खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 11:29 AM (IST)
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात मागेल त्याला शेततळे या योजनेत २८० तलावांचा लक्षांक घेण्यात आला आहे. जामनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुकाभरात शेतकऱ्यांच्या शिवारसभा घेवून जवळपास ५०० शेततळी करण्याचा निर्धार केला आहे. तसे झाले तर हा संपूर्ण राज्यभरात विक्रम असेल. खान्देशात धुळे व नंदुरबार तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. त्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यापासून पाणी टंचाई आहे. अशा वातावरणात या दोन्ही जिल्ह्यात शेततळ्यांची योजना घेण्यासाठी फारसे शेतकरी तयार झालेले नाहीत. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात शेततळी योजना शेतकऱ्यांनी स्वीकारली आहे. जलयुक्त शिवार योजनेत गत वर्षापासून सन २०१६ पासून मागेल त्याला शेततळे योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तलावाच्या आकारानुसार जवळपास ५० हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकते. याशिवाय प्लास्टीक कागद अच्छादनासाठी सुद्धा ७० हजार रुपयांपर्यंत निधी मिळू शकतो. जळगाव जिल्ह्यात सन २०१६- १७ च्या दरम्यान २,००० शेततळी करण्याचा सरकारी लक्षांक आहे. यासाठी कृषि विभागाकडे ऑनलाईन सेवाशुल्क भरुन ३,२८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जानुसार २,१८६ ठिकाणी शेततळी होवू शकतात अशा जागा उपलब्ध आहेत. जागा अयोग्य असल्याची प्रकरणे १९७ आहेत. शेततळे करण्यासाठी मंजुरी दिलेली प्रकरणे २,१५२ असूनकार्यारंभासाठी ७५५ आदेश दिले आहेत. यानुसार आता शेततळ्यांची कामे शेत शिवारात वेगात सुरू आहेत. जळपास १ कोटी ४५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. तालुकानिहाय शेततळ्यांचा लक्षांक पुढील प्रमाणे - अमळनेर सर्वाधिक ४५०, चाळीसगाव २८५, जामनेर २८०, पारोळा १७०, जळगाव १४०, पाचोरा ११५, मुक्ताईनगर १००, धरणगाव १००, एरंडोल ८५, भुसावळ ७०, बोदवड ६०, चोपडा ५५, भडगाव ५०, रावेर ३५, यावल ५. या प्रमाणे जिल्ह्यात २,०००शेततळ्यांचा लक्षांक आहे. जामनेर पॅटर्न राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर तालुका आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जामनेर येथे झालेल्या नागरी सत्कार प्रसंगी महाजन यांनी संपूर्ण तालुका सिंचनमय करणार असे सांगितले होते. ही बाब लक्षात घेवून तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव यांनी जामनेर तालुक्यात किमान १,००० शेततळी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी ते स्वतः गावेगावी शेतकऱ्यांच्या शिवारसभा घेत आहेत. शेततळ्यांच्या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांचे काही आक्षेप आहेत. सर्वांत जास्त अडथळा हा शेततळ्यासाठी लाणाऱ्या जमीनीचा आहे. मोठ्या आकारातील शेततळ्यासाठी शेतजमीनही जास्त जाते, असे शतकऱ्यांचे म्हणणे आहे. तळ्याच्या जागेतून निघणारी माती टाकण्याची सुध्दा समस्या असते. या बरोबरच शेतकऱ्यांना वाटते की, अनुदानाच्या रकमेतून तळ्याचा खर्च होवून काही रक्कम शिलकी असावी. या दोन्ही आक्षेपांना खोडून काढत शेतकऱ्यांचे काहीही नुकसान होत नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न तालुका कृषि अधिकारी जाधव करीत आहेत तलावासाठी जागा गेल्यानंतर त्यातील माती तलावाच्या शेजारी भराव म्हणून टाकली जाते. त्या भरावावर सरी पद्धतीने फळझाड लागवड करता येत. यातील अंतरही टप्पा पद्धतीमुळे कमी ठेवून जास्त झाडे लागवड करता येतात. तलावासाठी जेवढी जमीन जाते, तेवढीच जागा या मातीच्या भरावावर उपलब्ध होते. तलावाचा आकार हा आपल्या शेताच्या गरजेनुसार घेतल्यास त्यावरील खर्चही नियंत्रणात राहतो. तालुका कृषि अधिकाऱ्यांनी शिवार सभांचे केलेले आयोजन पाहता जामनेर तालुक्यात किमान ५०० शेतततळ्यांचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता दिसत आहे. तसे झाले तर जामनेर तालुक्याचा विक्रम महाराष्ट्रात होईल. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जामनेरसाठी भगीरथ ठरले असे म्हणता येईल.