जळगाव शहरात नागरी जिव्हाळ्यांच्या अशक्य कोटीतील "अ" कारांशी संघर्षाचा विडाच जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी उचलला आहे. निंबाळकर यांनी नागरीकांसाठी अशक्य वाटणारे अतिक्रमण हटाव आणि अस्वच्छता भगाव या 2 विषयांना थेट हात घालून 2 सार्वत्रिक चमत्कार करुन दाखवले. यात सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा अनेक विषयांमधील बेधडक बदल अवघ्या 6 तासांमध्ये करुन दाखवले. एखादा पोलीस आधिकारी बेधडक वागत असेल तर त्याला "सिंघम" उपाधी दिली जाते. सिंघम नावाने अजय देवगणचा चित्रपट गाजला आहे. एखादा पुढारी 24 तासात परिवर्तनाचे प्रयत्न करीत असेल तर त्याला "नायक" संबोधले जाते. नायक हा अनिल कपूरचा गाजलेला चित्रपट. पण, प्रशासनातील एखादा अधिकारी अवघ्या 6 तासात बदल घडवून दाखवत असेल तर त्यासाठे "राजे" नावानेच चित्रपट काढावा लागेल. कारण जळगावचे जिल्हाधिकारी व मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे आहेत. त्यांना जळगावकर लवून मुजरा करीत राजे संबोधू लागले आहेत. शोले चित्रपटात गब्बरसिंग असलेला अमजद खानचा एक डायलॉग होता, बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा!
जळगावात गोलाणी संकुलात कचरा करणाऱ्याला इतर व्यापारी म्हणतात, कचरा डस्बिन में डाल वरना राजे आ जाएगा! अजिंठा चौकात अतिक्रमण करणाऱ्याला इतर म्हणतात, पसारा आवरुन घे नाहीतर राजे येईल. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने घडविलेले हे ऊलगुलान आहे. गोलाणी मार्केट हे जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तेथे 1050 दुकाने आहेत. रोज किमान 10 ते 15 हजारावर नागरिक या संकुलात येतात. गेल्या 5 वर्षांपासून या संकुलातील साफसफाई बंद होती. मनपाची 17 मजली इमारत याच संकुलाचा भाग आहे. म्हणतात ना, दिव्याखाली अंधार तसे गोलाणीतील सफाईचे होते. सहा वर्षे गोलाणीचा उकिरडा झाला होता. दि. 18 जुलैला स्वतः निंबाळकर यांनी गोलाणीत ठाण मांडून अवघ्या 6 तासात 500च्या वर ट्रॅक्टर ट्रॉली कचरा साफ केला. सहा वर्षे बाळगलेला अस्वच्छतेचा नासूर एका झटक्यात संपला. नाक दाबले की तोंड उघडते याचा प्रत्यय त्यांनी आणला. अस्वच्छतेचे कारण ठरलेले गोलाणी संकुल 3 दिवस बंदची नोटीसच जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी दिली. मग काय, अस्वच्छतेत व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शहाणपण आले. सफाईसाठी प्रत्येकी 1100 रुपये द्यायला तयार झाले. आता नियमित पैसे देत ठेकेदारामार्फत सफाई होणार आहे. अस्वच्छतेचा हा लढा यशस्वी झाला.
राष्ट्रीय महामार्ग 6 आणि औरंगाबाद राज्य मार्ग यांच्या चौफुलीला अजिंठा चौक म्हणून ओळखले जाते. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या या चौकातून दिवसभरात किमान 30 हजारावर वाहनांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद रोड परिसरात आणि राष्ट्रीय महामार्गलगत नागरी वस्ती वाढली. त्यामुळे अजिंठा चौफुली हे हातगाडी, टपरी, रिक्षा आदींच्या अतिक्रमणासाठी स्वस्तातले ठिकाण झाले. कारण, महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात आहे आणि त्यांचे कार्यालय धुळ्यात आहे. त्यामुळे दर तासाला अजिंठा चौकात वाहतूक खोळंबली तरी वाहतूक पोलीस, मनपा आणि रामप्रा हे काहीही कार्यवाही करु शकत नव्हते. महामार्ग व औरंगाबाद रस्ता खोळंबला की मुंबई, नागपूरसह औरंगाबाद, पुणे सोबत जळगाव एमआयडीसी व जळगाव बाजार समितीकडे होणारी अवजड वाहतूकही खोळंबायची. अशा वाहतूक कोंडीत सापडते हा मनस्ताप देणारा वाहनातील सक्तीचा कारावास असायचा. परिसरातील व्यापारी, दुकानदार आदी सर्वच मनपाकडे अतिक्रमण हटावची मागणी करीत. रामप्रा कधी तरी कार्यवाही करायचे. पुन्हा जैसे थे स्थिती व्हायची. अजिंठा चौफुलीवरील कायमच्या दुखण्यावर अक्सीर इलाज निंबाळकर यांनी अवघ्या 6 तासात काढला. चौकालगतचे अतिक्रमण निंबाळकरांच्या तिहेरी भूमिकेत निघाले. जिल्हाधिकारी, प्रभारी मनपा आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी. मनपा कर्मचाऱ्यांचा ताफा आणि तगडा पोलिस बंदोबस्त सोबत असताना अवघ्या ६ तासात अजिंठा चौक अडचणीची झाडे मोडून आणि कृष्ण मंदिराचे अतिक्रमण साफ करुन खुला झाला. ही कारवाई करताना निंबाळकर यांचे सोबत पोलीस अधीक्षक, रामप्राचे अधिकारी होते. 