आज 27 फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा दिन.. त्यानिमित्ताने आज राज्यभर मराठी भाषेचा गौरव करण्यात आला ज्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो त्या कुसुमाग्रजांच्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकरांच्या साहित्याचा आणि त्यातही मुख्यत्वे त्यांच्यातील कवीचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.

मराठी भाषेला दिलेल्या चिरंतन आणि अफाट देणगीमुळे आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. पण असं जरी असलं तरी कुसुमाग्रजांच्या दृष्टीने मराठी भाषा खरोखर दीन होती. मराठी भाषेचं वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात की 'मराठी भाषेची अवस्था म्हणजे डोक्यावर राजमुकुट आणि अंगात फाटके कपडे अशी आहे.' तिला मातृभाषेचा दर्जा आहे पण मान नाही. कुसुमाग्रजांनी तेव्हा केलेलं हे वर्णन आजही तंतोतंत लागू पडतं हे दुर्दैव आहे... असो

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांना गुरुस्थानी मानलं होत. त्यांच्या टोपणनाव ठेवण्याच्या शैलीवरूनच त्यांनीही आपलं नाव कुसुमाग्रज अर्थात त्यांच्या लहान बहिणीचा कुसुमचा मोठा भाऊ या अर्थाने ठेवलं होतं. पण गुरुचं अशापद्धतीने अनुकरण करत असताना ते अंधानुकरण होणार नाही याचीही काळजी कुसुमाग्रजांनी घेतलेली. गडकरींच्या लिखाणात अतिशयोक्ती असते किंवा ते शब्दबंबाळ लिहितात असा त्यांच्यावर अनेकदा आरोप करण्यात आला. पण कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आजतागायत असा आक्षेप कोणी घेतलेला नाही.

मराठी साहित्यात जरी गडकरी त्यांचे गुरु असले तरी जागतिक साहित्यात शेक्सपिअर त्यांचा आदर्श होता. त्याच्या नाटकातील शोकात्म नायकांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. या प्रभावाची प्रचिती आपल्याला त्यांच्या 'नटसम्राट' या नाटकातून येते. पण असं जरी असलं तरी कुसुमाग्रजांच्या कविता आणि नाटकातील व्यक्तिरेखा या जीवनातील अमंगलाला नष्ट करून सत्याचा, मांगल्याचा आणि शिवत्वाचा शोध घेणाऱ्या आणि आशावादी आहेत.

कुसुमाग्रजांचे जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पण कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अविष्कार प्रकर्षाने प्रकट झाला तो त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातून. त्यातील कवितांच्या मोहिनीने एक अक्खी पिढी भारून, थरारून उठलेली पाहायला मिळते. जीवनाविषयीचा व्यापक आणि परिपक्व दृष्टिकोन हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा स्थायी भाव होता.

माणसाच्या आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. पण अशा संघर्षमय काळात मनाला उभारी देणारी, संकटावर मात करण्याची प्रेरणा देणारी कुसुमाग्रजांची कविता म्हणजे 'कणा'. राखेतून भरारी घेणारा फिनिक्स पक्षी प्रत्येकाच्याच मनात दडलेला असतो. फक्त त्याच्या पंखांना बळ देण्यासाठी कोणाचातरी आश्वासक शब्द हवा असतो, आणि म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा... पाठीवरती हात ठेऊन सर फक्त लढा म्हणा'

कुसुमाग्रजांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे. त्यांचा हाच सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला त्यांच्या 'समिधाच सख्या या' या कवितेतून आपल्याला दिसतो. जीवनरस संपून गेलेली, कोरड, शुष्क लाकडाची काष्ठ देखील आत आग घेऊन जगत असतात. ज्यांच्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही.. अग्नीही प्रज्वलित होत नाही.

कॉलेज जीवन सुरु झाल्यावर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो की 'ये प्यार होता क्या है, ते नेमकं व्यक्त कसं करायच?' आणि आपल्या याच प्रश्नांच कुसुमाग्रज किती छान उत्तर देतात पहा.. ते म्हणतात 'प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं आणि मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं' आणि याच लौकिक प्रेमातून अलौकिक प्रेमाकडे जाताना कुसुमाग्रज मेघांना छेदून आकाशात जातात आणि आकाशातून थेट अवकाशात जात पृथ्वी आणि सूर्याचं प्रेम ही रंगवतात पण केवळ या प्रेमाच्या कवीकल्पनांमध्ये न रमता ते आजच्या पिढीला त्या पृथ्वीच्या प्रेमातली एकनिष्ठता दाखवतात... आणि मग त्यांच्या लेखणीतून अजरामर काव्यपंक्ती जन्म घेतात.. 'परि भव्य ते तेज पाहून पुजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे? नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता, त्याहूनी साहवे'

