Malika Movie Review: मलिकाचा फैसला - कझाकस्तानमधल्या 'तिची' गोष्ट

Malika Movie Review: रशियाच्या विभाजनानंतर आणि आधीही स्थानिक पातळीवर झालेल्या हिंसाचारामुळं इंगुश लोकांनी मातृभूमीतून पलायन केलं. ते कझाकस्तानात आले. आता जवळपास 80 वर्षे हे लोक कझाकस्थानमध्ये राहतायत. संख्येंनं कमी असल्याने आणि मातृभूमीपासून वेगळं राहिल्यानं इंगुश कम्युनिटी एकमेकांना धरुन असते. यातूनच मग त्यांच्या क्लिष्ट पद्धती सुरू झाल्या. या सुन्नी मुस्लिम समाजातल्या महिलांची परिस्थिती थोडी बिकट आहे. तिथं आदतचं पालन केलं जातं. आदत म्हणजे धर्मानं आखून दिलेली नियमावली. यानुसार घरची जबाबदारी कर्त्या पुरुष्याची आहे. तो म्हणेल ती पुर्व दिशा. महिलांनी सांभाळावं, किचन सांभाळावं, पोरं काढावीत, ती वाढवावीत, समाजातल्या थोरा-मोठ्यांचा मान करावा. तिला निर्णयाचा अधिकार नाही. अगदी नवऱ्यापासून वेगळा होण्याचाही नाही. समाज तिच्यासाठीचा निर्णय घेणार. तिची बाजू न ऐकता. तिनं फक्त त्या निर्णयाचं पालन करायचं.
नतालिया ओवरोवाचा कझाक सिनेमा मलिका (2025) हेच दाखवतं. नतालियानं सिनेमात इंगुश कम्युनिटीच्या या रुढी परंपरेचा पडदा कराकरा फाडलाय. 12 वर्षाच्या मलिकाचं आयुष्य सुरळीत सुरु असतं. तिची आई रोझा वडिलांपासून वेगळी राहतेय. मलिका आणि रोझा आई-मुलीपेक्षा मैत्रिणी जास्त वाटतायत रोझाचा एक बॉयफ्रेन्ड आहे. त्यांना लग्न करायचं आहे. हे लग्न झालं तर प्रथेनुसार मलिकाला वडिलांकडे जावं लागेल. वडिलांनी दुसरा संसार थाटलाय. मलिकाला तिथं जायचं नाहीय. आई रोजाला सोडून तर अजिबात नाही. मग अश्यावेळी मलिका काय निर्णय घेईल? यावर हा सिनेमा आहे.

सिनेमाची मांडणी अगदी साधीसोपी आणि सरळ रेषेतली आहे. नतालियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. कझाकस्तानात राहणाऱ्या इंगुश लोकांना तिनं फार जवळून पाहिलं आहे. त्यांचा अभ्यास केलाय. मलिकासारखी एक दोन प्रकरणं तिच्यासमोर होती. त्यांची सिनेमॅटिक मांडणी करायची होती. ही मांडणी वयात येणाऱ्या मलिकाच्या (इझाबेला) नजरेतून घडतेय. अल्लडपणा मागे पडलाय. आता ती वयात आलीय. आई हेच तिचं जग आहे. आईला नवा संसार थाटायचाय. तिनं शोधलेला नवा साथीदार तिलाही आवडतो. तो तिचाही मित्र आहे. उद्या या दोघांचं लग्न झाल्यास तिला वडिलांसोबत राहायला जावं लागणार हे निश्चित आहे. याचंच तिला टेन्शन आलंय, या सर्व परिस्थितीतून घडणारं नाट्य नतालियानं खूप चांगलं घडवून आणलं आहे.

इराणच्या असग़र फरहादीचा द सेपरेशन (2011) सिनेमाची गोष्ट ही अशीच आहे. घटस्फोटाच्या फेऱ्यात अडकलेलं हे जोडपं आणि त्यांची वयात येणारी मुलगी. द सेपरेशनमधली सर्व नाट्य कोर्टात घडतं. तिथं नवऱ्यासोबत न राहण्याची कारणं देण्याची मुभा महिलेला आहे. पण कझाकस्तानमधली परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथं कोर्टापेक्षा प्रथा आणि ती माननाऱ्या समाजाचं महत्त्व जास्त आहे. असगर फरहादीचा हा सिनेमा ओपन एन्डेंड आहे. म्हणजे ती 12-13 वर्षांची मुलगी काय निर्णय घेते हे दाखवलेलं नाही. आता प्रेक्षकांना तिचा निर्णय काय असेल याचा कयास लावायचा आहे.. पण मलिकाचं तसं नाही. मलिकात या 12-13 वर्षाच्या मुलीचं मोठं होण्याची प्रक्रिया दाखवण्यात आलीय. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती हेरतेय. त्यावर आपलं मत बनवतेय. त्यातूनच ती आपला योग्य निर्णय घेते. ही प्रक्रियाच या सिनेमाची जान आहे.

मूल असेल तर घटस्फोटाची प्रक्रिया फार किचकट असते. मोठ्याचा खेळ संपतो, पण मुलांचं अल्लडपण हरवतं. आई वडिलांपैकी एकाची निवड कर, अशी चॉईस त्याला दिल्यास तो किंवा ती काय निर्णय घेतील. अशी मुलं विचित्र मानसिक स्थितीतून जात असतात. मलिकाची अवस्थाही तिच आहे.

संपूर्ण सिनेमात कझाकस्तान मधल्या महिलांचं रोजचं जगणं दाखवण्यात आलंय. बुरखा घालण्याची सक्ती नाही पण डोकं झाकायचंय. पुरुष मग तो वयानं लहान असला तरी त्याला मानसन्मान द्यायचा. हे असं सर्वकाही पुरुषासाठी जगायचं. समाज पण पुरुषी आणि त्यांची मानसिकताही. बाईवर बाळंतपण लादलं जातं. सिनेमात मलिकाची आई रोझा आणि तिची मैत्रीण मरियम यांच्यातला संवाद फार महत्त्वाचा आहे. रोझा म्हणते मी मलिकाची कस्टडी सोडणार नाही. मी तिच्यावर खुप प्रेम करते. मरियम म्हणते ‘म्हणजे माझं माझ्या पाच मुलांवर प्रेम नाही तर. मलिका मोठी होतेय. काही दिवसात तिचं स्वत:चं आयुष्य सुरु होईल. तेव्हा काय करशील? मरियम इंगुश समाजाच्या प्रथ्येतून तावून सुलाखून निघालेय, म्हणूनच ती रोझाला तिच्या घटस्फोटाकडे प्रॅक्टिकली बघायला सांगते.
सिनेमाची मांडणी फ़ेमिनिस्ट आहे. त्यात मलिकाच्या मोठं होण्याची प्रक्रिया आहे. समाज किंवा आईचा आनंद यापैकी तिला एकाची निवड करायची आहे. ती आपल्या पद्धतीनं स्वतःचा निर्णय घेते हे विशेष.





