150/200 जणांचा जमाव पाहत होता. महापौर नितीन लढ्ढा व आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. रस्त्यावर अडथळा ठरणारे मंदिर हे आमदार भोळेंच्या नातेवाईकाचे होते. त्यामुळे तेही तेथे हजर होते. अतिक्रमण काढायला मदत करीत असल्याबद्दल तेथेच आमदाराचा सत्कार निंबाळकर व लढ्ढा यांनी केला. आमदार सत्कार घेऊन गेल्यानंतर निंबाळकर यांनी कृष्णमंदिरात आरती करुन मूर्ती हलविली. ती सन्मानाने दुसरीकडे ठेवली आणि अतिक्रमणात असलेला मंदिराचा ढाचा निंबाळकरांनी जमिनदोस्त केला. निंबाळकरांची ही कारवाई ऊलगुलानच आहे. भाजपच्या आमदाराच्या शहरात त्याच्याच नातेवाईकाचे अतिक्रमित मंदिर पाडले गेले. अतिक्रमणात असलेली इतर धर्मस्थळांची ढाल बाळगणाऱ्या मंडळींना हा इशारा आहे. अजिंठा चौकातील अतिक्रमण हटावचा समारोप असा झाला. अर्थात, उपकथानक नंतर सुरु झाले. मंदिरच पाडून टाकल्याचे कळल्यावर आमदार सुरेश भोळेंनी निंबाळकरांवर शाब्दिक हल्ला करीत म्हटले, माझा विश्वासघात केला. दुसऱ्या दिवशी निषेधाचे निवेदन घेऊन आमदार निंबाळकरांकडेच गेले. स्व जातीयांचा दबाव गट तयार करुन अतिक्रमित पाडलेले मंदिर पुन्हा उभारायचा आग्रह आमदार भोळेंनी धरला. अर्थातच, जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन देणे भाग होते.
जळगाव शहराने टपरी हटाव प्रकरणात हट्टाला पेटलेल्या एका आमदाराचे गर्वहरण पाहिले आहे. त्यानंतर आमदार भोळे दुसरा इतिहास लिहिण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक रहदारीस अडथळे ठरणारे देवस्थानांचे अतिक्रमण हटवा असे आदेश मुंबई हायकोर्ट व दिल्ली सुप्रीम कोर्टने दिले आहे. तरी सुध्दा आमदार भोळे अतिक्रमीत व पाडून टाकलेल्या मंदिरासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. हे करताना आमदार भोळे म्हणतात, माझा विश्वासघात केला. हे म्हणताना आमदार भोळे जळगावकरांचा विश्वासघात करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही का? जळगाव शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे एका रात्रीत मनपाला हस्तांतर करुन दारु दुकानांना संरक्षण कोण देत होते? जळगाव मनपा व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांसाठी दुकाने भाड्याने देण्याचा रितसर ठराव केलेला असताना त्याला विरोधाची भूमिका भाजपच्या एका माजी आमदाराने घेतली होती. व्यापाऱ्यांकडून पैसा गोळा करुन त्यांची दिशाभूल केली होती. या प्रकरणातही आमदार भोळेंनी उलटसुलट पत्रापत्री करुन व्यापाऱ्यांनी फितवले. नंतर काय घडले, तर हायकोर्टने व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव करायचे आदेश दिले. मुख्यमंत्री विशेष निधीतून मिळालेल्या 25 कोटींसाठीही आमदार भोळेंनी उलट-सुलट पत्रापत्री केली आहे. आता 25 कोटींची कामे बांधकाम विभाग करणार असा आमदार भोळेंचा आग्रह आहे. आमदार भोळेंना या सर्व कोलांटउड्या आगामी निवडणुकीत त्रासदायक ठरतील. अंदाज असा आहे की, आमदार भोळे हे भाजपचे उमेदवारही असणार नाहीत. जळगावचे भाजप आमदार मंदिराच्या अतिक्रमणासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असताना धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी मात्र मंदिराचेच अतिक्रमण काढण्यासाठी तेथील शिवसेनेशी पंगा घेतला आहे. दुसरीकडे आमदार गोटेंनी संरक्षण दिलेली पांझरापात्रातील चौपाटी धुळे मनपा व प्रशासनाने हटविली आहे. अगदी आलिकडे नकाणे रोडवरील अतिक्रमित व वादग्रस्त हॉटेल कुणाल परमिटरूम व बिअरबार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केला आहे. हे अतिक्रमण काढायला महिला सरसावल्या होत्या. आमदार गोटेंनी शहरातील 19 अतिक्रमणे काढायला पुढाकार घेतला होता. जळगावचे आमदार भोळे मात्र अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने असल्याचे चित्र समोर आले आहे.
(ता. क. - वरील मजकूर ऑपरेट करीत असताना जळगाव मनपा आयुक्तपदी मनोहर हिरे यांच्या नियुक्तीची चर्चा होती. मात्र तसे काही नंतर समोर आले नाही.)
‘खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :