Lok Sabha Election History: इतिहास लोकसभा निवडणुकांचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेली ‘मैं भी चौकीदार’ घोषणा भारतीय जनमानसाला खूपच भावली. देशातील नागरिकांच्या संपत्तीचे रक्षण करण्याकरिता, ती भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती जाऊ न देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नरेंद्र मोदी भारतीय जनतेच्या मनात बिंबवू पाहात होते. सर्व भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मैं भी चौकीदार स्टेटस ठेवले होते. राफेल विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी ‘चौकीदार चोर है’ चीं घोषणा दिली होती, त्याला भाजपने ‘मैं भी चौकीदार’ने उत्तर दिले होते. त्यामुळे ही घोषणा काँग्रेसवरच उलटली. पुलवामा आत्मघातकी हल्ला आणि भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा भाजपने या निवडणुकीत फायदा उचलला. सर्जिकल स्ट्राईकमुळे देशभरात भाजपबाबत विशेषतः नरेंद्र मोदींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. यातच काँग्रेसच्या काही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने जनता काँग्रेसवर आणखीनच नाराज झाली. आणि मोदी लाट आणखी मोठी झाली.


नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीनंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी नोटबंदीचा गोरगरीबांवर होत असलेल्या परिणामांवरून भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भाजप भ्रष्टाचार करीत असल्याचा प्रचारही  सोनिया, राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर केला. मात्र नोटबंदीमुळे भ्रष्टाचारी नेत्यांकडील पैसा वाया जात असल्याने सामान्य जनता मात्र नोटबंदीवर खुश होती. बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगा लागत असल्या तरी त्याबद्दल कोणी तक्रार केली नाही. फक्त विरोधकच याबाबत आरडाओरडा करीत होते. खरे तर विरोधी पक्षाकडे फसलेली अच्छे दिनची घोषणा, बेरोज़गारी असे अनेक मुद्दे होते. 20-22 पक्षांची विरोधी आघाडी होती पण त्यांचा एक असा कोणी सक्षम नेता नव्हता. त्यातच मोदींच्या समोर कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. राहुल गांधींना कोणीही गंभीरतेने घेत नव्हते. भाजपने 2014 प्रमाणेच आक्रमक प्रचार नीतीचा वापर केला आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपले स्थान बळकट केले.


दुसरी गोष्ट मुस्लिम मतदारांची. काँग्रेस मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. परंतु 2019 च्या निवडणुकीत मुस्लिम मतांबाबत कोणीही काहीही वक्तव्य केले नाही. मुस्लिम नेते आणि मुस्लिम समाजाच्या संघटना या निवडणुकीत शांत होत्या. त्यांनी कोणतीही मागणी या निवडणुकीत केली नाही. मुस्लिमांचे मुद्दे कोणत्याच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर नव्हते. आपण जर मुस्लिमांविषयी बोललो तर मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपलाच त्याचा फायदा होईल या भीतीने काँग्रेसससह सर्वच विरोधी पक्ष मुस्लिम आघाडीवर गप्प होते.  


विस्कळीत विरोधी पक्ष आणि नवमतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरल्याने भाजपने लोकसभेतील संख्याबळाचा सगळ्यात मोठा विजय प्राप्त केला. 2014 पेक्षाही नरेंद्र मोदींच्या यशाची टक्केवारी खूपच पुढे गेली होती. भाजपला 303 जागांवर विजय मिळाला जो स्वप्नवत होता. भाजप पुन्हा एकदा इतके प्रचंड यश मिळवेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि त्यांना पुन्हा एकदा सत्ता दिली. या निवडणुकीत 67.11 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये मतदानाची टक्केवारी 66.40 टक्के होती. काँग्रेसच्या कामगिरीत 2014 पेक्षा थोडीशी सुधारणा झाली. 2014 मध्ये 44 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत अर्धशतक मारता आले. काँग्रेसचा 52 जागा मिळाल्या. मात्र काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला. राहुल गांधी काँग्रेसच्या परंपरागत उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांच्यासमोर भाजपने स्मृती इराणींना उतरवले होते. अमेठीत पराभव होईल असा अंदाज आल्याने राहुल गांधींना केरळच्या वायनाड या सुरक्षित मतदारसंघातूनही निवडणूक अर्ज भरला. अमेठीतून राहुल गांधींचा पराभव झाला पण वायनाडमध्ये विजय मिळाल्याने राहुल गांधी संसदेत पोहोचू शकले. त्यानंतर झालेल्या काँग्रेस कार्?कारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सोनिया गांधींकडे हंगामी अध्यक्ष


काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघाच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून पराभव स्वीकाराला लागला. नरेंद्र मोदींवर आरोप करीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पटनासाहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हरवले. तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये आलेल्या जयाप्रदा यांना सपाच्या आजम खान यांनी पराभूत केले. मध्य प्रदेशच्या गुणा मतदारसंघात काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपच्या कृष्णा पाल सिंह यांनी पराभव केला.


बाजपने 2014 निवडणूक खर्चातही प्रचंड वाढ झाली होती. 2014 च्या निवडणुकीत 30 हजार कोटी रुपये खर्च झाले होते तर 2019 मध्ये 60 हजार कोटींच्या आसपास खर्चाची रक्कम गेली होती. 2019 ची निवडणूक आतापर्यंतची सर्वात महाग निवडणूक ठरली आहे. केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील ही महागडी निवडणूक झाल्याचे सीएमएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एका मताला जवळ जवळ 700 रुपये खर्च आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने 1264 कोटी रुपये तर काँग्रेसने 820 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती या दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला दिली.