कालच्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे यात शंका नाही! हाताशी आलेलं पीक भिजलं, काही ठिकाणी पूर्ण पिकच वाहून गेलं. पण यापेक्षा मोठं नुकसान हे जमिनीवरचा मातीचा पूर्ण थर वाहून गेल्यानं झालं आहे! जमिनीवरचा सुपीक मातीचा थर वाहून जाऊन त्याठिकाणी बाजूच्या शेतातील, माळावरील दगडगोटे वाहून आल्याने बऱ्याच जमिनी आता पुढील काही वर्षासाठी नापीक होऊन बसल्या आहेत, त्या जमिनीला पूर्ववत सुपीक करण्यासाठी बराच खर्च येईल आणि बरीच वर्षे देखील लागतील!
झालं ते अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे, पण ही वेळ आपल्यावर का आली हे शेतकऱ्यांनी एकदा स्वतःला विचारायला हवे! आपल्या आजोबा पणजोबा लोकांनी सुद्धा हीच जमीन कसली, त्यांच्या पिढीत देखील असे भयंकर उन्हाळे पावसाळे येऊन गेले असतील, तरीही जमिनी तग धरून राहिल्या! मग आपल्याच काळात आपल्या जमिनी का वाहून जातायत यावर विचार करण्याची वेळ आली आहे?
आधीच्या पिढीने आपापल्या शेतीला व्यवस्थित कमीत कमी 5 फुटापासून ते 20 फूट रुंदीचे बांध घालून ठेवले होते, जिथं लवणाची किंवा तीव्र उताराची जमीन आहे अशा जमिनीला दगडगोट्यांची व्यवस्थित चाळ लावून बांध घातला होता! अशा प्रकारच्या बांधामुळे कितीही पाऊस पडला तरी पाणी एखादी रात्र जमिनीवर साचून राहायचे पण नंतर त्या चाळीतून पाझरून वाहून जायचे पण माती मात्र अडवली जायची! शिवाय जमिनीच्या बाजूने चर खोदून ती ओढ्याला जोडलेली असायची ज्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी पाझरून या चारीतुन ओढ्याला वाहून जात असे. या जमीनी पूर्णपणे शेणखताच्या जोरावर पिकविल्या जायच्या, रासायनिक खतांचा या जमिनीला गंधही नव्हता, त्यामुळे या जमिनी भुसभुशीत असल्याने पाणी बऱ्यापैकी जमिनीत मुरायचे! बहुतांश ठिकाणी फक्त एक पीक पद्धती होती, खरीफ किंवा रब्बी, दोन्हीपैकी एकच पेरणी व्हायची! पीक कापनी नंतर जमीन नांगरून किमान 2 महिने तरी उन्हात तळुन काढलीं जायची. त्यांनी बांधावर चिंच, आंबा, सीताफळ, बोरी, बाभळी अशी अनेक झाडे लावली, आणि आपण त्याची फळे खाल्ली, सावली घेतली! या आणि अशा बऱ्याच जल आणि मृदा संवर्धनाच्या उपक्रमाने आपल्या अशिक्षित पिढ्यांनी आपल्या जमिनीचे आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून ठेवले होते!
कालच्या पावसामुळे पडलेल्या वाहत्या पाण्याला थांबवण्यासाठी आता जमिनीवर बांधच शिल्लक राहिला नसल्याने ते पाणी प्रचंड वेगाने एका शेतातून दुसऱ्याच्या शेतात शिरले, जाताना सोबत आपल्या पिढ्यांनी जोपासलेली सुपीक माती घेऊन गेले आणि सोबत आणलेले दगड गोटे तेवढे आपल्या जमिनीवर सोडून गेले! शेतकऱ्यांनी झालेल्या प्रकारातून एकदा आत्मपरीक्षण करून पहावे आणि सगळ्याच गोष्टींसाठी शासनाला दोष देण्याऐवजी आपल्या हातून झालेल्या चुका सुद्धा एकदा पडताळून पहाव्यात! आपल्या वाईट खोडीमुळे आपण आपलं स्वतःच, शेजाऱ्यांचं आणि पुढच्या पिढीचं खुओ मोठं नुकसान करत आहोत याची जाणीव शेतकऱ्यांना होणे ही काळाची गरज आहे!
भारतातील कृषी विद्यापीठात बी टेक कृषी अभियांत्रिकी (B.Tech. Agriculture Engineering) नावाचा एक पदवी अभ्यासक्रम अस्तित्वात आहे ज्यामध्ये जल आणि मृदा संधारण या विषयावर सखोल अभ्यासक्रम शिकवला जातो, या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम (M.Tech Soil and water conservation engineering) देखील अस्तित्वात आहे! मात्र या विषयातील विद्यार्थ्यांना शासकीय कृषी विभागाच्या जल आणि मृदा संधारण विभागात पाहिजे ते स्थान दिले गेले नाही, त्याऐवजी सिविल इंजिनिअर किंवा BSc अग्रीकल्चरच्या लोकांना या विभागात पात्रता दिलेली आहे! मूळ विषयातील सखोल अभ्यास नसणाऱ्या किंवा कमी अभ्यास असणाऱ्या लोकांना या विभागात भरती केल्यामुळे भारतात सर्वत्रच जल आणि मृदा संधारण विभागात कमालीची उदासीनता आणि अकार्यक्षमता दिसून येते! कधीही बांधावर न जाणाऱ्या या विभागातील अधिकाऱ्यांनी मागच्या 3 दशकांत शेतकऱ्यांमध्ये जल आणि मृदा संधारणाची जनजागृती करण्यासाठी कसलेही परिश्रम घेतले नाहीत! जल आणि मृदा संधारणाचे फायदे, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या जाणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना अशा समस्यांचा आणि संकटांचा सामना करावा लागणार आहे! याचाच परिणाम म्हणून दरवर्षी हजारो कोटी रुपये शासनाने या विभागामार्फत खर्च करूनसुद्धा जल आणि मृदा संधारणाचा प्रश्न आजतागायत सुटला नाहीये! आणि त्याचा परिणाम आपण कालच्या पावसात पहिलाच आहे!
(सदर ब्लॉगसाठी फोटो हे प्रतिकात्मक असून सोशल मीडियावरून घेतलेले आहेत)
- लेखक महेश हाऊळ हे कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत.