊन उभी आहे अशी चिंता खुद्द कुसुमाग्रजांनीच जागतिक मराठी परिषदेत बोलताना व्यक्त केली होती.


माझी मराठीची बोलु कौतुके।
परि अमृताते ही पैजा जिंके।


आम्हाला आमच्या मराठीचं खूप कौतुक...
आणि जागतिक मराठी दिवस आला की कार्यकार्ते मराठीच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून येतं. मग महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठीतच बोलायला हवं हा दबाव परकियांवरही टाकला जातो. नुकताच घडलेला एक किस्सा. आरपीएफ अधिकाऱ्याने मराठीमध्ये बोलायला नकार दिला म्हणून त्याला 'मराठीप्रेमी पक्षा'च्या कार्यकर्त्यांनी फटकावलं. पण त्यांना हा अधिकार कोणी दिला?


आपल्यापैकी किती जण बाजारात जाऊन मराठीला प्राधान्य देतात??? आपसुकच भाजीवाल्यांना विचारलं जातं. भैया ये सब्जी कितने को दिया??? भाजीवाला देतो मराठीतच उत्तर... ताई 25 रुपये पाव. कितीतरी वेळा अनुभवलंय हे.


भाषाही अशी गोष्ट नाही की जी जतन करायला लागावी. भाषा ही वृद्धिंगत करायला हवी आणि त्यासाठी ती नेहमीच्या व्यवहारात हवी, वापरात असायला हवी. मग ती बँकेत गेल्यावर असो, बाजारात गेल्यावर असो की कस्टमर केअरशी बोलताना असो. उठता बसता तिचा वापर हवा. ती आपली मातृभाषा आहे. आणि मातृभाषेचा आग्रह धरणं महत्वाचं आहे. याच गोष्टी आपल्या मातृभाषेला वृद्धिंगत करतील.


जोपर्यंत तुम्ही सुरुवात नाही करणार तोपर्यंत बदल नाही होणार. प्रत्येक बदलाची सुरुवात स्वतःपासून होते.
सुरुवातच होते शाळेपासून...
मुलांना शाळेत घालताना प्राधान्य दिलं जातं हे इंग्रजी शाळेला. माझा मुलगा/मुलगी सरकारी शाळेत जाते हे कितीजण अभिमानाने सांगतात? इंग्रजी शाळेची एक उंची आहे... वजन आहे समाजात...असा समज आहे आणि त्यावरुन आपण शिक्षणाची गुणवत्ता ठरवतो. अ आ इ ई च्या आधी ए बी सी डी शिकवली जाते. घरी मुलं मम्मी-पप्पा, मॉम - डॅड म्हणतात. पण आई-बाबा म्हणण्यातला गोडवा वेगळा. आपण या गोडव्याला दूर करुन ऐकायला भारी म्हणून मम्मी – पप्पा म्हणायला शिकवतो.


आपल्या बोलण्यातच बघा ना... प्रत्येक वाक्यात किमान एक तरी इंग्रजी शब्द येतोच. मराठी आणि इंग्रजीची आपण भेळ करतो. (हे लिहीतानाही काही शब्द जे इंग्रजीत सुचत होते... त्यांना आवर्जुन मराठीत लिहायचा प्रयत्न केलाय.) मराठीमध्ये, आपल्या बोलीभाषेमध्य खूप सुंदर शब्द आहेत. जे आपण विसरत चाललोय. यात महत्त्वाची भुमिका आहे वाचनाची. तेच कुठेतरी कमी झालंय. हे मोबाईल किंवा इंटरनेटमुळे होतंय असं मी म्हणणार नाही. पण पुस्तकं वाचण्यापेक्षा एखादी सिरीज बघितली जाते. आणि आता सोशल प्लॅटफॉर्म इतके उपलब्ध झालेत, त्यातले काहीतर फ्री असल्यामुळे पुस्तकांकडे दुर्लक्षच.


ई-बुक ही आहेतच की. पण हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजाच वेगळी. पान पलटण्याची मजा स्क्रोल करण्यात नाही, सिरीजची नावं जितक्या पटापट सांगितली जातील तितक्या तत्परतेनं मराठीतले अनेक कवी, लेखक हे आता किती जण सांगू शकतात नाही माहिती. पण या लोकांनीच आपल्या मातृभाषेला मोठं केलंय. यांनी आपल्यासाठी लिखान स्वरूपात साहित्य जपून ठेवलंय भाषा जपलीए. आणि येणाऱ्या काळातही जर मातृभाषेला जपायचं असेल तर त्यासाठीचे प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत. त्यासाठी मराठीची ओढ हवी. मराठीवर प्रेम हवं.


मराठीची परंपरा खूप समृद्ध आहे. तिला जपायला हवं. नाहीतर आपण हे जे काही 'दिन' साजरे करतो ते 'दीन' व्हायला जास्त वेळ नाही लागणार.