पण कुसुमाग्रज केवळ प्रेम, शृंगार, आशावाद यातच रमले का तर नाही. त्यांचा काळ हा स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच काळ होता. इंग्रजांच्या अत्याचाराचा वरवंटा संपूर्ण देशभर फिरत होता. इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाने संपूर्ण भारत पेटून उठला होता. जनमानसाच हे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून नाही उमटलं तर नवल.. त्यांच्या अहि-नकुल या कवितेत अहि म्हणजे साप हे उन्मत्त इंग्रज सरकारचं प्रतीक आहे तर नकुल म्हणजे त्यांना नेस्तनाबूत करणाऱ्या, त्यांचा वध करणाऱ्या क्रांतिकारांचं प्रतीक आहे. अशाच आशयाची कुसुमाग्रजांची कविता म्हणजे 'आगगाडी आणि जमीन' ज्यात आगगाडी हे शोषकांचं प्रतीक आहे तर जमीन हे शोषितांच प्रतीक आहे. जमिनीवर अत्याचार करणाऱ्या आगगाडीला जमीन विनवतेय 'नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन, धावसी वेगात मजेत वरून, आणिक खाली मी चालले चुरून' तर याच जमिनीला आगगाडी उद्दामपणे सांगतेय 'दुर्बळ! अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड? पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन' पण एका क्षणी मात्र या पीडित समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जमिनीच्या शक्तीचा उद्रेक होतो आणि त्याचा परिणाम म्हणजेच 'उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती.' शोषितांच्या या शक्तीचा हा उद्रेक कुसुमाग्रजांनी पाहिला, अनुभवला... शोषकांच्या या शोषणचक्राला भेदून त्यांची सत्ता उलथवून टाकता येते हे त्यांनी समाजाला दाखवलं. आणि याच क्रांतीसाठी प्रेरित करणार, क्रांतीचा जयजयकार करणार गीत ही लिहिलं.. 'अन वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार.. गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार'

या क्रांतीगीतांमुळे पेटून उठलेले तरुण ध्येयवेडे होतात आणि त्यांचं हेच ध्येयवेडेपण चितारताना कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकार होते 'स्वप्नांची समाप्ती' सारखी कविता.. पण क्रांतीचा जयजयकार करणारे, शौर्यगीत लिहिणारे कुसुमाग्रज कोमल आणि संवेदनशील मनाचेही होते. त्यांच्या 'लिलाव' किंवा 'जालियनवाला बाग' या कविता त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतात.

कुसुमाग्रज हे स्थंडिल संप्रदायी कवी होते. त्यांना भव्यदिव्यत्वाची ओढ असली तरी त्यांच्या प्रतिभेची मूळ समाजाच्या जमिनीत खोलवर रुजलेली दिसतात. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या कवितेत नाट्यमयता आहे आणि नाटकातील स्वगतांमध्ये काव्य आहे. पण तरीही त्यांच्यातल्या कवीने आणि नाटककाराने कधी एकमेकांवर मात केली नाही. उलट ते हातात हात गुंफून एकत्र चालताना आपल्याला दिसतात.

कुसुमाग्रजांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणं म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेच्या कोंदणात हिरा जडवण्यासारखं आहे. इथे मुद्दामच काव्यप्रतिभा हा शब्द वापरला कारण त्यांना हा पुरस्कार कोणत्याही नाटक किंवा कथेसाठी नाही तर तर त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी मिळाला आहे.

कुसुमाग्रजांच्या कविता आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात. संघर्षकाळात प्रेरणा देतात, अपयशाने निराश झालेल्या मनाला आशेचा किरण दाखवतात, तर विजयाचा उन्माद चढल्यावर जमिनीवरही आणतात. त्यांच्या काव्यात कोमलता आहे, तर कधी नभात तळपणारी वीज आहे, त्यांच्या कवितांमधून आपल्याला कधी लौकिक अलौकिक प्रेमाची व्याप्ती कळते तर कधी समाजाचे भेसूर चित्र बघून मन विषण्ण होतं. प्रत्येक टप्प्यावर कुसुमाग्रज आपल्याला समृद्ध करतात.