या निवडणुकीसाठी भाजपने मंत्री महाजन यांचा शब्द ऐकून पक्षासह सर्वसामान्य लोकांना नवखे व बिल्डर, प्रॉपर्टी लॉबीतील कोट्यधीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल यांच्या पारड्यात उमेदवारीसाठी मंत्री महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री कामात आली आहे. मावळते आमदार डॉ. जगवानी हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक मानले जातात. खडसे यांनी मंत्रीपद त्यागल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपात गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीचा फटका डॉ. जगवानी यांना बसला. त्यांची उमेदवारी कापली गेली. त्यांच्यासाठी खडसेही प्रतिष्ठा पणाला लावू शकले नाहीत. डॉ. जगवानींची उमेदवारी वगळून पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे मंत्री महाजन यांचे पक्षांतर्गत वजन असल्याचे सिध्द झाले आहे.
मंत्री महाजन यांनी नवख्या पटेल यांना रिंगणात उतरवल्यामुळे त्यांना विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. पटेल या लढाईसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. शिवाय, काही व्यवहारात मंत्री महाजन, पटेल व खटोड बंधू पार्टनर सुध्दा आहेत. मावळते आमदार डॉ. जगवानी हेही अशाच काही व्यवहारात खडसेंचे पार्टनर होते. हा योगायोग भाजप उमेदवारांबाबत लक्षवेधी आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे पटेल यांच्यासाठी जळगावातील बिल्डर व प्रॉपर्टी डिलर लॉबी कामाला लागली आहे.
पटेल यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवकर, शिवसेनेचे मात्र एबी फॉर्मच्या घोळाने अपक्ष ठरलेले सुरेश चौधरी यांचे आव्हान होते. रिंगणात खाविआचे बरडे, मनसेचे कोल्हे हेही होते. पण ही मंडळी तडजोडवाली आणि मंत्री महाजन यांचा शब्द मानणारी होती. शिवसेनेचे जिल्ह्यातील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्री महाजन यांच्याशी गुळपीठ आहे. भाजप अंतर्गत मंत्री महाजन व खडसे यांच्यात सुंदोपसुंदी आहे. गुलाबराव पाटील व खडसे यांच्यात उघडपणे व्यक्तीगत वैरभाव आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांचे उमेदवार पटेल यांच्यासाठी शिवसेनेचे चौधरी व अमोल पाटील यांची माघार सहजपणे झाली. उरला होता प्रश्न देवकर यांचा. मंत्री महाजन व पडद्यामागून मुख्यमंत्री यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले.
राजकीय पक्ष कशा प्रकारे तडजोड घडवून आणतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे विधान परिषदेची जळगावची जागा भाजपची आहे हे लक्षात घेवून देवकर यांच्या माघारीचा आदेश बारामतीतून आला. जळगावातून देवकर बाजूला होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले व विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्यासाठी भाजपने मदत करायचे आश्वासन दिले आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेससह स्वपक्षातील बंडखोरानेही आव्हान दिले आहे. पुण्यात भोसलेंच्या विजयाचा मार्ग भाजपच्या अंतर्गत मदतीतून सुकर होईल. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपापसात हे सर्जिकल स्ट्राईक केले आहे. पुण्यात काय होईल सांगता येत नाही. पण जळगावात चंदूलाल पटेल यांचा विजय निश्चित झाला असून मंत्री महाजन यांनी आता पटेल हे सर्वपक्षिय उमेदवार असल्याचा दावा केला आहे. जळगावची खाविआ आणि जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये सुरेश जैन यांना मानणारे नगरसेवक पटेल यांना मतदान करतील. मंत्री महाजन आणि जैनांचे गूळपीठ आहेच.
मान्यवर व मातब्बर उमेदवारांच्या माघारीने या निवडणुकीतील मतदारांचे भाव घसरले आहेत. यापूर्वी दोन वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. जगवानी यांचीही बिनविरोध निवड झाली होती. तेव्हाही मंत्री महाजन यांच्या शिष्टाईनंतर कैलास सोनवणेंनी माघार घेतली होती. पटेल यांच्यासाठी मंत्री महाजन यांचा शब्द पाळून डॉ. जगवानी यांनी माघार घेतली. आता मतदानाच्या निमित्त मत खरेदीचा घोडेबाजार रंगण्याची शक्यता नाही. नगरसेवकपदावरुन पायउतार होताना कमाईची संधी हुकल्याने नगरसेवकांमध्ये मातम सारखे वातावरण आहे.
विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघात 548 मतदार आहेत. सध्या सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मावळत्या पालिकेतील नगरसेवकांचे बलाबल कागदावरच आहे. यात सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे 139, भाजपचे 103, शिवसेनेचे 64 आणि 57 खाविआचे नगरसेवक आहेत. या शिवाय इतर ठिकाणी आघाड्यांचे नगरसेवक आहेत. कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होते. मात्र मंत्री महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, खाविआ यांच्या गोटात घुसून सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले. अर्थात, देवकर यांनी नाराजीनेच माघार घेतली आहे. सर्व प्रकारच्या मनी, मसल व मासची ताकद लावली असती तर देवकरांसाठी अपेक्षित निकाल साध्य झाला असता.
आता चंदूलाल पटेल यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. मात्र, अपक्ष असलेले व जळगाव जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे बंधू ॲड. विजय पाटील प्रचारात रंगत आणू शकतात. मराठा क्रांती मोर्चाने जळगाव जिल्ह्यात एकीचे वातावरण निर्माण केले आहे. याचा पडद्यामागून नीट लाभ घेतला तर मराठा समाजाचे किमान 150 नगरसेवक आहेत. ॲड. पाटील यांना मंत्री महाजन व मंत्री पाटील विरोधकांची छुपी मदत होवू शकते. बाकी इतरांचे पटेल यांच्यासाठी आव्हान नाही. विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही मंत्री महाजन यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर मात करीत खाविआ, शिवसेना, काँग्रेसमध्येही आपले मैत्रिपूर्व कनेक्शन असल्याचे सिध्द केले आहे. मंत्री महाजन यांनी हेच संबंध जिल्हा विकासासाठी वापरावेत अशी जनतेची अपेक्षा आहे.