गणेशोत्सव म्हणजे उभ्या महाराष्ट्राचाच मानबिंदू. पुण्यातून सुरुवात झालेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवात पुणे कायमच अग्रस्थानी राहिलंय. पेशवेकालीन सारसबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई, लोकमान्यांचा केसरीवाडा आणि मानाचे सगळे गणपती, त्यांचे देखावे, रोषणाई बघायला तर जगभरातली मराठी आणि परदेशी माणसं आवर्जून पुण्यात दाखल होतात.

पुण्यातल्या पेठा तर गणेशोत्सवाच्या काळात सगळ्यांचा केंद्रबिंदू होतो. गणपती बसवायच्या तयारीपासून आणि चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत पुण्यातल्या घरांतील एक तरी व्यक्ती या ना त्या कारणाने शहरातल्या मध्यवस्तीत एकदातरी चक्कर मारतेच. पुण्यातल्या पेठांना नवचैतन्य देणारा काळ असतो.

पुण्यातली समस्त तरुणाई या काळात रस्त्यांवर उतरते. मित्रांसोबत पेठेतल्या गणपतींचे देखावे बघत, रस्त्यांवर रात्रीबेरात्री गप्पा मारत तंगडतोड करणं म्हणजे खरंतर एक अनुभूती आहे. त्या सुखाचं वर्णन शब्दात नाही करता येत, ज्यांनी अनुभवलंय त्यांनाच ते समजतं.

रात्री-अपरात्री भटकणाऱ्या ह्या पब्लिकच्या खाण्यापिण्याची जय्यत सोय करायला शेकडो हॉटेल्स, दुकानं, हातगाड्या तर असतातच पण ताजे घरगुती पदार्थ तयार करुन विकणारे बिननावाचे तात्पुरते स्टॉल्सही पुण्यातल्या घरांच्या, दुकानांच्या बाहेर मिळेल त्या जागेत सुरु होतात.

वडापाव या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय खाद्यापासून सुरुवात झालेल्या तरुणाईची खाद्यभ्रमंती, रात्री उशिरापर्यंत मिळणाऱ्या मिसळ, पावभाजी, पराठे, पुलाव, डोसे, इडलीच्या स्टॉल्सवर जाऊन थांबते. अधेमधे भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली यांच्या जोडीला पुण्यात 3-4 वर्षांपूर्वीच सुरु झालेला ‘शेवपाव’ रस्त्यावर भटकणाऱ्यांच्या जीवाला मोठा आधार देऊन जातो. आजकाल पंजाबी पदार्थ देणारेही अनेक स्टॉल्स वाढत चालले आहेत. या दिवसात कधीच न मिळणारा उसाचा रस बाहेर मंडईत गेल्यावर लक्ष वेधून घेतो, जरा बरं वाटतं.

मंडई बाहेरचे स्टॉल्स, शनिवारवाड्याबाहेरच्या गाड्या म्हणजे ग्रुप्सनी गणपती बघायला आलेल्या भक्तांच्या विसाव्याच्या हमखास जागा. साधारण 15 वर्षांपूर्वीपर्यंत तुळशीबागेच्या बाजीराव रस्त्याच्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक हातगाड्या उभ्या असायच्या, तिथेही वडापाव, डोसा, अंडाभुर्जी खाणाऱ्यांची रग्गड गर्दी असायची.

विसर्जन मिरवणूक म्हणजे तर रस्त्यावर पदार्थ विकणाऱ्यांच्या व्यवसायाची कळसाची रात्र. पण विसर्जनाला खरा ‘धंदा’ होतो तो वडापाव, दाबेली आणि आजकाल शेवपावचा. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीत नाचून, ढोल ताशे बडवणाऱ्या अनेक पथकातली मुलंमुली हे पदार्थ  अक्षरशः हजारोच्या संख्येने उभ्याउभ्या संपवतात. चांगला स्पॉट असेल तर गाडीवाल्यांचा एकेक महिना होत नाही येवढा अफाट सेल आणि कमाई एका रात्रीत होते. एवढा प्रचंड ‘सेल’ होतो की असे स्टॉल्स, हातगाड्या तात्पुरत्या चालवायला आजकाल पार युपी, बिहारमधूनही लोकं पुण्यात येतात आणि तात्पुरती कमाई करुन परत जातात.

या निमित्ताने जाताजाता यंदाची परिस्थिती सांगतो. यंदा मुसळधार पावसामुळे आणि अजून गौरी विसर्जन न झाल्याने पुण्यातल्या रस्त्यांवर देखावे बघायला येणार्यांची तितकीशी गर्दी अजूनही झालेली नाही. भेटलेले ओळखीचे काही हॉटेल्स, स्टॉल्सवाले अजून धंद्याला सुरुवातच नाही म्हणत शांत होते. त्याचवेळी सहज फिरत असताना शहरातल्या अगदी मध्यवस्तीत मक्याच्या कणसांची गाडी लावणारा जेमतेम वीस-बावीस वर्षांचा एक बिहारी मुलगा, राजू चौहान भेटला. मुलगा स्मार्ट होता. पावसाळी वातावरणात येणाऱ्याजाणाऱ्यांना ‘भैय्या भैया’,करुन भरपूर कणसं विकत होता. जरा चौकशी केल्यावर त्यानी एकेक गोष्टी सांगितल्या. त्या ठिकाणी साध्या हातगाडीसाठी तो दिवसाला तब्बल एक हजार रुपये भाडं मोजतो. गणेशोत्सवात मक्याची कणसं विकून ‘बाइज्जत’ कमाई करुन हा मुलगा गणेशोत्सवानंतर पाटण्याला परत जातो.

असे “बाहेरुन” येऊन “आपल्या” गणेशोत्सवात काम करुन पैसे कमावून परत जाणारे लोकं बघितले की आवश्यक शिक्षणही न घेता फक्त सॉफ्टवेअरमधली नोकरी, एसी ऑफिस, महिन्याला लाखभर पगार, महागडा मोबाईल आणि दिवसभर वायफाय अॅक्सेस मागणाऱ्या आणि कष्टाची काम हलकी मानणाऱ्या आपल्या अनेक मराठी मुलांची मला कीव येते.

यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या पुण्यात, सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत हे “बाहेरुन” आलेले लोकच स्टॉल्स लावताना दिसले, तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही. सध्यातरी ती वेळ येऊ न देता, मराठी मुलांना व्यावसायिक होऊन आपल्या पायावर उभे रहाण्याची बुद्धी देण्यासाठी मी गणपतीबाप्पाची प्रार्थना करु शकतो.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:


खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ

खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’

खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची

खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी

खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा

खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम

खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा