आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे धर्म, भाषा, सण, परंपरा, खाद्यपदार्थ यांचं जे वैविध्य आहे; तसं जगात कुठल्याचं देशात नाही. हे आता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकवताना एक गोष्ट मात्र कायमची आपल्याला सांगायची राहून गेलीये. किंबहुना ती गोष्ट या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची, उल्लेख करण्याजोगी आहे हेच कुणाला कधी वाटलं नाहीये आणि हेच आपलं दुर्दैव आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ देणारी आपली जैवविविधता.


आपला देश जैवविविधतेच्या बाबतीत जगातील टॉप 17 देशांत येतो.

या बाबतीत जगात आपला 9 वा क्रमांक लागतो.

आपल्या देशात जगातल्या जैवविविधतेच्या मोठ्या हॉटस्पॉटमधील चार हॉटस्पॉट आहेत.

हिमालय पर्वतरांगा, पश्चिम घाट, उत्तर-पूर्वेकडच्या डोंगररांगा आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह हे जैवविविधतेच्या दृष्टीनं देशातले सर्वात संपन्न प्रदेश म्हणजे हॉटस्पॉट आहेत.

आज हे सांगण्याचं कारण म्हणजे 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी जगभरातील 100 हून अधिक देशात हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाकडून एक संकल्पना किंवा विषय ठरवण्यात येतो आणि एक देश या दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा आयोजक असतो. यंदा जैवविविधता हा विषय असून कोलंबियासह जर्मनी याचे आयोजक आहेत. उद्देश हाच की जगभरात या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी, चर्चा घडून यावी, पर्यावरणाच्या या महत्त्वाच्या विषयाबाबत सगळ्यांचं लक्ष वेधलं जावं.

जैवविविधतेच्या बाबतीत आपण कितीही संपन्न असलो तरी जगातल्या सात आश्चर्यात आपला ताजमहाल आहे हे जसं आपण अभिमानानं सांगतो. तसं आमच्याकडे हिमालय आहे किंवा सह्याद्री आहे हे आपल्या अभिमानाचा भाग कधीच नसतात. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला ज्या क्रूरपणे मारलं गेलं ते पाहून ऐकून आपण व्यथित होतो, चिडून सोशल माध्यमांवर व्यक्त होतो. पण, हे एक उदाहरण आहे. अशा शेकडो जीवांना माणूसच आपल्या स्वार्थासाठी मारत आलाय. त्यात आपण सगळेच आलो. आपल्या गरजांसाठी, आपल्या हव्यासासाठी आपण अशा अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. यातले कित्येक दुर्मिळ किटक, प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती अस्तंगत झालेत.

गेल्या काही वर्षांत जगानं तापमान वाढ, दुष्काळ, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, भूस्खलन, अशी संकटं अनुभवली आहेत. आता आपण कोरोनासारख्या आपत्तीचा सामना करतोय. पण, लॉकडाऊनमुळे दिसणाऱ्या चमत्कारांमुळे थक्क होतोय. चंदीगढमधून दिसणारा हिमालय, मुंबईच्या समुद्रात बऱ्याच वर्षांनी दिसलेले डॉल्फिन, मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत सध्या अनुभवायला मिळणारी शुद्ध हवा याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतंय. पण, तरिही या गोष्टी कायम राहाव्यात यासाठी आपण कणभरही प्रयत्न करत नाही.

खरं तर निसर्ग आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडू देत आलाय. त्याचा सगळा खजिना त्यानं आपल्याला खुला केलाय. पण, आपण त्यालाच बोचकारतोय. त्यामुळे, निसर्गही कोपलाय. त्यानं काही छोटे मोठे धक्के देऊन इशारा दिलाय. तरिही आपल्याला जाणीव नाहीये. निसर्गानं आता माणसाशी युद्ध पुकारलंय. पुढच्या काही वर्षांत न भुतो न भविष्यती असं संकट माणसासमोर उभं ठाकणार आहे. कोरोनाच्या संकटापासून सुरक्षित राहायला आपल्याकडे घर तरी आहे. पण, आताच आपण निसर्गावरचा अत्याचार थांबवला नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचायला डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीनही नसेल.